साहित्य अकादमी
साहित्य अकादेमी साहित्य अकादमी
•साहित्य अकादेमी• [पूर्ण वाचूनच प्रतिक्रिया द्या]
माणूस इतका सहज जुळत नाही. भावनांच्या प्रदेशात कला – भाषा – संस्कृती – साहित्याचा भाव जेव्हा काळजाला भिडतो तेव्हा माणूस जुळतो, अशी माझी समज. म्हणून मी माणूस जोडण्याचा प्रयत्न अधिक करतो कारण भाषा – कला – संस्कृती – साहित्य ही माणसाची निर्मिती आहे बाकी सर्व गौण आहे. ‘आम्ही भारताचे लोक’ हा भाव जेव्हा मनापासून मनातून येतो तेव्हा मी भारताशी जुळत जातो. मात्र भारताशी जुळत असताना मराठी प्रदेशातील लोकांना जुळणं मला सोपं वाटत नाही.
मी जेव्हा आंतरराष्ट्रीय मंचावरून माझ्या मातृभाषेतून प्रतिनिधित्व करतो तेव्हा मला भारतीय लोक जुळतात, जेव्हा भारतीय मंचावरून प्रतिनिधीत्व करतो तेव्हा तुरळक लोक राज्यातील लोक जुळतात आणि जेव्हा मी राज्यातील मंचावरून प्रतिनिधीत्व करतो तेव्हा मला प्रादेशिक विभाग जुळतो. माणसं जुळण्याचा हा आलेख जरा उलटाच आहे. म्हणून काळजात भारत ठेवून फक्त माणूस जोडायला हवा, हाच प्रयत्न सदानकदा असतो.
‘साहित्य अकादेमी’ या मंचावर गेल्यावरच भारतीय साहित्य क्षेत्राचा व भारतीय साहित्य प्रवाहाचा अंदाज घेता येऊ शकतो. कारण साहित्य अकादेमी नव्या संकल्पना राबवायला समर्थ आहे. फक्त सुचवणारे अकादेमीला कमी लाभले आहेत ज्यामुळे कसदार – उत्तम लिहित्या हातांना लवकर संधी उपलब्ध होत नाही. वर्ष २०२२ ला शिमला येथे मी साहित्य अकादमीला एक संकल्पना सुचवली होती. ती म्हणजे ‘साहित्य अकादेमीचा बॅच’ ती संकल्पना यावेळी राबवली गेली. तसं साहित्य अकादेमी निमंत्रित साहित्यिकांना गर्जावू वस्तू व मानधन देऊन गौरवित असते. जसे की ब्यॅग, वही, पेन, परिचय स्मरणिका, पुस्तक, कप. अकादेमी सहभागी कवींना सन्मानचिन्ह सन्मानपत्र देत नाही… हे जरा मनाला भावणारं आहे.
साहित्य अकादेमी विशेष
१} साहित्य अकादेमी प्रेमचंद फेलोशिप.
२} साहित्य अकादेमी डॉ. आनंद कुमारस्वामी फेलोशिप.
३} साहित्य अकादेमी मानद महत्तर सदस्यता.
४} साहित्य अकादेमी फेलोशिप.
५} साहित्य अकादेमी भाषा सन्मान.
साहित्य अकादेमीचे विविध पुरस्कार
१] साहित्य अकादमी पुरस्कार
२] युवा साहित्य अकादेमी पुरस्कार
३] साहित्य अकादेमी अनुवाद पुरस्कार
४]बाल साहित्य अकादमी पुरस्कार
साहित्य अकादेमीचे महत्वपूर्ण कार्यक्रम
१] अस्मिता. २] आविष्कार
३] बाल साहिती. ४] साहित्य मंच
५] लोक विविध स्वर. ६] ग्रामालोक
७] भाषांतर अनुभव. ८] पुस्तक चर्चा
९] दलित चेतना. १०] व्यक्ती आणि कृती
१२]प्रवासी मंच. १३] पूर्वोत्तरी
१४] लेखक भेट. १५] मुलाखत
१६]नारी चेतना. १७]कथासंधि
१८] कविसंधि. १९] कवी – अनुवादक
मी साहित्य अकादेमीला आणखी एक सुचवलंय, की साहित्य पुरस्कारांसाठी ज्यांची पुस्तके नोमिनेशन यादीत बसतात त्यांना देखील एकदा मंचावर संधी दिली गेली पाहिजे.
•दरवर्षी साहित्य अकादेमी निवडक साहित्यिकांना व्यासपीठावर संधी उपलब्ध करून देते. यात काही जुने तर काही नव्या साहित्यिकांची निवड होत असते. पण प्रत्येक कवी – लेखक व्यासपीठावरून आपला वैचारिक बेस्ट देईलच असंही नाही, ‘प्रत्येक वेळी मला संधी मिळतेय’ हा आनंद मी नेहमी का व्यक्त करावा ? मलाही वाटतं जशी मला संधी मिळाली तशी ती संधी इतर भाषा व मातृभाषेतील लेखक कवींना देखील मिळावी. मी सुचवू शकतो एखाद्या साहित्यिकाचे नाव.
पण ते नाव मंचावर येईलच! याची मलाही कल्पना नाही. हो पण व्यासपीठालाही नवा चेहरा, नवीन साहित्यातील अस्तित्व हवं असतं, असं मला वाटतं. कारण मला कळतो साहित्यातील तर्क आणि साहित्य दर्जा. साहित्य जर प्रवाह असेल तर या प्रवाहाला समजून घेणे गरजेचं आहे कारण प्रवाह कुणा एकासाठी नसतोच. यांसाठी मला पेटायला इंधनाची नव्हे तर पुस्तकांची गरज भासते.
साहित्य अकादमी व माझा तर्क अनुभव
•साहित्य अभ्यासकाचा अभिप्राय आणि साहित्य अकादेमी पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचा अभिप्राय यात खूप फरक असतो. इथं अभ्यासक साहित्य अकादमी पुरस्कार मिळवलेला साहित्यिक असेलच असे नाही, तसेच साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणारा साहित्यिक अभ्यासक असेलच असेही नाही.
•मराठी प्रदेशात बऱ्याच पुस्तकांच्या पाठराखणीला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचे विचार दिले गेलेले असतात. मी अशा प्रत्येक पुस्तकांच्या पाठराखणीला सहमत राहतोच असेही नाही. म्हणून मी कुठलंही नवं पुस्तक वाचताना सहसा प्रस्तावना, पाठराखण वाचायचं टाळतो आणि सरळ साहित्य प्रकारच वाचायला सुरुवात करतो.
•महाराष्ट्रात एकदा राज्य वाङ्मय पुरस्कारातील ‘कवी केशवसुत’ पुरस्कार मिळवून दुसऱ्यांदा पुन्हा केशवसुत पुरस्कार मिळवण्यासाठी धडपडणारे कवी समकाळात देखील आहेत. राज्य वाङ्मय पुरस्कारातील केशवसुत (कविता), ह.ना.आपटे (कादंबरी), लक्ष्मीबाई टिळक (आत्मचरित्र) सारखे जर पुरस्कार एखाद्या साहित्यकृतीला मिळाला तर पुढिल चार वर्षात त्या साहित्यकृतीला साहित्य अकादेमीचा पुरस्कार दिला जाऊ शकतो. तसेच राज्य वाङ्मय पुरस्कार मिळालेली सर्वच साहित्यकृती कसदार असते असेही नाही. राज्य शासन एकदाच त्या वर्षासाठी मागवल्या गेलेल्या साहित्यकृतीची दखल त्या एका वर्षापुरताच घेते, मात्र प्रौढ साहित्य अकादेमी वर्गात एखाद्या साहित्यकृतीची दखल पुढिल चार वर्षात कधीही घेतली जाऊ शकते.
•आपलं लेखन कसदार आहे, आपल्याला आपली साहित्यकृती साहित्य अकादमी पुरस्कारासाठी पाठवायची आहे पण आपली साहित्यकृती प्रादेशिक विभागातून डावलली जाईल, असे जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा आपण आपली साहित्यकृती सरळ दिल्ली साहित्य अकादेमीच्या पत्त्यावर पाठवायची, कारण शेवटचा निरागस प्रयत्न तिथून सिध्द होतो. इथंही ‘पुरस्कार देऊन टाका’ सुचवण्यासाठी भरपूर आहेत.
•२०१८ पासून मला अशी काहीशी साहित्य विशेष माहिती स्वतःचं युट्यूब चैनल सुरू करून लोकांपर्यंत पोहचवायचं असं मी ठरवलं होतं, पण फाॅरवर्ड – लाईक – कमेंट – सबक्राईबच्या काळात ही अशी ऑनलाईन भिक मागणं मला काही जमलं नाही…
•मी काही आयुष्याचा टाॅकटाईम मारलेला नाही. उद्यासाठी मी जीवंत राहिल न राहिल याची ना गॅरंटी आहे नाही वाॅरंटी. म्हणून मला मिळालेली कुठलीही संधी मी शेवटचीच समजतो आणि स्वतःतील बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो.
•साहित्य अकादेमी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय मंचावर निवड होण्याआधी मला दोन ओळी सुचल्या होत्या, त्या अशा की –
‘ सत्तेची हाळवायला बाजूला सारायचं आहे
मला दिल्लीच्या दावणीतून माझं वावर सोडवायचं आहे ‘
शिमला येथील आंतरराष्ट्रीय मंचावर मराठी सोबत नेली होती, भोपाल येथील आंतरराष्ट्रीय मंचावर मायेला सोबत नेलं होतं आता दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय मंचावर वावराची माती सोबत नेली होती. माय – मराठी – माती यांप्रतिचा भाव सदानकदा माझ्या श्वासात असतो. दिल्लीची संधी मी नाकारली होती. पण झालं उलट. साहित्य अकादेमीने पहिल्यांदाच मला विमानाचं टिकट दिलं आणि मला ‘वर्ल्ड बुक रेकार्ड’ साठी डबल संधी दिली.
•दिल्लीत फारसा फिरलो नाही पण मायेला एक साडी, साहित्य अकादेमी प्रकाशन स्टाॅलवरून सहा पुस्तके विकत आणता आली. दिल्लीत मला फोटोग्राफी करता आली ज्यामुळे बरेच भारतीय स्नेही, लेखक, कवी, अनुवादक, वाचक, राजस्थान साहित्य अकादेमी, मध्य प्रदेश साहित्य अकादमी, गुजरात साहित्य अकादेमी, कर्नाटका साहित्य अकादेमी, मुंबई मराठी साहित्य अकादेमीचे सदस्य जुळल्याचा नव्याने आनंद अनुभवता आला…
•गुगलवरही उपलब्ध नाहीत अशा साहित्यासाठी नव्या संकल्पना मनात भरपूर आहेत. ज्या दिवशी एखादी शासनाची साहित्य संस्था मला संधी देईल तेव्हा नक्कीच नव्या संकल्पना राबवेल… तोवर करूया प्रयत्न माणूस जोडायचा.

प्रविण पवार
मराठी कविता संग्रह (Marathi Kavita)
{बरीच क्षणचित्रे मीच आवडणीने काढलीयेत}

























Pingback: जागतिक कविता दिवस लेख विशेष तुमची कविता अन् तुम्ही - मराठी 1