खानदेशातील स्वातंत्र्य सेनानी लिलाताई उत्तमराव पाटील

खानदेशातील स्वातंत्र्य सेनानी लिलाताई उत्तमराव पाटील
खानदेशातील स्वातंत्र्य सेनानी लिलाताई उत्तमराव पाटील

खानदेशातील स्वातंत्र्य सेनानी लिलाताई उत्तमराव पाटील यांची आज 15 मार्च म्हणजेच जन्मदिवस (जयंती). अत्यंत शौर्यवान व कर्तृत्ववान अशा  लिलाताई पाटील यांनी इंग्रजांच्या कोर्टकचेर्‍या जाळून अंगावर रोमांच उभे करणारे पराक्रम गाजविलेत. आम्हां कृतघ्न देशवासियांच्या विस्मरणात गेलेल्या या थोर सेनानीस विनम्र अभिवादन.

तेजस्वी क्रांतिविरांगना :- लिलाताई उत्तमराव पाटील
                         नाशिक जिल्ह्यातील साकोरे या छोट्याशा गावातील प्रखर सत्यशोधक वामनराव पाटील यांच्या पोटी जन्म घेतलेल्या व डॉ. उत्तमराव गिरीधर पाटील या अमळनेरच्या स्वातंत्र्यवीराचे सौभाग्य भाळी लावलेल्या लिलाताई पाटील यांची आज जयंती. (जीवनकाळ:15 मार्च 1922 ते 1 मे 1985) क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकार चळवळीतील तुफानसेनेच्या या सेनानीस भावपुर्ण अभिवादन.
                         महात्मा गांधीसारखा युगपुरुष नेता, साने गुरुजींसारखा मातृहृदयी मार्गदर्शक, वामनराव पाटलांसारखा सत्यशोधकी पिता, उत्तमरावांसारखा देशभक्त क्रांतिकारी जोडीदार लाभलेल्या या अंतर्यामी व संवेदनक्षम बंडखोर महिलेचा देशाप्रती असलेला त्याग अंगावर रोमांच उभे करणारा व काळीज पिळवून टाकणारा आहे. स्वातंत्र्योत्तर काळात जन्मुन दर महिन्यास आजही स्वातंत्र्यसैनिकाचे पेन्शन घेणार्‍या अनेक ‘थोर’ नकली स्वातंत्र्यसैनिकांचे सद्यस्थितीला कौतुक होत असताना किंवा ज्यांनी खर्‍या क्रांतिकारकांची हेटाळणी करुन ब्रिटीशांची चापलुसी केली अशा बेगडी स्वातंत्र्यवीरांचे सध्या गौरवीकरण होत असतानाच्या पार्श्वभूमीवर लिलाताईंसारखे अव्वल बावनकशी सोनेरी व्यक्तीमत्त्व आज विस्मरणात जात आहेत यापेक्षा दुर्दैव ते काय?
                         फारसे प्राथमिक शिक्षण न झालेल्या परंतु श्रीमंत व सुखवस्तु मराठा कुटुंबात जन्मलेल्या लिलाताईंच्या आयुष्यात उत्तमरावांसोबत 1937 मध्ये झालेल्या विवाहादरम्यान घडलेल्या घडामोडीतून पुरोगामी सामाजिक विचारांचे बिजारोपण झाले. डॉ. उत्तमराव पाटील म्हणजे साने गुरुजींचा पट्टशिष्य व महात्मा गांधींच्या विचारांचा पाईक. लिलाताईंचा विवाह हातात रिकामी पिशवी एवढीच ईस्टेट असलेल्या या कफल्लक देशभक्त तरूणाशी लग्नसोहळ्यातील एकही पारंपारिक विधी न करता, जाड्याभरड्या खादीच्या साडीवर, एका दलितबांधवाच्या पौरोहित्याने, गळ्यात मंगळसुत्र न घालता पार पडला. खानदेशातील त्या पंचक्रोशीत अशाप्रकारचा सत्यशोधकी विवाह समारंभ पहिल्यांदाच संपन्न होत होता. जळगाव जिल्ह्यातील डांगरी या गावातील सासरी गेल्यानंतर तेथे अठराविश्वे दारिद्र्य असलेल्या चंद्रमौळी झोपडीत संसार सुरु करताना लिलाताईंना त्यांच्या विवाहातील बंडखोरीमुळे भावकीतील नातलगांकडुन सुरुवातीला सामाजिक बहिष्काराला सामोरे जावे लागले. सख्ख्या चुलत सासरची मंडळी त्यांना महाराच्या हातुन लग्न लावुन घेतले अशी हेटाळणी करित विहीरीवर पाणी सुद्धा भरु देत नसत. मात्र घरातील सासू, दिर, पती यांच्या पुरोगामीत्वाच्या भक्कम पाठबळामुळे त्यांनी या सर्व बाबींवर लिलया मात केली. ‘डोईवरचा पदर आला खांद्यावरी, जाईन मी भरल्या बाजारी’ या संत जनाबाईंच्या 700 वर्षापुर्वी लिहिलेल्या स्त्रीसशक्तीकरणाच्या ओवीप्रमाणे लिलाताईंनी अत्यंत बाणेदारपणे व विनयतेने डोक्यावरचा पदर खांद्यावर घेत स्वतःचा संसार धार्मिक व सामाजिक रूढीबंधनांना टिच्चून समर्थपणे पेलला. त्या काळी खानदेशी परिसरात स्त्रीने स्वत:च्या पायाचे नखसुद्धा बाहेर दिसु देणे म्हणजे सामाजिक निंदा नालस्तीचा विषय असताना लिलाबाईंना काय जाच झालेला असावा याची आपण आज कल्पना करू शकतो. 1937-38 म्हणजे आजपासून 87 वर्षापुर्वीचे बंडखोरीचे हे चित्र आज आम्हां सर्वांना विस्मयचकीत करणारे आहे.
                         लिलाताई पाटिल यांचे संपुर्ण कुटुंबच स्वातंत्रता चळवळीसाठी बलिदानाच्या वेशीवर उभे असल्याचे आपल्याला दिसुन येते. लिलाताईंच्या वयोवृद्ध सासु स्वातंत्र्यलढ्यात तुरुंगात गेल्या; तुरुंगातच त्यांचे निधन झाले. पती डॉ. उत्तमराव पाटील यांचे भारत छोडो आंदोलनातील व प्रतीसरकार (पत्रीसरकार) चळवळीतील योगदान स्वातंत्र्यलढ्यात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्याजोगे विलक्षण आहे. लिलाताईंचे दोन्ही धाकटे दिर शिवाजीराव पाटील व दशरथराव पाटील स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या त्यांच्या आंदोलनांमुळे तुरुंगात होते. ( शिवाजीराव पाटील म्हणजे महाराष्ट्राचे माजी मंत्री व अभिनयसम्राज्ञी स्मीता पाटील यांचे पिता) एवढेच नव्हे तर लिलाताईंचे वडील वामनराव पाटील, त्यांचे मामसासरे कॅप्टन विश्वासराव पाटील, सख्खे मामा गोविंदराव यांच्यासह त्यांच्या रक्ताच्या अनेक आप्तांनी स्वातंत्र्यलढ्यात जीव धोक्यात घालून सक्रीय योगदान दिले. एकंदरीत लिलाताईंचे कुटूंबच स्वातंत्र्यसैनिकाची खाण होती असे म्हटल्यास अजिबात अतियोशोक्ती होणार नाही. एकाच  कुटूंबाच्या उज्ज्वल देशभक्तीचे असे दुसरे उदाहरण भारतीय स्वतंत्रता चळवळीत आढळत नाही.
                         विवाहाआधी फारसे शिक्षण नसलेल्या लिलाताईंनी डॉक्टर पतीच्या मार्गदर्शनातून नर्सिंगचा अभ्यासक्रम पुर्ण केला. 1939 ला अंमळनेर येथे गोरगरीबांकरिता या उभयतांनी दवाखाना सुरु केला. मात्र अवघ्या 1-2 वर्षातच त्यांना हा दवाखाना त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील इतर व्यस्ततेमुळे तसेच इंग्रजाच्या जाचामुळे बंद करावा लागला. मात्र त्यांनी खेडोपाडी दिलेल्या वैद्यकीय सेवेमुळे त्यांच्या भावकीतील व परिसरातील आप्तजनांनी त्यांच्या कुटूंबावरील घातलेला सामाजिक बहिष्कार नाहिसा झाला. उत्तमराव पाटलांना कट्टर सामाजिक शत्रु मानणा-या चित्रमआप्पा या गावप्रमुखाची स्त्री तीच्या बाळंतपणात लिलाताईंनी स्वत:च्या वैद्यकीय कौशल्याने सोडविली. बाळासह त्या भगिनीला जीवदान दिले. तेव्हा तर चित्रम आप्पांनी मनातील सर्व किल्मीषे दुर सारून लिलाताईंना त्या काळी उत्तुच्च समजल्या जाणा-या उंच चौरंगावर बसवित चांदीच्या थाळी- निरंजनाने ओवाळुन सत्कार केला व स्वत:च्या द्वेषाची सांगता केली.
                         महात्मा गांधींच्या प्रेरणेने स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतल्याने लिलाताईंना वयाच्या 18 व्या वर्षीच 1940 ला धुळे येथील तुरुंगात ब्रिटीशांनी वैयक्तीक सत्याग्रहाच्या आरोपाखाली कोठडीत टाकले.  1937 ते 1942 या कालावधीत लिलाताईंनी खादी, कॉंग्रेसविचार, सभासद नोंदणी, प्रभातफेरी, ग्रामसफाई, संडाससफाई, मजूर- शेतकरी संघटन इत्यादी सामाजिक कार्यात सक्रीयपणे सहभाग घेतला. 1942 च्या ऑगष्ट महिन्यात गांधींनी सर्व देशवासियांना दिलेली ऑगष्टक्रांतीच्या आंदोलनाची हाक शिरोधार्ह मानुन पाच महिन्यांच्या गर्भवती असलेल्या लिलाताईंनी या आंदोलनात उडी घेतली ही बाब आज अविश्वसनीय वाटते. त्यांनी  ऑगष्ट  1942  मध्ये पती उत्तमरावांसह ‘भारत छोडो’ या आंदोलनाची क्रांतिज्योत ‘नही रखना नही रखना, सरकार जालीम नही रखना’ अशा घोषणा देत पेटविली. 15 ऑगष्ट 1942 ला लिलाताई, उत्तमराव  व इतर सहका-यांनी अंमळनेर येथील न्यायालय, पोष्टऑफीस व स्टेशन या ब्रिटीशांच्या मर्मस्थानावर मोर्चा काढुन या तिनही इमारतींची पार राखरांगोळी केली. ब्रिटीश सरकारकरिता हा अत्यंत मोठा धक्का होता. त्यामूळे या आंदोलनादरम्यान शिपायांनी गोळीबार सुद्धा केला. इंग्रजांनी उत्तमराव यांच्याविरुद्ध या कारनाम्याकरिता डेथ वारंट काढल्याने 15 आँगष्टच्या रात्रीतून ते भुमिगत झाले. मात्र परत लगेच दुस-या दिवशी 16 ऑगष्ट 1942 ला इंग्रजांनी लावलेला मार्शल लॉ तोडण्याच्या धारिष्ट्याचे लिलाताईंचे आंदोलन म्हणजे त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाचा परमोच्च क्षण होय. लिलाताईंचे त्या दिवशीचे साहस बघितल्यास अंगावर रोमांच उभे राहतात. उत्तमरावांच्या गैरहजेरीत मात्र त्यांच्याच दिग्दर्शनाखाली लिलाताईंनी 16 ऑगष्टचे मार्शल लॉ भंगाचे आदोलन दिर दशरथ पाटील व काही मैत्रीणींच्या सहाय्याने यशस्वी केले. लिलाताई हातात तिरंगा झेंडा घेवुन या पाच-सहा तरूण आंदोलकांचे नेतृत्त्व करीत होत्या. त्यामुळे आदल्या दिवशीच्या जाळपोळीमुळे पित्त खवळलेल्या इंग्रज शिपायांनी या गटावर झडप घातली व अमानुष मारहाण केली. ‘ऑगष्ट क्रांती जिंदाबाद, इंग्रजी राज मुर्दाबाद’ अशा घोषणा देत असताना व तिरंगा झेंडा छाती-पोटाशी लिलाताईंनी कवटाळलेला असताना तो ताब्यात घेण्याकरीता शिपायांनी त्यांच्या पाठीवर मागुन पोलीसी दंड्याचे प्रहार केलेत. पण लिलाताई तिरंगा सोडत नाही हे बघून क्रोधाने उद्वीग्न झालेल्या शिपायांनी लिलाताईंच्या कमरेवर व ओटीपोटावर रायफलच्या दस्त्याने अमानवीय क्रुरतेने वार केलेत, त्यांना फरफटत नेत तुरुंगात डांबले. या अमानुष मारहाणीत झालेल्या दुखापतीमुळे लिलाताईंचा गर्भपात झाला. भारतमातेची सेवा करण्याच्या हट्टात या माऊलीचे मात्रुत्त्व इंग्रजांच्या जाचामुळे हिरावले गेले. अंमळनेर येथील शासकीय कार्यालयाची जाळपोळ या तत्कालीन शासनद्रोही गुन्ह्याकरिता साडेसहा वर्षे व मार्शल लॉ भंग गुन्ह्याकरिता साडेसात वर्षे अशी एकूण चौदा वर्षाची शिक्षा त्यांना सुनावण्यात आली. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात 14 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या लिलाताई ह्या भारतातील पहिल्याच महिला असाव्यात.
                         लिलाताईंच्या या शौर्यगाथेवर लिहिलेल्या ‘ऑगष्ट बुलेटिन’ या अंकातील ‘ लिलाताईचा संसार’ या लेखात साने गुरुजींनी या माऊलीप्रती प्रचंड आदरभाव व्यक्त केलेला आहे. ‘लिलाप्रमाणे निर्मळ आणि निष्पाप, सरळ आणि निर्भय, सेवामय आणि त्यागमय स्त्री बघितली नाही.’ असे गुरुजींनी या लेखात ठळकपणे नमुद केले.
                          ऑगष्ट 1942 पासुन त्यांचा प्रवास धुळे तुरुंग- ठाणे तुरुंग- येरवडा तुरुंग असा झाला. येरवडा तुरुंगात स्वातंत्र्यलढ्याची शिक्षा भोगत असताना कडक पहार्‍याच्या या तुरुंगातुन अंगात 101 डिग्री ताप असताना लिलाताईंनी इंग्रज शिपायांच्या हातावर तुरी देत केलेल्या पलायनाचा वृतांत छत्रपती शिवरायांच्या आग्र्याहुन केलेल्या पलायनाची आठवण व्हावी एवढा रहस्यमयी व  रोमांचकारी आहे. अमळनेरच्या जळीतकांडानंतर उत्तमराव पाटलांनी भुमिगत होवुन क्रांतिसिंह नाना पाटीलांच्या नेतृत्त्वात प्रतिसरकार चळवळीत कार्य केले. इंग्रज सरकारच्या त्यांच्या शोधामागील ससेमिर्‍यामुळे ते महादू धनगर या खोट्या नावाने वावर करीत. येरवडा तुरुंगातील पलायनानंतर लिलाताईंनी सुद्धा भुमिगत होत क्रांतिसिंहांच्या चळवळीत पतीच्या खांद्याला खांदा भिडवत प्रतिसरकार चळवळीतील तुफान सेनेच्या महिला सैनिकांची सेनानी म्हणुन नेतृत्व केले. या चळवळीत लिलाताईंनी खांद्यावर बंदूक घेवून नाना पाटलांच्या ग्रामराज्य संकल्पीत चळवळ बळकट करण्याचा प्रयत्न केला. 1946 पर्यंत उत्तमराव व लिलाताई यांच्या नावे असलेले सरकारी सर्चवारंट रद्द होईपर्यंत या जोडप्याने भुमिगत राहून महाराष्ट्रभर सामाजिक क्रांती पेटवत ठेवण्याचा प्रयत्न केला. नंतर हे सर्चवारंट रद्दबादल झाल्यानंतर संपुर्ण महाराष्ट्रभर या उभयतांचे लोकसत्कार झालेत. मात्र पत्रीसरकारच्या यशामूळे व जनाधाराच्या इर्ष्येमुळे महाराष्ट्रातील काही कॉंग्रेसी नेत्यांना पत्रीसरकारच्या या नेत्यांचा जनतेने केलेला असा अभुतपुर्व सत्कार व सन्मान मानवला नाही. बाळासाहेब खेर व मोरारजींच्या मुंबई सरकारचा तर फारच जळफळाट झाला. त्यामुळे उत्तमराव व लिलाताईंवर सभाबंदी, भाषणबंदीचे हुकुम कॉंग्रेस नेतृत्वाकडून बजावण्यात आले. प्रतिसरकारबाबत कॉंग्रेसी नेत्यांमध्ये असलेला द्वेष व इर्ष्येमुळे पुढे लिलाताई व उत्तमरावांनी समाजवादी पक्षाची कास धरली. या उभयतांच्या सत्कारानिमीत्त ठिकठिकाणी लोकांनी दिलेली एकूण 50,000 रुपयांची देणगी या उभयतांनी समाजवादी पक्षाला अर्पण केली. मात्र काही काळानंतर, विशेषत: 1948 नंतर समाजवादी पक्षाच्या ध्येय उद्दीष्टांच्या प्राधान्याबाबत त्यांचे मतभेद निर्माण झाल्याने कोणताही कडवटपणा न आणता लिलाताई व उत्तमरावांनी पुढे शेतकरी कामगार पक्षाचे कार्य केले.
                         स्वातंत्र्योत्तर काळात लिलाताईंनी स्त्रीशिक्षण, स्त्रीमुक्ती, सहकारी संघटना, स्त्रीहोमगार्डदल इत्यादी सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य केले. 1947 ला अमळनेर येथे जनता शिक्षण मंडळाची लिलाताईंनी मुहुर्तमेढ रोहून शेतकरी बोर्डींग व ट्रेनिंग कॉलेज सुरु केले. 1952 पासुन त्या शिरपुर येथे स्थिरावल्या. तेथील नगर परिषदेच्या त्या सलग 9 वर्षे नगरसेविका होत्या. स्टॅंडींग कमीटीच्या महीला चेअरमन होण्याचा महाराष्ट्रातील पहिल्या महिलेचा मान त्यांना मिळाला. शिरपूर येथे वनिता सेवा मंडळ व कन्या विद्या मंदीर स्थापन करुन त्यांनी मुलींच्या शिक्षणाचा व महीला सशक्तीकरणाचा प्रयोग राबविला. 1972 ते 1976 या कालावधीत महाराष्ट्र  विधानसभेच्या शिंदखेडा मतदारसंघाच्या जागरुक आमदार म्हणून लिलाताईंनी कार्य केले. शंकर पाटील यांनी लिलाताईंच्या साहसावर लिहीलेला ‘पक्षी पिंज-यातुन उडाला’ हा पाठ कधीकाळी इयत्ता सातवीच्या मराठी पाठ्यपुस्तकातुन विद्यार्थ्यांना शिकविल्या जायचा.
                         लिलाताई पाटलांचे जीवन म्हणजे केवळ एका सत्याग्रही व भुमिगत स्वातंत्र्यसैनिकाची कथा नसून एका संपुर्ण कुटूंबाच्या अद्वितीय त्यागाची गाथा आहे. अशा या साध्यासुध्या मराठमोळ्या अंतर्यामी, परकियांच्या गुलामगिरीने व सामाजिक-राजकीय अन्यायाने संतप्त होणारी, त्यासाठी प्रथम सत्याग्रहाच्या व अंती सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने ब्रिटीशांशी प्राणपणाने लढणारी, प्राणभयाच्या संकटसमयीही न डगमगता बुद्धी शांत व स्थिर ठेवणारी, प्रसंगी मृत्यूला हेटाळणारी, ऐन तारुण्यात पोटातल्या बाळावर व उभ्या संसारावर निखारा ठेवणारी एक तेजस्वी क्रांतिविरांगना लिलाताई उत्तमराव पाटील यांचे 1 मे 1985 ला देहावसन झाले. भारतातील जनतेला अन्यायाने छळत असलेल्या कॅंन्सररुपी ब्रिटीश सत्तेला उलथवून टाकणार्‍या या रणरागिणीचा अंत त्यांच्या शरीराला पोखरणा-या कॅंन्सरने झाला. ज्या महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय उत्थानाकरिता त्यांनी सर्वस्वाचा त्याग केला त्या महाराष्ट्र दिनीच त्यांच्या जीवन यज्ञाची सांगता व्हावी यापेक्षा दुसरा मोठा योगायोग नाही.
                         ख-या स्वातंत्र्यसैनिकांना फितूर होवून किंवा ब्रिटीशांची माफी मागून स्वातंत्र्यद्रोह करणा-या अनेक महाभागांवर पुस्तके, कादंब-या, नाटके, चित्रपटे निर्माण होत असताना महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या ‘क्रांतिपर्व’ या ग्रंथाखेरीज (1987) इतरत्र कोठेही या रणरागिणीबद्दल विशेष अशी माहीती आज मिळत नाही, हे महाराष्ट्रीय जनतेचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. शिवरायांच्या कर्तृत्त्वस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्राच्या सृजन मातीतून जन्मास आलेल्या या अतुल्य साहसी तुफान सेनानी लिलाताई पाटील यांच्या  जन्मतिथीनिमित्त मानाचा मुजरा करीत आपण नतमस्तक होवूया.