खान्देशातील नवदर्गा राजराजेश्वरी बडी बिजासनमाता
राजराजेश्वरी बडी बिजासनमाता
(खान्देशातील नवदर्गा / प्रा.बी.एन.चौधरी /९४२३४९२५९३)
बिजासनमाता
खान्देशवासीयांचे श्रध्दास्थान राजराजेश्वरी बडी बिजासन माता म्हणजे दुर्गेचे दुसरं रुप आहे. विंध्यावासिनी म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या बिजासन मातेची मध्यप्रदेश आणि बुंदेलखंडात मोठी मंदिरं असली तरी मुंबई – आग्रा महामार्गावरील घाटातील श्री बडी बिजासन माता सर्व भक्तांचं श्रध्देचं मुख्य केंद्र आहे. म. प्र. आणि महाराष्ट्राच्या सिमेवर धुळ्याहून ८५ किमी आणि सेंदव्याकडून १८ किमी अंतरावर हे भव्य मंदीर आहे.
इतर अनेक ठिकाणी मातेची मंदिरं पहाडावर असली तरी हे मंदिर जमिनीच्या सपाटीवर आहे. हजारवर्षांची परंपरा असलेलं आणि महाराज शिवाजीराव होळकर यांनी जिर्णोद्धार केलेलं हे प्राचीन मंदीर मराठा शैलीचं आहे. ज्यांना कुणाला आपले कुलदैवत माहित नसते ते विध्यानिवासिनी बडी बिजासनमातेला आपलं कुलदैवत मानतात. सौभाग्य आणि पुत्रदायीनी असा लौकिक असल्याने नवविवाहित दांपत्य विवाहानंतर प्रथम मातेच्या दर्शनाला हजेरी लावतात.

पौराणिक दंतकथेनुसार या क्षेत्रात रक्तबीज नावाचा आसूर माजला होता. त्याच्या त्रासाने परिसरात भयभीत झाला होता. तेव्हा एका भक्ताने दुर्गामातेची भक्ती केली. त्यास प्रसन्न होवून दुर्गादेवीने रक्तबीजासूराचा संहार केला आणि त्याच्या देहालाच आसन करुन त्यावर विराजमान झाली. म्हणून त्या रुपाला बीजासन असं नामाभिधान प्राप्त झाले. या ठिकाणी देवी कालीमाता-बिजासन-लक्ष्मिमाता या त्रिरुपात विराजमान आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात या तिनमूर्ती आणि मागे दर्गादेवीची मूर्ती शोभायमान आहेत.
हे मंदीर अतीप्राचीन असून देवीची मूर्ती स्वयंभू आहे. मंदिरात अखंड ज्योत सुरु असते. चैत्र-शारदीय नवरात्रीत येथे मोठा उत्सव असतो. लाखो भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात. श्री बिजासनदेवीच्या कृपाशीर्वादाने भूत, प्रेत, आसुरी शक्तींपासून मुक्ती मिळते.
मुंबई – आग्रा हायवेपासून खाली गेलेकी मंदिर परिसर सुरु होतो. व्यापारी बाजारपेठ ओलांडली की भव्य सभागृह लागते. तेथून काही पायऱ्या चढल्यावर मुख्य आकर्षक सभामंडप आहे. प्रारंभी मातेचे वाहन असलेल्या सिंहाची भव्य मूर्ती भाविकांचे स्वागत करते. डाव्याबाजूला श्री गणेशाची स्थापना आहे. मुख्य गाभाऱ्यात माता बिजासन विराजमान आहेत. मुख्यमंदिराच्या प्रदक्षिणा मार्गात देवीची नऊ रुपांची मंदिरं आहेत. मंदिर परिसरात श्रीराम-जानकी, श्री हनुमंत, श्री बटूक भैरवाची आणि त्रिदेवीचे मंदिर आहे. या त्रिदेवी मंदिरात सुनयना देवी, सुखयाद्री देवी आणि सुलक्षणा देवी एकत्र विराजमान आहेत.



मंदिरं आहेत. मुख्य मंदिराच्या समोरील टेकडीवर भगवान श्री महादेवाचं मंदिर आहे. येथला परिसर नयनरम्य असून थंडहवेच्या ठिकाणाची आठवण करुन देतो. मंदिरावर जाणे म्हणजे एक अवघड चढ चढून जावा लागतो. या ठिकाणी आपल्या क्षमतेचा कस लागतो. पावसाळ्यात या भागात चढून वर जाण्यासारखा आनंद नाही. वर गेल्यावर अत्यंत देखणं बांधिव शिवमंदिर आपलं लक्ष वेधून घैते. टेकडीवर निसर्गाची छान जोपासना केली आहे. महादेव मंदिरासमोर एक विहार अर्थात छत्री बांधली आहे. जी तिन्ही ऋतूत भाविकांना आल्हाददायक निवारा देते.
खान्देशातील नवदर्गा श्री मनूदेवी
खान्देशातील नवदर्गा एकवीरामाता
या ठिकाणी पोहचल्यावर टेकडी चढण्याचे श्रम विसरुन भाविक स्वर्गीय सुखाची अनुभूती घेतात. येथून खालचा निसर्ग नजारा अनुभवायला ती दृष्टीच हवी. दर्शनानुभूती नंतर निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतल्यावर या छत्रीत स्थानिक मुलं रानमेवा विक्री करतात. आलेले भाविक येथे सामुहीक निसर्ग भोजनानंद घेवू शकतात. एकाचवेळी श्रद्धा, भक्ती आणि पर्यटनाचा आनंद घेतात.
मंदिर द्रस्टच्यावतीने भाविकांसाठी अनेक प्रकारच्या सुखसुविधा पुरविल्या जातात. येथे अत्यल्प दरात भोजन प्रसाद आणि निवास व्यवस्था उपलब्ध आहे. ट्रस्टच्यावतीने भव्य विस्तार कार्य सुरु असून येथील निवासी विद्यालयात शेकडो आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथील गोशाळेत २०० गायींची सेवा केली जाते. नवरात्रीत येथे भाविकांची प्रचंड गर्दी असते. नवस फेडणाऱ्यांच्या आनंदाला उधाण आलेले असते. चैत्रात ठिकठिकाणी बट्टी-रोडगे भाजण्याच्या भट्ट्या पेटलेल्या असतात.
गोवऱ्या आणि शेण्यांवर भाजलेली खरपूस भट्टीचा खमंग वास आणि ओळख नसतांना हात ओढून जेवायचा आग्रह करणारे नवसफेडणारे भाविक चुकूनच कुणाला प्रसाद न ग्रहण करता जावू देत असतील. रोडगा – वरण आणि घोटलेल्या वांग्याची भाजी हा अमृतानुभवच असतो. नवरात्रीत काही किमी पर्यंत लागलेल्या वाहनांच्या रांगा देवीच्या महतीची ओळख देतात. भाविकांनी आपल्या मनोकामनांच्या पूर्ततेसाठी आणि मनाच्या प्रसन्नतेसाठी एकदा श्री बिजासनदेवींचं दर्शन घ्यायलाच हवे.
© प्रा.बी.एन.चौधरी.
देवरुप, नेताजी रोड.
धरणगाव जि. जळगाव.
(९४२३४९२५९३)
Pingback: खान्देशातील नवदर्गा श्री मनूदेवी - मराठी
Pingback: खान्देशातील नवदर्गा एकवीरामाता - मराठी 1