खान्देशातील नवदर्गा मुधाईदेवी

मुधाईदेवी
मुधाईदेवी

खान्देशातील नवदर्गा मुधाईदेवी

अंबाबाईचे प्रतिरूप वाघळीची मुधाईदेवी :
(खान्देशातील नवदर्गा – ८ / प्रा.बी.एन.चौधरी/९४२३४९२५९३)

खान्देशातील भडगाव-चाळीसगाव राज्य मार्गावरील वाघडी गावाजवळ श्री मुधाई देवीचे प्राचीन मंदिर आहे. हे भारतातील पुरतत्वखात्यामार्फत संरक्षित केले गेलेले महत्वाचे मंदीर आहे. हेमाडपंथी शैलीत बांधलेले हे मंदिर जीर्णशिर्ण अवस्थेत असले तरी त्याचे शिल्पशैलीचे वेगळेपण अधोरेखीत करणारे आहे. मंदीरातील मुधाई देवी अंबाबाईचे प्रतिरूप मानले जाते. मंदिरातील स्वयंभू अनघड मूर्ती मनभावन असून तिचे दर्शन प्रासादीक आनंद देते.

चाळीसगावकडून वहात येणाऱ्या तितूर नदीच्या काठावर राज्यमार्गाला लागून असलेलं हे मंदिर दिसताक्षणी लक्ष वेधून घेते. मंदिर एका कृत्रिम ढिगाऱ्यावर वसलेले असून ते आता अर्धवट उद्ध्वस्त स्थितीत आहे. हे इस ११५०-१२००  च्या आसपास बांधले गेले आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून पाच शाखांनी बनलेल्या नंदीनी प्रकाराच्या दगडी प्रवेशद्वाराने अंकीत आहे. ललाट बिंबाच्यावर नवग्रहाच्या नऊ मूर्त्या कोरलेल्या आहेत. 

मंडपाकडे जाणारे गर्भगृह, अर्धमंडप, मंडप आणि पोटिको यांचा समावेश तारामय योजनेत आहे. मंदिराचा ढाचा २४ दगडी खांबांवर उभा आहे. ४ खांबाचा एक समुह अश्या ६ समुहांवर मंदिराचे छत होते. मंदिर पूर्णपणे जतन केलेले नाही. त्यामुळे  शिखर गहाळ झालेले असून ते नव्याने स्लॅब टाकून संरक्षित केले आहे.

त्यातील पिठा, वेडीबंध आणि जंघा सारखे भाग चांगले जतन केले गेले आहेत. त्याच्या संरक्षणासाठी नंतर जोडणी केली आहे. मंदिराच्या भिंती रत्न, पर्णसंभार, भौमितिक आणि गवतमुखाच्या रचनांसह कमीत कमी सजावटींनी सजलेल्या आहेत. उत्तर, पश्चिम आणि दक्षिणेकडील मध्य भिंतीवर मुख्य शिल्पे अनुक्रमे चंडिका, सूर्य आणि गणेश यांच्या उभ्या असलेल्या प्रतिमा आहेत.

ज्या अत्यंत बारीक कलाकुसरींनी युक्त आहेत. मंदिराची पश्चिम बाजू बऱ्यापैकी शास्वत असल्याने ती मंदिराच्या वैभवाची आणि कलाकुसरीची साक्ष देते. हे मंदीर यादकालीन असून परकीय आक्रमणात याचा अंशतः विध्वंस झाला असावा.

मंदिराच्या दरवाजाच्या चौकटीच्या आत, छत आणि खांब सुशोभित केलेले आहेत. लिंटेलमध्ये दोन प्रतिमा आहेत एक दुसऱ्याच्या वर ज्या वाईटरित्या जीर्ण झाल्यामुळे ओळखल्या जात नाहीत. गर्भगृहाच्या आत उमा-महेश्वराची प्रतिमा असून एका वेदीवर नंदी दिसत आहे. मंदिराच्या बाहेर दर्शनी भागात होमकुंड आहे. हे मंदिर सुरुवातीच्या मध्ययुगीन काळातील सर्वात महत्त्वाचे मंदिर आहे जिथे देवीच्या रूपाची पूजा केली जाते.

मंदिराच्या बाजूने वाहणारी तितूर नदी बांध घालून अडविण्यात आल्याने या परीसरात जलाशय तयार झाले आहे. दूरदूर पर्यंत दिसणारा जलाशयाचे विहंगम दृष्य आणि भोवतालचा हिरवा निसर्ग क्षणार्धात मनाला आनंदाच्या झुल्यावर नेतो. मुधाई देवी वाघळी गावाची ग्रामदेवता आहे.

वाघळीला चक्रधरांचे वास्तव्य
वाघळी गावाला महानुभाव पंथीय संकल्पना स्थान म्हणून मान्यता आहे. या गावात भगवान चक्रधरांनी एक रात्र मुक्काम केल्याची नोंद आहे. गावातील भगवान शिवाच्या मंदिरात चक्रधर स्वामींनी मुक्काम केला होता. त्या नंतर ते कनाशी क्षेत्री गेले होते. या मुक्कामात स्वामींनी ज्या जागेवर निद्रा घेतली ती जागा, आसन मांडले ते स्थान, जेथून दृष्टीक्षेप टाकला ती खिडकी आणि ज्या खांबांना स्पर्श केला ते खाब पूजनीय झाले आहेत. भक्तांमध्ये त्यांना दर्शन म्हणून मान्यता आहे.

मुधाईदेवी भोसले घराण्याचे दैवत :
याबाबत सविस्तर माहिती बघता मुधाईदेवी नागपूरच्या छत्रपती घराण्याच्या कुळदैवत आहेत. देवीचे मुख्य मंदिर हे सातारा जिल्ह्यातील देवूर या गावी आहे. येथे देवीचे मंदिर २० फूट खाली भूमिगत दगडी गुहेत आहे. पुण्याहून पंढरपूरकडे जातांना लोणंद फाटा लागतो. तेथून साताऱ्याकडे जातांना जवळच देवूर गाव आहे. येथे जमिनीवर भव्य मंदिर असून प्रांगणात ३ दीपमाळा आहेत. जमिन सपाटी वरुन २० पायऱ्या खाली गेल्यावर एक भव्य लाकडी सभामंडप लागतो. येथून ३ पायऱ्या खाली गेल्यावर भूयारात एकाच व्यक्तिला जाता येईल असे प्रवेशद्वार आहे.

तेथून वाकून आत गेल्यावर दगडी गाभारा आहे. ज्यात देवीची भव्य प्रसन्न मूर्ती आहे. येथे एकावेळी ४/५ भाविकच बसू शकतात. बाहेर सभामंडपात दोन महादेवाच्या पिंडी आहेत. पैकी एकीवर दोन शिवलिंग आहेत. अश्या प्रकारची ही महादेवाची एकमेव अद्भूत पिंड असावी. जवळच भक्त मुधोजी चव्हाण यांची शिळा आहे.

भोसले घराण्याच्या रघुजीराजे भोसले (हिंगणेशाखा) आणि छत्रपती शिवाजी महाराज भोसले (वेरुळ शाखा) या दोन शाखा असून रघुजीराजे हे नागपूर भोसले साम्राज्याचे अधिपती होते. या घराण्याचा राजवाडा देवूर गावात आहे. देवूर जवळील दहिगावचे भक्त मुधोजी चव्हाण हे कोल्हापूरच्या अंबाबाईचे भक्त होते. ते कोल्हापूरला नित्य पायी चालत जावून अंबामातेचं दर्शन घेत असत. ८०व्या वर्षी वृध्दापकाळाने त्यांना जाणे शक्य नव्हते तेव्हा त्यांनी आईला साकडे घातले.

मातेने प्रसन्न होवून त्यांच्या सोबत गावी येण्याचे मान्य केले. ते चालायला लागले तेव्हा चालतांना राजांनी मागे बघू नये अशी अट देवींनी घातली. चालतांना मातेच्या नुपूरांचा आवाज ऐकू न आल्याने मुधोजींनी मागे पाहिले. तेव्हा अचानक वीज कडाडली. टेकडी दुभंगली आणि देवी क्षणार्धात अंतर्धान पावली. तीच ही जागा. या ठिकाणी आजही टेकडी २० फूट जमिनीत दुभंगलेली दिसते. याच ठिकाणी भुयारात देवीची स्वयंभू मूर्ती विराजमान आहे. तेच हे श्री मुधाई देवीचे मंदीर.

भक्त मुधोजींना देवी प्रसन्न झाली म्हणून तिचे नामाभिधान मुधाई असे झाले. हेच नागपूरच्या भोसले घराण्याचे कुलदैवत. नवरात्रीत येथे मोठी यात्रा भरते. भोसले घराण्याचे आजचे वंशज श्रध्देने येथे हजेरी लावतात. देवीच्या मंदिराच्या बाजूला पाण्याचे पवित्र कुंड व म्हसोबाचे मंदिर आहे. या संस्थानाचा वाघळीशी काही संबध आहे कां ?

याबाबत अधिकृत माहिती मिळत नाही. मात्र, मुधाई देवी ही अंबाबाईचेच दुसरे रुप आहे याची खात्री पटते. मातेची रुपं अनेक असली तरी मातेची सर्व भक्तांवर सारखीच माया असते. ती आपल्या लेकरांच्या कल्याणाचेच वरदान देते. ज्यांना देवूर जाणं शक्य नाही ते वाघळीला मुधाईमातेचे दर्शन घेवून तृप्त होवू शकतात.

© प्रा.बी.एन.चौधरी.
     देवरुप, नेताजी रोड.
     धरणगाव जि. जळगाव.
     (९४२३४९२५९३)

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *