पाऊसगाणे
पाऊसगाणे!
जुन्या प्रितिच्या आठवणींचा, आला पाऊस नवा नवा
शितल वारा या जलधारा, मृदगंध वाहे हव हवा
बागेमधल्या बाकावरती, बसून बघितल्या पाऊस गमती
सरसर टिप टिप रिमझीम रिमझीम, कधी तर नुसता शिरवा शिरवा
गडगडणा-या ढगात दडली, कडकडणारी ती बिजली
बिलगलीस तू मजला ऐसी, मनी पेटला वणवा वणवा
धगधगणा-या तनात शिरल्या, सळसळणा-या सागर लाटा
आलिंगनाचा गुंता वाटे, मोहक आणिक बरवा बरवा
इंद्रधनुच्या साक्षीने तुज, अर्पित केले हे सारे जीवन
सप्तरंगी रंगात नाहला, ऋतु अनुरागी बरवा बरवा
डोंगरमाथ्यावरती चढुनी, अंगोअंगी चिंब भिजुनी
थिजले तन-मन घेता चुंबन, विसरुन गेलो रुसवा-फुगवा
वनात चाले मयुर नर्तन, कोकिळेचे सुमधुर गुंजन
पुलकित होऊनी नटली धरणी, नेसुनी शालू हिरवा हिरवा
तू कुठे अन् मी कुठे पण, दृढ ‘किरण’ हे ऋणानुबंधन
नयनी दाटले पाऊसगाणे, निरोप प्रियेला कळवा कळवा
रचनाकार-
शिवाजी साळुंके, ‘किरण’
चाळीसगाव, जि. जळगाव.
![पाऊसाच्या कवीता](https://marathi.khandeshvahini.in/wp-content/uploads/2024/06/img-20240624-wa0054722608060733450183-829x1024.jpg)