खान्देशातील नवदर्गा एकवीरामाता
खान्देशातील नवदर्गा
खान्देश कुलस्वामीनी श्री एकवीरामाता :
(खान्देशातील नवदर्गा – ४ / प्रा.बी.एन.चौधरी /९४२३४९२५९३)
अमर ऋषी परशुरामांची आई रेणूकामाता यांचेच एक रुप म्हणून श्री एकवीरा देवीची उपासना केली जाते. उत्तर महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून धुळ्याचे एकवीरादेवी मंदीर लौकीक पावले आहे. सूर्यपुत्री तापीमातेची उपनदी असलेल्या पांझरेच्या काठावर खान्देश कुलस्वामीनी आदिशक्ती एकविरा मातेचे मंदीर आहे. या मंदिराला सुमारे ४०० वर्षाचा इतिहास असून २५० कुळांची कुलस्वामीनी म्हणून देवीची पूजा केली जाते. या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केला असून मंदिर हेमाडपंती, पूर्वाभिमुखी व प्राचीन आहे.
लोणावळा या गावाजवळ कार्ला येथील लेण्यांजवळ देखील एकवीरा मातेचे मंदीर आहे. येथे आगरी-कोळी समाजाचे कुलदैवत म्हणून मातेची पूजा होते. ऋषी जमदग्नी आणि रेणुकामातेचे पुत्र परशुराम यांनी २१ वेळा पृथ्वीवरील क्षत्रियांचा नाश करुन एकमेव वीर असा लौकीक मिळविला होता. अश्या वीराची आई म्हणून रेणुका मातेला एकवीरा हे नामाभिधान मिळाले. माता पार्वतीचेच हे एक रुप आहे.
पांझरेच्या काठावर भव्य परिसरात मातेच्या मंदिराचा विस्तार आहे. मंदिराच्या दर्शनी भागावर दीपस्तंभ आहे. मूर्ती स्वयंभू, अष्टभुजा, शेंदूरलेपन असून, पद्मासनी आहे. मूर्तीच्या उजव्या बाजूला गणपती, तर डाव्या बाजूला तुकाईमातेची चतुर्भुज शेंदूरलेपनाची मूर्ती आहे. मंदिर पूर्व-पश्चिम १३२ फूट, दक्षिणोत्तर ११५ फूट, उंची १५ फूट असून, शिखराची उंची २७ फूट आहे. मंदिरात प्रवेशासाठी दगडी दरवाजा आहे. त्यावर नगारखाना आहे. परिसरात शितलामाता, खोकलीमाता, परशुराम, हनुमान, विठ्ठल-रुक्मिणी, काळभैरव आणि महादेवाचे मंदिरं आहेत. पश्चिमेस महालक्ष्मीचे मंदिर आहे. परीसरात असलेली पायविहीर मंदिराचे पुरातनत्व सिध्द करते.
खान्देशातील नवदर्गा श्री मनूदेवी
खान्देशातील नवदर्गा राजराजेश्वरी बडी बिजासनमाता
मूर्तीच्या उजव्या बाजूस श्री गणपती व डाव्या बाजूस तुकाईमातेची चतुर्भुज शेंदूर लेपनाची मूर्ती आहे. साडेचार फुट उंचीच्या दोन मोठ्या समया आहेत. श्री.एकवीरा मातेची मुर्ती पुर्वाभिमुख आहे. चैत्रोत्सव व नवरात्रोत्सवात देवीचा मोठा यात्रोत्सव भरतो. मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव मंदिराचे नियोजन सांभाळतात. चैत्र व अश्विन या दोन महिन्यात दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. प्रत्येक महिन्याच्या चावदसच्या दिवशी अर्थात अमावस्येच्या आदल्या दिवशी श्री एकवीरा देवीचे मंगलस्नान केले जाते. प्रत्येक पौर्णिमेला मंदिर परिसरात श्री एकविरा देवी पालखी सोहळ्याचे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.
श्री एकविरा देवीच्या शोभायात्रेसाठी १८ फुट उंचीचा संपूर्ण पितळी धातुचा दोन घोडे, इष्ट देवी – देवतांच्या मूर्ती असलेला पाच टन वजनाचा अष्टकोनी नक्षीदार असा रथ तयार करण्यात आला आहे. जुने धुळे येथील श्री रेणुका माता मंदीराचे संपूर्ण बांधकाम नव्याने करण्यात आले आहे. मंदिरात देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान आदी भागातून भाविक येतात.
© प्रा.बी.एन.चौधरी.
देवरुप, नेताजी रोड.
धरणगाव जि. जळगाव.
(९४२३४९२५९३)
Pingback: खान्देशातील नवदर्गा भटाईमाता - मराठी 1
Pingback: खान्देशातील नवदर्गा खोंडाईमाता - मराठी
Pingback: खान्देशातील नवदर्गा धनदाई माता - मराठी 1
Pingback: खान्देशातील नवदर्गा पाटणादेवीचे वरदहस्त शक्तीपीठ श्री चंडीकादेवी - मराठी 1