gudi padwa गुढीपाडवा म्हणजे
गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षे प्रारंभ
मंगळवार दिनांक ०९/०४/२०२४
गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो.
चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठतात. स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात. या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात. उंच बांबूच्या काडीला कडूनिंबाची डहाळी , काढीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात, फुलांचा हार आणि साखरेची गाढी बांधून त्यावर तांब्या /धातूचे भांडे बसवले जाते, गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो, तयार केलेली गुढी दारात , उंच गच्चीवर लावतात. गुढीला गंध , फुले , अक्षता वाहतात व निरांजन लावून उदबत्ती दाखवतात. दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद-कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते. यादिवशी आनंद साजरा करीत
आप्तेष्टांना नववर्षाच्या शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा गौतमीपुत्राची सत्ता असलेल्या राज्यांत स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजयदिन म्हणून संवत्सर पाडवो वा उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. प्रामुख्याने महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा असे संबोधले जाते. [६] सिंधी लोक चेटीचंड नावाने या उत्सवाला संबोधतात.
वर्षप्रतिपदेच्या दिवशी विघ्नहर्त्या गणपतीचे, देवादिकांचे स्मरण, पूजन करतात. गुरू, वडीलधाऱ्यांना वंदन करावे, अशीही रूढी आहे. त्यानंतर संवत्सर फल श्रवण करावे,असा संकेत रूढ आहे. संवत्सर फल म्हणजे काय? तर त्या पाडव्यापासून जे संवत्सर म्हणजे वर्ष सुरू होत असते, त्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आणि नंतरच्या काही विशिष्ट दिवशी असणारी स्थिती – जसे वार, चंद्र, नक्षत्र, सूर्याचे विविध नक्षत्रप्रवेश इत्यादी संदर्भांवरून हे संवत्सर फल दिलेले असते. संवत्सर फलात देशकालाचाही निर्देश असतो, म्हणजे देशाच्या कोणत्या भागात सुखसमृद्धी असेल ते संवत्सर फलात त्रोटकपणे सांगितलेले असते. वर्षप्रतिपदेच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी जो वार असेल त्या वाराचा जो ग्रह असेल तो त्या संवत्सराचा अधिपती असे मानले जाते.
म्हणजे आजपासून सुरू होणारे वर्ष हे जर मंगळवारी सुरू होत असेल तर मंगळ हा त्या वर्षाचा अधिपती असे समजले जाते. साठ संवत्सरांची वेगवेगळ्या पद्धतीने विभागणी केली आहे. एका विभागणीत पाच संवत्सरांचे एक युग अशा पद्धतीने साठ संवत्सरांची बारा युगे मानली जातात. तसेच संवत्सर चक्रातील ८व्या भाव नावाच्या संवत्सरापासून विजय या २७व्या संवत्सरापर्यंत २० संवत्सरांचा स्वामी पालनकर्ता विष्णू आहे असे मानले जाते. ब्रह्मदेवाने पहिली तिथी सर्वात श्रेष्ठ म्हणून घोषित केली. तिला पहिले पद मिळाल्याने ती ‘प्रतिपदा’ म्हणून ओळखली जाते असे मानले जाते. या तिथीला ‘युगादी’ तिथी असेही म्हणतात.या दिवशी उपाध्यायाकडून पंचांग श्रवण म्हणजेच वर्षफल श्रवण करतात. या पंचांग श्रवणाचे फळ असे सांगितले आहे.:-
“तिथेश्च श्रीकरं प्रोक्तं
वारादायुष्यावर्धनम् |
नक्षत्राद्धरते पापं
योगाद्रोगनिवारणम् ||
करणाच्चिन्तितं कार्यं
गङ्गास्नानंफलं लभेत्||
अर्थ – तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी लाभते.वाराच्या श्रवणाने आयुष्य वाढते. नक्षत्र श्रवणाने पापनाश होतो. योगश्रवणाने रोग जातो. करणश्रवणाने चिंतिलेले कार्य साधते. असे हे पंचांग श्रवणाचे उत्तमफल आहे. त्याच्या नित्य श्रवणाने गंगास्नानाचे फल मिळते.
चैत्र हा अधिकमास असता, काहींच्या मते अधिकमासाच्या शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभाची धार्मिक कृत्ये करावीत; तर काहींच्या मते ती शुद्ध किंवा निज चैत्राच्या प्रतिपदेस करावी, असा मतभेद आहे. याविषयी धर्मसिंधूने निर्णय दिला आहे तो असा- अभ्यंगस्नानादी कृत्ये अधिक मासाच्या शुद्ध प्रतिपदेसच करावी; पण गुढी उभारणे, कडुलिंबाची पाने खाणे, पंचांग श्रवण करणे या गोष्टी शुद्ध चैत्राच्या प्रतिपदेस कराव्या.
महाभारतातील उल्लेख महाभारताच्या आदिपर्वात (१.६३) उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंद्राच्या आदरार्थ जमिनीत रोवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंभीच्या दिवशी तिची पूजा केली.
या परंपरेचा आदर म्हणून अन्य राजेही काठीला शेल्यासारखे वस्त्र लावून, ती शृंगारून, पुष्पमाला बांधून तिची पूजा करतात. महाभारतातच खिलपर्वात कृष्ण त्याच्या संवगड्यांना इंद्रकोपाची पर्वा न करता वार्षिक शक्रोत्सव (इंद्रोत्सव) बंद करण्याचा सल्ला देतो. महाभारत ग्रंथातल्या आदिपर्वात हा उत्सव वर्ष प्रतिपदेस करण्यास सुचवले आहे तर खिलपर्वातून आणि इतर संस्कृत ग्रंथांतून हा उत्सव साजरा करण्याच्या तिथी वेगवेगळ्या दिलेल्या दिसतात.
*सांस्कृृतिक इतिहास ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले, असे सांगितले आहे. श्रीराम अयोध्येला परत आले. प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला. शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाला. प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करायला सुरुवात केली तीच देवीच्या, स्त्रीच्या रूपात सुरू केली. ती स्त्री म्हणजे आदिशक्ती, आदिमाता पार्वती असे मानले जाते. पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्यादिवशी ठरले. पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतीयेला लग्न झाले. पाडव्यादिवशी पार्वतीच्या शक्तिरूपाची पूजा करतात. यालाच चैत्र नवरात्र म्हणतात.
लग्नानंतर नवमीला योगिनींची अधिपती म्हणून पार्वतीची अभिषेक झाला. काश्मिरी मुलींना पार्वतीचे रूप असे श्रीकृष्णाने म्हटले आहे. पार्वती लग्न झाले की माहेरवाशिणी म्हणून महिनाभर माहेरी राहते. तेव्हा तिच्या कौतुकासाठी चैत्रगौरीचे हळदीकुंकू केले जाते. अक्षयतृतीया यादिवशी ती सासरी जाते. संदर्भ- शक्रोत्सवाचे उल्लेख संस्कृत रघुवंशात व भासांचे ‘मध्यमव्यायोग‘, शूद्रकाचे ‘मृच्छकटिकम्‘ या नाटकांमध्ये आले आहेत.सध्वजांचे पौराणिक उल्लेखच्या अनुषंगाने झालेल्या अभ्यासाच्या दृष्टीने इंद्रध्वज व ब्रह्मध्वज कसे दिसत याबद्दल उपलब्ध वर्णने फारच कमी वाटतात. जी वर्णने उपलब्ध आहेत त्यांच्यांतही आपआपसांत फरक आहे. त्यांमध्ये इतर ध्वजप्रकारांशी सरमिसळही केली गेली आहे असेही दिसते.
रामायण, महाभारत आणि पुराणे असोत, अथवा नाटके, इंद्रध्वजाचे उल्लेख मुख्यत्वे उपमा अलंकाराच्या स्वरूपात आलेले दिसतात. नायकांना इंद्रध्वजाची उपमा दिलेली दिसतेच पण युद्धांमध्ये धारातीर्थी पडणाऱ्या शत्रुपक्षाच्या नायकासपण इंद्रध्वजाची उपमा दिलेली दिसून येते.
श्रीरामाने रावणावर विजय मिळवून ज्या दिवशी अयोध्येत पुन्हा प्रवेश केला त्या दिवशी नागरिकांनी गुढ्या उभारून उत्सव साजरा केला, अशी पारंपरिक समजूत आहे.
ततोऽभयवकिरंस तव अन्ये लाजैः पुष्पैशच सर्वतः
समुच्छ्रितपताकास्तु रथ्याः पुरवरोत्तमे ||
ततो हय अभ्युच्छ्रयन पौराः पताकास्ते गृहे गृहे
ऐक्ष्वाकाध्युषितं रम्यम् आससाद् पितुर्गृहम् ||
हे वाल्मिकी रामायणातील श्लोक आहेत. ह्यांत गुढी असे कुठेही म्हटले नसून पताका हाच शब्द वापरलेला आहे.गुढी शब्दाची उकल तेलुगू भाषेत गुढी या शब्दाचा अर्थ ‘लाकूड अथवा काठी’ असा आहे तसाच तो ‘तोरण’ असाही आहे. दाते, कर्वे लिखित ‘महाराष्ट्र शब्दकोशा’चा आधार घेतला तर “गुढ्या घालुनी वनीं राहूं , म्हणा त्यातें । – प्रला १९ (?)” असे उदाहरण येते यातील गुढ्या या शब्दाचा अभिप्रेत अर्थ त्या शब्दकोशाने खोपटी, झोपडी, अथवा पाल (रहाण्याची जागा) असा दिला आहे.
हिंदीत कुडी या शब्दाचा एक अर्थ लाकूड उभे करून उभारलेली कुटी अथवा झोपडी असा होतो. इथे गचा क (अथवा कचा ग) होऊ शकतो ही शक्यता लक्षात घेता येते तरीही राहण्याची जागा या अर्थाने ‘गुडी’ हा शब्द येऊन दक्षिणेतली (आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू) खासकरून आंध्रातील स्थलनामांची (गावांच्या नावांची) संख्या अभ्यासली असता (संदर्भ सेन्सस ऑफ इंडिया – गाव नावांची यादी), लाकूड या अर्थाने तेलगूतील गुढी या शब्दाचा अधिक वापर आणि जुन्या मराठीतील लाकूड बांबू/काठी ने बनवलेले घर, हे पाहता हा शब्द महाराष्ट्र आणि आंध्र या प्रदेशात गुढी शब्दाचा प्रचार अधिक असावा. शालिवाहनपूर्व काळात कदाचित गुढीचा लाकूड बांबू/काठी हा अर्थ महाराष्ट्रीयांच्या शब्द संग्रहातून मागे पडला असावा पण आंध्रशी घनिष्ट संबंध असलेल्या शालिवाहन राजघराण्याच्या लाकूड बांबू/काठी या अर्थाने तो वापरात राहिला असण्याची शक्यता असू शकते.
मध्ययुगात हा उत्सव राजा अथवा त्याच्या अधिकाऱ्याकडून साजरा केला जात असे. सात गावांचा अधिपती असलेली व्यक्तीही हा उत्सव संपन्न करीत असे. आता घरोघरी हा उत्सव साजरा होतो. आरोग्यदृष्ट्या महत्त्व चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रातःकाळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. पचनक्रिया सुधारणे, पित्तनाश करणे, त्वचा रोग बरे करणे, धान्यातील कीड थांबवणे हे , आणि असे अनेक औषधी गुण ह्या कडुनिंबाच्या अंगी आहेत असे आयुर्वेदात मानले जाते.) शरीराला थंडावा देणाऱ्या कडूनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात घालणे, ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते.
महाराष्ट्रीय गुढीचे लिखित साहित्यिक संदर्भ इ. स. १२७८ च्या आसपास पंडित म्हाइंभट सराळेकर रचित लीळाचरित्रात, लीळा २०८ : देमती तुरंगम आरोहणी मध्ये “…. तेथ बाइसाचे भाचे दाएनाएकू होते : तेयापूढें सांघीतलें : मग तेंही सडासंमार्जन करवीलें : चौक रंगमाळीका भरवीलीया : गुढी उभविली : उपाहाराची आइति करविली : आपण घोडें घेउनि साउमे आले :… ” असा उल्लेख येतो. संत ज्ञानेश्वरांच्या (इ.स.१२७५–१२९६) ज्ञानेश्वरीत अध्याय ४, ६ आणि १४ मध्ये
अधर्माचि अवधी तोडीं ।
दोषांचीं लिहिलीं फाडीं ।
सज्जनांकरवी गुढी ।
सुखाची उभवीं ॥ ५० ॥”
“ऐकें संन्यासी आणि योगी ।
*ऐसी एक्यवाक्यतेची जगीं ।
गुढी उभविली अनेगीं ।
शास्त्रांतरी ॥ ५२ ॥
“माझी अवसरी ते फेडी ।
विजयाची सांगें गुढी ।
येरु जीवीं म्हणे सांडीं ।
गोठी यिया ॥ ४१० ॥
असे उल्लेख येतात. संत नामदेव (इ.स. १२७० – जुलै ३, इ.स. १३५०) संत जनाबाई (निर्वाण इ.स. १३५०) आणि त्यांचेच समकालीन संत चोखामेळा (चोखोबा) (जन्म अज्ञात वर्ष – इ.स. १३३८) यां सर्वांच्या लेखनांत, गुढीचे उल्लेख येतात. संत चोखोबा त्यांच्या अभंगात म्हणतात
टाळी वाजवावी गुढी उभारावी ।
वाट हे चालावी पंढरीची ॥१॥
१६व्या शतकातील संत एकनाथांच्या (१५३३–१५९९) धार्मिक काव्यात तर गुढी हा शब्द असंख्य वेळा अवतरतो. त्यांच्या वेगवेगळ्या काव्यातून संत एकनाथ हर्षाची उभवी गुडी, ज्ञातेपणाची ,भक्तिसाम्राज्य, यशाची, रामराज्याची रोकडी, भक्तीची, जैताची, वैराग्याची, भावार्थाची, स्वानंदाची, सायुज्याची, निजधर्माची इत्यादींच्या गुढ्यांची रूपके वापरताना आढळतात. संत एकनाथांना या गुढ्यांची अनुभूती त्यांच्या रोमांचात होते, कीर्तनीं होते, ते गुढी तिन्ही लोकीं, वैकुंठीं, उभारण्याचेही उल्लेख करतात; पण मुख्य म्हणजे रणांगणी उभारली जाण्याचाही उल्लेख करतात. आणि संत एकनाथांच्या लेखनातील गुढी रणांगणी वापरली जात असल्याचा उल्लेख महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रीय शब्दकोश अभ्यासल्यास गुढी उजवी देणें [ गुढी=कौल] म्हणजे विनंती मान्य करणें, संमती देणें, मान्यता देणें
आणि गुढी डावी देणें म्हणजे विनंती अमान्य करणें, नापसंत करणें, नाही म्हणणें. असे संकेत शालिवाहन आणि त्यानंतरच्या रणांगणात महाराष्ट्रीयन सैन्याने वापरले असल्यास ते तत्कालीन युद्धाच्या व्यूहातील महत्त्वाचे, कदाचित निर्णायक संदेश साधन असावे. या उपलब्ध संदर्भांचा अभ्यास केल्यानंतर, या गुढीचे अजून एक वैशिष्ट्य दिसून येते. वारी असो अथवा रणांगण असो जाणाऱ्या समूहांतील एखादा चपळ माणूस पाहून त्याकडे ही गुढीची काठी दिली जात असे. तुकाराम गाथेतील संत तुकारामांच्या ४५२९ क्रमांकाच्या अभंगात ते म्हणतात.
“पुढें पाठविलें गोविंदें गोपाळां ।
देउनि चपळां हातीं गुढी ॥२॥”
*१६व्या शतकातील विष्णूदास नामा यांच्या अभंगात गुढीपाढव्याच्या दिवसाचा उल्लेख ‘गुढीयेसी’ असा होताना रामाच्या अयोध्येस परत येण्याच्या प्रसंगाशी या अभंगात संगती लावली गेल्याचे दिसते,तो अभंग असा”
आनंदु वो माये नगरी उत्सवो ।
आजि येईल रामरावो ।।
मोतिया तांदुळ कांडिती बाळा ।
गाती वेळोवेळा रामचंद्र ।।
अजिंक्य जिंकोनी आले कौसल्यानंदन ।
धन्य आजि दिन सोनियाचा ।।
कनक दंड चवऱ्या ढळताती रामा ।
विष्णूदास नामा गुढीयेसी ||
अर्वाचीन साहित्यात अर्वाचीन साहित्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी त्यांच्या ‘गुढी उभारनी’ या कवितेतून गुढीपाडव्याचे खालील प्रकारे वर्णन करतात. अहिराणी बोलीचे अभ्यासक डॉ. सुधीर देवरे यांच्या मतानुसार बहिणाबाई चौधरी यांची ही काव्यरचना खानदेशातील लेवा पाटीदार गणबोलीत आहे.
आरंभ होई चैत्रमासीचा गुढ्या-तोरणे सण उत्साहाचा गुढीपाडव्याचा सन आतां उभारा रे गुढी नव्या वरसाचं देनं सोडा मनांतली आढी गेलसालीं गेली आढी आतां पाडवा पाडवा तुम्ही येरांयेरांवरी लोभ वाढवा वाढवा
स्त्री लोकगीतांत गुढीपाडव्याचे वर्णन पुढीलप्रमाणे येताना दिसते
गुढी पाडव्याला उंचे गुढी उभवावी कुळाची कीर्ती जावी दाही दिशा ॥२४॥
गुढी पाडव्याला गुढी उंच उभी करी खण घाली जरतारी गोपूबाळ ॥२५॥
गुढी पाडव्याला कडुलिंब खाती आधी कडू मग प्राप्ती अमृताची ॥२६॥
गुढी पाडव्याला घरोघरी गुढी पडू दे माझी कुडी देवासाठी ॥२७॥
पाडव्याची गुढी उंच कळकीची काठी चांदीची वर लोटी गोपूबाळाची ॥२८॥
पाडव्याची गुढी उंच कळकीची काठी कुळाची कीर्ती मोठी बाप्पाजींच्या ॥२९॥*
पाडव्याची गुढी उंच कळकीची काठी वर खण जरीकाठी उषाताईचा ॥३०॥*
लोकसाहित्यात- आज पावडा पावडा लावा काठीवर गडू.
आसी उभारा गुढीले लागे आभायावर चढू.
कृषी विषयक महत्त्व डॉ. सरोजिनी बाबर यांच्या मतानुसार गुढीपाडव्यास लोक-संस्कृतीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. भूमी हा जगाचा गर्भाशय, तिच्यात सूर्य बीज पेरतो, वर्षनाच्यामुळे भूमी सुफलित होते.
सर्जनाला मिळणाऱ्या ऊर्जेशी जोडलेला हा एक सण आहे असे लोकसंस्कृतीचे अभ्यासक आवर्जून सांगतात.सामाजिक महत्त्व गुढीपाडव्याच्या दिवशी पाणपोई घालावी, पाण्याने भरलेल्या घड्याचे दान करावे असाही संकेत रूढ आहे.
या मंगलदिनी विविध ठिकाणी पहाटेच्या सांस्कृतिक मैफिली उत्साहाने आयोजित केल्या ” जातात. रसिकांचा वाढता प्रतिसाद दिवाळी पहाट, नववर्ष पहाट व गुढीपाडवा किंवा हिंदू नववर्ष पहाट या उपक्रमाला मिळत आहे.
भारतातील विविध प्रांतांत नव वर्ष – उच्चार ‘नोब बोर्ष’ (बंगाल). हे वर्ष ९ एप्रिलला (सूर्याचा मेष राशीत प्रवेश होतो त्या दिवशी) सुरू होते..*पुंथंडु तामिळनाडू- १० एप्रिल उगादी आंध्र प्रदेश बिहू (आसाम) – १५ एप्रिल.. विशु केरळ १३-१४ एप्रिल बैशाखी (पंजाबी वर्षारंभ) ही दरवर्षी १३ किंवा १४ एप्रिलला (सूर्याचा मेष राशीत प्रवे, होतो त्या दिवशी) असते.
काठीपूजामुख्य लेखविविधा: काठीपूजा आणि गुढी काठीपूजन तसेच उत्सवी काठी ही मानवी इतिहासात विविध समुदायात केली गेलेली एक प्राचीनतम पूजा-परंपरा आहे. ‘इव्होल्यूशन ऑफ गॉड’ या ग्रंथातील ग्रॅंट ॲलेन यांच्या नोंदीनुसार सायबेरीयातील ‘सामोयीड्स’ ते दक्षिण आफ्रिकेतील ‘दामारा’ या जमातींमध्ये काठीपूजेची परंपरा होती. इस्रायलमधील अशेराह पोल या काठी पूजा परंपरा ज्यू धर्माच्या स्थापनेपूर्वीच्या काळात प्रचलित पूजन पद्धती होत्या युरोपात नॉर्वेजियातील Mære चर्च उत्खननामध्ये काठीपूजेच्या परंपरेचे दाखले मिळालेले दिसतात, युरोपातील मेपोल हा काठी उत्सव ख्रिश्चनपूर्व काळापासून ख्रिश्चन धर्मीय विरोधाचा सामना करीत साजरा करताना दिसतात. पॅसिफिक क्षेत्रात माओरी मिथकातून ‘व्हाकापोकोको आतुआ’
नावाने शेती-पिकांचा देव रोंगोची पूजा होत आली आहे. कुक बेटांवरील आदिवासी ‘आतुआ राकाऊ’ नावाने काठीपूजा करतात. चीनच्या युनान प्रांतातील मिआओ आणि अनशूनमधील येलांग संस्कृती, व्हिएतनाम मधीले ‘के न्यू’, कोरियातील ‘जॉंगशॉंग’ आणि ‘सोटडे’, म्यानमार देशातील ‘के होते बो’ उत्सव ही जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या ठिकाणी साजऱ्या झालेल्या अथवा होत आलेल्या काठी उत्सवांची अथवा पूजांची उदाहरणे आहेत. अमेरिका खंडात देवक-स्तंभाच्या स्वरूपात प्राचीन काठ्यांचे वा स्तंभांचे जतन केले जाते.
*भारतीय उपखंडात नेपाळमध्ये काठी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो, आसाममध्ये काही समुदाय वैशाख महिन्यात ‘बास पूजा’ साजरी करतात, त्रिपुरा आणि मणिपूर राज्यांत काठी उत्सव परंपरा दिसून येतात; तसेच बलुचिस्तानच्या हिंगलाज देवीस काठी सोबत यात्रेने जाण्याची प्रथा आहे. राजस्थानात गोगाजी मंदिर येथे व मध्यप्रदेशातील निमाड प्रांतात काठी मातेची पूजा आणि काठी नृत्याची परंपरा आहे. महाराष्ट्रात गुढीपाढव्याशिवाय जतरकाठी, काठीकवाडी, नंदीध्वज हे काठी-उत्सव साजरे केले जातात. डॉ. बिद्युत लता रे यांच्या मतानुसार ओरिसा राज्याच्या आदिवासींमध्ये खंबेश्वरी देवीची पूजा हा काठी पूजेचा प्रचलित प्रकार असून खंबेश्वरीची पूजा अर्वाचीन काळात हिंदू धर्मात उत्क्रांत झालेल्या मूर्तिपूजांपेक्षा प्राचीन असावी.
दररोज परमेश्वराला प्रार्थना करा. आजपर्यँत जे दिले ते तुझेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस. आमचे राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपाशिर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृध्दीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण आम्हास सतत होऊ देत. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे. या शरीराला कोणताही घातपात होऊ नये. याचीही काळजी तुच घे.
आपल्या जिवलग व्यक्तींच्या आठवणी, आभास वास्तविकता स्वीकारून आनंदाने जगा. स्वतःची व कुटुंबाच्या जीवनाची व आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सुचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा, पण लोकशाही व संविधान सुरक्षित ठेवा. एकमेकांना अडचणीत आणु नका, त्यापेक्षा मदत करा, जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा, नकोत्या उठाठेवी करू नका. समाजातील खोट्या, राजकारणी, मतलबी, स्वार्थी, गर्विष्ठ, अहंकारी, लबाड, लोकांपासुन दूर रहा, अफवानवर विश्वास ठेवण्या आधी प्रथम खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा.
Pingback: gudi padwa 2024 marathi गुढीपाडवा - मराठी 1