वासोटा किल्ला जि.सातारा

वासोटा किला
वासोटा किला

वासोटा किल्ला जि.सातारा

वासोटा किल्ला..जि.सातारा
           (भाग-०२)
नानाभाऊ माळी

          
(आम्ही वासोटा किल्ल्यावर दिनांक ०८डिसेंबर २०२४रोजी गेलो होतो!त्याचं श्वास रोखून,एकवटून केलेलं वास्तव थरारक अनुभवकथन)

      टेंटमध्ये झोपलो असतांना अचानक जाग आली!थंडीचा गुलाबी स्पर्श जाणवत होता!दोन ब्लॅंकेट पांघरून सुद्धा धरण क्षेत्रातील पाण्यामुळे थंडी जाणवत होती!सकाळी ०८ वाजेच्या आत बोटीवर बसून वासोटा किल्ल्याकडे निघायचं होतं!सकाळी ठरल्याप्रमाणे बोटीवर जाऊन बसलो!आमची बोट इतर बोटींपेक्षा मोठी होती!४०जनांची कॅपॅसीटी असलेल्या बोटीवर जाऊन बसलो!इतर बोटी २० लोकांच्या कॅपॅसिटीच्या होत्या!बोटीवर बसलो होतो!पण दाट धुक्यामुळे सर्व बोटी जागेवरचं उभ्या होत्या!दहा फुटापेक्षा पुढचं अंतर दिसतं नव्हतं!सकाळ धुक्यानें व्यापली होती!
         
     काही वेळाने गूगल मॅपचा उपयोग करून सर्व बोटी एका मागोमाग निघाल्या!धुक्यातून अस्पष्टता जाणवत होती!दिशा कोणालाही कळत नव्हती!अथांग समुद्रातून बोटी चालाव्या तशा कोयना डॅमच्या बॅकवाटर मधून प्रवास सुरू झाला होता!आम्ही निसर्गाचा अविश्वसनीय अविष्कार अनुभवत होतो!बोट ड्रायवरनें सांगितलं की कोयना धरण साठ्याची लांबी ९० किलोमीटर आहे!आम्ही तोंडात बोटे घातली होती!समुद्रासारखं विशाल पाणीसाठ्यातून बोटी आपल्याचं नादात विशिष्ट वेगाने पळत होत्या!जलसाठ्यातून बोटी पळत होत्या!डाव्या-उजव्या बाजूला प्रचंड उंच पर्वत होते!

     जंगलांची झूल पांघरलेले डोंगर विशाल सह्याद्रीचीं आठवण करून देत होते!आम्ही दोन्ही डोंगरातील खोल दरीतल्या धरण पाणी साठ्यावरून पुढे पुढे जात होतो!काही ठिकाणी पाण्यातून झाडांच्या फांदया डोकं वर काढून हलतांना दिसतं होत्या!बुडत्या धरण क्षेत्रातील झाडं पाण्याच्या प्रवाहाला तोंड देत ताठ मानेने उभी होती!एखाद्या छत्रीसारखी दिसतं होती!डोळ्यात तें विलोभनीय सौंदर्य पिवून घेत होतो!पाणी साठा खोल असूनही काही ठिकाणी झाडांना वळसा घालीत बोट पुढे पळत होती!बोटीच्या इंजिनचा धूर नाका तोंडांतही जात होता!डिझेलचा नकोसा वास नाका तोंडात जात होता!


       सूर्य देवाचं सकाळचं कोवळं उन बोटीच्या शिडावरून आमच्या अंगाला स्पर्श करू लागलं होतं!अंगातील थंडी कमी होऊ लागली होती!आम्ही विशाल जल स्रोताकडे पाहात कडेकडेने दिसणारी घनदाट जंगलं संपदा पाहण्यात दंग होतो!निसर्गात आणि मानवी घुसखोरीच एकत्रित रूप पाहात होतो!आम्ही घरदार सोडून आलो होतो!निसर्गाच्या सुंदर रूपात एकरूप झालो होतो!समोर आव्हान होतं!भीती होती!साहस अंगी बाळगून बोटीतून वासोटा किल्ल्याकडे प्रवास सुरू होता!डाव्या उजव्या दिशेने डोंगराच्या पायथ्याशी झाडं दाटीवाटीने उभी दिसत होती! डोंगर पायथ्याची झाडफांदया अर्ध्यावर पाण्यात बुडालेल्या दिसतं होत्या!फांदया पाण्याला स्पर्श करून तरंगताना दिसतं होत्या!पावसाळ्यानंतर हिवाळा सुरू झाला आहे!धरणाची पाणी पातळी हळूहळू खाली येतं असावी!त्याच्या स्पष्ट खाणाखुणा झाडांच्या दिसण्यावरून जाणवत होतं!


        आमची बोट ध्येयाकडे पळत होती!बोट इंजिनचा टुकटुक आवाज कानी पडत होता!पाण्याची खोली किती असेल बरं? अशी शंका मनात आली होती!बोट ड्रायवरला विचारले असता बोटीखाली ३००फूट खोल पाणी सांगितलं!अंगावर सर्रकन शहारे आले होते!आम्ही ३०० खोल पाणी पातळीवर पुढे पुढे जात होतो!कोणाला पोहता येतं होतं मला माहीत नव्हतं!पण मला पोहता येतं नाही याचं मनस्वी दुःख झालं होतं!चुकून अघटित घडलं तर? नको, नको विचार न केलेला बरा होता!विशिष्ट भीती भूतांटकी बनून मानगूटावर येऊन बसली!तसा विचार झटकतं बसलेल्या प्रवाशांशी बोलण्यात एकरूप झालो होतो!मरणाची भीती किती भयंकर असतें!मी अनुभवत होतो!पण यातून साहस नावाचा योद्धा जन्माला येत असतो!साहसी दर्यावर्दी होण्यासाठी आम्ही अनुभव घेत होतो!तरीही अनामिक भीतीने मुठीत जीव घेऊन बसलो होतो!जीवाशी खेळ होता!छाती धडधडत होती!उगाचच शंकेची मूर्ख पाल मनात चुकचूकत होती!दर्यावर्दी बनून आव्हान पार करीत बरोबर दोन तासांनी जंगलाच्या एका चिंचोळ्या कडेला आमची बोट येऊन थांबली!



              बोटीवरून एकेकजन लावलेल्या शिडीतून उडी मारीत खाली उतरलो!मातीवर पाय ठेवला!माझी माय भेटली होती!माती ममतेच्या स्पर्शाने आईच्या कुशीत सुरक्षित आल्याचा आनंद तॊ वेगळा वाटत होता!हक्काची माय भेटल्याचा आनंद झाला होता!माती ममतेचा स्पर्श सुखावह वाटत होता!दोन तास तरंगणाऱ्या बोटीवर होतो!बोट हक्काची वाटत नव्हती!अथांग पाणी मृत्यू जबड्या सारखं वाटत होतं!मग शाश्वत सत्य काय होतं बरं?

      बोटीवरून जमिनीवर पाय ठेवला!मागे वळून पाहिले असता उंच डोंगर दऱ्यातील चिंचोळ्या पायथ्याशी धरणाचं पाणी अजगरासारखं शांत पहुडलेले दिसतं होतं!आपल्याचं मस्तीत छोटे मोठे तरंगावर तरंग येतं होते, जात होतं!लहानशा वळणदार लाटा उठतं होत्या!अथांगतेवर नजर खिळली होती!आमचा श्वास मोकळा झाल्यासारख जाणवत होतं!एक दिव्य पार केल्याचं समाधान होतं!


   आम्ही प्रचंड झाडांनी वेढलेल्या घनदाट जंगलातं प्रवेश केला होता!ते जंगल व्याघ्र प्रकल्पासाठी राखीव होतं!फॉरेस्ट खात्याचे जवान थांबले होते!त्यांनी आमच्याकडे असलेल्या बॅगा चेक केल्या!प्लास्टिकवर पूर्णतः बंदी असल्याने!परतीच्या प्रवासात पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या दाखविण्याचे आदेश दिल्यावर आम्हास पुढील प्रवासाला सोडण्यात आले होते!आता खऱ्या साहसी प्रवासाला सुरूवात झाली होती! सूर्यप्रकाशा आड झाडांनी वेढलेल्या अंधाऱ्या घनदाट जंगलातून प्रवासाला  सुरुवात झाली होती!

     हातात लहान मोठया काठ्या होत्या!ट्रेकर म्हणून जमीनीवर टेकवायच्या होत्या!घनदाट जंगलातील वाघापासून जीव वाचावा,बचाव व्हावा म्हणून काठ्या घेऊन पुढे वाटचालीस सुरवात केली होती!बुडत्याला काडीचा आधार होता जणू!निव्वळ मनाचं समाधान होतं!वाघाचा हल्ला कुठल्या काठीला जुमनणारा होता बरं?

      सर्व ट्रेकर एकमेकांना साथ हात देत मागे पुढे चालत होते!उंच झाडांच्या जमिनीवर पसरलेल्या मूळ्या सपासारखे वेटोळे करून इकडे तिकडे मातीत शिरलेल्या दिसतं होत्या!लोळत पडल्या होत्या!काही मूळ्या झोपळ्यासारख्या अधांतरी लटकलेल्या दिसतं होत्या!आम्ही खडकाळ कच्च्या पाय वाटेने एकमेकांना साथ देत पुढे सरकत होतो!चालतांना गर्द झाडीतून एक लहान नाला आडवा आला होता!त्यात पावसात डोंगरावरून वाहून आलेले अनेक दगड धोंडे सुस्थित पडलेले दिसतं होते!वाहत्या पाण्याची छोटीशी खळखळ कानी येत होती!स्वच्छ अन निर्मळ वाहात पाणी डोळ्यांना मोहवीत होतं!मी ओंजळीत घेतलं असता थंडगार स्पर्शाने ओंजळही सुखावली होती!सप्पकनं थोंडावर मारले!ताजे तवाने होत पुन्हा जंगलातल्या पायवाटेला मागे सारीत प्रवास सुरू झाला होता!प्रवास सहासाचा सखा असतो!दोघांनी हात मिळवला तर प्रवास सुखकारक होत असतो!आम्ही पहिला टप्पा पार केला होता!

(साहसी अनुभव भाग-०३ मध्ये भेटूयात!)
… नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
          ७५८८२२९५४६
दिनांक-१२ डिसेंबर २०२४