गाते कोकीळा अंतरा
गाते कोकीळा अंतरा
तुझी वसंता वासंती
नाव दुजे वसुंधरा
अति झाली पानगळ
आता तुझाच आसरा॥धृ॥
तूच करिशी हरित
हिचा शृंगार नखरा
सारे पुरविशी लाड
आसमंत हराभरा॥१॥
अति उन्हाने होतसे
पण जीव हा घाबरा
घाल उन्हाला रे आळा
मग भासशिल बरा॥२॥
मुबलक अन्न पाणी
चारा लाभू दे पाखरा
नव्या पालवीत आशा
ऋतुराजा ये मैतरा॥३॥
आम्रतरतून बघ
गाते कोकीळा अंतरा
तुझ्या वसंता स्वागता
गळा आळविते स्वरा॥४॥
निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं. ७ अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.
ऋतुराज आगमने
ऋतुराज आगमने
ऋतुराज आगमने
वसंताच्या स्वागताला
ऐका कोकिळेचे गाणे
नवे छेडते तराणे
एका वसंता कारणे॥धृ॥
नको थंडीची लहर
नको पावसाचे येणे
यावा वसंत बहार
नवे बहारीचे लेणे॥१॥
लेणे असे लावण्याचे
वसुधेचे शृंगारणे
दिन हिचे फुलण्याचे
ह्याच वसंता कारणे॥२॥
व्हॅलेन्टाइन दिनाचे
झाले हिच्यासाठी येणे
आला ऋतुराज आला
काय धरतीला उणे॥३॥
वसुधेच्या ह्या खुशीत
ऐका कोकिळेचे गाणे
गाण्यातून मधुस्वर
नित् प्रवाहत जाणे॥४॥
प्रवाहात त्या माझिया
कवितेचे प्रवाहणे
साज नवा धरतीला
ऋतुराज आगमने॥५॥
निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७ अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.
स्वर सवे तुझा आला
स्वर सवे तुझा आला
कुणी शिकविले तुला
सांगशिल का कोकिळा
कशा कुणी छेडिल्या ग
आर्त तुझ्या स्वरलिला॥धृ॥
तुझी बोली डोलवितो
देश प्रदेश सगळा
सांग गोड तुला गळा
कसा मिळाला आगळा॥१॥
तुझी माधुरी घुमते
कशी चारही दिशेला
सांगतेस तू उषेला
संध्या समयी निशेला॥२॥
यावी लागते संक्रांत
आम्हा गोड बोलण्याला
जसा तुझ्या साठी बाई
ऋतुराज वसंताला॥३॥
आला ऋतुराज आला
आला वसंत हा आला
आम्र रसात घोळून
स्वर सवे तुझा आला॥४॥
निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं. ७ अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३
तोच सृष्टीचा मैतर
तोच सृष्टीचा मैतर
आला वसंत बहार
सांगे आंब्याचा मोहर
वृक्ष-लता वर आली
पाने फुले मनोहर॥धृ॥
ऐका अधून मधून
कोकिळेचे मधुस्वर
माघ फाल्गुना आधीच
झाला चैत्र का अधीर॥१॥
चित्र रेखिले सृष्टीने
पहा किती हे सुंदर
स्वर्ग असेल कोठला
काय याहून सुंदर॥२॥
पाखरांचा गुंजारव
ऐका फांदी -फांदीवर
नव वर्षाचे स्वागत
हेच असे खरोखर॥३॥
सृष्टी उभविते गुढी
जणू वसंता खातर
करी सृष्टीचे जतन
तोच सृष्टीचा मैतर॥४॥
निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.
Pingback: मराठी कविता निर्यातबंदी - मराठी 1
Pingback: gudi padwa गुढीपाडवा नववर्ष आरंभानं - मराठी 1