खान्देशातील नवदर्गा पाटणादेवीचे वरदहस्त शक्तीपीठ श्री चंडीकादेवी
पाटणादेवीचे वरदहस्त शक्तीपीठ श्री चंडीकादेवी
(खान्देशातील नवदर्गा चंडीकादेवी- ७ / प्रा.बी.एन.चौधरी /९४२३४९२५९३)
आदिशक्तीचं खान्देशातील एक जागृत देवीस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले ठिकाण म्हणजे पाटणादेवी देवस्थान. चाळीसगाव तालुक्यातील चंडिकादेवीचे पवित्र मंदिर शहरापासून अवघ्या १८ किमी अंतरावर गौताळा अभयारण्यच्या कुशीत वसलेले आहे. वर्षभर येथे भक्तांचा राबता असतो. नवरात्री उत्सवात येथे अलोट गर्दी होते.निसर्गाच्या सान्निध्यात आदिशक्तिचा जागर मनात साठविण्यासाठी परराज्यातूनही भाविक येथे आवर्जून हजेरी लावतात.गणितज्ज्ञ भास्कराचार्यांची कर्मभूमी असलेल्या या परिसराला पर्यावरणासह धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. संह्याद्री पर्वताच्या कुशीत डोंगरदऱ्यात, हिरव्यागार वनराईच्या सानिध्यात असलेले हे ठिकाण पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे.
गौताळा औट्रमघाट अभयारण्यातील सह्याद्री पर्वताच्या रांगा, लहान मोठे झरे, धबधबे मनाला वेधून घेतात. धवल तीर्थापासून उगम पावलेल्या डोंगरी नदीच्या किनारी उंचावर वसलेले ठिकाण म्हणजे चंडीकादेवी पाटणादेवी तीर्थक्षेत्र. खळाळत्या डोंगरी नदीवरील छोटासा साकव ओलांडून पुढे गेल्यानंतर समोरच देवी चंडिकेचे हेमाडपंथी भव्य मंदिर आणि पाठीशी असणारा प्रचंड मोठा डोंगर दृष्टीस पडतो. ११५० (इ.स. १२२८) मध्ये आषाढी अमावास्येला सूर्यग्रहण होते. त्या दिवशी पितरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यादवराव खेऊणचंद्र व गोविंदराज मौर्य यांनी हे मंदिर लोकांसाठी खुले केले असा उल्लेख संत जनार्दन चरित्रात आहे.
त्या काळात यादव सम्राट व त्यांचे मांडलिक राजे यांचे येथे राज्य होते. आदिशक्तिचा हे मंदिर १२ व्या शतकात उभारले गेले आहे. राज्यातील हेमाडपंथीय मोठ्या मंदिरांमध्ये त्याची गणना होते. १० ते १२ फूट उंच चौथ-यावर त्याची रचना पुर्वाभिमुख करण्यात आली आहे. गाभारा चंद्राकृती असून त्याल २८ कोपरे आहेत. ७५ बाय ३६ फूट मंदिराची लांबी-रुंदी असून मंदिराची उंची १८ फूट आहे. मंदिराला २१ दगडी खांब आहेत. गाभा-यात सभामंडपामध्ये एक पुरातन शिलालेख आहे.
पाटणादेवीच्या या पुरातन मंदिरात अठरा हातांची देवीची भव्य अशी प्राचीन, स्वयंभू मूर्ती आहे. वाघावर स्वार झालेल्या या देवीने प्रत्येक हातात विविध आयुध धारण केलेली असून एका हातात राक्षसाचं शीर धरलेलं दिसून येते. पुराणातील कथेनुसार चंड आणि मुंड या दैत्यांचा वध केल्यामुळे या देवीचे नाव चंडिका देवी पडल्याचे सांगतात.
देवळासमोर दोन भल्यामोठ्या दगडी दीपमाळा आहेत. मंदिरपरिसरात असलेल्या अनेक प्राचीन शिल्पाकृती असून त्या पहाण्यासारख्या आहेत. मुख्य मंदिराशेजारी उजव्या हाताला एक किमी अंतरावर महादेव मंदिर आहे.संपूर्ण काळ्या पाषाणात कोरलं गेलेलं हे मंदिर ७५ फूट लांब, ३६ फूट रुंद आणि १८ फूट उंच आहे. भव्य शिवपिंडी आणि त्यामागे असलेल्या चौथऱ्यावर दोन देवींच्या मूर्ती आणि बाहेर नंदी विराजमान आहे.
शेजारीच श्री गणपतीचे मंदिर आहे. भाविक श्रध्देने गणरायांचे दर्शन घेतात. महादेव मंदिराशेजारीच श्री विष्णूचे मंदिर आहे. अंदाजे साडेचार फूट उंचीच्या विष्णू मूर्तीवर महालक्ष्मी, गरुड आणि एका ऋषींची शिल्प कोरलेली आहेत
एका आख्यायिकेनुसार, माता सतीचे वडील दक्षप्रजापती यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता. सती मुलगी असूनही तिच्यासह तिचे पती महादेव यांना त्यांनी निमंत्रण दिले नाही. असे असूनही नारदमुनींच्या सूचनेवरून माता सती यज्ञ सोहळ्यास येतात. मात्र येथे शिवजींचा अपमान केला जातो. पतीचा अपमान माता सती आपलाच अपमान समजून स्वतःच्या शरिरातील प्राण काढून घेते. त्यामुळे तिचे शव यज्ञ मंडपात पडते. ही गोष्ट महादेवांना समजताच ते क्रोधीत होतात आणि तिचे शव हातात घेऊन तांडव नृत्य करु लागतात. त्यावेळी त्यांचा तिसरा नेत्रही उघडतो.
तिन्ही लोकात या घटनेने थरकाप उडतो. अशावेळी त्यांना शांत करण्यासाठी भगवान विष्णू सुदर्शन चक्राने सतीच्या शवाचे तुकडे करतात. जे पृथ्वीवर पडतात. यातील उजव्या हाताचा तुकडा पाटणा येथे पडल्याने येथे आदिशक्तिचीचे जागृत वरदहस्त शक्तिपीठ निर्माण झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. देवीचे आद्य उपासक गोविंद स्वामी यांनी तपस्या करून चंडिकेला प्रसन्न केले. भक्तांसाठी देवीने उंच कड्यावरून खाली यावे अशी विनंती त्यांनी भगवतीला केली.
यावर भगवतीने होकार देतांना गोविंद स्वामींना मागे न पाहता पुढे चालण्यास सांगितले. धवलतीर्थाजवळ त्यांना विचित्र आवाज ऐकू येतो. भगवती मागे आहेत की नाही हे पाहण्यासाठी ते मागे पाहतात. त्याचवेळी देवी तेथे अदृश्य होते. गोविंद स्वामी पुन्हा तपश्चर्या करतात. भगवती प्रसन्न होते. कुंडात स्नान केल्यावर माझी स्वयंभु मुर्ती तुझ्या हातात येईल, असे भगवती सांगते. स्वामी कुंडात स्नान करतात तेव्हा त्यांना एक मूर्ती प्राप्त होते. हीच पाषाणाची स्वयंभु मूर्ती पाटणादेवी मंदिरात स्थापन झाली आहे.
मंदिर परिसरात डाव्या हाताला काही पायऱ्या उतरून श्री कालिका मातेचे मंदिर आहे. चंडिका देवी प्रमाणेच या देवीची मूर्ती भव्य असून भाविक श्रद्धेने दर्शन घेतात. येथे देवीदेवतांच्या भग्नावस्थेतील अनेक पुरातन मूर्ती विखुरलेल्या दिसून येतात. नवरात्रातीत अष्टमीला पुजाऱ्यांतर्फे विशेष अशी चक्र पूजा बांधली जाते
शून्याचा आविष्कार करणाऱ्या प्रसिद्ध गणिती भास्कराचार्यांनी आपला लीलावती नामक ग्रंथ येथेच बसून लिहिला असा एक शिलालेख भारतीय पुरातत्त्वखात्याला मिळाला आहे. ज्योतिषशास्त्राच्या अध्ययनासाठी त्यांनी या ठिकाणी एका मठाची स्थापन केली होती.
भग्नावस्थेतील पुरातन मठाचे अवशेष मंदिर परिसरात दिसून येतात. भास्कराचाऱ्यांचा नातू चांगदेव यानेही अध्ययनाची सुरुवात याच मठाच्या माध्यातून केली होती असं भाविक मानतात. वनखात्याने मंदिराजवळच भास्कराचार्य निसर्ग केंद्र उभारले आहे.
पाटणादेवीच्या आसपास कन्हेरगड, पितळखोरे लेणी, हेमाडपंथी महादेव मंदिर, सीता न्हाणी नामक लेणे, शृंगारचौरी लेणी, धवलतीर्थ धबधबा, जैनांची नागार्जुन लेणी आणि गौताळा अभयारण्य आहे. श्रध्दा भक्तीने देवींचे दर्शन आणि एक दिवसाच्या पर्यटन ट्रीपचा आनंद या निमित्ताने घेता येतो. रेल्वेने मुंबई-नासिकरोड-भुसावळ मार्गावर मनमाडनंतर चाळीसगाव हे रेल्वे स्थानक येते. चाळीसगाव एस्टी स्टॅन्डवरून सकाळी साडेसातपासून दर तासाला पाटणादेवी जाण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत.
जळगाव पासून १२० किलोमीटर आणि चाळीसगाव येथून १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या गौताळा औट्रम अभयारण्य परिसरात हे मंदिर वसले आहे. प्रत्येक खान्देशी माणसाने अभिमान बाळगावा आणि श्रध्देने नतमस्तक व्हावं असं हे तिर्थक्षेत्र आहे. ज्यांनी भेट दिली असेल त्यांनी वारंवार भेट द्यावी. ज्यांनी भेट दिली नसेल त्यांनी आवर्जून एकदा मातेचे दर्शन घ्यावे. हाच या लेखमालेचा उद्देश.
© प्रा.बी.एन.चौधरी.
देवरुप,नेताजी रोड.
धरणगाव जि. जळगाव.
(९४२३४९२५९३)