मृत्युपत्र
मृत्युपत्र
हल्ली ती झोपूनच असायची.
फार हालचाल करायला तिला नकोच वाटायचं .
तसं वयही झालं होतं म्हणा… नवरा गेल्यापासून डोळे मिटून गत जीवनातल्या घडामोडी आठवत राहायची.
आज तिला नवऱ्याने केलेल्या मृत्युपत्राची आठवण आली.
तो दिवस आठवला.
चार दिवस त्याचं काहीतरी लिहायचं आणि कागद फाडायचा असं सुरू होत. तिने विचारलं
” काय करताय?”
” महत्त्वाच काम करतोय..मृत्युपत्र लिहितोय..विचार करून ते लिहायच असत..”
” काय मृत्युपत्र..आत्ता …कशासाठी?”
” आत्ता नाही तर कधी करणार? सगळं व्यवस्थित केलं म्हणजे काळजी नको”
” म्हणजे वाटणी का “
यावर तो जरा रागवलाच..
“नुसती वाटणी नसते ती…
बरं ते जाऊदे.. ऊगीच काहीतरी विचारत बसु नको..तुला काय त्यातल समजणार ?एक वाजायला आलाय जेवायला वाढ “
ती गप्प बसली .
खरंच आपल्याला काय कळणार? आणि समजा काही सांगितलं तरी त्यांनी काही ऐकून घेतलं नसतं त्यांना जे करायचं तेच त्यांनी केलं असतं.
नेहमीचच होतं ते ..
त्याचं बोलणं तिने मनावर घेतलं नाही.
मनात मात्र कुठेतरी वाईट वाटलच…
का कोण जाणे…
पण गेले काही दिवस मृत्युपत्र हेच तिच्या डोक्यात होत..
आज लेक भेटायला आली .
तेव्हा तिने विषय काढला .म्हणाली..
“मला पण मृत्युपत्र करायच आहे .”

“तुला ?…मृत्युपत्र ?…कशासाठी? काय लिहिणार आहेस त्यात ?”
मुलीनी हसतच विचारलं..
तिचं लक्षच नव्हतं. ती तिच्याच नादात होती .पुढे म्हणाली ..
“अगं एक महत्वाच विचारायचं होतं मृत्युपत्र लिहिले की त्याप्रमाणे वागाव लागतं का ?ते बदलता येत नाही ना ?”
आईचा शांत संयमित आवाज ऐकून लेकीच्या लक्षात आलं…आई गंभीरपणे काही सांगते आहे..ती म्हणाली….
” हो नाही बदलता येत .पण आई असं का विचारते आहेस?”
” मला पण करायचे आहे मृत्युपत्र. आण कागद.. पेन .. घे लिहून …”
“कशाची वाटणी करणार आहेस ?काय आहे तुझ्याजवळ?”
लेकीच्या बोलण्याकडे तिचं लक्षच नव्हतं .
ती तंत्रितच बोलत होती ..
“भावानी बहिणीला वर्षातून एकदा माहेरपण करायचं..
राखी पौर्णिमेला आणि भाऊबीजेला बहिणीने भावाला बोलवायचं .त्याला ओवाळायचं .तबकात अगदी अकरा रुपये टाकले तरी चालतील …
भावाला घरी बोलवायचं .
गौरीला माहेरची सवाष्ण हवी ..नाही जमलं तर एखाद्या शुक्रवारी तिला घरी बोलवायचं तीची ओटी भरायची.. बहिणीने भावाच्या अडीनडीला धावून जायचं ..त्याला मदत करायची..
वहिनीला बहिणी प्रमाणे सांभाळायचं तिच्यावर माया करायची.. आपापसात सगळ्यांनी प्रेमाने मायेनी आपुलकीनी राहायचं …
आत्या ,काकु,मामा ,मामी सगळी नाती जपायची .. एकोप्याने रहायच.. पुढच्या पिढीने पण हे असंच चालू ठेवायचं …..”
एवढं बोलल्याने ती दमली मग श्वास घेतला थोडा वेळ थांबली.
लेक थक्क होऊन आईचं बोलणं ऐकत होती…
आई मनाच्या गाभाऱ्यातलं खोलवर दडून असलेलं अंतरंग तिच्याजवळ उघडं करत होती…
” तु विचारलस ना…माझ्याकडे काय आहे वाटणी करायला ?खरंच ….काही नाही ग… मला वाटणी नाहीच करायची …तर तुमची जोडणी करायची आहे .
तुमची माया एकमेकांवर अखंड अशीच राहू दे. आलं गेलं तरच ती टिकून राहील ..हीच माझ्या प्रेमाची वाटणी आणि हेच माझं मृत्युपत्र असं समजा.”
लेकीचे डोळे भरून वाहत होते. आईची प्रांजळ भावना तिला समजली .
तिने आईचा हात हातात घेतला…त्यावर थोपटल.. आश्वासन दिल्यासारख……
लाखमोलाच सदविचारांचं धन आईनी वाटल होत..
दारात भाऊ भावजय मायलेकींचं बोलणं ऐकत उभे होते. ते पण आत आले त्यांनीही तिचा हात हातात घेतला.
चौघांचे डोळे भरून वाहत होते .
आता ती निश्चिंत झाली होती .
खूप दिवसांनी ती समाधानाने हसली.
मनात म्हणाली …
रामराया आता कधीही येरे न्यायला मी तयार आहे..
नीता चंद्रकांत कुलकर्णी
9763631255
