सहजता हवीच!
एके दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे आन्हिकं उरकून पुस्तक वाचत बसलो होतो. अचानक एक बालमित्र घरी दारात उभा राहिलेला दिसला. त्या आकस्मिक मित्रभेटीनं आनंदीत होऊन मी त्याला करकचून मिठी मारली. त्याच्या भेटीनं मी आनंदीत झाल्याचं पाहून मित्रालाही आनंद झाला. तसं त्यानं बोलूनच दाखवलं. तो म्हणाला- “आजकाल कुणाकडे अचानक गेलेलं कुणालाच आवडत नाही!” बऱ्याच वर्षांनी भेटलेल्या त्या मित्राला बसायला सांगून प्यायला पाणी दिलं. त्याच्यासाठी चहा बनवायला आमची सौ. आत गेली आणि मी मित्राला हळूच विचारलं- “मित्रा! आज कसं काय येणं केलंस? काय काम काढलंस?” त्यावर मित्र म्हणाला- “काही नाही रे, सहज आलो होतो.” माझ्या मित्राचं माझ्या घरी असं सहज येणं झालं होतं. त्या मागे फक्त मित्रभेट हा एकच निखळ हेतू होता. त्यामुळे या संपूर्ण भेटीत आमच्या बोलण्या-वागण्यात एक सहजता होती. आम्ही बराच काळ गप्पा मारल्या. अनेक वेगवेगळ्या विषयांवर बोलत राहीलो. एकमेकांचे कुटूंबिय, आईवडिल आणि मुला-बाळांविषयी आस्थेनं विचारपूस केली. एकमेकांच्या स्वप्नांविषयी भरभरून बोलत राहण्याचा मनसोक्त आनंद आम्ही घेतला. हा दुर्मिळ सुखद अनुभव केवळ त्या सहजतेतून मिळाला असं मला ठामपणे वाटतं.
असं ‘सहज आलोय!’ म्हणणारे अनेकजण तुमच्याही आयुष्यात आले असतील. पण प्रत्येकवेळी हा आनंदानुभव आपल्या वाट्याला येत नाही. कारण एकच… त्यात सहजता नसते! खरंच कुणी सहज येतं का हो? निमंत्रण वा आमंत्रण देऊन किंवा अगदी आग्रह करूनही माणसं येत नाहीत. हा तुमचा, माझा आणि सगळ्यांचाच सार्वत्रिक अनुभव आहे. असं भेटायचं सोडा, माणसं कोणतीच गोष्ट सहज करीत नाहीत. त्यांच्या प्रत्येक कृतीमागे काहीतरी हेतू असतो, काहीतरी कारण असते. खरंतर माणसं ताकाला जाऊन भांडं लपवू इच्छित असतात. त्यांच्या या इच्छेतूनच सारं घडत असतं.
वास्तविक, आपण माणसं निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहोत. सहजता हा निसर्गाचा स्थायीभाव आहे. तो खरंतर आपल्याही अंगी असला पाहिजे. त्यानुसार आपलं एकूण जगणंच सहज असायला हवं. जसं की, झाडं उगवतात, वाढतात, त्याला फांद्या फुटतात, त्या प्रत्येक फांदीला पानं फुटतात. काही झाडांवर कळ्या लगडतात, कळ्यांची फुलं होतात. फुलं उमलतात, आसमंतात त्यांचा सुगंध पसरतो. त्यासाठी कोणतंही फुल कोणताही विशेष प्रयत्न करीत नाही. त्याचा तसा हेतूही नसतो. परागीकरण झालं तर फलधारणा होते. फळं लगडतात, मोठी होतात, परिपक्वही होतात. कालौघात झाडाची पानं-फुलं आणि फळंही कोमेजून जातात आणि ती सहजपणे गळूनही जातात. दगडा-मातीचा प्रवासही असाच अगदी सहजपणे होत असतो. सारे पशु-पक्षी याच सहजतेने जगत असतात. पाण्याचे सारे प्रवाह वाटेतले अडथळे टाळून मिळेल त्या मार्गाने विनातक्रार सहजपणे वहात असतात.
प्रत्येक जीवाची गरज भागेल अशी सर्वप्रकारची साधनसामुग्री निसर्गात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. ती तशी सतत उपलब्ध रहावी यासाठी निसर्गानं आवश्यक त्या सर्व सिस्टीम्स लावून दिलेल्या आहेत. त्या प्रत्येक सिस्टीमला लागणारा वेळ आणि काळ निसर्गानं निश्चित करून दिलेला आहे. त्यामुळं त्या सर्व सिस्टीम्समध्ये एक प्रकारची सहजता आपणास दिसुन येते. माणसाच्या बाबतीत मात्र ही सहजता दिसत नाही. माणसाच्या जीवनात त्याच्या जन्मापासून त्याच्या मृत्यूपर्यंत एकही गोष्ट सहजपणे होत नाही. तशी ती होऊही दिली जात नाही. असं का? माणूस जन्मल्यानंतर शैशव, बाल्य, कौमार्य, तारुण्य, प्रौढत्व, वार्धक्य अशा अनेक अवस्थांमधून जात असताना ही सहजता कुठेच दिसुन येत नाही. प्रत्येक अवस्थेत त्याची स्वतःची आणि त्याच्याशी संबंधित अन्य माणसांची आवड, इच्छा, गरज यातून निर्माण होणारी एक विचित्र स्पर्धा दिसते. या स्पर्धेमुळे मानवी जीवनातली सहजता नष्ट झाली आहे. त्याबरोबरच सुख आणि समाधानाच्या हिंदोळ्यावर सतत हिंदकळत राहणारा त्याच्या जीवनातला आनंदही नष्ट झाला आहे.
इतर लाखो प्रजातींमधली सहजता शाबूत ठेवताना निसर्गानं माणसांच्या बाबतीत असं का केलं असेल? का त्याच्या मनात गरजेसोबत इच्छा आणि आवड निर्माण केली असेल? का दिली असेल त्याला कल्पना करण्याची अनाकलनीय ताकद? ज्यातून असंख्य विचार निर्माण होतात. त्या विचारांवर नियंत्रण ठेवणं माणसाला खूप कठीण होतंय! का दिल्या असतील इतक्या प्रचंड भावना? ज्यांची अभिव्यक्ती सहजपणे करणं माणसाला महाकठीण होताना दिसतंय! अशा अनेक प्रश्नांची वावटळ मनात उठल्याशिवाय रहात नाही. दुसरीकडे माणूस हा निसर्गाचा एक घटक असुन इतर कोणत्याही घटकांपेक्षा तो निराळा आणि सरस आहे असं म्हटलं जातं. त्याच्या पुष्ट्यर्थ माणसाची कल्पनाशक्ती, बुद्धी, विचार आणि भावनांची अभिव्यक्ती याविषयीचे दाखले दिले जातात. अनंत जन्मांचं पुण्य म्हणून आपल्याला हा मनुष्यजन्म मिळाला आहे. या जन्मात आपण मुक्त होण्याचा प्रयत्न केला तर तो निश्चित यशस्वी होऊ शकतो. असं वारकरी संप्रदायाच्या संतसाहित्यात अनेक ठिकाणी नमुद केलेलं आहे. संत-साहित्यातील पाप-पुण्याची ही कल्पना न मानणाऱ्या लोकांनीही आपल्याला मिळालेला मानवजन्म हा माणसाची कल्पनाशक्ती, बुद्धी, विचार आणि भावनांची अभिव्यक्ती या कारणांसाठीच अतिविशेष मानलेला आहे. या अतिविशेष मानवी जन्माचं सार्थक कशाने होईल? हा खरं तर सखोल चिंतनाचा विषय आहे.
कल्पनाशक्तीच्या जोरावर माणसानं निसर्गावर आपलं निर्विवाद वर्चस्व निर्माण करण्याचा चंग बांधला आहे. सहजता, समानता, वैविध्य, परस्परावलंबन या निसर्ग तत्वांना मुरड घालून माणूस भरधाव वेगाने निघाला आहे. असं करताना माणूस निसर्गानं त्याला घालून दिलेल्या काळ-वेळेच्या मर्यादांचं उल्लंघन बेभानपणे करतो आहे. त्याला दूरगामी दुष्परिणांमाची पर्वा वाटत नाही. तात्कालिक यश त्याला अधिक महत्त्वाचं वाटतं आहे. त्यामुळे त्याच्या कोणत्याही व्यवहारांत निसर्गाला हव्या असलेल्या प्रेम, त्याग, समर्पण, कृतज्ञता, सचोटी, प्रामाणिकपणा यासारख्या अनेक गोष्टी दिसेनाशा झाल्या आहेत. तो सुख, समाधान आणि आनंदाच्या शोधात भटकतो आहे परंतु त्याला यातल्या एकाही गोष्टीची प्राप्ती होताना दिसत नाहीय. याचं कारण म्हणजे त्याच्या वागण्या-बोलण्यातली नव्हे प्रत्येक कृतीतली सहजता हरवली आहे. माणसाच्या हिताला बाधा येईल अशा कल्पना कितीही भव्यदिव्य वाटत असल्या तरी त्या कल्पना अतिशय भिकार असतात. कारण त्यांच्यामुळेच जीवनातली सहजता हरवून जाते. याच कारणासाठी “कल्पनेची बाधा न हो कोणे काळी” असं म्हणण्याची गरज संतांना वाटली असावी. या पार्श्वभूमीवर माणसाला त्याचं जीवन सुखी समाधानी आणि आनंदी हवं असेल तर त्याच्या जीवनात सहजता यायला हवी असं म्हटलं; तर तेच अधिक रास्त ठरेल.
लेखक
© अनिल वत्सला आत्माराम उदावंत
ज्येष्ठ प्रशिक्षक, समुपदेशक व साहित्यिक
सावेडी, अहिल्यानगर, संपर्क: ९७६६६६८२९५
Posted inमराठी ब्लॉग (Marathi Blog)
सहजता हवीच

Simplicity