खान्देशातील नवदर्गा धनदाई माता

धनदाई माता
धनदाई माता

खान्देशातील नवदर्गा धनदाई माता

७१ कुळाचे कुलदैवत श्री धनदाई माता :

(खान्देशातील नवदर्गा – ६ / प्रा.बी.एन.चौधरी /९४२३४९२५९३)

सातपुड्याच्या कुशीत वसलेली खान्देशातल्या ७१ कुळांचे कुलदैवत असलेली श्री धनदाई माता म्हणजे सुख-संपत्ती-धनाचे दान देणारी देवी आहे. धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्याचं हे ग्रामदैवत. यादेवीची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. धुळे-साक्री महामार्गावर म्हसदी फाट्यापासून ७ किमीवर म्हसदी गाव आहे. तेथून दीड किमीवर असलेलं विश्वस्त आणि भाविकांच्या सहकार्यातून साकारलेलं हे मंदीर आज खान्देशचं श्रद्धास्थान झालं आहे.

एका आख्यायिकेनुसार पूर्वीच्या काळी सातपुडा परिसरातील घनदाट जंगल होते. येथील जनतेवर दैत्य अत्याचार करत होते. त्यांच्या अत्याचारापासून रक्षण करण्यासाठी जनतेने आदिशक्तीची प्रार्थना केली. भक्तांच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन धनदाई, सप्तशृंगी, म्हाळसा, एकविरा, चिराई, भटायी, रेणुका अशा सप्तर्षी भगिनींच्या रूपाने आदिशक्ती खान्देशात अवतरली. या सप्त भगिनींनी दैत्यांना युद्धाचे आवाहन दिले.

त्यांच्यात झालेल्या घनघोर युध्दात दैत्य पराभूत झाले. ते वेगवेगळ्या दिशेने पळत सुटले आणि रेड्याचे रूप घेऊन ठिकठिकाणी जंगलामध्ये लपून बसले. तेव्हा या सप्तभगिनी त्यांचा पाठलाग करत शोध घेतला. त्या जंगलात पोहचल्या व रेड्यांच्या रुपात असलेल्या दैत्यांचा देवींनी नाश केला. तेव्हापासून देवींचे येथे वास्तव्य आहे.

आज जेथे आदिशक्ती धनदाई देवीचे मंदिर आहे त्या ठिकाणी म्हणजे नायगावी देवरे कुळातील नागरीक वास्तव्यास आले. त्यांनी तेथे कुल संरक्षणासाठी धनदाई देवीच्या स्वयंभू मूर्तीची स्थापना केली. नायगावात बरेच वर्ष वास्तव्य केल्यानंतर त्या भागात जंगली प्राण्यांचा उपद्रव वाढला. पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले. दरोडेखोरांचाही त्रास वाढला.या सर्व गोष्टीना कंटाळून त्यांनी तिथून जवळच असलेल्या नदीपलीकडील त्याकाळचे म्हैसपाडा म्हणजेच आजचे म्हसदी या ठिकाणी स्थलांतर केले.

आणि या क्षेत्राचा विस्तार झाला. त्या काळी पूजा करताना देवीच्या मूर्तीला शेंदूर लावण्याची प्रथा होती. पिढ्यानपिढ्या मूर्तीला शेंदूर लावल्यामुळे ती मूर्ती लुप्त झाली. त्या ठिकाणी मूर्ती होती हे पुढील पिढ्यांना लक्षातही आले नाही. कालंतराने हे देवस्थान दुर्लक्षित झाले. जंगलात वास्तव्य असणारे भिल्ल त्या देवस्थानचा सांभाळ करू लागले. इसवी सन १९६४मध्ये धनदाई देवीने दाखविलेल्या दृष्टांतामुळे दुर्लक्षित झालेले हे देवस्थान पुन्हा भक्तांच्या नजरेत आले.

गावात प्रवेश करतांनाच ठिकठिकाणी उभारलेल्या स्वागत कमानी तिर्थक्षेत्राची जाणिव करुन देतात. मंदिर परिसरात अत्यंत देखणे, अत्याधुनिक सभामंडप साकारले आहे. भाविकांना धार्मिक विधी करता यावा यासाठी ट्रस्टतर्फे निवासाची सोय करण्यात आली आहे. दुर्गम भाग असूनही येथे सर्वसोयींनीयुक्त असे सभामंडप लक्ष वेधून घेते.

याच प्रांगणात पोलीस स्टेशन असल्याने सुरक्षेबाबत चोवीस तास दक्षता पाळली जाते. गाभाऱ्यात अत्यंत देखणी, प्रसन्नरुपात मातेची मूर्ती आहे. मातेच्या दर्शनाने भाविकांचा क्षणात श्रमपरिहार होतो. यामुळे येथे भाविकांची दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. परिसरातील गोमातेचे शिल्प मातृभक्तीचं दर्शन घडवते. अनेक भाविक तर वर्षानुवर्ष देवीच्या दर्शनाला येत असतात. धनदाई देवीचं रूप जागृत आहे. इथं बोललेले नवस पूर्णत्वास जातात हे येथे येणारे नवस फेडणारे भाविक सांगतात.

आज याठिकाणी महाराष्ट्रासह इतर राज्यातील देखील भाविक येतात. नवरात्रोत्सव  तसेच चैत्र महिन्यात देवीची यात्रा भरते. हे दोन उत्सव भाविक मोठ्या उत्साहात साजरे करतात. गावातील काही युवकांनी १९७३-७४च्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला.

या मंदिर परिसरातील दोनशे मीटर क्षेत्रात देवीला कुठल्याही प्राण्याचा बळी देण्यास मनाई असतांना देखील काही भाविक प्राण्यांचा बळी देतात. देवीला केवळ वरण बट्टीचा नैवद्य देण्यासाठी जनजागृती सुरू  आहे.

© प्रा.बी.एन.चौधरी.
      देवरुप, नेताजी रोड.
      धरणगाव जि. जळगाव.
      (९४२३४९२५९३)

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *