मराठी पत्र
॥ कोरड्या जगातले ,ओले पत्र ॥
———©MK भामरे बापु
“पोऽऽष्टऽऽमऽऽनऽऽ…”
खुपखुप दिवसांनी ही गोड हांंक ऐकली.
ती कानावर पडताच सारे मन भुतकाळात गुंजारव घालायला लागले.
सुख दुःखाच्या बातम्यांचे दारात येणारे पत्ररुपी “प्लेझर बाॅक्स् ” आताशा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
बालपणापासुन ते तारुण्यापर्यंतच्या जीवन प्रवासात महत्वपुर्ण भुमिका निभावणार्या या पत्रसंस्कृतीला लागलेली घरघर ही मनाला बेचैन करते.
पण
आज अशीच पोष्टमनची हांक आली नि हातात पत्र पडले.
पत्रसंस्कृती जपणार्या आदरणीय सदानंद गुरुजींचे ते गुढीपाडवा शुभेच्छाचे पत्र पाहुन मन गहिवरले.
गुरुजी,
किती आनंद झाला म्हणुन सांगु?
मानवीय संस्कृतीचा झपाट्याने र्हास होत असतांना,
माणसं आत्मकेंद्री,आत्मघातकी,
कृतघ्न व तामसी होत असतांना आपण आपल्या थरथरत्या हाताने हा ढासळणारा बुरुज सांभाळत,प्रेम मैत्री व सणासुदीला अशी प्रेमळ शुभेच्छा पत्र पाठवुन ती मानवी संस्कृती जपताहेत.
खुप बरं वाटलं सर.
आताशा या डिजीटल जगात सारेच भ्रामक झाले आहे.
सदिच्छा,शुभेच्छा,अभिनंदन वगैरे वगैरे गोष्टी या भ्रामक पडद्यावर भरभरुन वाहतांना दिसतात,
पण का कुणास ठाऊक, त्यातला ओलावा कमी झालाय हो.
प्रेमाच्या गंगेचा प्रवाह ही कोरडा कोरडाच भासतो.
पण
हे पत्र अजुनही ओलावा घेवुन येते.मायेचा पाझर घेवुन येते.
ते वाचतांनाची अनुभुती वेगळाच आनंद देते,तो आज मिळाला.
तुमच्या शुभेच्छा पावल्यात.धन्य झालो.
आपणासही शुभेच्छा.
आपण “पत्राची पोंच द्यावी”
हे लिहिलं आहे,
सर,
माणसं संसारात ईतकी गुरफटलीत की पोंच ही देत नाही हो… आताशा कुठे वेळ आहे त्यांना?
ते सुध्दा असे नमुद करावे लागावे ही आपली अवस्था चिंतेची व चिंतनाची बाब झालीय.
म्हणुन हे फोन सोबतची पोंच.
आपण या पत्राद्वारे करत असलेली पत्र संस्कृतीची जपणुक ही स्पृहनिय व वंदनिय आहे.
त्रिवार नमन गुरुजी..
—— तुमचाच
MK भामरे बापु.
शिरपुर