बालकवींची कविता चिमणीचा घरटा
स्वातंत्र्याचा जोरकस पुरस्कार करणारी
बालकवींची कविता “चिमणीचा घरटा” :
काव्य-अंतरंग / प्रा.बी.एन.चौधरी / ९४२३४९२५९३.
बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे म्हणजे मराठी साहित्याला पडलेले गोड स्वप्नं. मराठी कवितेच्या इतिहासात त्यांचे स्वतःचे असे वेगळे स्थान आहे. निसर्ग कविता म्हटली म्हणजे बालकवींचे नाव आवर्जून घ्यावे लागते. निसर्गाच्या अलौकिक असा साजशृंगार बालकवींच्या कवितेतून प्रकट होतो. सौंदर्याचा आस्वाद घेण्याची क्षमता त्यांच्या कवितेत आहे. त्यांच्या कवितेत गुढता, उदासीनता आणि चिंतन दिसत असले तरी त्यांनी काही बालकविताही लिहून ठेवल्या आहेत. त्यांच्या बालकवितांमधून बालमनाचे रंजन आणि बाल वृत्तीचे उद्बोधन दिसून येते. बालकवींचा जन्म १३ ऑगष्ट १८९० रोजी धरणगाव येथे झाला. त्यांनी एकूण १७२ कविता लिहिल्या. यापैकी १३२ प्रकाशित झाल्या. यापैकी बालकविता फक्त पाच ,सातच आहेत. नादमयता आणि गीतांमधील नाट्य निर्मिती क्षमता यामुळे या कविता बालगीते म्हणूनच प्रचलित झाल्या आहेत. चांदवा मजला देई, रागोबा आला, चिव चिव चिमणी ताई, घोडा घोडा माझा भाऊ, चिमणीचा घरटा चोरीला गेला. या त्या पाच कविता या सर्व बालकवितांमधून बालकांच्या निष्पाप, निरागस आणि प्रश्नार्थक बालवृत्तीची छटा दिसून येते. चांदोबा मजला देई या गीतात मुलांचा निरागस हट्ट आहे. शक्य अशक्यतेच्या कल्पना मोडीत काढत लहान मुलं आपल्या आईजवळ चांदोबा मागतात, त्याचे हे वर्णन. रागोबा या कवितेत लहान मुलांना येणारा लटका राग आणि तो घालवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या खटपटी यांचे मजेशीर वर्णन आहे. चिऊ-काऊ हे तर लहान मुलांचे सवंगळीच. घोडा घोडा हे एक खेळाचे वर्णन आहे. माझा भाऊ या कवितेत देखील लहान बहिणीने भावाचे वर्णन केले आहे. चिमणीचा घरटा चोरीस गेला या कवितेत चिमणीने मेहनतीने केलेला घरटा चोरीस जातो व त्याच्या शोधासाठी तिने केलेल्या अथक प्रयत्नांचे वर्णन म्हणजे ही कविता आहे.
चिमणीचा घरटात चोरीस गेला :
चिव चिव चिव रे,
तिकडे तू कोण रे ?
कावळे दादा कावळे दादा,
माझा घरटा नेलास बाबा ?
नाही ग बाई चिऊताई,
तुझा घरटा कोण नेई ?
कपिला मावशी कपिला मावशी,
घरटे मोडून तुका जाशी ?
नाही ग बाई मोडीन कशी,
मऊ गवत दिले तुशी.
कोंबडी ताई कोंबडी ताई,
माझा घरटा पाहिलास बाई ?
नाही ग बाई मुळीच नाही,
तुझा माझा संबंध काही.
आता बाई पाहू कुठे ?
जाऊ कुठे राहू कुठे ?
गरीब बिचार्या चिमणीला,
सगळे टपले छळण्याला.
चिमणीला मग पोपट बोले,
कां गं तुझे डोळे ओले ?
काय सांगू बाबा तुला,
माझा घरटा कोणी नेला ?
चिमुताई चिमुताई,
माझ्या पिंजऱ्यात येतेस बाई ?
पिंजरा किती छान माझा,
सारा शिण जाईल तुझा.
जळो तुझा पिंजरा मेला,
त्याचे नाव नको मला.
राहील मी घरट्या विना,
चिमणी गेली उडून रानात.!
खरंतर ही बालकवींची कविता नाही. त्यांनी एका इंग्रजी कवितेचा केलेला हा मराठी अनुवाद आहे. “हू स्टोलन द बर्ड्स नेस्ट” या कवितेचे हे भाषांतर आहे. चिमणी, कावळा, कोंबडी, गाय, पोपट हे लहान मुलांचे बालपणाचे मित्र. त्यांची ओळख मुलांना आगोदर खेळण्यातून होते. नंतर ते अंगणात, दारात, पिंजऱ्यात दिसतात. गावखेड्यात तर लहान वयापासूनच त्यांच्यासोबत खेळण्यात बागडण्यात मुलांचा वेळ जातो. त्यांची एकमेकांजी गट्टी जुळते. या साऱ्यांचा बालकवींनी आपल्या कवितेत खुबीने वापर करून एक छानसे कथाचित्र साकार केले आहे. या कवितेत चिमणी ही स्वातंत्र्याचं, पोपट हा पारतंत्र्याचं आणि सोनेरी पिंजरा हा तुरुंगाचं प्रतिकं म्हणून आलेली आहे. त्या दृष्टीने या कवितेकडे पाहिले तर मग ही कविता बालगीत न राहता स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारं एक प्रेरणा गीत होवून जातं. चिमणीच्या बोलण्यातून तिची आगतिकता, आर्जव आणि स्वाभिमान दिसून येतो. या कवितेतली घरटा तयार करणारी चिऊताई कष्ट करणाऱ्या स्त्रीचे प्रतीक मानले तर कावळा, कोंबडी, गाय आणि पोपट हे देखील समाजातील विविध स्वभावाच्या व्यक्तिमत्त्वांचे प्रतिनिधित्व करतात. कवितेतील हे वेगवेगळ्या प्रतीकांचे परिमाण मानवी वृत्तींना चपखल लागू पडतात. कष्टाने मेहनतीने घरटा साकार करणाऱ्या चिमणीवर घरटा चोरीला गेल्याने विस्थापिताचे जीवन जगण्याची वेळ येते. अशा परिस्थितीत घरट्याचा शोध घेताना, तिची होणारी परवड समोर येते. ज्याच्याकडे चौकशी करावी त्यांची करावी लागणारी मन धरणी दिसून येते. त्यांच्याकडून होणारी अवहेलना आणि धनिकतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पोपटाकडून मिळणारे आमिष या साऱ्यांचा एक सुंदर मिलाफ या कवितेत साधला गेला आहे. चिमणीच्या कष्टाळूपणा, कावळ्याची सहानुभूती, देवरुप कपिला गायीचे सहकार्य, कोंबडीचा तुसडेपणा, पोपटाची पारतंत्र्यात सुख शोधणारी सुखासिद्ध वृत्ती आणि शेवटी चिमणीने बाणेदारपणे लाथाडलेली पारतंत्रता अतिशय प्रभावीपणे या कवितेतून व्यक्त झाली आहे. आपल्या संकटकाळी प्रत्येकाकडे मदतीची अपेक्षा करताना चिमणी ज्या सहजतेने प्रत्येकाशी संवाद साधते त्यातून तिचा समंजस आणि संवादी स्वभाव समोर येतो. हरवलेल्या घरट्याची चौकशी करणारी चिमणी स्त्री जातीच्या एकूणच सहनशीलतेचे वर्णन करते. कावळा हा वरवर काळा असला तरी त्याच्या अंतर्मनात सहनभूतीचा ओलावा आहे. कोंबडी सुंदर, निर्मळ दिसत असली तरी तिची चंचलता, बेफिकिरी आणि दुसऱ्याचे दुःख उडवून लावणारा फणकारा त्यातून व्यक्त होतो. घरट्याला गवत देणारी कपिला गाय सहकाराचं नातं दृढ करते. सोनेरी पिंजऱ्यात स्वतःला कैद करून घेणारा आणि मालकाच्या मर्जीत आश्रिताचं जीणं जगणारा पोपट असहाय चिमणीलाही आपल्या पिंजऱ्याचा आमिश दाखवतो. वरवर तो दयाळू वाटत असला तरी चिमणीला त्याच्यातील सुखासीन वृत्ती भावत नाही. पोपटाचा सोनेरी पिंजरा म्हणजे स्थैर्य, सुबत्ता, सुरक्षिततेचे प्रतिक आहे. मात्र, या बदल्यात पोपटाला आपले स्वातंत्र्य व स्वायत्तेचा बळी द्यावा लागतो. आयुष्यभर पारतंत्र्यात रहावे लागते. त्यासाठी चिमणी तयार होत नाही. सोनेरी पिंजऱ्यासाठी ती आपलं उडण्याचं स्वातंत्र्य गहाण ठेवू ईच्छित नाही. चिमणीला असे विना कष्टाचे घर नको आहे. तिला हवं आहे तिने स्वतः तयार केलेलं स्वतःचं घर. जळो तुझा पिंजरा मेला, त्याचं नाव नको मला ! या शब्दातून चिमणीचा बाणेदारपणा, निर्धार स्पष्ट होतो. सोन्याचा पिंजरा स्वीकारण्या ऐवजी ती रानात भुरकर उडून जाते. ती घरट्यासाठी नव्या काडीच्या शोधात. नवी काडी, नवा घरटा. हा कष्टाचा मार्ग पत्करून चिमणी स्वतःच वेगळेपण, स्वतःच अस्तित्व, स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यात यशस्वी होते. वर वर बालगीत वाटत असले तरी या गीतात स्वातंत्र्याची महती दडली आहे. चिमणीचा ईवलासा जीव स्वतःचं स्वातंत्र्य गमवून पारतंत्र्याला चक्क नकार देते. घरटा, निवारा मिळाला नाही तरी चालेल मात्र कुणाची गुलामगिरी करणार नाही, असं ती ठणकावून सांगते. ही कविता म्हणजे जीवनाच्या संघर्षाचे चित्रण आहे. समाजातील वेगवेगळ्या प्रवृत्तींचं दर्शन आहे. भिन्न स्वभावांची ओळख आहे. समाजात स्त्रीलाच घर सांभाळावं लागतं. या कवितेत स्त्रियांची तारेवरची कसरत अधोरेखीत झाली आहे. त्यांच्यावर होणारे अन्याय, त्यातून त्यांना शोधावी लागणारी वाट आणि या प्रवासात त्यांना भेटणारी स्वार्थी, मतलबी, निस्वार्थ प्रवृत्तीची माणसं. निरनिराळी प्रलोभन आणि आमिषं या साऱ्यांना बालकवींनी आपल्या कवितेमधून सहजपणे मांडले आहे. ही कविता इंग्रजीतून मराठीत अनुवाद करतांना त्यांनी तिचं भावनिक आणि परिसरीय चित्रण चपखलपणे केले आहे. भारतीय संस्कार आणि अस्सल मराठमोळेपण लेवून ती आपली झाली आहे. एका छोट्याशा प्रसंगाला बालकवींनी गीतात गुंफून त्यातून स्वातंत्र्याचा जोरकस पुरस्कार केला आहे. हेच बालकवी यांच्या शब्दांचे सामर्थ्य आहे. या गीतातून कष्टाची शिकवण, स्वाभिमानाचा अंगीकार आणि स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्याचा संस्कार केला गेला आहे. बालमनावर तो दृढ आणि दीर्घकाल परिणाम करू शकेल यात शंकाच नाही. यासाठी अश्या कविता मुलांना वाचायला द्यायला हव्या. ऐकवायला हव्या. त्यातील मर्म त्यांना उलगडून दाखवायला हवे. ही काळाची गरज आहे. बालकवींचा एका रेल्वे अपघातात ५ मे १९१८ रोजी भादली येथे दुर्दैवी मृत्यू झाला. अल्पकाळ जगून ते गेले मात्र त्यांची ही कविता कालातीत झाली आहे. जी त्यांना सदैव अक्षय ठेवेल.
© प्रा.बी.एन.चौधरी.
देवरुप, नेताजी रोड.
धरणगाव जि. जळगाव.
४२५१०५.
(९४२३४९२५९३)