पाणी आडवा पाणी जिरवा पाणी जागतिक जल दिन विशेष लेख
तोय,वारी,जल,जीवन,नीर पाणी पाणी आडवा पाणी जिरवा
रखरखत्या उन्हाचा मे महिना होता.सगळीकडे लगिनघाई होती.आमच्याकडेही लग्नाचीच गडबड होती.लग्नासाठी नातेवाईक,पै-पाहुण्यांना आग्रहाचे निमंत्रण होतं.
त्यामुळे मामा-मावशी, आत्या,काकू,मामी आणि त्यांची मुलं-मुली सारे वऱ्हाडी मंडळी जमली.त्यातच नळाला ३-३दिवसाआड पाणी येत होतं.एरवी ठीक हो,पण पै-पाहुण्यांच्या समोर आमची अशी फट्फजिती.जीव रडकुंडीला आला हो पाणी मिळवतांना.गावच्या नदीचं तर पार वाळवंट झालं होतं,गांवविहिरीनं तळ गाठला होता.
आमची धावपळ,तारांबळ पाहून सरला मावशी म्हणाली “आमच्या गावाला घागरभर पाण्यासाठी २-३मैल पायपीट करावी लागते आणि रिकाम्या घागरीने परत यावं लागलं तर डोळ्यात पाणी येत.
सुदामा तात्या म्हणत होते, आमच्या गावची विहीर आटली, विहिरीत २००फुट खोल बोअर केली पण तिही कोरडीच.मग मात्र तोंडचं पाणी पळाले.शेतातल्या विहिरींची ही तीच गत, हातातोंडाशी आलेली उभी पिकं वाळतांना पाहण्याचं दुर्भाग्य नशिबी आलं.
हीच अवस्था सर्वदूर.तेव्हाच बाळ्या बोलला,”अहो तात्या,लातुरला नांदेडला पाण्याची बिकट अवस्था टि.व्ही वर दाखवत होते.तुम्ही बघितलं ना तेथे रेल्वेने पाणी पुरवठा केला जातोयं.तशी मनू आत्या म्हणाली,”अरे आपण माणसं कुठेतरी पाणी मिळवू,तहान लागली तर सांगतो तरी पाणी द्या म्हणून पण् माझ्या म्हशी,बैल तहानले तर सांगणार कुणाला त्यांना तहान लागली हे.मग मलाच समजून घ्यावे लागते.रानात चरायला न्यायचं तिकडेच मिळेल तिथे पाणी पाजायचं नि मग यायचं घराकडं.
मथुरा आजी जुने दिवस आठवत म्हणाली, आमच्या बालपणी नद्या कशा खळखळ वहायच्या,धुणं धुवायला नदीवर जायचो येताना घागरभर पाणी भरून आणायचो.गुरढोरं पाण्यात डुंबत पोरं बाळं मजेत पाण्यात खेळत.सर्वदुर हिरवीगार वनराई ,मनं मोहरुन यायचं.पिकांना मोकाट पाणी सोडलं जायचं.ते वाहुन रस्त्यावर यायचं.आत्ता डोंगर सुध्दा उघडे पडले तर हिरवळ कसली?
भूगर्भातील पाणी साठा एखाद्या कणगीत साठवलेल्या धान्यासारखा.रोजच्या बेसुमार वापराने तो एक दिवस संपणारच.रोजच्या वापराने रिकामी होणारी धान्याची कणगी आपण नवीन सुगी पिकुन आल्यावर नव्या धान्याने भरुन घेतो.
तशीच भूगर्भातील आपण वापरलेला पाणीसाठा पावसाळ्यात पडणारे पाणी अडवून,जमीनीत जिरवून कणगी सारखं भरुन काढणं गरजेचं आहे.मथुरा आजी अनुभवाचे बोल बोलत होती.तेव्हाच साठे गुरुजी बोलते झाले.
अहो,भारत स्वतंत्र झाला १९४७ला तेव्हा भारताची लोकसंख्या होती ४४कोटी,आज आपण १३५कोटीच्या पुढे आहोत.अशी खाणारी तोंडे वाढत आहेत.कारखानदारी,धरणे,रस्ते यासाठी उपजाऊ जमिन बिनशेती होत आहे.शिवाय निवारा साठी घरे बांधणे ही आलेच, त्यामुळे प्रत्येक गांवाचं शहर होवु लागलं.झाडे तोडत गेलो,नविन लावायचे नांव नाही.लावलचं एखादे रोप तर जगवायचं कुणी? तिकडे बघायला कुणाला वेळ नाही.
प्रदुषण वाढलं,वाहनं वाढली त्याची प्रदुषण वाढवण्यात भरचं पडली.हवा अशुद्ध, पाणी अशुद्ध मग रोगराई वाढणारचं आणि अशी बिकट अवस्था होणारंच.हे नको असेल तर यावर्षी प्रत्येकाने पावसाळ्यात ५-५झाडे लावा आणि नक्की जगवा.म्हणजे झाडे वाढतील, प्रदुषण कमी होईल, पावसाचं पडणारे पाणी झाडांच्या मुळ्या वाटे जमिनीत जिरेल.
माती घट्ट धरून ठेवली जाईल, त्यामुळे धरणे-तलावात गाळ कमी साचेल.पुन्हा ही धरती हिरवीगार होईल आणि पुर्वी चे दिवस यायला वेळ लागणार नाही.
हे उपदेशपर कथन सुरू असतानां च भटजी आले, लग्नघटिका जवळ आली, नवरदेव मंडपात आला.नवरीमुलगी म्हणाली, आम्हाला आहेर नको, आमच्या लग्नाची आठवण म्हणून प्रत्येकाने १-१झाड लावा आणि नक्की जगवा.हाच आम्हाला तुमचा आशिर्वाद.
भटजींनी माईक हातात घेऊन मंगलाष्टक म्हणू लागले, मध्येच वधुपिता गजाकाका म्हणजे माझे काका म्हणाले, जेवल्यावर हात धुवायला पाणी जास्त सांडू नका, पाणी जपून वापरा.
पाण्याची नासाडी थांबवा.मला पाणी मिळवताना खुप त्रास झालेत,तेच उद्या आपण सगळ्यांना नको असेल तर पाणी आडवा हो… पाणी जिरवा हो!
आडवा पाणी -जिरवा पाणी!
येईल पुन्हा आबादानी!!
हा थेंब थेंब पाण्याचा, आता जीवापाड जपण्याचा!!
जागतिक जल दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा सह.
रमेश महाले शहादा
Pingback: जागतिक जल दिन (World Water Day) - मराठी 1