पेट्रोल पंपावरील ग्रंथपूजारी
पेट्रोल पंपावरील ग्रंथपूजारी
नानाभाऊ माळी
“हॅलो मी फागण्याहून अशोक सोनार बोलतोय!दादा तुमच्याशी बोलावसं वाटलं म्हणून बोलतोय!मी पेट्रोल पंपावर कामाला आहे…..!” ते बोलत होते!मी ऐकत होतो! कानाला लावलेला मोबाईल फोन एकचित्त होऊन ऐकत होतो!मोबाईल खाली ठेवूच नये असं वाटतं होतं!कानावर पडणारां प्रत्येक शब्द चिरंजीवी होतं राहिला!मन पटलावर संजीवन होतं राहिला!मी ऐकणारा श्रोता होतो!बोलणाऱ्यांचें शब्दठसा हृदयावर छपाई करीत राहिले….
शिंदखेडा शिरपूर फागणे
व्हाया धुळे गाडी पळते आहे!
पेट्रोल डिझेल भरुनि
अंग धुराणे मळते आहे!
वेड्यावाकड्या वळणावर
मध्येचं उंच घाट येतो!
दम लागुनी घाम काढतो
कणा पाठीचा ताठ होतो!
धूर सूर गियर शिफ्टिंग
असं असूनही पळणे आहे
जीवन म्हणजे घाट राजा
वेडीवाकडी वळणे आहेत!
पुढे वय वाढत साठी येते
हाती काठी येत माटी होते
साठी पुढे कणा वाकला
कोरी स्मृतीची पाटी होते!
जिद्द मनातं शाबूत असतें
लढ म्हणुनी सांगत असतें
वय भिरकावूनि देता वरती
गाली सुरकुत्या हसत बसते!

नव वर्षारंभी वयाची सदुसष्ठी गाठलेल्या एका लढवंय्या तरुणाचा तो फोन होता!वय गौण होतं!त्यांच्या बोलण्यातील आत्मविश्वास जबरदस्त होता!कान तृप्त होत राहिले कधी मन दुःखी होत राहिलं!सुख दुःखाचे हिंदोळे वर खाली होतं राहिले!फागणे गाव ता.जि.धुळे येथील बाबू श्रीराम पेट्रोलियम पंपावर कामाला असणारे!वयाच्या छातडावर बसून वयालाच चीतपटीचा उत्तम डाव शिकविणारं उमदे झुंजार व्यक्तिमत्व होतं तें!पेट्रोल पंपावर पोटासाठी डिझेल-पेट्रोल भरत होते!त्यात तें साहित्यकला व्यासंगी होते!वयाला,आळसाला लाथ मारून कर्मसिद्ध करणारे होते!आत्मविश्वास जागृत होता!एक एक शब्द कानावर पडत होते!माझ्या चेहऱ्यावरील हावभाव चढ उतारागत बदलत राहिले !मी देखील आतून बाहेरून बदलत होतो!हृदय, मन, डोळे, कान चेहऱ्यावरील हावभाव बदलत राहिले!
परिस्थितीला तोंड देत लढणाऱ्या लढाऊ व्यक्तीत्वाचें बोल हृदयातल्या खोल तळाशी संचित होत राहिले!उगवत्या सूर्याकडे आशेने पाहात,मावळत्यालाही उघड्या डोळ्यांनी पाहात होते!अशा जिद्दी व्यक्तिमत्वाचे नाव अशोकदादा होतं!तरीही ‘मावळत्या सूर्याकडे कोण पाहतो?’ असा प्रश्न विचारीत जीवनाची कैफियत मांडत राहिले!वडील शिरपूर सारख्या व्यापारी शहरात नोकरीस होते!मुळात शिंदखेडा गावातील परिवार रोजीरोटीसाठी शिरपूरला गेलें!लहानाचे मोठे होत!कष्ट, दरीद्रीपण माथी घेऊन जगणारे अशोकदादा आहेत!त्यांचे वडील संसाराचा गाडा ओढत आयुष्यभर राबले तरी हात रिकामेच राहिले होते!गरिबीचे चटके साथ सोडीनात!पुढे पुढे वडिलांचीं जागा सांभाळून भावंड,बहीण,भाचा यांचं आयुष्य घडवितांना उपासमारीला सामोरे जात राहिले!
फोनवर कैफियत ऐकतांना अशोक दादांच्या अर्धांगिनीचा उल्लेखही आला होता!पत्नी सात नव्हे सातशे वर्षाचीं साथीदार असावी अशी त्यांची देवाजवळ मागणी होती!प्रत्येक सुख दुःखात साथ देणाऱ्या, त्यांच्या पत्नी सौ.कल्पनाताई सतत सावली सारख्या पाठीशी होत्या!त्या आठवी शिकलेल्या असूनही शिकवणी घेवून,चिमणीच्या दिव्यावर शिवणकाम करीत स्वतःच्या तीन मुलांनाही शिकवतं होते!ज्योती निळसर पिवळा रंग दाखवीत जळत होती!मुलांना घडवत राहिल्या!तीन मुलांपैकी एक मुलगा मिलटरीमध्ये मेजर पदावर असून इतर दोन्ही मुलांनी पारोळ्याला सोनाराचें दुकान टाकली आहेतं!
कोणावरही बोज होऊ नये म्हणून उभयता बाळापूरला राहतं असून अशोकदादा फागणे गावी पेट्रोल पंपावर कामाला आहेत!सदुसष्ठाव्या वर्षी देखील पुढील ३० वर्ष कष्ट करून उभे राहण्याची पक्की जिद्द अन चंग बांधला असावा!देवाजवळ तशी प्रार्थना करीत असावेत!पश्चिमेच्या उतार सूर्यालाही नमून उघड्या डोळ्यात सामावून घेण्याची आश्वासक दृष्टी होती!आत्मविश्वास दिसत होता!जोश,उर्मी वाखाणण्याजोगी होती!जगण्याची इच्छाशक्ती जबरदस्त होती!झिजलेल्या हाडात वंगण ओतण्याची तयारी होती!पंपावर डिझेल,पेट्रोल भरत होते!स्वप्न पाहात जगत होते!
अशोकदादांच्या बोलण्यातून तें उत्तम ग्रंथप्रेमी होते!ग्रंथ व्यासंगी होते!त्यांच्या तुटपुंज्या कमाईतून धुळे शहरांत जाऊन नामवंत लेखकांची पुस्तकं विकत घेऊन वाचणारे!साहित्यिक विचारवंताचे शब्दसागर वाचून हृदयात जपत प्रेरणा घेत जगत होते!स्वप्न पाहणारे!पंपावर पेट्रोल भरता भरता कादंबरीतील अनेक पात्र मनी रंगवतं जगत होते!अनेक नामवंत लेखकांची पुस्तकं वाचून झाली होती!अशा या पुस्तकं प्रेमीच्या घरात अनेक लेखकांच्या कादंबऱ्यां,पुस्तकांनी दोन “कोठ्या” भरलेल्या आहेत असं तें म्हणाले!लेखक अन कादंबऱ्या त्यांच्या हृदयात निवासाला असाव्यात!साहित्य व्यासंगीच्या बोलातून कान तृप्त होईस्तोवर ऐकत होतो!त्यांच्या चेहऱ्यावर, मेंदूवर अनंत सुरकुत्या असाव्यात!ज्ञानियाच्या त्या सुरकुत्या सदगुणांच्या प्रसारक असाव्यात!तें उत्साही कर्मयोगी भरभरून बोलत होतें!
होय!तें आदरणीय अशोक रामदास सोनार होते!या वयातही तरुणांना लाजवतील अशी जिद्द होती!दिवभर काम करणे!फावल्या वेळात ग्रंथ वाचन सुरू होतं!सुदाम देवाच्या झोपडीतून दूर राजमहाल दिसतो आहे!राजमहाल दूर आहे!झोपडीत अंधार आहे!अंधारातून राजमहालाचा झागमगाट दिसतो आहे!कष्ट-दुःख डोंगर पार करीत राजमाहाली पोहोचायचं आहे!राजमहाल तो वैकुंठीचा आहे!वयाची तमा नाही!घाबरू का मी? मी सच्चा सेवक आहे!भक्त आहे….!”
अशोक दादा सोनार यांनी फोन ठेवला होता!मी मनोमनी फागण्याच्या त्या पेट्रोल पंपावर मलाच शोधित होतो जणू!कान, मन, हृदय, डोळे सर्व सर्व अवयव एकचित्तातून बाहेर आले होते!
नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
७५८८२२९५४६
दिनांक-०६ जानेवारी २०२५