चला प्रश्न विचारण्याचा संकल्प करूया
चला, प्रश्न विचारण्याचा संकल्प करूया!
एकविसाव्या शतकातील चोविसावे वर्ष काल संपले आहे. मागील वर्षातला सारा कडवटपणा अळेबळे पचवून चांगल्या आठवणींची शिदोरी सोबत घेऊन मोठ्या धुमधडाक्यात आपण पंचविसाव्या वर्षात प्रवेश करीत आहोत. नेहमीप्रमाणे नव्या वर्षाचे नवे संकल्प केले जातील. काहींचे संकल्प तडीस जातील. काहींचे संकल्प काळाच्या ओघात अलगदपणे विरुनही जातील. तसं पाहिलं तर संकल्पांचं असं विरुन जाणं आपल्याला सवयीचं झालं आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर आपल्याला अनेक विकल्प प्राप्त होत राहिल्याने संकल्पांचं महत्त्व क्षीण झालं आहे.

त्यामुळे अनेकजण कोणताही संकल्प न करण्याचाच संकल्प करताना दिसतात. अशावेळी येणाऱ्या या नव्या वर्षासाठी काय संकल्प करावा? अशी विचारणा करणाऱ्या माझ्या काही विद्यार्थ्यांशी झालेल्या चर्चेत आजच्या लेखाची बीजे रोवली गेली आणि श्री सम्राट साठे या माझ्या ज्येष्ठ मित्राने पोस्ट केलेल्या “आपण सुसंस्कृत मुखवटे घातलेली विकृत माणसं..?” या अनामिक लेखकाच्या लेखाने त्याला पुरेसं खतपाणी घातलं.
वाचकहो, येणाऱ्या नव्या वर्षात आपण आपल्याला पडणारे प्रश्न संबंधितांना आवर्जुन विचारण्याचा संकल्प करायला हवा! वास्तविक, ‘प्रश्न विचारणे’ ही माणसाच्या आयुष्यातील अत्यंत ऐतिहासिक घटना आहे. आपणास ठाऊक आहे की, आदिम काळातला माणूस जंगलात रहात होता. त्यांचे एकूण वागणे आणि जगणे एखाद्या जंगली प्राण्यांसारखेच होते. माणूस प्राण्यासारखाच चार पायांवर चालत असे. सुमारे साठ लाख वर्षापूर्वी चार पायांवर चालणाऱ्या या प्राणी असणाऱ्या माणसाला प्रश्न पडला.
तो प्रश्न असा होता की, “आपणास दोन पायांवर चालता येईल का?” असा प्रश्न त्याला पडताच त्यानं दोन पायांवर उभं राहून पाहिलं. तो दोन पावलांवर उभा राहिल्यामुळे त्याची उंची वाढली. त्याला दूरवरचं दृष्य सहजपणे दिसायला लागलं. त्याला दूरवर कुठं आपली शिकार करु शकेल असा धोकादायक प्राणी वावरत असेल तर तो दिसू लागला. तशीच त्याची भूक भागण्यासाठी आवश्यक असलेली शिकारही त्याला दूरवरुन दिसू लागली. त्यामुळे माणसाच्या संरक्षण आणि भूक या दोन्ही गरजा भागविणे त्याला अधिक सोपे वाटले. याच कारणामुळे तेव्हापासून माणूस दोन पायांवर नुसता उभा राहिला नाही तर तो दोन पायांवर चालायला आणि पळायलाही शिकला. याचा अर्थ माणसाला प्रश्न पडला आणि त्याने त्याचे उत्तर मिळवले. तिथपासून त्या जनावराचा प्रवास माणसाच्या दिशेने झाला!

मागील काही हजार वर्षांत माणसाला वेगवेगळे प्रश्न पडत गेले. त्या प्रश्नांची उत्तरे शोधताना माणसाला पशुपालन, शेती, नांगर, चाक अशा अनेक गोष्टींचा शोध लागला. माणसाने लिपीचा शोध लावून आपली भाषा विकसित केली. अशी मजल मारीत माणसाचा प्रवास माणुसकीच्या आणि विकासाच्या दिशेने होत राहीला. यातून संस्कृति निर्माण होत गेली तशी सत्तेच्या अंमलबजावणीसाठीची व्यवस्थाही निर्माण झाली.
ठराविक माणसांनी या व्यवस्थेवर आपले वर्चस्व निर्माण केले. त्यातून इतरांच्या शोषणाची व्यवस्था निर्माण झाली. आताचा काळ वेगळा आहे. आता आपण माणूस म्हणून बऱ्यापैकी स्थिरावत आहोत. अशावेळी कुणी कुणाला प्रश्न विचारले पाहिजेत? कोणते प्रश्न विचारले पाहिजेत? असा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहणार नाही.
सांप्रतकाळी आम्ही लोकशाही व्यवस्था स्वीकारलेली असली तरी सत्तेच्या आधाराने सुरु झालेले शोषण आजही सुरूच आहे. उलटपक्षी लोकशाहीचा सभ्य मुखवटा घालून होणारे हे शोषण अधिक घातक आहे. अशावेळी मतदार म्हणून आपण निवडणूकीतल्या उमेदवारांना काही प्रश्न विचारायला हवेत. सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रश्न विचारले पाहिजेत, तसेच ते विरोधी पक्षाच्या उमेदवारांनाही विचारले पाहिजेत.
अर्थात त्यासाठी आधी आपल्याला हे प्रश्न पडले पाहिजेत. जसे की, धर्म, जात, लिंग आणि उत्पन्नाच्या आधाराने होणारा भेदभाव कुणाच्या फायद्याचा आहे? भेदभावाने गरीबी वाढते की कमी होते? राज्यकर्ते असा भेदभाव का करतात? भेदभाव कमी करण्यासाठी त्यांचे काय धोरण असणार आहे? ते धोरण निर्धोकपणे अंमलात आणण्यासाठी त्यांनी किंवा त्यांच्या पक्षाने काय नियोजन केले आहे? त्या नियोजनाची अंमलबजावणी प्रक्रिया कशी असणार आहे? त्याची ब्ल्यू प्रिंट तयार आहे का?
सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचे विश्लेषण करायचा प्रयत्न केला तर असं दिसतं की समाजधुरीणांना राजकीय पुढाऱ्यांशी जवळीक करण्याच्या नादात समाजाच्या वास्तव समस्यांचा विसर पडत चालला आहे. राजकीय धुरीणांमध्ये तर केवळ अराजकीय गोष्टी करण्याची चढाओढ लागली आहे. धर्माच्या आणि संस्कृतिच्या गोष्टी रंगवून रंगवून सांगितल्या जात आहेत.
लोकभावना प्रक्षोभित करुन स्वतःच्या सत्तेची पोळी भाजणाऱ्या तथाकथित सांस्कृतिक आणि धार्मिक ठेकेदारांनी कधीतरी धर्म आणि संस्कृतिचे रक्षण केल्याचे एकही उदाहरण दिसून येत नाही. ती जबाबदारी समाजातल्या वाघ्या, मुरळी, पोतराज, पिंगळा, वासुदेव, तमासगीर यासारख्या लोककलाकारांची आहे असं कार्यक्रमातून उच्चरवानं सांगीतलं जातं. तेव्हा मनात येतं की, या तथाकथित सांस्कृतिक आणि धार्मिक ठेकेदारांनी कधीतरी आठवड्यातून एखादा दिवस पोतराज, पिंगळा, वासुदेव, वाघ्या, मुरळी असं काहीतरी होऊन पहावं.
लोकांकडे भीक मागावी. मग समजेल हे संस्कृती जपणं किती अवघड आहे! वासुदेवाच गाणंच फक्त सुंदर असतं, जगणं नाही! पोतराजाचा आशीर्वाद चांगला असतो पण त्याचं आयुष्य अजिबात सुखी नसतं! वाघ्या -मुरळीची गोष्टही यापेक्षा वेगळी नसते.
वाघ्या, मुरळी, वासुदेव, पिंगळा, पोतराज, तमासगीर ही आमची संस्कृती म्हणून अभिमानाने सांगणाऱ्या तथाकथित संस्कृतिरक्षकांना त्यांच्या लेकरांनी संस्कृती जपण्यासाठी वाघ्या, मुरळी, पिंगळा, पोतराज, वासुदेव, तमासगीर असं काहीतरी होऊन फिरलेलं चालेल का? स्वतः वाघ्या, मुरळी, वासुदेव, पिंगळा, पोतराज, तमासगीर यांनासुद्धा आपल्या पोरांनी आपण जे करतो ते करू नये असंच वाटत असतं!
हे कोण आणि कधी समजून घेणार आहे? फाटक्या तुटक्या कपड्यात कळकटलेल्या शरीराने रापलेले, बालपण हरवलेली त्यांची उद्याची पिढी डोळ्यांआड कशी करू शकतो?
आमच्यातला संस्कृतिरक्षक त्यांना सिग्नलवर भीक देतो, खाऊ देतो आणि हे करताना फोटो काढून तो सोशल मीडियावर पोस्ट करून स्वतःचंच कौतुक करून घेतो. सांगा, याला संस्कृतिरक्षण म्हणायचं का? लोककला जपल्या पाहिजेत असं म्हणत आपण एका मोठ्या आणि गरिब लोकसमूहाचा गळाच दाबत आहोत हे आपल्या कधी लक्षात येणार?
“कर लो दुनिया मुठ्ठी में” असं म्हणत तंत्रज्ञानाच्या आधाराने सारं जग आता जवळ आलं आहे. हजारो कि. मी. अंतरावर, सातासमुद्रापार घडणाऱ्या घटनांचे पडसाद दुसऱ्याच क्षणाला आपल्या अनुभवाला येत आहेत. संवाद अतिशय वेगवान झाला आहे. त्यातून माहितीचा भडिमार आपल्यावर होतो आहे. इतक्या वेगाने ही माहिती आपल्या अंगावर शब्दशः फेकली जात आहे की, मिळालेली ही माहिती तपासून पहायला आपल्या हाती जराही वेळ रहात नाही. काही बेरकी लोक याचा गैरफायदा घेत आहेत.
सत्तेत असलेले आणि सत्तेत येऊ पाहणारे असे दोन्ही प्रकारचे लोक यात सामील आहेत. आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय अशा सगळ्याच व्यवस्थांवर याच लोकांचा वरचष्मा आहे. आपण या सर्वांना प्रश्न विचारले पाहिजेत!
खरेतर प्रश्न विचारणारी माणसं कुणालाच आवडत नाहीत. आपल्या कनिष्ठाने आपल्याला प्रश्न विचारु नयेत असं प्रत्येक वरिष्ठाला वाटत असतं. अगदी घरी, कार्यालयात, कामाच्या ठिकाणी इतकेच काय शाळा कॉलेजात सुध्दा कुणालाच प्रश्न विचारलेलं आवडत नाही. या मागे प्रचंड भीती दडलेली असते. कोणत्याही सत्ताधाऱ्यांना कुणीही प्रश्न विचारले तर ते आवडत नाहीत. अशा प्रश्न विचारणाऱ्या लोकांचा बंदोबस्त केला जातो. आधी मांडवली करण्याचा प्रयत्न केला जातो.
मांडवली होऊ शकली नाही तर त्यांचा कडक बंदोबस्त केला जातो. हे पाहून “आपण उगाच का वाईटपणा घ्यायचा?” असा सरळ साधा आणि भाबडा विचार करून आपण आजवर कुणालाच प्रश्न विचारले नाहीत किंवा प्रश्न विचारण्याचं धाडस केलं नाही. अशाने आपला प्रवास माणसाच्या दिशेने कसा होईल. आपला प्रवास जनावराच्या दिशेने होऊ द्यायचा नसेल आणि आपल्याला माणसाच्या दिशेने प्रवास करायचा असेल तर घर, कार्यालय, शासन, प्रशासन अशा सर्व ठिकाणच्या प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न विचारायला हवेत!
या नव्या वर्षात प्रश्न विचारण्याचा हा संकल्प आपण केलात तर आपल्याला माणूस म्हणून आपल्या जगण्याचं सोनं करता येईल!
लेखक
© अनिल वत्सला आत्माराम उदावंत
ज्येष्ठ प्रशिक्षक, समुपदेशक व साहित्यिक
सावेडी, अहमदनगर, संपर्क :