वासोटा किल्ला
वासोटा किल्ला…जि.सातारा
(भाग-०३)
नानाभाऊ माळी
लढाई केवळ चढाईतून जिंकता येत नसते!अस्र-शस्रानीं जिंकता येत नसते!लढून जिंकता येत नसते!आत्मिक उर्मी आणि प्रचंड इच्छा शक्ती सोबत असावी लागते!चिवट झुंज साथीला असतें!छत्रपती शिवरायांनी त्या काळी वासोटा किल्ल्यावर पहिलं पाऊल कसं ठेवलं असेल बरं?खूप अवघड पण स्वराज्याच्या दृष्टीने, भौगोलिक दृष्टया वासोटा किल्ला अतिशय महत्वपूर्ण असावा!महाराजांचा आदर्श अन शिकवण सोबतीला होती!त्यांच्या पराक्रमांची शिकवण सोबतीला होती!विपरीत परिस्थितीतून मार्ग काढण्याची कुटनीतिक ज्ञान महाराजांचं होतं!३५० हून अधिक किल्ल्यांचे राष्ट्रस्वामी छत्रपती शिवराय होते!छत्रपती महाराजांचं स्मरण करून आम्ही लढवय्यासारखे वासोटा किल्ला चढत होतो!
वासोटा किल्ला!ऑ.. वासून बघत राहावासा वाटतो!जावळी खोऱ्यातील,शिवसागर जलाशय पार करून आम्ही कोयना खोऱ्यातील या अतिदुर्गम किल्लावर साहसी चढाई करीत होतो!किल्ला असल्याने आंतरिक भीती वाटत असतें!उंच पठारावर १०-१२ एकरात हा किल्ला विस्तारलेला आहे!किल्ल्याची समुद्र सपाटीपासून उंची साधारण ४५०० फूट असावी!निमूळता कोकण कडा भयावह वाटत होता!खाली खोल दरी पाहून भीती वाटत होती!हृदयात धडधडतं होतं!गरगरायला होत होतं!अंगाला दरदरून घाम फुटत होता!.. तरीही धाडस और जिद्द के आगे जीत होती हैं!आमचा दिनांक ०८डिसेंबर २०२४ रोजी अनुभूतीचा विस्मयकारी प्रवास झाला!
आम्ही वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी निघालो होतो!घनदाट जंगलातील अरुंद खडकाळ पायवाटेचा पहिला टप्पा पार केला होता!असे चार टप्पे होते!.. अचानक उंच उंच घसरडी पायवट सुरू झाली होती!फिकट लालसर मातीत खडक रुतून बसलेलें दिसलें!एकेक पाऊल काळजीपूर्वक टाकत होतो!पिवळसर लाल खडकांवरं पाय ठेवून वाटचाल करीत होतो!आव्हान मोठं होतं!चढाई सुरू होती!गुढघ्यानां ताण येतं होता!एकमेकांना हात देत,वर ओढत त्या घनदाट जंगलाच्या चढ वाटेने प्रवास सुरू होता!वासोटा किल्ला व्याघ्रगड म्हणूनही ओळखला जात असल्याने दाट झाडाझूडपात वाघ बसला असण्याची भीती वाटत होती!तरीही आम्ही साहसी वीर होतो!काही साहसी महिला विरांगना देखील होत्या!
मध्ये मध्ये पायऱ्या अन कधी कच्ची पायावट मार्ग दाखवीत होती!कडेला हनुमान अन गणपतीचीं मूर्ती अखंड एका शिळेत कोरलेले दिसलें!श्रद्धापूर्वक नतमस्तक होत पूढे चालत होतो!पुढे गेल्यावर डाव्या बाजूने नागेश्वर सुळक्याचा बोर्ड लावलेला दिसला!नागेश्वराचं मंदिर होत!आम्ही सरळ वासोटा किल्ल्यावर दमदार पावलं टाकीत निघालो होतो!उभट चढ अंगावर घेऊन वासोटा किल्ला चढत होतो!हिवाळा असूनही अंगाला घाम येत होता!
आम्ही उद्दिष्टाकडे वाटचाल करीत होतो!शेवटच्या टप्प्यात जंगल नव्हतं!खुर्गटलेली झाडं अन गवत पार करीत तीव्र चढ अंगावर घेत एका पडक्या बुरुजाजवळ जाऊन पोहचलो होतो!कडेकडेने उभ्या कातळात पायऱ्या कोरलेल्या दिसल्या अन अचानक दोन्ही बाजूला पडके अवशेष नजरेस पडले!तेचं जिर्णावस्थेतील प्रवेशद्वार असावं!भिंती तग धरून उभ्या होत्या!!सतत दोन तास चालत येऊन शेवटच्या टप्प्यातील त्या पडक्या पायऱ्या पार करून किल्ल्यावर जाऊन पोहचलो होतो!किल्ल्याच्या पायथ्यापासून चालत आम्ही दोन तासांनी वासोटा किल्ल्यावर जाऊन पोहचलो होतो!
वासोटा किल्ला शिलहार राजा भोज यांनी बांधला असावा!अतिशय उंच अन दुर्गम ठिकाणी बांधलेला वासोटा किल्ला कदाचित गुरु वशिष्ठ यांच्या नावाने असावा!शब्द अपभ्रशं होऊन पूढे वासोटा नाव प्रचलित झाले असावे!किल्ल्यावर निमूळतं सफाट भू पठार दिसलं होतं!त्यावर काही भागावर जंगल वेढलेलं दिसलं!तेथे झाडांच्या सावलीला कित्येक गिर्यारोहक जाऊन बसले होते!घाम पूशीत होते!त्यांच्या चेहऱ्यावर अवघड किल्ला सर केल्याच समाधान दिसत होतं!किल्ल्यावरून खाली पाहिले असता एका बाजूला कोयना शिवसागरचा अफाट जलसाठा दिसत होता!
आम्ही इको बाबू कडा पाहात होतो!इंग्रजी उलटा यू सारखा आकार होता!खोल दरीतील हवा वरती येत होती!ते अनामिक भीतीयुक्त ठिकाण होतं!पुढे नागेश्वर सुळका होता!तेथून निघालो असता रस्त्यावर पाण्याचे लहान तलाव दिसलें!पाण्यावर हिरवट रंग दिसतं होता!चालताना पुढे आलो असता वाड्याचे प्राचीन भग्नावशेष नजरेस पडत होते!ते किल्ल्यावर प्राचीन वास्तूचे पुरावे होते जणू!इतक्या उंचावर बांधकाम कसं झालं असावं असा प्रश्न पडतो!शेजारी प्राचीन शिवमंदिर नजरेस दिसलं!मनोभावे दर्शन घेऊन पुढे निघालो!पुढे चालतांना कोकण कडा दिसला होता!तेथून कोकणचीं सुरुवात होते असं म्हणतात!हेचं टकमक टोक होते!डोळे भरून नैसर्गिक अनादी अनंताचं दर्शन घेत होतो!सह्याद्रीचं अतिविशाल रूपाचं दर्शन घडत होतं!काळजाचं थरकाप उडवणाऱ्या स्वरूपाचं दर्शन घेत होतो!🚩
छातीत धडकी भरविणारे उभट कडे दिसत होते!दरीतल्या खोलगट पोकळीतून वारा वरती येत होता!खोल दरी जणू तोंड ‘आ’ वासून उभी होती!आम्ही डोळे विस्फारून पाहात होतो!तेथून हिम्मतिने दुसऱ्या टोकावर गेलो होतो!त्या काळी भयंकर गुन्हेगारांना, कैद्यांनां शिक्षेसाठी वासोटा किल्ल्यावर ठेवण्यात येत असावं!उंच कडे,घनदाट जंगलातील वाघांच्या भीतीने कारावासातील गुन्हेगार पळून जाऊ शकत नव्हते!त्याला नैसर्गिक खोल खोल दरी देखील कारणीभूत असावी!
आम्ही सह्याद्री पर्वत रांगेतील नैसर्गिक अनमोल अविष्कार पाहात होतो!धापा टाकीत, घाम, भीती, शक्ती,दमछाक नंतर गोड अनुभव घेत वासोटा किल्ला सर केला होता!🚩
डोळ्याची, मनाची तृप्ती झाली होती!आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो होतॊ!दिड-दोन तास किल्ल्यावरील वेगळ्याचं अनामिक अनुभवांचीं शिदोरी घेऊन खाली उतरत होतो!किल्ला चढणे अवघड होते!त्याहून किल्ला उतरणे अति अवघड वाटत होता!गुढगे खाली उतरण्यास नकार देत होते!शरीरावर मनाचं नियंत्रण होतं!मनाच्या घोडयास आदेश मिळताचं कठीण पायवाटेने वासोटा किल्ला पायथ्याशी येऊन पोहचलो होतो!प्रवास ट्रेकिंगचा होता!जिद्दी मनाचा होता!शुद्ध भावनेचा होता!काही तासांचा अद्भुत, अलौकिक अविस्मरणीय पण धडकी भरवणार वासोटा ट्रेक अति उत्तम झाला होता!हृदय पटलावर हा ट्रेक कोरला गेला होता!
.
.. नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
७५८८२२९५४६
दिनांक-१३ डिसेंबर २०२४