मावळतीतील हिरवा रंग
मावळतीतील हिरवा रंग
वय होऊदे साठी वा सत्तरी पार मन हिरव ठेव, म्हातारा झालो ?
तुणं तुणं वाजवण सोड,
गड्या आत्ताच तर तू फक्त साठीचा वा सत्तरीचा झाला,
तीस -चाळीश शिल्लक आहेत.
मारायच्या आधी स्मशानात गोवऱ्या रचून येऊ नकोस.
मी आता थकलो, दमलो असं सारखं सारखं म्हणून त्रागा करू नकोस.
गड्या रं तुला विनंती आहे बळंच म्हातारपण आणू नको,
आता सुन आली, नातू झाला, नात झाली, जावई आला म्हणजे म्हातारपण येत नसतं,
स्वतःकडे लक्ष द्यायचं सोडलं की वार्धक्य येत असतं.
डाय कर, करू नको हां तुझा वैयक्तिक प्रश्न आहे.
नीटनेटकं टापटीप राहयचं एवंढच आमचं म्हणणं आहे.
बैलाला झुली घातल्यासारखे गबाळे पोषाख घालू नको.
उगीचच अधर अधर जीव गेल्यासारखं चालू नको.
लोकांनी आपल्याला काहीही म्हणो आपण मात्र स्वतःला सुंदर समजावं, सेवानिवृत्त झालो, साठी आली तरी रोमॅंटीक गाणं गाणे सोडू नको, अगदी शून्य झालास तर अंतरी नामस्मरण कर. कारण पोथ्या, पुराणं, जपतप, कुलाचार याला विरोध नाही,
पण मी आता म्हातारा झालोरे असा डांगोरा पिटू नकोस.
जरी साठी, सत्तरी आली तरी स्वःतासाठी वेळ देणे सोडू नको.
मित्रांचा ग्रुप कर, छोटया मोठ्या सहलीला जा, आधी सहचरणीला सोबत घेऊन आनंद यात्री बनून फिरून ये. जीवनाचा आनंद घ्यायचा आणि हो दुःखाचे रडगाणे ऐकवू नको.
प्रारब्ध प्रारब्ध म्हणून रडायचं नाही.
घराच्या बाहेर पडायचं.
मोकळा श्वास घ्यायचा आणि हिरव्यागार निर्सगाला पाहून
धुंद होऊन मारवा गायचा.
फिट राहण्यासाठी सगळं करायचं, हलकासा व्यायाम, योगा आणि थोडा मॉर्निंग वॉक, फेशियल, मसाज , स्टीम बाथ..
सगळं कसं नियमित करायचं.
रडत कुढत जगायचं नाही अन् म्हातारपण आलं असे म्हणायचं नाही.
साठाव्या/सत्तराव्या वर्षी फॅशन करू नये असं कुणी सांगितलं?
पॅन्ट, टी शर्ट सगळं घालायचं. गळम्या सारखं नाही तर मस्त ऐटीत, टाईट चालायचं.
नको बाबा लोकं काय म्हणतील?
अरे म्हणाला का? पुन्हा लोकं काय म्हणतील?
असा बुजरेपणा सोड.
मग ट्रीपला काय पंजा, धोतर, मेणचट पायजमे, कोपऱ्या घेऊन जाणार का?
अरे बाबा पुन्हा सांगतो जगाची फिकीर करायची नाय अन् म्हातारो झालो असं म्हणयाचं नाही.
जग काय पायीही आणि घोडी पण चालू देत नाही.
जमलं तर हलका फूलका व्यवसाय कर, शेती असेल तर जमेल तसा शेतावर जा, शेत निंदवून काढ थोडेफार.
हे सगळं तू का करायचं? ते नीट समजून घे कारण तू घराचा पोशिंदा आहेस.
कुटुंबाचा आधार आहेस, वास्तु नावाच्या पंढरपुरातला विठ्ठल आणि मंजूळ असा विणा आहेस.
तुझं शारिरीक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहिलं तरच घर आनंदी राहणार आहे.
देवघरात दिवा लावून घराच्या प्रारंणात चैतन्याचा वास दरवळणार आहे.
घरा-घरात संस्काराचा पाढा आणि अंगभूत शिस्तीचा झरा वाहण्यासाठी तुझं मन प्रसन्न असणं खूप गरजेचं आहे.
सगळ्यांना जायचं आहे पण तुकोबा म्हणतात तस्से आम्ही जातो आमुच्या गावा म्हणत निर्वासनिक होऊन स्वर्गारोहण करायचे आहे.
मग सांग गड्या तू कुठे म्हातारा झालास?
पर्वा मी शेवटचा घटका मोजत असलेल्या नातेवाईकला भेटायला गेलो होतो, मन सुन्न व बधीर झाले. आयुष्यभर मेरी मेरी सुनो उद्धटपणे बोलणारा गेले महिनाभर मुक्का आहे कधीच न बोलण्यासाठी, माझ्याकडे किलकिल्या डोळ्यांनी पाहिले, दोन आसवं पाझरली, माझेही डोळे भरून आले आणि Jeff मनात पुटपुटलो, “हा आयुष्यभर ना स्वतःसाठी ना दुसऱ्यासाठी जगला.”
म्हणून हा शब्द प्रपंच, पटतयका का बघा, नाहीतर द्या सोडून.
🌿चिंतनशील 🌿
मझिसु प्रा. मगन सुर्यवंशी