वाळु निसटून जातांना Diana Nyad
वाळु निसटून जातांना.….
वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी एका तरुण मुलीने क्युबा ते फ्लोरिडा ह्या दोन देशांमधील सागरी अंतर ११० मैल म्हणजेच साधारण १८० किलोमीटर पोहून जाण्याचा प्रयत्न केला.साल होतं १९७८.
परंतू तुफान वारा तिला पश्चिमेकडे ढकलू लागला.जी तिची दिशा नव्हती.ती भरकटली, साधारण ७६ मैल दूर ती गेली आणि ४२ तास पाण्यात होती आणि तिने हार मानली.
आयुष्य सुरु राहिलं,ती पुढे पत्रकार झाली.लेखिका झाली.
तिच्या साठाव्या वाढदिवसाला तिला वाटू लागलं कि तिने आयुष्यात काहीच केलं नाही आणि मग तब्बल तीस वर्षानंतर वयाच्या साठाव्या वर्षी डायना तिचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पुर्ण करायला पुन्हा पाण्यात उतरली.

साल २०१०….
दररोज आठ,दहा, बारा,चौदा तास ती पोहण्याचा सराव करत राहिली. हळू हळू ती सलग २४ तास पाण्यात पोहू लागली.पहिल्या असफल प्रयत्नानंतर डायना २०११ साली दुसऱ्यांदा क्युबा ते फ्लोरिडा अंतर कापण्यासाठी सज्ज झाली.परंतु तेव्हाही जोरदार प्रवाह आणि समुद्री वाऱ्यामुळे ती पुन्हा भरकटली आणि पूर्वेकडे फेकली गेली.एकोणतीस तासांनंतर डायना महासागरातून बाहेर आली.
दिडच महिन्यात ती पुन्हा पाण्यात उतरली.परंतु मानेला आणि हाताला झालेल्या जेलीफिशच्या दंशाने तिला पुन्हा पाण्याबाहेर यावं लागलं.डायनाला श्वसनाचा प्रचंड त्रास व्हायला लागला आणि तिचा हा तिसरा प्रयत्न एक्केचाळीस तासांनी संपला.डायना साधारण एक वर्षानंतर पुन्हा महासागरात उतरली.ह्या वेळेस मागील तीन प्रयत्नांपेक्षा तिने नक्कीच जास्त अंतर कापलं परंतु दोन वादळे आणि जेलीफिशच्या नऊ डंखामुळे प्रकरण तिच्या जीवावर बेतलं. डायना चौथ्या प्रयत्नातही असफल ठरली.
आता मात्र तिच्या ह्या सततच्या अपयशाला तिचे सोबती,तिची टीम,तिचे मित्र मैत्रिणीही कंटाळले.जवळचे पैसे संपले, स्पॉन्सर पैसे लावायला तयार नाहीत,मित्र मैत्रीणींही पाठ फिरवली,सगळ्यांनी तिला वेड्यात काढलं.
डायना संपूर्ण एकटी पडली.परंतु काहीही करून तिला हा प्रवास पूर्ण करायचाच होता.तिने पुन्हा स्पॉन्सर्स जमवले.एक वर्षाच्या काळात तिला सोडून गेलेले लोकं तिला पुन्हा येऊन मिळाले आणि अशी पस्तीस जणांची टीम घेऊन तिने पुन्हा पाचव्या प्रयत्नाला सुरुवात केली.
सिलिकॉन मास्क,जेलीफिश पासून संरक्षण करणारा संपूर्ण घट्ट बॉडीसूट,हातमोजे हे सगळं घालून ती इलेक्ट्रॉनिक ‘शार्क शील्ड’ प्रतिबंधक उपकरणांच्या मदतीने पुन्हा एकदा म्हणजेच पाचव्यांदा समुद्रात उतरली.डायनाने त्रेपन्न तास पाण्यात पोहून,एकशे दहा मैल म्हणजेच साधारण एकशे ऐंशी किलोमीटरचा पल्ला गाठला आणि दोन सप्टेंबर २०१३ ला डायनाने,की-वेस्टच्या समुद्रीवाळूवर पाऊल ठेवलं.
तिने ह्या प्रवासात शार्क माशांपासून बचावासाठी कुठलाही पिंजरा वापरला नाही.त्यामुळे पिंजऱ्याशिवाय इतका मोठा पल्ला गाठणारी ती प्रथम महिला ठरली.परंतु तिचा लढा इथेच संपला का? तर नाही.इतका जीवघेणा, आव्हानात्मक प्रवास गिनीज बुक ऑफ वर्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवला गेला नाही.तिच्या संपूर्ण प्रवासाचा एकसंध असा कुठलाच व्हिडीओ उपलब्ध नाही.तिच्या प्रवासात कुणीही व्यक्ती स्वतंत्र निरीक्षक म्हणून उपलब्ध नव्हती.अशी अनेक कारणं दिली गेली.जो वाद आजही सुरु आहे. परंतु डायनाने तीस वर्षानंतर कम बॅक करणं.पुन्हा पुन्हा अपयश पदरी पडणं त्यातून उभं राहणं हे निखालस प्रेरणादायी आहे.त्या त्रेपन्न तासाच्या महासागरातल्या प्रवासाला असंख्य कंगोरे आहेत.
महासागरातील वादळं,लाटांचा मारा,जेलीफिश आणि शार्कची भीती- डंख,पाण्याचे बदलणारे तापमान,आर्थिक पाठबळ, खचणारं मन,साथ सोडणारे व साथ देणारे लोक आणि शारीरिक वय,ह्या सगळ्या प्रवासात तिच्या मनात सुरु असणारं द्वंद्व,तिचे लहानपणी तिच्याच कोचकडून झालेलं लैंगिक शोषण,त्या धक्क्यातून बाहेर पाडण्यासाठी सुरु असलेली तिची तगमग आणि त्याच घटनेतुन मिळणारी प्रेरणा, तिच्या साठ वर्षीय देहात नांदणारं तिचं बारा पंधरा वयाचं बालमन.
चौसष्ठ वर्षांची डायना जेव्हा एकशे ऐंशी किलोमीटर पोहून त्रेपन्न तासानंतर फ्लोरिडा देशाच्या वाळूवर पाऊल ठेवते. असंख्य लोक तिच्या स्वागताला तिथे उभे असतात.तिथेच ती आयुष्याचे तीन महत्वाचे संदेश देते….
• पहिला – कधीही म्हणजे कधीही हार मानू नका.
• दुसरा – तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी वयाची अट कधीच नसते.
• तिसरा – तिचा प्रवास दिसताना भले एकट्याचा दिसत असेल, परंतु हे टीमवर्क आहे.
डायनाची कहाणी आहे,दुर्दम्य इच्छाशक्तीची,भयाच्या मुळ भावनेची,भितीला सामोरं जाण्याची,धैर्याची.
डायनाला जे अठ्ठाविसाव्या वर्षी शक्य झालं नाही ते पस्तीस वर्षानंतर चौसष्ठ्याव्या वर्षी तिने शक्य करुन दाखवलं.कारण वाळू निसटते तसा काळ निसटून जातोय हे तिला साठाव्या वर्षी जाणवलं.तिला आयुष्याच्या शेवटी कुठलाही पश्चाताप अथवा खेदाची भावना घेऊन मरायचं नव्हतं.अपूर्ण राहिलेल्या,अस्पष्ट झालेल्या स्वप्नांवरचा फोकस तिने पुन्हा ऍडजस्ट केला आणि ती जिंकली.
वय कोणतही असुदेत हार मानू नका.
तिच्या प्रवासवाटा..