खान्देशातील नवदर्गा सप्तशृंगी माता
महाराष्ट्राचं मातृ-वैभव सप्तशृंगी माता :
(खान्देशातील नवदर्गा – ९ / प्रा.बी.एन.चौधरी /९४२३४९२५९३)
नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी माता ही देवी भागवत तसेच दुर्गा सप्तशती या दोन्ही ग्रंथात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक आहे. महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठांपैकी ते आद्य शक्तीपीठ आहे. आद्यशक्तीपीठ या शब्दाचा अपभ्रंश होऊन आर्धे शक्तीपीठ झाले परंतु हे मूळ शक्तीपीठ आहे. बाकीचे तीन पीठे म्हणजे, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी व माहूरची रेणुकामाता. सप्तशृंगी गडावरील १८ हातांच्या या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. देवीचे मंदिर ७ शिखरांनी वेढलेले असुन समुद्रसपाटीपासुन ४६५९ फुट उंचीवर आहे.
सप्तशृंगी गड हा भारताच्या हा नाशिक जवळील नांदुरी गावाजवळ वसलेला असून देवी अनेक कुटुंबांची आराध्यदैवत आहे. देवीचे हे तीर्थक्षेत्र जागतीक पटलावर प्रसिद्ध आहे. ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी असे मानले जाते. आदिशक्तीचे हे मूळ स्थान आहे असे मानले जात
देवीचे अठराभुजा सप्तशृंग रूप येथे पहावयास मिळते. ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे. येथील गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत. या तिन्ही दरवाजातून देवीचे दर्शन घडते. या मंदिरात दरवर्षी शाकंभरी नवरात्रोत्सवही साजरा केला जातो. वर्षभर येथे मातेच्या भक्तांची अलोट गर्दी असते.
या भागात महिषासूर नावाचा राक्षस माजला होता. कोणत्याही पुरुषाकडून मरण मिळणार नाही असा वर त्याला प्रत्यक्ष शंकराकडून मिळाला होता. त्याने सरळ स्वर्गावर आक्रमण करून करून इंद्राला तिथून हुसकून लावले होते. त्यामुळे इंद्र ब्रह्मा विष्णू व महेश या त्रयींकडे मदतीची याचना करू लागला. त्या तिघांनी आपले सामर्थ्य एकवटून एका तेजाची निर्मिती केली. ते तेज अंबेच्या रूपाने पृथ्वीवर अवतरले.
या काळात महिषासुर सप्तशृंगीच्या जवळ होता. देवीने त्याचा तेथेच वध केला आणि जगाला त्याच्या जाचातून मुक्त केले अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे.
दंडकारण्यात राम-सीता वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचे पौराणिक ग्रंथात उल्लेखलेले सापडते. पौराणिक कथांनुसार महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी येथे वास्तव्य केले. महानुभावी लीळाचरित्रात असा उल्लेख आढळतो की राम-रावण युद्धात इंद्रजिताच्या शस्त्राने लक्ष्मण मूर्च्छा येऊन पडला.




त्या वेळी हनुमंताने द्रोणागिरी पर्वत नेला आणि द्रोणागिरीचा काही भाग खाली पडला तोच हा सप्तशृंग गड होय. सुरतेची लूट केल्यानंतर शिवाजी महाराज देवीच्या दर्शनाला आल्याचा संदर्भ बखरींमध्ये नोंदवलेला आढळतो. गडावर चैत्रोत्सव सुरू झाला की खानदेशातील लाखो भाविक अनवाणी चालत येतात.
गडावर कालीकुंड, सूर्यकुंड, जलगुंफा, शिवतीर्थ, शितकडा, गणपती मंदिर, गुरुदेव आश्रम ही ठिकाणं प्रेक्षणीय आहेत. पहाटे पाच वाजता सप्तशृंगी देवीचे मंदिर उघडते. सहा वाजता काकड आरती होते. आठ वाजता देवीच्या महापूजेला सुरुवात होते. या पूजेमध्ये मूर्तीला पंचामृत स्नान घालण्यापासून ते पैठणी अथवा शालू नेसवून तिचा साज-शृंगार केला जातो.
पानाचा विडा मुखी दिला जातो. पेढा आणि वेगवेगळी फळे याचा नैवेद्य दाखवला जातो. यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले होते. बारा वाजता महानैवेद्य आरती होते. सायंकाळी ७.३० वाजता शेजारती होते. गडाला एकूण ४७२ पायऱ्या असून सध्या लिप्ट ट्रेन सुविधा उपलब्ध आहे. देवीमातेचे दर्शन म्हणजे अमृतानुभव असतो. प्रत्येक भाविकाने तो घ्यायलाच हवा.
© प्रा.बी.एन.चौधरी.
देवरुप, नेताजी रोड.
धरणगाव जि. जळगाव.
(९४२३४९२५९३)
Pingback: दसरा सण एक परंपरा एक आनंद - मराठी 1