डॉ.जयकर व्याख्यानमाला
मु.पो.पापळवाडी
(डॉ.जयकर व्याख्यानमाला)
… नानाभाऊ माळी
छोटासा टेकडीवजा एक माळ माथा!निवडक चार-पाच घरं दिसतात!आजूबाजूला हिरवीगार शेती दिसतेय!शेतात प्लास्टिक पाईपलाईन द्वारें छोटया मोठया पाटात पाणी झूळझूळ पळतंय!पाटात उभे राहून शेतकरी राजा भिजत्या पाण्यात उभा राहून वाफ्या वाफ्यानां पाणी वळतोय!..मानकर माथा त्याचं नाव!
निसर्ग सानिध्यात वसलेल्या टूमदार पापळवाडी गावातील हा मानकर माथा!पुणे जिल्ह्यातील खेड-राजगुरू पासून वाडा रोडवर असलेलं हे गाव त्यात मोजक्या घरांची वस्ती असलेला हा मानकर माळ!हिरवेगाव शेतमळे फुललेले दिसताहेत!ज्वारी, कांदे उभे दिसत आहेत!शेताच्या बांधावर वेगवेगळी झाडं उभी आहेत!नजरेच्या टप्प्यात सह्याद्री पर्वत रांग मान खाली वाकवून बघतेयं जणू!घनदाट झाडांनी पर्वताला नटवलय!संपूर्ण पर्वतरांग झाडांनी शृंगारलेली दिसतेय!मानकर माथा पलीकडे आखरवाडी गाव दिसतंय!शेतातील वस्ती गावापासून थोडी दूर आहे!पिकं,माणसं,आपल्याचं नादात,कामात धुंदीत आहेत!सर्वत्र सुंदर, सुरेख, शुद्ध वातावरण दिसतंय!हवेत गारवा आहे!डिसेंबर महिन्यातील गारव्याने उत्साहाला उधाण आलेलं दिसतंय!
मानकर माथ्यावर शेतात गहू, हरभरा, कांदे, ऊस हिरवाईच रुपडं घेऊन उभे आहेत!मानकर माथ्यावर भलं मोठं घर आहे!घर नव्हे तर तें शहरापासून दूर निसर्ग सानिध्यात मुलींचं माहेरघर आहे!निराधार मुलींचं माहेर घर आहे!व्यसनमुक्ती केंद्र आहे!शेतातt तें घर कुणाचं असेल बरं? अन तें शेत कुणाचं असेल बरं?हिरवाईच्या चादरीत सुंदर घर असणाऱ्या पित्याच नाव आहे.. म.भा.चव्हाण सर
कोण आहेत हे म.भा.चव्हाण सर मग?प्रश्न नैसर्गिक आहे!तें कुणी राजकीय व्यक्तिमत्व नाहीतं!…मराठी साहित्य जगतात ज्यांनी आपल्या नावाचा ठळक ठसा उमटवला आहे!मराठी काव्य विश्वात काळजाला हात घालणाऱ्या गझलांनी मनामनावर राज्य केलेले आहे!महाराष्ट्रातील प्रसिद्ध गझलकार आदरणीय म.भा. चव्हाण सर आहेत!स्वतःच्या पिकपाणी शिवारात,शेतात टूमदार माहेरघर बांधून निराधार मुलींचे पालकत्व स्वीकारून सामाजिक कार्यातील महान योगदान देत आहेत!त्यांच्या *फादर फाउंडेशन* द्वारा मुलींचं माहेरघर ही संस्था चालवली जात आहे!त्या छोट्याशा माळ माथ्यावर जाण्याचं भाग्य आम्हाला लाभलं होतं!सावित्रीबाई पुणे विद्यापीठ अंतर्गत डॉ.बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला आयोजित केली जात असतें!सहसा कुठल्याही संस्थेला ही व्याख्यानमाला आयोजित करण्याचा हा सन्मान मिळत नसतो!हा बहुमान सन्मान म.भा. चव्हाण सरांच्या *फादर फाउंडेशनला* मिळाला!ते ही चक्क एका छोट्याशा खेडे गावातील माळमाथ्यावर!मानकर माथ्यावर!








महाराष्ट्रातील थोर विचारवंतांनी जयकर व्याख्यान मालेत विचारांचं दान दिलं आहे!मानव समाजाचं मंथन होईल असे महत्वपूर्ण विचार पेहरले आहेत!अनेक विषयांवर सकारात्मक, सडेतोड विचार मांडले आहेत!समाजात लौकिक विचार वाढीस लागावे!मानव कल्याणसाठी झटणारे अनेक विद्वान मंडळीनी प्रबोधन केलेले आहे!
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळ आणि ‘द फादर फाउंडेशनच्या’ संयुक्त विद्यमाने पापळवाडीतील ग्रामीण भागात, मुलींच्या माहेर घरात, व्यसनमुक्ती केंद्रात विचारांची मेजवानी आयोजित केली होती!सद्विचार विचार कायमस्वरूपी असतात पण जड असतात!अंगीकरण्यास थोडं कठीण जात असतात!जडतत्व समाज हिताचे असतात!दिनांक २५,२६,२७ डिसेंबर २०२४ रोजी शब्दधन अन विचारधनांचं सिंचन होत राहिलं!ग्रामीण भागातील पहिले पुष्प सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचें मराठी विभाग प्रमुख डॉ. संदीप सांगळे सर यांनी गुंफलें!अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कवी किशोर टिळेकर होते!
दुसरे पुष्प श्रीमती तमन्ना इनामदार यांनी गुंफलें अध्यक्षस्थानी सौ.प्रतिमा जोशी होत्या!२७ डिसेंबर २०२४ रोजी तिसरे पुष्प गुंफलें ऍड.भालचंद्र सुपेकर* यांनी!सामाजिक, संवैधानिक,अस्वस्थ वर्तमान, सामाजिक सलोखा सारख्या अनेक ज्वलंत विषयावर वक्त्यांनी आपली मतं मांडली!भाष्य केलेतं!देश संविधान प्रमाणे चालत असतो!लोकशाही बळकट करण्यासाठी सामाजिक सलोखा राखणे अत्यंत महत्वाचे आहे!मानवी मूल्य संवर्धन महत्वाचं आहे!त्यात काव्यसंमेलन ही झाले!विविध अंगानी कविता फुलत राहिल्या!व्याख्यानातून अमृत पाझरत राहिलं!मन तृप्त होत राहिलं!
म.भा.चव्हाण सरांच्या संकल्पनेतून पापळवाडीत डॉ.जयकर व्याख्यानमालेत जीवनदर्शन होत राहिलं!आम्ही निसर्गाच्या सानिध्यातील सर्वरंग न्याहाळत परतीच्या प्रवासाला लागलो होतो!
****************************
… नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
७५८८२२९५४६
दिनांक-२८ डिसेंबर २०२४