जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त
सत्तरी ओलांडलेल्या सर्व वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींना सादर समर्पित!

सत्तरी ओलांडली दम लागतो आता
घेत काठी तोल मी सांभाळतो आता
गोव-या गेल्या स्मशानी गूढ आकळले
अंत आला जवळ पक्के जाणतो आता
पायरीवर पाय ठेवायास घाबरतो
डगमगे ती नाव तैसा डोलतो आता
केस पिकले, दातही कामातुनी गेले
लाळ चघळत बोळके जोपासतो आता
कष्ट उपसत काळ गेला भागलो-शिणलो
या कडाचा त्या कडावर लोळतो आता
कान डोळ्यांची किती ती काळजी घ्यावी
भाष्य करणेही अकारण टाळतो आता
वृद्ध झाल्यावर कळाले मोल पत्नीचे
दुखविले होते बहू पस्तावतो आता
लेक-लेकी अन् सुनांसह जावई जपती
नातवंडांना उरी कवटाळतो आता
सत्तरीनंतर जगायाची नको शिक्षा
साकडे त्या यमदुताला घालतो आता
अंत्यसमयी ने सुखाने देवराया तू
मागणे तुज हेच अंतिम मागतो आता
आत्मग्लानी ‘किरण’ छळते काहिली होते
माणसागत माणसातच राहतो आता
शिवाजी साळुंके, ‘किरण’
चाळीसगाव, जि. जळगाव.

खूप छान