खान्देशातील नवदर्गा भटाईमाता

भटाईमाता
भटाईमाता

नवसाला पावणारी भटाईमाता

नवसाला पावणारी भटाईमाता :
(खान्देशातील नवदूर्गा / प्रा.बी.एन.चौधरी / ९४२३४९२५९३)

महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही, भक्तांच्या नवसाला पावणारी, आपत्यहिनांना पुत्र आणि पुत्रीचे दान देणारी म्हणून, लौकिक पावलेली, धुळे जिल्ह्यातील जागृत देवीस्थान म्हणजे “भटाईमाता” ! नेर पासून चार, पाच किलोमिटर आत, एक डोंगराच्या पायथ्याशी खंडलाय, मालखेडा, भदाणे या गावांच्या मध्यभागी, एका धनगर वस्तीत हे देवस्थान आहे. कुठलेही अवडंबर, अंधश्रध्दा आणि लुबाडणुकीला, थारा न देणारं हे देवीस्थान आहे.

ज्यांच्या पोटी वंशाचा अंकुर नाही, अश्या दाम्पत्यांसाठी, आशेचा एक किरण म्हणून प्रसिद्ध आहे. निर्मळ मनाने केलेली प्रार्थना, आई भटाईच्या चरणी वाहिलेली निस्सीम श्रध्दा आणि सर्वभावे केलेले समर्पण, इतकंच काय ते येथे लागतं. त्यामुळे गरीब, सर्वसामान्य, मध्यमवर्गीय ते गर्भश्रीमंतांपर्यंत भटाईमातेचा भक्त परिवार आहे. इतर वेळी, कोणतीही यात्रा, उत्सव नसला तरी, नवरात्रीत भटाईमाता मंदिर, भाविकांनी फुलून जाते. राज्य आणि राज्याबाहेर भाविक दर्शनाला येतात. नऊ रात्री येथे गरब्याची धमाल असते आणि दिवसा यात्रेचे स्वरुप. निसर्गाच्या सानिध्यात, शेत शिवारात वसलेलं भटाईमाता संस्थान, म्हणजे वाळवंटातली, मनाला शांती देणारी, भक्तीची हिरवळच आहे. देवस्थान म्हणून यायचं नसेल, त्यांच्यासाठी एक दिवसाच्या फॅमिली ट्रिपसाठीही हे, उत्तम पर्यटन स्थळ आहे.

खान्देशातील नवदर्गा एकवीरामाता

खान्देशातील नवदर्गा श्री मनूदेवी

खान्देशातील नवदर्गा राजराजेश्वरी बडी बिजासनमाता



                       सध्याचं भटाई मातेचे मंदिर, हे अत्यंत आखीव, रेखीव, भव्यदिव्य आहे. गर्भगृहावर पंन्नाससाठ फुटाचा उंच कळस आहे. गर्भगृहाला लागून असलेला १५०×५० फूट सभामंडप आहे. गर्भगृहात चांदीच्या आसनावर स्थापित भटाईमातेचा मनभावन, प्रसन्न मुखवटा आहे. भाविकांना दर्शनासाठी, पूजेसाठी समोरच आईच्या पादुका आहेत. मंदिरात प्रवेश करताच भलामोठा घंटा लागतो. आणि, भटाईमातेचं देखणं रुप समोर येतं. भाविक श्रध्देने हात जोडून, नतमस्तक होतो. आपलं गाऱ्हाणं मांडतो. व्यथा-वेदना आई जवळ सांगतो. फलप्राप्ती, यश, आनंदाचा नवस फेडतो. येथे येणाऱ्या अनेकांच्या कथा ह्या अनाकलनीय, अविश्वसनीय वाटत असल्या, तरी… श्रध्देला मोल नसतं आणि दैवी आशीर्वाद कधिही फोल नसतो, याची प्रचिती येते. इथली माणसं, साधी, भोळी आहेत. स्वार्थी, लालची वृत्तीपासून दूर आहेत.

                         भटाईमातेची एक आख्याईका सांगितली जाते. ज्या वेळी येथे मंदिर नव्हते, तेव्हा आई भटाई आपला पुत्र भटूसह या घनदाट, निर्जन परीसरात आल्या. त्यांना पाण्याची तहान लागली. भटूने शोध घेत पाणी आणले. भटाई पाणी प्याल्या. त्यांची तहान भागली. मात्र, नंतर भटू दिसेना. त्या भटूला शोधू लागल्या. तेव्हा, भटू जवळच्या एका पायविहरीवर मासे पकडत असतांना दिसला. आईला त्याचा राग आला. मासे कां पकडतो.? म्हणून त्या रागवून त्याचेपासून दूर जावू लागल्या. तेथील मेंढपाळ, पेंढारी स्त्री-पुरुषांनी मातेला विनंती केली. विश्राम करायला सांगितले. त्या तिथंच बसल्या. देवी ज्या ठिकाणी बसल्या, तिथंच देवी कायम स्वरुपी विराजमान झाल्या. तिथंच देवीची स्थापना आहे. भटूने नंतर आईची माफी मागितली. आईने त्याला विहिरीजवळच राहण्याचा आदेश दिला. म्हणून, मंदिरापासून अर्धाकिलोमिटरवर असलेल्या, विहरीजवळ भटूची स्थापना केली आहे. विहिरीला पायऱ्या आहेत.

आत उतरुन गेल्यावर दोन गोटे दिसतात. मोठा गोटा म्हणजे भटू आणि लहान गोटी म्हणजे भटी. ज्यांनी देवीला विश्राम करायची विनंती केली होती, त्यांना संतती नव्हती. देवीने प्रसन्न होत, त्यांना पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला. कालांतराने तो सत्यात उतरला. देवी अंतर्धान पावल्या. आणि, हे ठिकाण भटाईमाता देवीस्थान म्हणून उदयास आले. ही भटाईमातेची लोककथा, आख्याईका आहे. जी पिढ्यान् पिढ्या चालत आली आहे. त्या काळापासून भटाईची पूजा केली जाते. नवस बोललात, की संतती प्राप्त होते, अशी भाविकांची धारणा झाली आहे. इथं आल्यावर, नवस बोलल्यावर, ज्यांना संतती प्राप्त होते, त्या लेकरांची नांवे, भटू किंवा भटी ठेवावं लागतं. हा इथला अलिखीत नियम आहे. तुम्हाला कुणी भटू किंवा भटाबाई नावाची व्यक्ती भेटली, तर हमखास समजावं, ते भटाईमातेच्या नवसानेच झालेले आहेत.

                     मला सांगायला आनंद होतो की माझेही नाव भटूच आहे. मी आज ६३ वर्षांचा आहे. म्हणजे, माझ्या आईने ६५ वर्षांपूर्वी असा नवस केला होता. आईने आज ८२ पार केली आहे. तेव्हा प्रवासाची साधनं नव्हती. आई सांगते, माझे आजी, आजोबा, मामा, मामी आणि आई बैलगाडीवर अमळगाव येथून, ८० किमीचा प्रवास करुन, भटाईमातेचा नवस बोलायला आले होते. त्यांनी घेतलेले कष्ट, केलेली भक्ती, पाळलेली पथ्थे म्हणून माझं अस्तित्व आहे. ती आजही मला हट्ट करुन, भक्तिभावाने दरवर्षी भटाईला नेते. मी स्वतः एम. एसस्सी. एम. ए. बी. एड. असून, मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झालो असलो तरी, मी भटाईच्या कृपादृष्टी साठी आसुसलेला असतो. तिच्या चरणी नतमस्तक होतो. मनाला एक निर्मळ शांती मिळते. कृतकृत्य झाल्यासारखे वाटते. कारण, येथे कोणतेही स्तोम नाही.

पुजाऱ्यांची लुटमार नाही. गंडेदोरे नाहीत. भगत-भक्तीण नाही. ज्याला कुणाला देवीचा कृपाप्रसाद हवा असेल, त्याने सोमवती आमावश्येला येथे येवून, निर्मळ मनाने, भटूच्या विहिरीवर आंघोळ करावी. देवीचं दर्शन घ्यावं. रोडगे-बट्टी-वरण-भाजी – असं प्रसादाचा नवस बोलावा आणि मांसाहार टाळावा. एव्हढंच काय ते पथ्य. तुमची श्रध्दा खरी असेल, तर देवी नवसाला पावतेच, पावते. असं सांगणारे, असंख्य भक्त तुम्हाला केव्हाही मंदिरात, परिसरात भेटतील.

                       भटाईमाता देवस्थान धुळे – साक्री महामार्गावर नेर जवळ आहे. हायवेला भटाई फाटा लागतो. जेथे भव्य स्वागत कमान उभारली आहे. या कमानीपासून आतल्या बाजूला पाच किलोमिटर गेलं की भव्य मंदिर दिसते. भटाईफाटा धुळ्याकडून ३० किमी आणि साक्रीकडून येणाऱ्यांसाठी २५ किमीवर आहे. मंदिर परीसरात मेंढपाळ, पेंढारी, धनगर वस्ती आहे. मंदिरासमोर जि. प. ची शाळा आहे. येथे निवासाची व्यवस्था नाही. दिवसा भाविक येतात. विस्तवावर भाजलेले रोडगे, बट्टी, वरण, भाजी, प्रसादाचा नैवेद्य करतात. भटाईमातेला प्रथम नैवेद्य दाखवतात. मग भटू-भटीला नैवेद्य जतो. आणि पक्ती उठवल्या जातात.

                         विज्ञान, तंत्रज्ञानाने प्रचंड प्रगती केली आहे. तरीही श्रध्दा कमी होत नाही. कारण, मानवी जीवनामध्ये इतक्या समस्या, अडचणी, आगतिकता, संकटं येतात, की ती विज्ञान, तंत्रज्ञानानेही दूर होत नाहीत. विज्ञान जिथं थांबतं, तिथून श्रध्दा – आध्यात्म सुरु होतं, असं म्हणतात. अश्यावेळी देवी – देवतांची जागृत देवस्थानं, रंजल्या-गांजलेल्यांना आस्थेची, आशेची, मदतीची ठिकाणं वाटतात. त्यात गैर काही आहे, असं मलाही वाटत नाही. अवडंबर आणि अंधश्रद्धा जिथं नसेल, ज्यामुळे कुणाचं अहित होणार नसेल, कुणाच्या भावना दुखावणार नशतील, तर तशी कृती, भक्ती आनंदाने करायलाच हवी. महाराष्ट्रात शक्तीची, देवीची साडेतीन शक्तीपीठं आहेत. समाजातील एकूण ९६ कुळांसाठी १२ देव्या आहेत. आपण, आपल्या कुलदैवताला भजलं पाहिजे. पूजलं पाहिजे.

नतमस्तक होवून शरण गेलं पाहिजे. तोच भाव, श्रध्दा माझ्या मनात जागृत होतो. जेव्हा मी आई भटाईमातेच्या दर्शनाला जातो. आपणही भटाईचं दर्शन घ्यावं. आई कुणाचीही असो. ती आईच असते. तुमची, माझी, सर्वांची !

या देवी सर्वभूतेषु, शक्ति-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नमः॥


© प्रा.बी.एन.चौधरी
    
    देवरुप, नेताजी रोड.
    धरणगाव जि. जळगाव.
    (९४२३४९२५९३ /९८३४६१४००४)

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *