जागतिक कविता दिवस लेख विशेष तुमची कविता अन् तुम्ही

जागतिक कविता दिवस लेख विशेष
जागतिक कविता दिवस लेख विशेष

जागतिक कविता दिवस लेख विशेष

तुमची कविता अन् तुम्ही

        जागतिक कविता दिवस साजरा करण्यापेक्षा, कविता जागतिक स्तरावर सादर झाली पाहिजे अथवा आपल्या प्रतिच्या कवितेचा दिवस साजरा झाला पाहिजे, असा एक दिवस एकदा तरी आयुष्यात आणला पाहिजे. आणि ह्यासाठी प्रयत्न तुमच्यातला ‘मी’ च करू शकतो. आपल्या कवितेला आपल्याशिवाय कुणी पुढे नेऊ शकत नाही. कारण कवितेला आपणच बऱ्यापैकी जाणतो. मानतो. कवितेवर प्रेम करतो म्हणून आपल्या कवितेचं बोट धरून सध्या तरी आपल्या कवितेला पुढे कुणी नेऊ शकत नाही. हा प्रयत्न आपल्यालाच करावा लागणार आहे. कारण आपण जगत चाललेल्या काळाचं प्रतिनिधित्व करत आहोत.

मराठी प्रदेशातील कवी

मराठी प्रदेशातील मला खालील प्रमाणे काही निवडक कवी – कवयित्रींच्या कविता आवडतात. कारण माझी आवड कवितेतील नवंपण, नव्या संकल्पना, नव्या जाणिवा, नवी शैली शोधत असते.
रावसाहेब कुवर – Ravsaheb Kuwar
संदीप जगताप – Sandeep Jagtap
किरणकुमार मडावी –
अक्षय शिंपी – Akshay Shimpi
पुनीत मातकर – पुनीत मातकर
आबासाहेब पाटील – Aba Pati L
कविता ननवरे – Kavita Nanaware
सुनिता झाडे – Sunita Zade
मनिषा पाटील – Manisha Patil
मयुर राजपूत – Mayur Rajput
तान्हाजी बोऱ्हाडे – Tanhaji Borhade

साहित्य प्रवाहात आपल्यावर कुणी तरी जळणारं हवं तसेच आपल्यालाही कुणावर तरी जळता यायला पाहिजे. तेव्हाच आपण जगत चाललेल्या काळाचं प्रतिनिधित्व करू शकतो. मी वरील पैकी कवी – कवयित्रींच्या कविता व त्यांची लेखनशैली वाचून जळतो, पण ह्या जळण्यामागे मी माझं पुढील लेखनासाठी नक्कीच प्रेरणा घेतो.

बाकी नव्या लिहित्या हातांपर्यत, त्यांच्या लेखना पर्यंत मी पोहचलेलो नाही पण पोहचण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. कारण त्यांची कविता भविष्यात मला देखील प्रेरणा देणारी ठरू शकते.  Sagar Jadhav Jopulkar  या मित्राची जागतिकीकरणावरील ‘नाॅट रिचेबल’ ही कविता गेल्या तेरा वर्षा आधी जळगाव येथील प्रतिभा संगम संमेलनात ऐकली होती आणि मलाही त्याच्याकडून जागतिकीकरणाच्या कविता लिहायला प्रेरणा लाभलेली आहे. तसं आम्ही ह्या तेरा वर्षात एकदाही प्रत्यक्ष भेटलेलो नाहीत.

ज्यांची कविता उमगली नाही ते महाकवी

•आपल्या मराठी प्रदेशात ज्यांची कविता उमगली नाही, वाचून काळजात देखील पोहचली नाही, अशा कवींना बरेच मराठी समीक्षक, वाचक, प्राध्यापक ‘महाकवी’ म्हणतात. पण खरं सांगायचं तर असे महाकवी माझ्या वाचक मनात फार काळ वास्तव्य करत नाही.

•एका ओळीची कविता गिनीज बुक रेकार्ड करू शकते, तसेच अकाराशे ओळींची कविता देखिल वर्ल्ड बुक रेकॉर्ड करू शकते मात्र या वर्ल्ड बुक रेकॉर्ड, गिनीज बुक रेकॉर्ड करणाऱ्या कविता विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट होतील याची गॅरंटी नाही.

•कविता प्रतिभेची उत्तम देण आहे. कुठलीही कविता कवी – कवयित्रीच्या भावगर्भात जन्माला येतांना ती सर्वप्रथम वाचकांना व समीक्षकांना विचारून जन्माला येत नाही. कारण कवी – कवयित्रीला स्वतंत्र अस्तित्व, स्वतंत्र विचारधारा लाभलेली असते. मग का विचार करायचा वाचक – समीक्षक – अभ्यासकांचा ? त्यांचा जरका आपण विचार केला तर आपली जन्माला येणारी नैसर्गिक कवितेचं सिझर होईल अथवा आपल्याकडूनच कवितेसाठी आयव्हीएफ सारखा प्रयोग होईल.

कवितेचे प्रवाह

•कवितेचे प्रवाह•
१] दलित         २] आदिवासी
३] ग्रामीण        ४] अस्तित्व
५] स्त्रीवाद       ६] सौंदर्य
७] विज्ञान        ८] जागतिकीकरण
९] कामगार    १०] बाल
११] माणूस  
आदी मराठी कवितेचे प्रवाह आहेत जे काळानुसार दूर्मिळ होत चालली आहेत.

वाचक दूर्मिळ होत चालले आहेत

•समीक्षा ही साहित्यिकापेक्षा साहित्यिकाच्या साहित्यकृतीवर केली जाते. म्हणून साहित्य प्रवाहात याचा फारसा विचार करायची आवश्यकता नाही. काळानुसार वाचक दूर्मिळ होत चालले आहेत तसेच समीक्षक देखील दूर्मिळ होणारच आहेत.

साहित्य समीक्षेचे आद्य उद्दिष्ट म्हणजे सम्यक आकलन अथवा दर्शन हे असते. त्यात त्या साहित्यकृतीचे अर्थग्रहण हे प्रथम येते. त्यानंतर तिचे गुणग्रहण, रसग्रहण, मर्मग्रहण, सौंदर्यग्रहण ह्या गोष्टी येतात परंतु समीक्षा एवढ्यावरच थांबत नाही. ती साहित्यकृती ज्या साहित्यप्रकारात मोडते त्या साहित्य प्रकारातील अन्य कृतींमध्ये तिचे स्थान काय आहे, ती त्या कृतींहून श्रेष्ठ असल्यास तिची श्रेष्ठता वा महात्मता कशात आहे, हेही समीक्षक सांगण्याचा प्रयत्न करीत असतो.

त्यामुळे समीक्षेचे दुसरे उद्दिष्ट साहित्यकृतीचे मूल्यमापन हे ठरते. त्यातून वाचकांच्या अभिरुचीला वळण लावण्याचे उद्दिष्टही अप्रत्यक्षपणे वा अनुषंगाने साधते तथा पिह्यावरुन समीक्षा ही परार्थच असते, असे म्हणता येत नाही कारण समीक्षा हा एक शोध आहे. कोणत्याही साहित्यकृतीचे स्वरुप, तिची वैशिष्ट्ये, तिचे सौंदर्य, तिच्या महात्मतेचे रहस्य ह्यांचा शोध समीक्षक स्वत:साठी घेत असतो.

समीक्षा प्रकार

•समीक्षा प्रकार•
१)रूपनिष्ठ समीक्षा     २)न्यायिक समीक्षा,
३)आस्वादक समीक्षा, ४)चरित्रात्मक समीक्षा,
५)समाजशास्त्रीय समीक्षा, ६)मार्क्सवाद समीक्षा,
७)मानसशास्त्रीय समीक्षा, ८)अनुबंधनात्मक समीक्षा,
९)आधुनिक समीक्षा, १०)नवसमीक्षा.

वाचकांचे साहित्यिकांना प्रश्न

•बऱ्याचदा वाचक साहित्यिकाकडून कवितेचं अथवा साहित्यकृतीचं गुढ जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. ‘तुम्ही असं का लिहिलं?, तुम्हाला नेमकं ह्या लिखाणातून म्हणायचं काय आहे?’ असले प्रश्न वाचकांनी साहित्यिकाला का? विचारावं! वाचकांना जरका साहित्यकृतीचा आस्वाद घेता येत नसेल तर त्यांनी कुठल्या प्रकारे ती साहित्यकृती वाचली? हा प्रश्न नाही का त्यांना पडत.?

मान्य आहे की, वाचक शब्दकोश घेऊन साहित्यकृती वाचत नाही पण कधी कधी साधा सरळ आकलनीय आशय साहित्यकृतीचा असतो जे वाचक सहज वाचून सोडतात. सहज वाचून सोडलं जाणारं साहित्य नसतंच कधी. कारण प्रत्येक नवनिर्मिती होतांना ती निर्मिती वाचकांचा विचार करून किंवा वाचकांच्या मनाला विचारुन येत नाही!

पण वाचकांना समीक्षात्मक विचार करण्याची पडलेली नसते, म्हणून बोटावर मोजण्या इतकेच समीक्षक समीक्षाकडे वळतात, साहित्यकृतीचा समीक्षात्मक विचार करतात, समीक्षा लिहित असतात. मराठी साहित्य प्रवाहात काही साहित्य प्रकारात समीक्षा केली गेली आहे तर काही साहित्य प्रवाहातले साहित्य तर अजूनही समीक्षकच शोधत राहतात आणि हे वर्तमान आहे मराठी साहित्याचे, जे कुणीही नाकारू शकत नाही….

प्रविण पवार

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *