होळी मराठी कविता संग्रह
मानसहोळी संत जनाबाई यांची
।। मानसहोळी ।।
संत जनाबाई यांची!
कराया साजरा । होलिकेचा सण ।
मनाचे स्थान । निवडीले ।।
ऐसे ते स्थान । साधने सरावले ।
भक्तीने शिंपिले । केले सिद्ध ।।
त्या स्थानी खळगा। समर्पणाचा केला।
त्यात उभा ठेला । अहंकार एरंड ।।
रचलीया तेथे। लाकडे वासनांची ।
इंद्रीयगोवऱ्याची। रास भली ।।
गुरुकृपा तैल । रामनाम घृत ।
अर्पिले तयात । ऐसे केले ।।
रेखिली भोवती । सत्त्कर्म रांगोळी ।
भावरंगाचे मेळी । शोभिवंत ।।
वैराग्य अग्नीसी । तयाते स्थापिले ।
यज्ञरूप आले । झाली कृपा ।।
दिधली तयाते। विषय पक्वान्नाहुती ।
आणिक पुर्णाहूती । षड्रिपु श्रीफळ।।
झाले सर्व हुत । वैराग्य अग्नीत ।
जाणावया तेथ । नूरले काही ।।
वाळ्या म्हणे जनी ।
व्हावी ऐसी होळी ।।
जेणे मुक्तीची दिवाळी।
अखंडित ।। 🙏🏻🙏🏻🚩
होळी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
होळी फाल्गुनी पुनव
होळी
फाल्गुनी पुनव, लख्ख प्रकाश
शीतल गारवा,दुधाळलं आकाश…..
असं सारं उत्साहवर्धक बाहेरचं
अंतरी मात्र विरोधाभास…
होळी साजरी करतोय म्हणाले,
पण स्वीकारतंय कोण उदात्तता…
अन कोण जाळतंय कचरा,
मळ मनीचा…….
इथे तर आसुरी थयथयाट…..
अमंगळ……!
जपावी म्हणालेत संघनिष्ठा
होळी मनवुन…अन खेचताय तंगड्या….
कापताहेत पंख पक्षिणीचे….
म्हणे होळी दिक्षा देतेय संयमाची
अन नाचतात सारे बेताल..
मद्यधुंदीत उडवित रंग,म्हणत….
“आले रे होळी…करा धमाल…”
वाजतायेत गाणी वास्तवतेची…
चित्र चितारणारी…….
” लोंगा ईलाची का बिडा बनाया…
खाये गोरी का “यार”….
बलम तरसे ……रंग बरसे..”
फेर धरून नाचतायेत उडवीत
पिचकाऱ्या रंगांच्या…..
‘लाल’ बेताल झालेला
‘हिरवा’ अवकाळीनं गिळलेला
‘गुलाबी’ तर तकलादू विलायती
‘निळ्याची’ विशालता अन शांती
‘पांढरा’ साऱ्यात मिसळलेला
‘काळा’ मनामनात घुसळलेला……
ओरडतायेत….
“होळी रे होळी,पुरणाची पोळी
………..
होळी ला गोवऱ्या पाच पाच
….ला डोई घेऊन नाच नाच..”
इथं माती जीवाची बळीराजाची
नाचतोय दुष्काळ डोळ्यावर
त्याच्या……….!
ठोकताहेत बोंबा
अनिष्ठतेला पळवून लावण्यासाठी
पण…..आतलं अनिष्ठ जळतंय कुठं?
जाळतोय वसंत ओकत
उरातल्या झळा……
झोपडीत पेटलीय भूक
आणि….
धगधगती होळी
तिच्या उभ्या आयुष्याची…..!
लतिका चौधरी
दोंडाईचा,जि. धुळे
जशी होळीतली पोळी
जशी होळीतली पोळी
स्त्रीच्या जीवनाची केली
अरे माणसा तू होळी
तिचा घेऊनिया बळी
खातो पुरणाची पोळी॥धृ॥
कलाकृती स्त्री ब्रम्हाची
कल्पितोस कथा खुळी
तिचे पावित्र्य जाळून
काय केलीस रे होळी ?॥१॥
किती काळ व्हावी तिच्या
अशी जीविताची होळी
अख्खी मानवता का रे
तिच्यासवे होरपळी॥२॥
नित्य आशा आकांक्षांची
तिच्या व्हावीच का होळी
सुख शांतीसाठी तुझ्या
जावे तिनेच का बळी॥३॥
कधी ओठी उमलावी
तिच्या सौख्याची पाकळी
साथ जीवन भराची
तरी तुला न आकळी॥४॥
समर्पिते भाव सारा
तिची उरते न मुळी
तरी जळावे का तिने
जशी होळीतली पोळी॥५॥
निसर्गसखी सौ.मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं.७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुलीरोड, एरंडोल जि.जळगांव.
होळी लाकडाचं जळणं
होळी
लाकडाचं जळणं
रंगा रंगांची उधळणं
म्हणे हर्षाचा दिन
आला होळीचा सण
शिशिराचं जाणं
वसंताचं आगमन
पुनवेच चांदणं
लखलखत्या ज्वाला
रणरणतं ऊन्हं
म्हणे हर्षाचा दिन
आला होळीचा सण
आजूबाजू रांगोळी
वर टांगल्या फुलांच्या माळी
नैवेद्य पुरणपोळी
संगे संसाराची झोळी
नाचत – गात वाजत – गाजत
पेटली होळी
होळीचे हे ऋण
कधी तुटेल तोरण
डोळा फिटेल पारणं
म्हणे हर्षाचा दिन
आला होळीचा सण
नको त्या बोंबा
मध्ये जळे कुठे बांबू
कुठे एरंडाचा खांबा
बाजू पेटल्या गोवऱ्या
ज्वाळा निघाल्या सासुरा
म्हणे पुन्हा परत येईन
तेच होळीचं मरण
म्हणे हर्षाचा दिन
आला होळीचा सण….
आला होळीचा सण….
कवी :-
चंद्रशेखर प्रभाकर कासार
चांदवडकर , धुळे.
7588318543.
8208667477.
रंग होळीचे
रंग होळीचे
रंग रंगात उधळू चला होळीचे
रंग रंगात खेळू चला होळीचे ॥धृ॥
रंग प्रेमाचा उधळू
रंग मैत्रीचा उधळू
रंग सत्याचा उधळू
रंग निष्ठेचा उधळू ॥१॥
रंग रंगात उधळू चला होळीचे
रंग रंगात खेळू चला होळीचे ॥धृ॥
रंग एकतेचा उधळू
रंग एकात्मतेचा उधळू
रंग ममतेचा उधळू
रंग समतेचा उधळू ॥२॥
रंग रंगात उधळू चला होळीचे
रंग रंगात खेळू चला होळीचे ॥धृ॥
रंग बंधूभावाचा उधळू
रंग शेजारधर्माचा उधळू
रंग सत्संगाचा उधळू
रंग देशभक्तिचा उधळू ॥३॥
रंग रंगात उधळू चला होळीचे
रंग रंगात खेळू चला होळीचे ॥धृ॥
रंग संस्कारांचा उधळू
रंग संस्कृतीचा उधळू
रंग प्रतिभेचा उधळू
रंग प्रगतीचा उधळू ॥४॥
रंग रंगात उधळू चला होळीचे
रंग रंगात खेळू चला होळीचे ॥धृ॥
कवी :-
चंद्रशेखर प्रभाकर कासार
चांदवडकर , धुळे.
7588318543.
8208667477.
तुझ्या विना कशी खेळू होळी
होळी
तुझ्या विना कशी खेळू होळी
सांगना कान्हा तू आता मला
सर्व रंग फिके पडतील मग
कुठे कशी शोधेल राधा तुला
गोकुळातील गवळणी या
आतुर झाल्या तुझ्या साठी
चल खेळूया रंग उधळूया
येना कान्हा तु माझ्या साठी
कान्हा बावरी झाली राधा
तुझ्या विना मी आहे अधूरी
रंगात रंगून जाऊ दोघेही
भिजेल आपली अंग सारी
करू नको माझी मस्करी
कान्हा धावत येना लवकर
उधळू आपण होळीचा रंग
किती वाट बघू आजवर
कवी.दिलीप हिरामण पाटील
कापडणे ता जि धुळे
मो.नं.९६७३३८९८७३
Pingback: होळी बद्दल माहिती होळी हुताशनी पौर्णिमा - मराठी 1
Pingback: मराठी कविता संग्रह - मराठी 1
Pingback: आखाजीची झोक्यावरची गाणी - मराठी 1