कवितेच्या गहिऱ्या डोही

कवितेच्या गहिऱ्या डोही
कवितेच्या गहिऱ्या डोही

काव्यसंग्रह “कवितेच्या गहिऱ्या डोही

कवितेच्या गहिऱ्या डोही

सौ.जयश्री काळवीट
यांचे अंतरंग उलगडणारा
लक्षवेधी काव्यसंग्रह
कवितेच्या गहिऱ्या डोही

उपक्रमशील शिक्षिका आणि कवयित्री सौ. जयश्रीताई काळवीट यांनी आगत्यपूर्वक आठवणीनं पाठवलेला “कवितेच्या गहिऱ्या डोही” हा कवितासंग्रह म्हणजे भावनांची असंख्य आवर्तनं सामावून घेणारा एक गहिरा डोह असल्याची प्रचिती तो वाचतांना आली. मानवी मनाचे असंख्य कंगोरे उलगडणारी त्यांची कविता संवादाचा पूल होत वाचकांशी सहज हितगूज साधते. मनाचे गूज या मनीचे त्या मनी पोहोचवते आणि एका समृध्द कवितेची सुखद जाणिव करुन देते. एका लक्षवेधी काव्यसंग्रहाचे या निमित्ताने साहित्य क्षेत्रात आगमन झाले आहे.

                  कवितासंग्रहाचे अंतरंग उलगडून दाखवणारे आशयगर्भी मुखपृष्ठ हे अत्यंत सुंदर झाले आहे. या संग्रहाला सुप्रसिद्ध कवी, समीक्षक डॉ. आशुतोषजी जावडेकर यांची अभ्यासपूर्ण आणि एकूणच कवितेचा वैश्विक पटल कवेत घेणारी प्रस्तावना मनभावन आहे. त्यांनी जयश्रीताईंच्या कवितेची उचित दखल घेतली असून त्यांच्या कवितेचा सर्वांगांनी परामर्श घेतला आहे. त्या अर्थाने ही कविता फक्त सशक्तच नाही तर ती स्वतःची स्वतंत्र शैली ठसविणारी आहे. या कवितेने स्त्री मनाचा गुंता अत्यंत हळुवारपणे सोडून, तो अलवार शब्दांचा उपयोग करत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.

                         जयश्रीताई या स्वतः शिक्षिका असल्यामुळे मुलांच्या भावभावना जाणून घेत, त्यांच्या शालेय अस्तित्वासोबत त्यांच्या कुटुंबाचा देखील त्या किती संवेदनशीलपणे विचार करतात ते या कवितांमधून जाणवते. शालेय परीसर, शिक्षकाची होणारी दमछाक, विद्यार्थ्यांची घुसमट त्यांनी सुक्ष्मपणे चितारली आहे. मुलांना शिकवता शिकवता त्यांच्या अंतरंगात त्यांनी डोकावून पाहिले आहे. त्यांच्या मनाच्या डोहातील तरंग टिपले आहेत. एका मातृहृदयी शिक्षिकेकडून हीच अपेक्षा असते. जी त्यांनी प्रत्यक्षात आणली आहे. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या कवितेत सहज उतरले आहे. त्यामुळे ही कविता तिचा स्वतःचा पोत घेऊन, स्वतंत्र लईत वावरते. कवी शशिकांतजी हिंगोणेकरकर यांनी म्हटल्याप्रमाणे, या कवितांनी नव्या परिवर्तनाची अस्वस्थ नोंद घेतली आहे. ती सभोवतालच्या वास्तवाला सामोरे जाणारी आहे. आत्मभानाने स्वयंप्रकाशित झालेली आहे. लिहत्या हातांना यापेक्षा दुसरे काय हवे असते.

                    “समग्र” प्रकाशनाने आकर्षक मांडणी,  सुबक बांधणी करून संग्रहाला अधिकाधिक देखणा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. संग्रह फक्त देखणाच नव्हे तर कवितांच्या एकूणच दर्जावरून तो चिंतनिय आणि संग्राह्य झालेला आहे. कविता संग्रहाच्या निमित्ताने त्यांनी व्यक्त केलेले मनोगत म्हणजे अलवार शब्दांची पेरणी करणाऱ्या ललितच्या अंगाने जाणारी एक दीर्घ कविताच आहे. यातील प्रत्येक वाक्य कवयित्रीच्या अंतर्मनाची साक्ष देणारी आहेत. यातील भावना पारदर्शी आहेत. मत निखळ आहेत. यातून त्यांच्या विचारांचा परीघ किती विस्तारलेला आहे याची ओळख पटते. खरंतर, कविता म्हणजे व्यक्त होणं आणि मुक्त होणं असतं ! तरी, या व्यक्त होण्याला आणि मुक्त होण्याला सभोवतालचा सामाजिक संदर्भाचा स्पर्श असावा लागतो. तेव्हा ती कविता कवी अथवा कवयित्रीची न राहता समाजाची होते. जयश्रीताई यांची कविता अशीच आहे. समाजाचं प्रतिनिधित्व करणारी.

                      कवितेचे सृजन होत असतांना, मनात भावभावनांचे तरंग उमटत असता. ते व्यक्त करतांना शब्द कितीही बोलके असले तरी त्यात भावनांचे गहिरं पण आवश्यक असते. हे गहिरं पण हरवले तर आपली कविता तिचं अस्तित्व हरवून बसते. ती जगाच्या पसाऱ्यात बेदखल होते. तिची कुठेही नोंद होत नाही. परंतु, या कवितेनं भावनांचं गहिरंपण जपलं आहे. संवेदनांचं हळवंपण टिपलं आहे. त्यातील चिंतन उत्स्फूर्तपणे आणि उत्कटतेने आलेले आहे. त्यांना मानवी संवेदनाची जोड लाभली आहे. ती राग, असूया, द्वेष यापासून कोसो दूर असून समता, समानता आणि मानवतेची कास धरणारी आहे. तिच्या जाणिवांची आभा अक्षर होईल. अक्षय राहील.

                        संग्रहातल्या एकूण ६० कविता असंख्य रंग एकत्र येवून तयार होणाऱ्या मोरपीसागत मनभावन आहेत. त्या निवांत चिंतन, मनन करत वाचण्याच्या कविता आहेत. असं असलं तरी सर्वप्रथम मी त्यांची प्रत्यक्ष व्यासपीठावरून ऐकलेली कविता “आनंदाची बातमी” शोधून काढली. पुन्हा एकदा वाचली. कवितेतल्या त्या मुलीला झालेल्या आनंदाचा मी पुनःप्रत्यय घेतला. तिला नवसाने झालेल्या भावाचा आनंद ती इतरांना पेढा वाटून, त्यांचं तोंड गोड करते. आईला वारंवार होणाऱ्या मुलींचा जाच आणि बाळंतपणं आता थांबतील, ही तिची प्रगल्भ जाण तिच्या आनंदाचं कारण असतं. ही गोड निरागस बालिका, तिच्या आईचं बाळंतपण, तिची आई होऊन करण्याचं मनोगत मांडते. लेकच आईची आई होते. ही जाणिवच किती गोड आहे. महान आहे. ही कविता मला तिच्यातील “बाई” मधील समग्र “आई”चं दर्शन घडवून जाते. ही भावना कवयित्रीने अत्यंत संवेदनशीलपणे टिपकागदागत अलगद टिपून तिला हळवं शब्द रूप दिले आहे. इतर कविताही त्याच तोडीच्या आहेत. काव्य रसिक या कवितेचं, संग्रहाचं उत्स्फूर्त स्वागत करतील अशी मी आशा बाळगतो. संग्रहातील दोन कविता ज्या, शांत मनाच्या काठावर, मौनाला बोलतं करु पहात आहेत त्या देत आहे. रसिकांनी आस्वाद घ्यावा.

मौनाचा काठ

असे कालवते आत काही
निःशब्द कोलाहल होई
जगण्याची सांजवेळ उरी
अंधारून येई….

मावळती दिशा आणि
संधिप्रकाश उरे
कसे कोण जाणे खोल
काळजात झरे…

मौनाचे परिघ आता
रुंदावत जाती
ओल संपलेली सारी
नामधारी नाती…

दिवसांचा गलबलाट
रात्रीची नीरवता
संधिकाल मौनाच्या
काठावर मुका मुका

डोह


खिडकीत उभी मी निरखित गहिरा डोह
हा कसा सुटावा तुझा जीवना मोह..

जग पल्याडचे मज सदैव खुणवित असते
या डोळ्यांनाही ऐहिका पारचे दिसते..

पाण्यावर तरंग शहारते है अंग
या गहिऱ्या डोही जुना जुना अनुबंध..

सांजेला डोही रोज उतरते ऊन
जलतरंगावरी हळवी रेशीम धून..

गलबलून येते हृदयामधूनी काही
डोहात मिसळते आठवणींची शाई..

वाऱ्याने अवघे रान स्वतःशी हलते
या डोह तळाशी दुःख मनीचे सलते..

पापण्या मिटून मी खिडकी करिते बंद
या कवितेचा मज जडला गहिरा छंद..!

अश्या संवेदनशील कविता लिहिणाऱ्या कवयित्री सौ. जयश्रीताई काळवीट यांचे मी अभिनंदन करुन त्यांच्या पुढील साहित्य प्रवासासाठी आभाळभर शुभेच्छा व्यक्त करतो.

© प्रा.बी.एन.चौधरी.
    देवरुप, धरणगाव.
    (९४२३४९२५९३)

Marathi Kavita

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *