सिंहगड किल्ला मोहीम

सिंहगड दिग्विजयी किल्ला
Sinhagad Fort

कानिफनाथ ट्रेक ग्रुप अंतर्गत
             सिंहगड किल्ला मोहीम
                       (भाग-०१)
       🚩🇮🇳👏🏼🇮🇳🚩👏🏼🚩🇮🇳
*****************************
… नानाभाऊ माळी

        प्रचंड संघर्ष!प्रचंड वाताहत!तरीही प्रतिकूल परिस्थितीवर मात करून संघर्ष करीत जिंकता येत असतं!आंतरिक प्रचंड ऊर्जा, सळसळणारे देशप्रेमीरक्त,बेंबीच्या देठातून उफाळलेला त्वेष जन्माला आल्यास महाकाय राक्षशी शक्तीशी जीवानीशी लढून जिंकलेला किल्ला म्हणजे *सिंहगड किल्ला*!भारतीय प्राचीन संस्कृती रक्षणासाठी देहत्याग केलेल्या महापराक्रमी महायोध्याचं स्मृतीस्थळ म्हणजे
*सिंहगड किल्ला*!🚩

             हा किल्ला जिंकता जिंकता बलिदानाची ग्वाही देत असतो!बलिदान आपले श्वास होतात!श्वासानी धमणी धडाडते तेव्हा क्रूरकर्मी शत्रूचा निप्पात होऊ लागतो!महायोद्ध्याच्यां बलिदानानंतरही शर्तीने जिंकलेला किल्ला म्हणजेचं *सिंहगड केला* साऱ्या दुनियेनें विश्वविजयी भगवाध्वज फडकतांना पाहिलेंला सिंहगड किल्ला आमच्या जोशाची मशाल आहे!किल्ला जिंकल्यावर छत्रपती शिवारायांच्या मुखातून आपसूक भावनांत्मक शब्द बाहेर पडले होतें, *”गड आला पण सिंह गेला!”*

             काळाच चक्र पळत असतं!इतिहासाची पाने पराक्रमाची साक्ष देत असतात!इतिहासातील घटना पूढील पिढीसाठी प्रेरणादायी असतात!आमच्या सेनापती सोबत, आदरणीय श्री.शाम कुंभार सरांच्या साहसी मोहिमेसाठी गेलो होतो!इतिहास प्रसिद्ध रणझुंजार किल्ल्यावर, सिंहगडावर आम्ही गेलो होतो!काल २६ जानेवारी २०२५ रोजी, प्रजासत्ताक दिनी राष्ट्रभक्तीने प्रेरित मावळे शूर सेनानींसं मानवंदना देण्यासाठी पहाटे पाच वाजता सिंगडावर निघालो होतो!महायोध्यास हृदयपूर्वक अभिवादन करण्यासाठी गेलो होतो!नतमस्तक होण्यासाठी गेलो होतो!तिरंगा फडकविण्यासाठी गेलो होतो!छत्रपती शिवरायांच्या अंतःकरणातील भगवा ध्वज फडकविण्यासाठी गेलो होतो!इतिहासातील सळसळत्या रक्तासं नतमस्तक होण्यास गेलो होतो!आम्ही माथा टेकण्यासाठी गेलो होतो!आमच्या श्वासात भारतमातेचा तिरंगा रुजविण्यास गेलो होतो!जाज्वल्य देशभक्तीचा इतिहास प्रत्यक्ष अनुभवण्यास गेलो होतो!होय आम्ही सह्याद्रीयोद्धा *नरवीर तानाजी मालुसरे* यांच्या समाधीवर आमचं हृदय अर्पण करण्यासाठी गेलो होतो!

आम्ही लोकशाही काळातील मावळे…शूर सेनानी,स्वराज्य रक्षक नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे हृदयातल्या महायोध्यासं मानवंदना देण्यास, समाधीवर माथा टेकविण्यास गेलो होतो!

               हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवारायांच्या अत्यंतीक काळजाचा तुकडा असलेला वीरयोद्धा, गड जिंकून देता देता वीरगती प्राप्त झालेल्या,धारातीर्थी पडलेल्या!गड आला पण सिंह गेल्याच्या प्रचंड वेदना हृदयात ठेऊन कष्टी,दुःखी हृदयाने स्वराज्य हितासाठी, प्रजेच्या हितासाठी संघर्षविरांसाठी अश्रू वाहात पुन्हा हाती तलवार घेऊन वाटचाल करीत राहणाऱ्या स्वराज्यातील किल्ला सिंहगडावर गेलो होतो!छत्रपती महाराज थांबणारे नव्हते!चौफेर दबा धरून बसलेल्या शत्रूला नामोहरण करीत, युद्धनितिकार छत्रपती शिवाजी राजे दारासमोरच्या शत्रुंचा खातमा करीत वाटचाल करीत राहिले!

           छत्रपती शिवाजी महाराजांनी  वीरगती प्राप्त झालेल्या शूर सेनानी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शब्द वचनांचा गौरव करीत बोलले होतें”खरचं तुम्ही जिंकलात, आपण बोलला आधी लग्न कोंडाण्याचं मग रायबाचं!”.. या शब्दांची आठवण उरात ठेवत जीवास जीव देणाऱ्या लढवंय्या शूर योध्यासाठी गहिवरून डोळ्यात अश्रू आणले होतें!हिंदवी धर्म अन राज्य रक्षणासाठी त्या क्षणी भावनेला आवर घालण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता!राजांनीं काळजातं जपलेल्या वीर सेनानीसाठी दुःखद अंतःकरणाचें शब्द मुखे आले होतें,” गड आला पण सिंहासारखा लढवंय्या माझा काळजाचा मित्र गेला, सखा गेला!अतीव दुःख होतं आहे!असा सिंह कधीही होणे नाही!”.. अश्रूपूर्ण डोळ्यांनी वीरश्री प्राप्त नरवीर तानाजी मालुसरे यांच्या कुटुंबाचे सांत्वन करीत कोंढाणा किल्ल्याचे नाव *सिंहगड* ठेवले होतें!

             आम्ही इतिहासातील स्मृतीना उजाळा देत अतिशय महत्वपूर्ण किल्ला सिंहगडावर काल २६ जानेवारी २०२५ प्रजासत्ताकदिनी वंदन करायला गेलो होतो!थेट सिंहगड पायथ्यापासून घनदाट अरण्यातून, कच्च्या वेडीवाकड्या अवघड पाय वाटेने श्वासात दम भरून चालत होतो!दम लागत होता!जिद्द मनात होती!झाडं, दगडं, उंच खडक पार करीत कच्चा रस्ता किल्ल्यावर नेत होता!आम्ही ट्रेकर होतो!स्वतःस अजमावीत होतो!सह्याद्रीच्या उंच शिखराकडे चालत होतो!

पुणे शहरापासून तीस किलोमीटर अंतरावर,खडकवासला धरण क्षेत्रापासून जवळ असलेल्या, निसर्गाच्या अतिशय सुंदर अन विलोभनीय आकर्षक साहसी किल्ला सिंहगडावर पोहचण्यासाठी कच्च्या आड रान मार्गे आम्ही निघालो होतो!नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाने पावन झालेल्या सिंहगडावर आम्ही चढत होतो!छत्रपती शिवरायांच्या आठवावे रूप!छत्रपती शिवारायांचा आठवावा प्रताप अशा हिंदवी स्वराज्यसंस्थापक महापराक्रमी राजांच्या ऐतिहासिक पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या ४५०० फूट उंच किल्ला सिंहगडावर आम्ही चढाई करीत होतो!इ.स १६७० सालीं महापराक्रमी योद्धा सुभेदार नरवीर तानाजी यांच्या समाधीस्थळी आम्ही निघालो होतो!

Sinhagad Fort
सिंहगड दिग्विजयी किल्ला

सिंहगड दिग्विजयी किल्ला
             (भाग-०२)
🚩🇮🇳👏🏼🚩🇮🇳👏🏼🚩🇮🇳
*************************
… नानाभाऊ माळी

             परवा २६ जानेवारी २०२५ रोजी देशाचा गणतंत्र दिवस होता!प्रजासत्ताक दिवस होता!देशाला स्वतंत्र घटना मिळाल्याचा गौरव दिवस होता!आम्ही राष्ट्रध्वज,तिरंगा फडकविण्यासाठी सिंहगडावर गेलो होतो!हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांनी भगवा ध्वज फडकवत ठेवला होता!मराठ्यांचं राज्य पूर्व पश्चिम,दक्षिण,उत्तरेत विस्तारलं होतं!आम्ही सिंहगडावर भगवा ध्वज हाती घेऊन स्मृतीस वंदन करण्यासाठी गेलो होतो!सह्याद्रीच्या पौलादी छातीवर विराजमान  सिंहगडावर गेलो होतो!प्रखर झंजावाताच्या अस्तित्व खाणाखुणानां हृदयी वसविण्यासाठी *सिंहगडावर* गेलो होतो!….

                  प्रजा असेल तर राजा असतो!राजा प्रजेचा रक्षक असतो!रक्षक शूरवीर असेल!शक्ती-युक्तिवान असेल!प्रजादक्ष असेल!न्यायप्रिय असेल!दूरदृष्टीचां असेल!राज्यावर चालून आलेल्या शत्रूचां निप्पात करणारा असेल!निर्धालन करणारा असेल कुटनीतीज्ञ असेल!राज्य हितासाठी एक पाऊल मागे जाऊन नंतर प्रचंड शक्तिनीसी राक्षशी शत्रुवर वार करीत धडक देणारा राजाचं नाव इतिहासातील सोनेरी पानांवर दिगंत चमकत राहात!जगाच्या इतिहासातील पृथ्वी अंतापर्यंत नाव कोरले गेलेल्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूण ३५० किल्ल्यांपैकी एका किल्ल्यावर आम्ही गेलो होतो!छत्रपती शिवरायांचें महापराक्रमी सुभेदार नरवीर तानाजी मालुसरेच्यां ऐतिहासिक पराक्रमाची ग्वाही देणाऱ्या स्मृतीगडावर गेलो होतो!आम्ही सिंहगडावर गेलो होतो!

           सिंहगड पायथ्यापासून प्रारंभ करीत,झाडं,दगड-धोंडे,उभट वाकडी वाट पार करीत असतांना डोळ्यांना सुखावणारं दृश्य नजरेस पडलं होतं!दुरूनचं किल्ल्याची तटबंधी,पुणे महाद्वारचं भव्य दगडी रूप अतिविशाल बुरुजात दिमाखात उभे असलेले दिसलें होतें!थकलेल्या जीवाला ऊर्जा मिळावी म्हणून आमचा उत्साह द्विगुणित झाला होता!एक एक पावलं उचलत हळूहळू पुणे महाद्वारासमोर येऊन पोहचलो होतो!महाद्वारावरील दगडी बुरुजावर प्राचीन टेहळणी व्यवस्था दिसली!त्यावर जाऊन किल्ल्याच्या पुण्याकडील खोल पायथ्याकडे पाहात होतो!असे तीन पुणे दरवाजे पार करीत आम्ही सह्याद्री पर्वताचा, सिंहगड किल्ल्याचा खोल अति खोल उतार पायथ्याकडे जात असल्याचं दिसलं!पुणे दरवाज्यापर्यंत चढाईस दिड तास गेला होता!🚩

            दुरून दूरदर्शनचं टॉवर दिसतं होतं!आम्ही अतिविशाल महाद्वारातून प्रवेश करून किल्ल्याच्या उजव्या बाजूच्या तटबंधीआतून कडेकडेनें चालत होतो!किल्ल्यावर अतिउचं राजसत्ता अस्तित्वाच्या प्राचीन खाणाखुणा नजरेत भरत होत्या!वास्तूकलेचं विशेष चमत्कार तटबंधीच्या बांधकामातून दिसतं होता!इतक्या उंच उतार डोंगरावर भक्कम पाया रचून उभी तटबंधी बांधणे किती अवघड गेलें असेल!मोठं मोठे दगडं वाहून न्यायला खूप परिश्रम पडले असतील!शिवरायांच्या दूरदृष्टीचा हा परिपाक दिसतं होता!डाव्या बाजूला घोड्यांच्या पागा दिसतं होत्या!चालत जातांना तोफखाना, गोलाबारूद सुरक्षित ठेवण्यासाठी अतिशय भक्कम अशी शिवकालीन दगडी वास्तू पाहात होतो!इतक्या शतकानंतरही शाबूत असलेली ही भव्य वास्तू होती!🚩

            आम्ही तटबंधींच्या आतून कडेकडेने चालत असतांना पलीकडे खोल खोल उभट दरी दिसतं होती!घनदाट झाडांनी वेढलेली दरी महाकाय राक्षस तोंडं उघडून बसल्यासारखी दिसतं होती!पुढे उंच कडा चढून गेल्यावर एका उंच चौथऱ्यावर भली मोठी शिवकालीन तोफ ठेवलेली दिसतं होती!तोफेच्या समोर,योग्य टप्प्यात शत्रू आल्यास यमसदणी पाठवणारी तोफ अजूनही तशीच जतन करून ठेवलेली असावी!येथून अनेक पॉईंट दिसतं होतें!सह्याद्रीच्या विशाल रूपाचं दर्शन घेत होतो!त्यावर ताठपणे उभा सिंहगड किल्ला पाहात होतो!महापराक्रमी एका सिंहाची स्मृती जपत उभा असलेला सिंहगड किल्ला पाहात होतो!नरवीर सुभेदार तानाजीराव मालुसरे यांच्या पराक्रमांनी गजलेला सिंहगड पाहात होतो!किल्ल्यावर अनेक वास्तू पडक्या स्वरूपात दिसतं होत्या!जाता जाता एक बंगला देखील दिसला जिथे उन्हाळ्यात दोन महिने बाळ गंगाधर टिळक राहात असतं!येथे तिळकांना भेटायला म. गांधी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस देखील येऊन गेलें होतें!🚩

             सिंहगडावर अनेक पाण्याचे टाके आहेत!त्यात हिरवगार पाणी दिसतं होतं!पाणी पिण्यासाठी देवटाके सुद्धा दिसलं तिथलं पाणी पिण्यायोग्य आणि गोड होत!किल्ल्याची तटबंधी अन विशाल बुरुज,महाद्वार अन किल्ल्यावर असलेल्या वास्तू बांधकामासाठी पाण्याच्या टाक्यातील दगडं उपयोगात आणले असतील!पुढे गेल्यावर कलावंतींचा बुरुजही दिसला!अजून पुढे चालत गेलो असता तानाजी कडा पाहिला असता खोल उभट दरींतून दो्र बांधून नरवीर तानाजी मालुसरे निवडक मावळ्यांसह किल्ल्यावर येऊन लढले होतें!उदयभानू राठोड बरोबर लढतांना विरगती प्राप्त झाल्यावर कल्याण दरवाज्यातून नरवीर तानाजी मालुसरे यांचे भाऊ वरती येऊन मावळ्यानां हिम्मत देण्यासाठी गर्जू लागले,’येथे तुमचा बाप मरून पडला आहे!मी दोर कापून टाकला आहे!लढून जिंका किंवा मरा!’ नंतर मावळे स्फूर्तीनें शौर्य गाजवीत किल्ला जिंकून घेतला होता!🚩

            आम्ही हळूहळू रणसंग्रामवीर सिंहाच्या समाधीजवळ जाऊन पोहचलो होतो!बलिदानी देहत्यागी लढणाऱ्या महायोध्याच्या समाधीजवळ पोहचलो होतो!कोंढाणा किल्ला सिंहगड झाला होता!सिंहासारख्या लढवंय्याच्यां समाधीवर श्रद्धापूर्वक डोकं टेकवलं!देवत्वाची अनुभूती झाली होती!धर्म अन राज्य रक्षण्यासाठी लढणारा महापराक्रमी योद्ध्यात देवरूप पाहात होतो!छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्मरणार्थ कोंढाण्याचा सिंहगड नामकरण केलं होतं!

                   पुढे जातांना हत्ती टाके दिसलें तिथे हत्तीना अंघोळ घालीत असावे!अन चालत चालत पश्चिमेंकडे गेलो असता अतिशय भव्य बुरुजांमध्ये तीन वेड्यावाकडया शिवकालीन कल्याण दरवाजा दिसला होता!वास्तुशिल्पाचा, वास्तुकलेचा अतिशय सुंदर नमुना कल्याण दरवाज्यातून अनुभवत होतो!कल्याण नावाच्या छोट्याशा गावाकडे जाणारा हा तत्कालीन भव्य मार्ग असावा!

             सिंहगडाचा पूर्ण इतिहास हृदयी बसवून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो होतो!इतिहासातील अजरामर किल्ला पाहून आम्ही नरवीर सुभेदार तानाजीराव मालुसरे यांच्या स्मृतीनां उजाळा देत २६ जानेवारी २०२५ रोजी किल्ल्यावर प्रजासत्ताक दिन साजरा करून निघालो होतो!आम्हाला अशा राष्ट्रपुरुषांचा अभिमान अन गर्व वाटत होता!इतिसातील एक पान उघडून हृदयात ठेवीत होतो!
🚩🚩👏🏼🚩🚩👏🏼🚩🚩
*************************
… नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-२८ जानेवारी २०२५
nanabhaumali.blogspot.com