अखिल भारतीय साहित्य परिषद दिल्ली बहूभाषिक कवीसंमेलन

अखिल भारतीय साहित्य परिषद दिल्ली बहूभाषिक कवीसंमेलन
अखिल भारतीय साहित्य परिषद दिल्ली बहूभाषिक कवीसंमेलन

अखिल भारतीय साहित्य परिषद दिल्ली बहूभाषिक कवीसंमेलन

उपजतच अत्यंत प्रखर बुद्धिमत्तेची देगगी लाभलेला एक अफलातून माणूस प्रा. विसूभाऊ बापट काल धुळे येथील सी.आर.टी.एस.हायस्कूलच्या सभागृहात अखिल भारतीय साहित्य परिषद, दिल्ली पुरस्कृत साहित्य भारती, धुळे या संस्थेद्वारा बहूभाषिक कवीसंमेलन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे अहोभाग्य मला लाभले.

अहोभाग्य या साठी म्हणतो, कारण या सोहळ्याचे प्रमुख अतिथी प्रा. विसूभाऊ बापट यांना भेटण्याची-ऐकण्याची व अनुभवण्याची ही अमुल्य अशी सुवर्णसंधी मला जवळजवळ चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ कालावधिनंतर मिळाली.
त्यावेळी मी वरोरा, जि. चंद्रपूर येथील कर्मवीर विद्यालयात सह.शिक्षक पदावर कार्यरत होतो व माझ्याकडे सांस्कृतिक विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेला असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी काय काय करता येईल याचा सातत्याने विचार करुन तद्नुषंगाने तत्कालीन सुप्रसिद्ध कवी, लेखक, व्यंगचित्रकार, कथाकार, गायक, नकलाकार, जादुगार यांच्या शोधात राहून त्यांना विद्यालयात सन्मानपूर्वक पाचारण करीत असे.

अखिल भारतीय साहित्य परिषद दिल्ली बहूभाषिक कवीसंमेलन
अखिल भारतीय साहित्य परिषद दिल्ली बहूभाषिक कवीसंमेलन

स्व.देवीदास सोटे, सुधीर भट, राम शेवाळकर, सुरेश द्वादशीवार, प्रा. विठ्ठल वाघ, भाऊ मांडवकर, मिर्झा रफी बेग, ज्ञानेश वाकुडकर, अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते या सारख्या समाजप्रबोधनकारांच्या संपर्कात राहून त्यांच्या पैकी ज्यांना शक्य झाले त्यांच्याशी विद्यार्थ्यांच्या भेटी गाठी घडवून देणे मला शक्य झाले, त्यातीलच एक म्हणजे प्रा. विसूभाऊ बापट हे होत.

त्यावेळी आजच्या सारख्या अद्ययावत सोई सुविधा उपलब्ध नसल्या तरी देखील अशा कार्यक्रमाचे सुनियोजित पद्धतीने व नियमितपणे आयोजन-नियोजन व संयोजन करण्यात येत असे.या सगळ्या मान्यवरांपेक्षा विसूभाऊ बापट मला काकणभर सरस व जरा हटकर वाटले.

त्यांच्या कार्यक्रमाचे स्वरुपही थोडे आगळ्या वेगळ्या स्वरुपाचे होते. हे सर्वात महत्त्वाचे होय. त्यांचा कुटुंब रंगले काव्यात हा कार्यक्रम त्यावेळेस महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर व विदेशातही अत्यंत लोकप्रीय असा कार्यक्रम होता. तसा तो आजही आहे!

विसूभाऊ हे त्यावेळच्या नामांकित व-हाडी कविंच्या कविता, पाठ्यपुस्तकात असलेल्या व नसलेल्या सुप्रसिद्ध कवींच्या कविता स्वरबद्ध करुन आपल्या सुमधुर आवाजात सादर करीत श्रोत्यांचे मनोरंजन व सोबतच प्रबोधन करीत श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवीत असत.

हा कार्यक्रम जितका आगळा वेगळा तितकाच श्रवणीय असा असायचा.
कुठल्याही कवीची कविता सादर करीत असताना विसूभाऊ पुस्तक अथवा डायरी समोर न ठेवता देखील न अडखळता, न थांबता तासन् तास काव्य सादर करीत असत. तो कार्यक्रम सार्वजनिक स्वरुपाचा असो की मग वैयक्तिक स्वरुपात आपल्या कुटुंबातील सदस्यांसमोरचा असो, विसूभाऊंचे हे कसब विलक्षण होते.

एखाद्या माणसाला जास्तीत जास्त किती कवींच्या कविता पाठ असू शकतात? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला जरी विचारला तरी त्याचे उत्तर फार फार तर आठ दहाच्या पलिकडे देणं अवघडच जाईल. ज्यादिवशी विसूभाऊंनी आपला हा कार्यक्रम आमच्या विद्यालयात सादर केला तो सबंध दिवस मी त्यांच्या सोबत घालवलेला मला आजही अगदी जसाच्या तसा आठवतो! माझ्या छोट्याशा घरी मी त्यांच्या भोजनाची व्यवस्था केलेली होती, त्या भोजनाचा आस्वाद घेतानाही भाऊंचं चर्वीत चर्वण व माझ्या कुटुंबाला काव्यात रंगवणं अखंड सुरुच होतं.

त्यांचं ते मनमोकळेपणानं वागणं बोलणं माझ्या आईला खूपच भावलं.
मित्रहो त्याकाळी दूरध्वनि होते परंतु एका शाळामास्तरची ऐपत खचितच दूरध्वनियंत्रणा लाऊन घेण्यायोग्य नव्हती. अहो! साधी एक कॕसेट घ्यायचे धाडस होत नव्हते त्या काळी! त्यामुळे विसूभाऊंचा आणि माझा संपर्क जरी तुटला तरी अंतरीच्या गाभा-यात आपण ज्याला अढळस्थान दिलेले असते त्या व्यक्तिचं व्यक्तिमत्त्व व ती व्यक्ती कधीच विस्मरणात जात नाही. याची मला वारंवार प्रचिती येते तशी ती कालही आली.

काल विसूभाऊंना तब्बल चाळीस वर्षानंतर बघताना-ऐकताना मला एक प्रश्न पडला तो असा, की तीस पस्तीस वर्षे वय असताना विसूभाऊच्या स्मरणात असलेल्या विदर्भातील, मराठवाड्यातील, कोकणातील, खान्देशातील व पश्चिम महाराष्ट्रातील नामवंत कवींच्या कविता आज सत्तरी ओलांडण्याच्या काठावार असताना या उतार वयात आल्यावर देखील अगदी भाषेच्या व त्या त्या भाषेतील व्याकरणासहीत व उच्चार शास्त्रीय तंत्रासहीत जशाच्या तशा कशा पाठ असतील? इतक्या प्रदीर्घ काळ त्या कविता स्मरणात कशा असू शकतात?

मी माझ्या विद्यालयात विसूभाऊंच्या कार्यक्रमाचे आयोजन केले त्या दिवशी त्यांनी कुठल्याही कवीची कविता असो ती सादर करताना त्यांच्या हातात मला कागद दिसला नाही व कालही श्रोत्यांना अनेकानेक कवींच्या कविता सादर करताना मला त्यांनी पुस्तकाकडे किंवा कागदाकडे बघितल्याचे आढळले नाही. कवीसंमेलनात असे असंख्य कवी आपण बघतो (त्यातला मी ही एक आहे) ज्यांना स्वतःची कविता सादार करताना कागद किंवा मोबाईलशिवाय एक ओळही सादर करता येत नाही!

विदर्भातील देवीदास सोटे असोत, तिफणकार विठ्ठल वाघ असोत, खान्देशातील बहिणाबाई चौधरी, जगदीश देवपूरकर, कुणी पान टपरीवाला देसले असो, की मग ते कुसुमाग्रज असोत, ना. धो. महानोर असोत, नारायण सुर्वे असोत, साने गुरुजी, संत गाडगेबाबा, अगदी वेदकालिन ऋचा असोत की संत, पंत वाङमय असो त्या त्या कवीचे नाव घेताच विसूभाऊ धडाधड त्यांचे श्लोक, अभंग, आर्या, भारुडं, लावण्या क्षणार्धात सादर करतात.

आजच्या या संगणकीय युगात माणूस कितीही प्रगतीचे दावे करीत असला तरी तो शेवटी परावलंबीच आहे. रोचच्या रोज कविता प्रसवणारे असंख्य कवी आहेत, असतीलही परंतु दुसऱ्याने लिहिलेल्या कविता वाचून त्यातील निवडक कविता कंठस्थ करुन कुटुंबात अथवा सार्वजनिक कार्यक्रमात सादर करणे हे नक्कीच ये-या गबाळ्याचे काम नोहे, त्याला विसूभाऊ सारखे सर्वधर्मसमभाव जोपासणारे, जात, पात, पंथ आसा भेदभाव अमान्य असणारे प्रज्ञावंतच असावे लागतात.

विसूभाऊंच्या भेटीतून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्यात त्यातील सर्वाधीक महत्त्वाची म्हणजे स्वतःतच गुरफटून न राहता इतरांवरही प्रेम करायला शिका, त्यांनाही प्रोत्साहन देत चला, कवितेची किंवा गझलेची एक ओळ जरी आवडली तरी दाद देत चला! आणि सतत लिहिते रहा सोबतच सतत वाचतही रहा! अगदी मरेस्तोवर! हो अगदी मरेस्तोवर! मित्रहो हे अत्यल्प स्वरुपाचे स्नेहभाव व्यक्त करताना मला खूप खूप आनंद होत आहे.

कोरोनाच्या करालदाढेतून मुक्त झाल्यावर जितका झाला असेल अगदी तितका! कदाचित अशाप्रकारे ही संवेदना व्यक्त करण्यासाठीच संजयदादा धनगव्हाळ किंवा दत्तात्रय कल्याणकर या दोन देवदूतांना ईश्वरीयशक्तिने भ्रमणध्वनिच्या माध्यमातून माझ्याकडे पाठवले असावे अशी मला माझी खात्री पटू लागलेली आहे.

मित्रांनो! विसूभाऊंनी आपल्या या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचा प्रारंभ केला तो काळ मी आमरण विसरणार नाही. विदर्भातील कार्यक्रमांसाठी एखाद्या लॉजवर आठवडाभर मुक्कामाला राहून माझ्यासारख्या साहित्यप्रेमी लोकांशी, शाळा-कॉलेजच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांशी संपर्क साधून घसा कोरडा होईपर्यंत काव्य वाचन व गायन करणं, कार्यक्रम संपल्यावर इतकेच द्या तितकेच द्या असा आग्रह न धरता जे मिळेल त्यात समाधान मानून पुढील प्रवासाला निघणं हा द्राविडीप्राणायम करीत.

महाराष्ट्रात, गुजरातेत व मध्यप्रदेशात हिंडून घशातून स्वरांच्या माध्यमातून अक्षरशः रक्त ओकीत फिरणं, याला खूप मोठं काळीज लागतं! खूपच मोठं! ज्या काळात विसूभाऊंना हा विलक्षण छंद जडला त्याकाळात त्यांना सहजपणे चार पाच आकडी पगाराची नौकरी कुठेही मिळाली असती व आज जवळपास एक लाखाहून अधिक निवृत्तीवेतन घेऊन अगदी ऐश आरामात राहता आलं असतं.

पण स्वतःच्या स्वार्थासाठी जगत बसण्यापेक्षा या विश्वात जे कवितेच्या रुपाने साहित्यक्षेत्रात लोकप्रिय झाले त्या कवींना लोकाभिमुख करुन समाजप्रबोधन करण्याचा विडा उचलणा-या विसूभाऊला हे मान्य नव्हतेच मुळी! आणि म्हणूनच हा उपजतच कुशाग्र बुद्धिमत्तेची देणगी लाभलेला अफलातून माणूस आजही एखाद्या तरुणाला लाजवील अशा अदम्य उत्साहाने काव्यात रंगतो!

हे काव्य जरी त्याचे स्वतःचे नसले तरी, त्या काव्यातून कवीला नेमका काय संदेश द्यायचा आहे, काय प्रबोधन करायचे आहे, हे पटवून सांगण्यासाठी कुटुंब रंगलं काव्यात या कार्यक्रमासाठी आमरण झटत आहे!
अशा या प्रा. विसूभाऊ बापट यांना मानाचा मुजरा करतो, सलाम करतो! वंदन करतो! व थांबतो!

शिवाजी साळुंके,’किरण’
चाळीसगाव, जि. जळगाव.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *