होळी कविता मराठी (Holi kavita In Marathi)

होळी कविता मराठी
होळी कविता मराठी (Holi kavita In Marathi)

मराठी कविता होळी

होळी कविता मराठी,होळी कविता,होळी मराठी कविता,

जशी होळीतली पोळी

              जशी होळीतली पोळी
स्त्रीच्या जीवनाची केली
अरे माणसा तू होळी
तिचा घेऊनिया बळी
               खातो पुरणाची पोळी॥धृ॥
कलाकृती स्त्री ब्रम्हाची
कल्पितोस कथा खुळी
तिचे पावित्र्य जाळून
               काय केलीस रे होळी ?॥१॥
किती काळ व्हावी तिच्या
अशी जीविताची होळी
अख्खी मानवता का रे
                   तिच्यासवे होरपळी॥२॥
नित्य आशा आकांक्षांची
तिच्या व्हावीच का होळी
सुख शांतीसाठी तुझ्या
                  जावे तिनेच का बळी॥३॥
कधी ओठी उमलावी
तिच्या सौख्याची पाकळी
साथ जीवन भराची
                  तरी तुला न आकळी॥४॥
समर्पिते भाव सारा
तिची उरते न मुळी
तरी जळावे का तिने
                जशी होळीतली पोळी॥५॥
        निसर्गसखी सौ.मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं.७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुलीरोड, एरंडोल जि.जळगांव.

भस्म व्हावयास हवी


     भस्म व्हावयास हवी
कोण कोठली होलीका
म्हणे तिची झाली होळी
सत्य भासावी अशीच
          दंत कथाच ती खुळी॥धृ॥
एकेकाच्या मनावरी
झाली आरुढ ती होळी
सत्य असत्याचे भान
          जन विसरली भोळी ॥१॥
भोळ्या मनांवरी रुढ
झाल्या सण सणावळी
रुढ अंधश्रद्धतेचे
आम्ही सारे झालो बळी॥॥२॥
पायी बांधून पैंजण
पाचोळ्याची करा होळी
नव्या युगाच्या होळीला
पाचोळ्याची साडी चोळी॥३॥
गेल्या कोरोना काळात
भस्म झाली होती होळी
व्हावी तशी भस्मसात
     अंधश्रध्देचीही होळी ॥४॥
  निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी,प्लाॅट नं ७ अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.

चारोळ्या होळीच्या पोळीच्या


            चारोळ्या होळीच्या पोळीच्या
१}होळी आली हिची गोडी
पुरणाच्या ग पोळीत
अन्न पूर्णब्रम्ह त्याची
        गोडी जळते होळीत॥
२}पूर्ण ब्रम्हाचा निर्माता
कष्ट विचारा बळीला
पुरणाची गोड पोळी
         मग अर्पावी होळीला॥
३}होळी आली होळी आली
करा स्वागत होळीचे
नैवेद्याला नको पण
           बाई दहन पोळीचे॥
४}होळी आली होळी आली
करा स्वागत होळीचे
पोळी जाळण्याच्या आधी
        कष्ट आठवा बळीचे॥
५}गहू डाळ आणि गूळ
भिडलेत आभाळीला
कशी देऊ पुरणाचा
        बाई नैवेद्य होळीला॥
६}होलीकेच्या नैवेद्याला
माझी एकेक चारोळी
नाही देणार पण ग
       हिला पुरणाची पोळी॥
    निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी,प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
   दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.

अहिराणी कविता होळी

2 Comments

Comments are closed