सेवापुर्ती सोहळा

सेवापुर्ती सोहळा
नानाभाऊ माळी
…भरीला रें घडा
घडा अमृताचा वाहे
जीवन वेचूनी घडीले
निघे अमृताची साय..!
सार सांभाळुनी उभा
जीव लावीतसे माय
कोणी राहिले ना परके
वासरू चाटीतसें गाय.!
किती पाझर फुटावा
डोळे वाहतीं घय घय
घाम भिजवी कष्टाशी
आज थांबलेतं पाय!
किती ऋणात मी राहू
नातें सांगुनिया जाय
जन्मोजन्मीचें उपकार
डोळे भरुनिया पाहे…!
सेवापूर्तीचा सोहळा
हृदयी भरलीयं माय
प्रेम तृप्तीनें भिजलो
आज निघेनात पाय!
काही राहिले ना मागे
करेल भविष्यचं सोय
निघू घेऊनिया पाय
भूत निघूनिया जाय!
झाले माहोल हळवे
गोठ्यात हंबरती गाय
हृदयी दाटला गहिवर
गाली ओघळत जाय!

काही हळवे क्षण भावनेला पाझर फोडीत असतात!अश्रूतं भिजवीत असतात!डोळ्याने भिजवीत असतात!गहिवर दाटून येत असतो!गालावार अनावर अश्रू ओघळत असतात!भाव भावनेतं भिजू लागतो!मागील इतिहास आठवू लागतो!कष्टाची उजळणी होऊ लागते!आठवणींचा उमाळा जन्म घेऊ लागतो!अश्रुंचा तुडुंब लोट घट्ट मिटलेल्या पापणीचा बांधही थांबवू शकत नाही!थोपवू शकत नाही!टचकन बांध फुटतो!अश्रू घळघळ गालावर निथळू लागतात!अंतःकरणी दबलेल्या अनावर भावनेचा उमाळा महापूर बनतो!डोळ्यातला उष्ण,गरम लोट गालावर ओघळू लागतो!दाटून आलेले ढग वर्षाव करु लागतात!कष्टाचा सडा चौफेर होऊ लागतो!मनं भिजवू लागतो!श्वास मोकळे होतात!हळूहळू आकाश निरभ्र होऊ लागतं! हा भावनिक क्षण असतो!कार्य सेवापुर्तीचा क्षण असतो!घाम गाळतं आयुष्यभर झिजलेल्या,जगलेल्या व्यक्तीच्या कार्यपूर्तीचा क्षण असतो!
काही क्षण अतिशय हळवे असतात!भावनिक असतात!अश्रुंचे तलाव भरतां भरता त्यावरून हलकीशी हवेची झूळूक वाहू लागते!मन फुलासारखं उमलू लागतं!कधी हास्य तुषारही फुटतात भूत-भविष्याची गोळाबेरीज मांडण्याचा हा भावनिक हळवा क्षण असतो!आठवणींचा पुंजका मोकळा करण्याचा भावनिक क्षण असतो!कष्टाळू हातांवर, सहलेल्या अंगा खांद्यावर खेळलेला भूतकाळ आठवू लागतो!घामा-कष्टानें भिजवून गेलेला भूतकाळ आठवू लागतो!प्रारंभ मध्याजवळ येऊन थांबतो!वर्तमानाशी येऊन थांबतो!मध्य वर्तमान असतो!भूतकाळाचा दीर्घ अनुभव पाठीशी असतो!भविष्याची अनाकलनीय चिंता असतें!भविष्य जानता येतं नसतं!आपण वर्तमानातं जगत असतो!प्रारंभीक भूतकाळाने घामात भिजविलेले असतें!माणूस कुठेतरी स्थिरस्थावर होता होता वयाच्या ५५ तें ६५ व्या वर्षी “सेवानिवृत्त” होतो!नोकरी करीत ३२तें ३८ वर्षं निघून जातात!असाच सेवानिवृत्तीचा दिवस उगवतो!इतक्या वर्षांत “मी काय केलं?” या उजळणीचा दिवस उगवतो! हा क्षण ‘सेवापूर्तीचा’ असतो!हा क्षण गत कार्य आठवणींचं मोर पीस बनून जातं!
आमच्या एका मित्राच्या सेवापुर्ती सोहळ्याला गेलो होतो!वेळ संध्याकाळचीं होती!सूर्य अस्ताकडे गेला होता!दिवस-रात्रीच्या मध्यावर, शांत शीतल प्रकाशात,सोहळा सुरु होता!…३० जून २०२४ रोजी आमचे मित्र श्री.लक्ष्मण माधवराव सोनवणे सेवानिवृत्त झाले होते!३५ वर्षें प्रदिर्घ नोकरी केली!कंपनीच्या नियमाप्रमाणे, वयोमानाप्रमाणे श्री.लक्ष्मणबापू सोनवणे रिटायर झाले!करोना काळात,संपूर्ण जगाला वॅक्सीन पुरवठा करणाऱ्या प्रसिद्ध सिरम कंपनीतून रिटायर झाले!
सेवापुर्ती सोहळ्यासं अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते!अनेक नातलग,स्नेहीजन,आप्त उपस्थित होते!शेजारी होते कंपनीतील अनेक अधिकारी,सहकारी होते!मित्रगण होते!वडील होते भावंड-वहिणी होत्या!पुतणे-पुतणी देखील उपस्थित होते!वेळ रात्रीची होती!आध्यत्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते!८५ वर्षांचे पिताश्रीं मुलाच्या सेवापुर्ती सोहळ्यासं उपस्थित होते!मुलाचं महान भाग्य होतं!श्री.लक्ष्मण बापूंनी भावनेचे अनंत धागे विनलेले होते!त्या धाग्यांचा मंडप बांधलेला होता!नात्यांचा, मैत्रीचा, स्नेहीजणांचा डोक्यावरील मंडप सुंदर दिसतं होता!आपुलकीचा होता!ओलाव्याचा होता!कुठेतरी हळवा कोपरा होता!
गावाहून अंगावरच्या कपड्यांवर आलेलें लक्ष्मणबापूंनी काही वर्षं भोसरीतं थोरल्या भावाकडे राहिले!हडपसरच्या ‘सिरम कंपनीत’ कामगार भरती होती!अर्ज केला!योगायोगाने सिरम कंपनीत नोकरी लागली!भाग्य उजळत गेलं!आयुष्य घडतं गेलं!हडपसरमध्ये भाड्याची खोली घेऊन, लग्न करून संसार थाटला!कष्ट-सचोटी असली की फळ मधुर-गोड असतं!माणसं जोडत राहणे!इतरांच्या सुख-दुःखात पळत राहणे!अडले नडलेल्यांना मदत करणारे लक्षमनराव बापू माणसं विणीत होते!कंपनीतं,नात्यात, शेजाऱ्यांशी मधुर संबंध जोडत होते!मुलं मोठी झाली!शिकून नोकरीला लागले!त्यांचं लग्न झालं!वर्षं कसे भराभरा पळत राहतात!सुख-दुःखाचां आलेख खाली वर होत राहतो! लक्ष्मणबापू हसत सामोरे जात राहिले!३५ वर्षं कसे निघून गेलेतं कळले देखील नाही!३० जून २०२४ रोजी उत्तम आरोग्य सांभाळत सन्मानाने सेवानिवृत्त झाले!
०६ जुलै २०२४ रोजी सेवापुर्ती सोहळा होता!सोहळा भावनेला वाट मोकळी करीत राहिला!स्नेहीजणांच्या बोलण्यातून ऋणानुबंधांचे धागे घट्ट होत राहिले!जोपसलेल्या बोलक्या नात्यांनी शब्द पाझरतं राहिले!हळवे क्षण डोळ्यातून पाझरतं राहिले!उपकाराचे ऋण शब्दात भिजत राहिले!प्रत्येक वक्त्याच्या बोलण्यातून “लक्ष्मणबापुं”च्या सतशील जगण्याचे कंगोरे उलगडत राहिले!सोहळा सेवापुर्तीचा होता!सोहळा त्यागमुर्तीचा होता!मदतगाराचा होता!सोहळा भुतकाळातील कर्तृत्वाचा होता!जोपासलेल्या नात्यांचा होता!शेवटी आभाराक्षणी पुत्र स्वप्नील वडिलांच्या त्यागाविषयी बोलत राहिला!वडिलांच्या कष्टाविषयी बोलत राहिला!मी डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूनां थांबवले नाही!खरचं जगणं असचं असतं का?माणसं जगतांना समोरच्याच्यां डोळ्यात सौहार्दाचे, उपकाराचे,दूरदृष्टीचें,परोपकाराचे अश्रू ठेवून जगत असतात!मी ही दबलेल्या भावनेला रोखू शकलो नाही!चष्म्याखाली हातरूमाल होता!हळूहळू भिजत राहिला!व्यक्ती अशा असतात ज्या आपल्या जगण्यातून आदर्श निर्माण करीत असतात!आई-वडिलांच्या समृद्ध संस्कारांनी वाटचाल करणारे सेवाव्रती श्रीं. लक्ष्मण बापू हृदयात जाऊन बसले!भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन घड्याळ पाहिली!रात्रीचे दहा वाजले होते!सेवापुर्ती सोहळ्यातून नवीन जगणं घेऊन निघालो होतो!नवीन दृष्टी घेऊन निघालो होतो!
नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
७५८८२२९५४६
दिनांक-१२ जुलै २०२४