खान्देशातील नवदर्गा श्री मनूदेवी
मन जाणून घेणारी श्री मनूदेवी
(खान्देशातील नवदर्गा / प्रा.बी.एन.चौधरी/९४२३४९२५९३)
श्री क्षेत्र मनुदेवी हे महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतरांगाच्या निसर्गरम्य परिसरात सूर्यपूत्री तापी नदीच्या कुशीत वसले आहे. जळगाव जिल्ह्य़ातील यावल तालुक्यात हे क्षेत्र येते. यावल-चोपडा रोडवरील आडगाव पासून १२ किमीवर मनूदेवी आहे. श्रध्दा आणि भक्तीने केवळ दर्शनाला गेल्यावर जी मन जाणून घेते आणि भक्तांच्या मनोकामना सत्वर पूर्ण करते, ती मनूदेवी असा या देवीचा लौकिक आहे. मनुदेवी ही जळगाव जिल्ह्यातील ७०% लोकांची कुलदेवी आहे.
या क्षेत्राला पौराणिक वारसा आहे. १२५१ मध्ये येथे ईश्वरसेन राजाचे राज्य होते. येथे हेमाडपंथी शैलीचे मातेचे मंदिर आहे. बुरुज शैलीने २किमी परिसरात मंदिराच्या सीमा अंकीत आहेत. या क्षेत्राबाबत एक अख्यायीका प्रसिध्द आहे. महिषासूराच्या त्रासाने सारे देव त्रस्त झाले तेव्हा ब्रम्हांड, विष्णू. महेश हे त्रीदेव सातपुड्यात शरण घेवून श्वासांवर नियंत्रण करुन साधना आणि तप करत राहिले.
![](https://marathi.khandeshvahini.in/wp-content/uploads/2024/10/IMG-20241006-WA0016-849x1024.jpg)
![बिजासनमाता](https://marathi.khandeshvahini.in/wp-content/uploads/2024/10/IMG-20241004-WA0034-1024x898.jpg)
![भटाईमाता](https://marathi.khandeshvahini.in/wp-content/uploads/2024/10/img-20241003-wa00164098482000243458403.jpg)
या साधनेतून एक दिव्य ज्योत प्रकटली. तीच मनूदेवी. या देवीने प्रसन्न होत शक्ती सप्तशृंगीच्या रुपात येवून महिषासूराचा वध करेल असे अभय दिले. त्या दिवसापासून हे क्षेत्र मनशक्तीपीठ म्हणून मान्यता पावले. आणि मनूदेवीचा लौकीक सर्वत्र पसरला.
यावल-चोपडा रोडवर आडगावजवळ एक भव्य प्रवेशद्वार आहे. तेथून ९किमी अंतरावर पवनपूत्र हनुमानाचे मंदिर आहे. तेथून ३किमी चालत गेले की मनूदेवी मंदीराला पोहचता येते. येथे मनूदेवीची प्रासादीक मूर्ती आहे. मंदिराच्या समोर एक आकर्षक धबधबा आहे जो ४०० फूटावरुन खाली कोसळतो. पावसाळ्यात हे दृष्य मनभावन दिसते. जे चित्तवृत्ती प्रफुल्लित करतं. धबधबा तीन बाजूंनी डोंगरांनी वेढलेला आहे.
खान्देशातील नवदर्गा राजराजेश्वरी बडी बिजासनमाता
खान्देशातील नवदर्गा एकवीरामाता
सर्वत्र दाट झाडी पसरली आहे. एक पिकनिक स्पॉट म्हणूनही लोकांची या स्थळाला पसंती मिळत आहे. शाळकरी मुले आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहली येथे नियमित येतात.
मंदिराजवळच एक मानवनिर्मित तलाव देखील आहे. पावसाळ्यात हा परिसर नयनरम्य दिसतो. ते सौंदर्य न्याहाळने म्हणजे स्वर्गसुख आहे.
मनुदेवीची पूजा बहुतेक खान्देशी आणि आसपासचे लोक करतात. देवी ही अनेक कुटुंबांची कुलदेवता असल्याने येथे नवस बोलले जातात. प्रतिष्ठानने अलीकडेच यात्रेकरू आणि पर्यटकांसाठी सुविधा केंद सुरु केले आहे. शासनाने या क्षेत्राकडे लक्ष पुरवले असून नवरात्रीत येथे मोठा बंदोबस्त असतो. श्री क्षेत्र मनुदेवी प्रतिष्ठान नवरात्रीत उत्सवासाठी सज्ज असून भाविकांना सुविधा देण्यासाठी प्रयत्नरत आहेत.
नऊ दिवस मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी असते. मनूदेवीची गाथा सांगणारा माय माऊली मनू देवी नावाचा एक चित्रपट येवून गेला आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांनी मनूदेवीची भूमिका साकार केली आहे. सातपुड्याच्या कुशीत वसलेले हे ठिकाण ट्रेकींग आणि युट्यूबर्ससाठी नवी संधी म्हणून आव्हान देत आहे.
© प्रा.बी.एन.चौधरी.
देवरुप, नेताजी रोड.
धरणगाव जि. जळगाव.
(९४२३४९२५९३)
![मनूदेवी](https://marathi.khandeshvahini.in/wp-content/uploads/2024/10/IMG-20241005-WA0009-914x1024.jpg)
Pingback: खान्देशातील नवदर्गा राजराजेश्वरी बडी बिजासनमाता - मराठी
Pingback: खान्देशातील नवदर्गा एकवीरामाता - मराठी
Pingback: खान्देशातील नवदर्गा खोंडाईमाता - मराठी 1