खान्देशातील नवदर्गा खोंडाईमाता

खोंडाईमाता
खोंडाईमाता

खान्देशातील नवदर्गा खोंडाईमाता

नंदुरबारचे ग्राम दैवत खोंडाईमाता :
(खान्देशातील नवदर्गा – ५ / प्रा.बी.एन.चौधरी /९४२३४९२५९३)

नंदुरबार हा निसर्ग सौंदर्याने नटलेला आणि आदिवासी संस्कृतीने समृध्द असा जिल्हा आहे. या नंदुरबार नगरीचे ग्रामदैवत म्हणून गिरीराज किशोरी खोंडाईमाता अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे. नवरात्रीत येथे लाखो भाविक श्रध्देने हजेरी लावतात. मातेचे दर्शन घेवून आपली मनोकामना मांडतात. ज्यांच्या मनातील ईच्छा पूर्ण होतात ते नवस फेडतात. अतिशय जागृत असे हे देवस्थान असून शहरातील नेहरुनगर भागात आहे.

पूर्वी घनदाट जंगल असलेला हा परिसर आता काॅलन्यांनी वेढला गेला आहे. एका विशाल वृक्षाखाली मातेचे भिंती-दारांविना मंदिर आहे. मंदिरात निराकार स्वयंभू विशाल मूर्ती आहे. देवीची पाठ दर्शनीभागी असून पाठीवर नेत्र आहेत. असे अलौकीक रुप असणारी ही एकमात्र देवता आहे. गुजराथेतील सौराष्ट्र भागात भावनगर येथे असलेल्या खोडीयार मातेचेच हे रुप आहे. ही देवी गुरांचं पालन पोषण करणाऱ्या भरवाड समाजाचे कुलदैवत असून सौराष्ट्रात या देवीला राजघराण्याची देवी म्हणून मान आहे.

नंदुरबार आदिवासी बहूल क्षेत्र असल्याने पशुपालन हा आदिवासींचा पूर्वापार व्यवसाय आहे. या लोकांचे खोडाईमाता हे श्रध्दास्थान आहे. मंदिरात सेवा करणाऱ्या पुजाऱ्यांची ६वी पिढी सध्या सेवा करत आहे. त्यांच्या पूर्वजांना त्याकाळी जंगलात गाईच्या रुपात देवीचे दर्शन झाले होते. गायीचा पाठलाग केल्यावर गाय अदृष्य झाली. त्या ठिकाणी एक निराकार शिळा मिळाली. तिच खोंडाईमाता. दुसऱ्या एका आख्याईकेनुसार देवी आणि राक्षसात तुंबळ युद्ध सुरु होते. तेव्हा देवीच्या पायात मोच आली.

देवीने त्या ठिकाणी बसून शिळेचे रुप घेतले आणि तेव्हापासून खोडाई माता या ठिकाणी शास्वत स्वरुपात वास्तव्य करु लागली. भक्तांनी मंदिर बांधण्याचा प्रयत्न केला. मात्र, एका रात्रीत मंदिर बांधण्याची अट पूर्ण न झाल्याने देवीचे बंदिस्त मंदिर होवू शकले नाही. या ठिकाणी नवरात्रीत मोठी यात्रा भरते. देशभरातून लाखो भाविक येतात. सौराष्ट्रातील भावनगर येथील

खोडियार मातेची कथा साधारण ७०० इ.स.ची आहे. याची सुरुवात ग्रामीण समाजापासून होते, ज्याला रोईशाळा म्हणून ओळखले जाते. रोईशाळा सौराष्ट्रातील अलीकडच्या भावनगर शहराजवळील वल्लभीपूर प्रदेशाचा हा विभाग होता. महाराज शिलभद्र हे वल्लभीपूर क्षेत्राचे सार्वभौम होते. मामानिया गढवी हे त्यांच्या साम्राज्यातील रोईशाळा या छोट्याशा गावात राहत होते. ते महाराज शिलभद्र यांचे सर्वात जवळचे मित्र आणि विश्वासू सहकारी होते.

मनाने प्रामाणिक, गरीब तसेच अस्खलित शिवभक्त, मामानिया गढवी यांना त्यांच्याकडून राजगढवी म्हणून पद देण्यात आले होते. ते खोडीयार मातेचे भक्त होते. खोडीयार माता दुर्गादेवी किंवा महाकालीचा अवतार असल्याचे मानले जाते. पौराणिक कथेनुसार, खोडियार मातेचा जन्म दधीची ऋषी आणि त्यांची पत्नी सुशीला यांच्या पोटी झाला. हाती त्रिशूल आणि मगरीवर स्वार असे देवीचे मनोहर रुप आहे. खोडियारमाता पाण्याशी संबंधित आहे. ती मच्छीमार, खलाशी आणि प्रवासी यांचे रक्षक असल्याचे मानले जाते.

हातात त्रिशूळ आणि मगरीवर स्वार असे तिचे रुप आहे. मगर हे तिचे वाहन मानले जाते. काही आख्याईकांनुसार तिला तलवार, ढाल किंवा कमळाचे फूल धरलेले देखील दाखवले आहे. एका कथेनुसार, मच्छिमारांना त्रास देणाऱ्या एका महाकाय मगरीला वश करुन देवीने मगरीला आपले वाहन बनविले व भक्तांना तिच्या त्रासापासून मुक्त केले. तेव्हापासून राजघराण्याने आणि आजूबाजूच्या रहिवाशांनी देवीला आराध्यदैवत म्हणून पुजनीय केले, मुख्य देवतेच्या नावावर असलेले खोडियार मंदिर १९११ मध्ये बांधले गेले. हे मंदिर खोडियार तलावाच्या काठावर आहे, अत्यंत विलोभनीय असलेले हे मंदिर आस्था आणि भक्तीचे केंद्र बनले आहे.

© प्रा.बी.एन.चौधरी.
देवरुप, नेताजी रोड.
धरणगाव जि. जळगाव.
(९४२३४९२५९३)

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *