मराठी कवीता संग्रह शिवाजी साळुंके,’किरण’
राजकारण
दिल्लीतुनीच आले गल्लीत राजकारण
देशास रोज आहे सडवीत राजकारण
नेता नि कार्यकर्ता खोटा खुशाल बोले
संस्कारशुन्य असतो लढवीत राजकारण
बदनाम देश केला चांडाळ चौकडीने
खोक्यामधून चाले हल्लीस राजकारण
हातास काम नाही कष्टास दाम नाही
शाळेतही शिजवती खिचडीत राजकारण
पुत्रासवे सुनेचे, पत्नी सवे मुलीचे
वंशात ढोल बसते बडवीत राजकारण
रेल्वे विमानसेवा विकलाय लालकिल्ला
रस्ते विकून चाले दिल्लीत राजकारण
लेकी सुना नि भार्या तरबेज ‘किरण’ झाल्या
दाबून ठेवती त्या मुठ्ठित राजाकारण
शिवाजी साळुंके,’किरण’
चाळीसगाव, जि. जळगाव.
जीवन
गंमत नसते जीवन चगणे
खडतर असते जीवन जगणे
आई झाल्यावरी उमगते
दुःखद असते जीवन जगणे
बाप राबतो हयात सारी
तोच जाणतो जीवन जगणे
रणांगणावर लढता लढता
खरे समजते जीवन जगणे
व्यथा-वेदना कथा सांगती
सुसह्य नसते जीवन जगणे
जगण्यावर बघ प्रेम करुनी
सत्वर कळते जीवन जगणे
जिवा-शिवाशी जुळता नाते
मंगल असते जीवन जगणे
जातिपातिच्या विळख्यामध्ये
शापित ठरते जीवन जगणे
‘किरण’ कशाला उगाच डरतो?
अशक्य नसते जीवन जगणे
शिवाजी साळुंके, ‘किरण’
चाळीसगाव, जि. जळगाव.

प्रेमळ माणूस
आंत बाहेर निर्मळ असतो
तोच माणूस प्रेमळ असतो
आप्त-मित्र परिवारासाठी
गर्द सावली हिरवळ असतो
जगणे जगतो जगावेगळे
मंदिरातली वर्दळ असतो
अन्यायाशी झुंजायाला
शिवशंभूचा त्रिशूळ असतो
अंतर्मनास पुलकित करण्या
टाळ मृदंग नि संबळ असतो
हर्षोल्हासी झुळझुळ वारा
वाहत निर्झर खळखळ असतो
भल्या बु-याची चाड निरंतर
व्यवहारी चोखंदळ असतो
हवा हवा सकळास वाटतो
दरवळणारा परिमळ असतो
‘किरण’ प्रेमळ माणूस म्हणजे
धरणीवरचा मंगळ असतो
शिवाजी साळुंके, ‘किरण’
चाळीसगाव, जि. जळगाव.

जिवन त्याला जगता येते
अनुरागाचे मोल समजते, तन मन मुठीत धरता येते
वाणीमधुनी अमृत झरते, जीवन त्याला जगता येते
तंटा भांडण नको टवाळी, वाममार्गही नित्यचि टाळी
हिंसक वर्तन रुचतच नसते, जीवन त्याला जगता येते
सहकार्याची भनी भावना, तनी शिरेना दुष्ट वासना
सहकार्यास्तव झटता येते, जीवन त्याला जगता येते
गुरूजनांचा मान करी जो, सुविचारांचा वारकरी तो
बंधुभावना जपता यते, जीवन त्याला जगता येते
कुटुंबवत्सल आज्ञाधारक, कार्य करी नित जनहितकारक
मित्रासाठी मन तळमळते, जीवन त्याला जगता येते
दुर्व्यसनांना आळा घाली, पाळत नसतो अनिष्ट चाली
देशासाठी लढता येते, जीवन त्याला जगता येते
अजातशत्रू अन् गुणग्राहक, शिवरायासम सुज्ञ प्रशासक
मात पित्याच्या चरणी नमते, जीवन त्याला जगता येते
शिवाजी साळुंके, ‘किरण’
चाळीसगाव, जि. जळगाव.
Pingback: मराठी कविता कर्म हवे छान - मराठी 1
Pingback: मराठी पत्र - मराठी 1