गिरणा गौरव प्रतिष्ठान द्वारा आयोजित शेकोटी व लोककला साहित्य संमेलन एक उत्कृष्ट साहित्य संमेलन

गिरणा गौरव प्रतिष्ठान द्वारा आयोजित शेकोटी व लोककला साहित्य संमेलन एक उत्कृष्ट साहित्य संमेलन

गिरणा गौरव प्रतिष्ठान द्वारा आयोजित,
शेकोटी व लोककला साहित्य संमेलन
एक उत्कृष्ट साहित्य संमेलन!

नाशिक येथील पंचवटी परिसरातील भावबंधन मंगल कार्यालयात ‘गिरणा गौरव प्रतिष्ठान’ द्वारा शुक्रवार व शनिवार दि. १० व ११ जानेवारी २०२५ असे दोन दिवस सतत ४८ तास शेकोटी व लोककला साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले होते. मा. अजयदादा बिरारी व मा. बाळासाहेब गिरी यांच्या सुचनेबरहुकूम या आगळ्यावेगळ्या महोत्सवातील गझल कट्ट्यात सहभागी होण्यासाठी नागपूरहून बसने सतत एकवीस तास प्रवास करुन मी दि. ११ जानेवारी रोजी पहाटे तीन वाजता सुखरुप येऊन पोचलो असता शेकोटीच्या सभोवती मान्यवर कवींचे काव्य वाचन व गायन सुरू असल्याचे दिसताच तिथेच एका खुर्चीवर स्थानापन्न होऊन त्या ‘शेकोटी काव्य मैफिलीत’ सहभागी झालो नागपूर ते नाशिक दरम्यान सतत एकवीस तास केलेल्या प्रवासाचा थकवा व मनातील मरगळ कुठल्या कुठे पळाले हे मुळी कळलेच नाही! पहाटे साडेचार वाजेपर्यंत एकाहून एक सरस, सुरस, अर्थवाही आणि हृदयस्पर्शी अशा भावपूर्ण  कवितांचे वाचन व गायन ऐकून कानासोबतच मनाने तृप्तीचा आस्वाद घेतला. या शेकोटी कविकट्ट्यात एक गझल सादर करण्याचा मोह मात्र अनावर झाला. या सतत ४८ तासात फराळ व जेवणाची वेळ वगळता कुठल्याना कुठल्या साहित्यिक, सांस्कृतिक व लोककलांचे सर्वांगाने व सर्वार्थाने होणाऱ्या दर्शनाचा आनंद श्रोत्यांची मने जिंकून घेत होता. बाळासाहेब थोरात साहेबांना मी नागपूरहून निघताना या महोत्सवात आराम करायची काही सोय आहे किंवा काय अशी विचारणा केल्यावर  ते लगेचच उत्तरले, ‘आप्पा! अहो! हा महोत्सव अगदी आगळावेगळा असा महोत्सव आहे. सतत दोन दिवस ४८ तास विविध कार्यक्रम याप्रसंगी होऊ घातलेले आहेत. जेवण व फराळ, आंघोळीला गरम पाण्याची सोय हे सगळं तुम्हाला देण्यात येईल मात्र, आम्ही येथे झोपायची मुळीच सोय केलेली नाही, कारण तुम्हाला आम्ही गझल कट्यासाठी बोलावलेले आहे, येथे झोपा काढण्यासाठी बोलावलेले नाही!’ बाबासाहेब गिरी असे कां बोलले याची मला ११ जानेवारीला पहाटे तीन वाजेपासून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून तर थेट महोत्सवाच्या समारोपीय समारंभाच्या माध्यमातून पुरेपूर प्रचिती तर आलीच आली पण बाळासाहेब गिरींना मी असा विचित्र प्रश्न विचारल्याची मला लाज वाटल्यावाचून राहिली नाही. अगदी कुठेही न थांबता अर्थातच विना थांबा (Non stop)! हे कार्यक्रम मी आयुष्यात पहिल्यांदाच बाघत , ऐकीत व अनुभावत होतो!
सुप्रसिद्ध बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे पणतू सुप्रसिद्ध गझलकार नंदकिशोर ठोंबरे, महाराष्ट्रातील नवाजलेले मराठी व अहिरानी भाषेचे अनेक अभ्यासक, विचारवंत, कवी, लेखक, गझलकार, चित्रकार, नाट्यसृष्टी गाजवणारे नट, नट्या, तमाशा, गोंधळ असे जवळजवळ सर्वच क्षेत्रातील मान्यवर व लहान सहान बालकवी, बालकलाकार, नर्तक, नकलाकार या ४८ तासात कुठेना कुठे दिसत व भेटत होते. डॉ. सुमतिताई पवार, गीता व रामायणाचे अहिरानी भाषेत भाषांतर करुन आपल्या अहिरानी मायबोलीचे पांग फेडू पाहणाऱ्या व साडेचारशे रुपयांचा हा ग्रंथ सन्मित्र अन् मैत्रिणींना मोफत सप्रेमभेट देत फिरणा-या काशीकन्या अर्थातच वनमाला ताई पाटील असोत की काव्य, नाट्य, गझल व सीनेक्षेत्रात असे सर्वत्र सारख्या उत्साहाने न थकता न कंटाळता हिरीरीने सहभागी होऊन नवोदितांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणारे अजयदादा बिरारी, सुप्रसिद्ध दिव्यांग कवी, लेखक आणि गझलकार मा. काशिनाथ महाजन साहेब व ईतर सर्व सन्मित्रांच्या मेळाव्यात मी माझ्यातल्या गझलकार ‘किरण’ ला तर अजिबात विसरूनच गेलो, व ‘कोण आहेस रे लेका तू?’ असा माझा मलाच प्रश्न विचारू लागलो. एकटा मीच नव्हे तर भल्या भल्यांचा ‘मी’ पणा या महोत्सवात गळून पडलेला मला दिसला.
वेळासोबतच काळाचेही भान ठेऊन बदलत्या परिस्थितीशी समन्वय साधीत या  नाशिक नगरीने आपले साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय वैभव महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात सातत्याने रुववत व वाढवत ठेवलेले आहे. नाशिक शहर हे प्राचीन काळापासून तीर्थक्षेत्र म्हणून देशभरात आधीच नावाजलेले आहे, परंतु  ‘गिरणा गौरव प्रतिष्ठान या सारख्या संस्थानी ही परंपरा सर्वतोपरी सांभाळलेली असून तिचे जतन व सोबतच संवर्धन करण्यात कुठलीच कसर बाकी ठेवलेली नाही याचा मी गेले दोन दिवस अगदी जवळून अनुभव घेतला.
या महोत्सवाचा हा एवढा प्रचंड तितकाच अवजड असा डोंगर उचलून धरण्याचे धाडस सातत्याने तीन वर्षे करणारा या संस्थेच्या सक्षम तसेच कर्तव्यदक्ष कार्यकर्त्यांचा फौजफाटा व त्यांची चिकाटी खूप खूप वाखाणण्या सारखी आहे, हे निर्विवाद सत्य होय.
सतत अठ्ठेचाळीस तास विविध कार्यक्रमांचे नियोजन अगदी तंत्रशुद्ध रितीने कसे केले गेले असेल? हे गूढ निदान मला तरी अजून उकलणे जमलेले नाही.
कवी, लेखक, गझलकार देवदत्त बोरसे असोत की त्यांचे सहकारी असोत हे सर्वच्या सर्व कुठल्याना कुठल्या कामाची जवाबदारी अगदी चोखपणे बजावत असताना पाहून या महोत्सवाची गिनिज बुकात निश्चितच नोंद होईल याची खात्री बाळगणे मुळीच अनुचित ठरणार नाही.
जवळच पंचवटी आणि गोदाकाठचा पवित्र परिसर प्राचीन सांस्कृतिक परंपरांची आठवण करून देत होता. मी आजपर्यंत शेकडो संमेलने बघितलीत, सहभागीही झालो, काही फक्त दुरुनच अभ्यासलीत परंतु त्यापैकी एकालाही ‘गिरणा गौरव प्रतिष्ठानची सर येणे केवळ अशक्य!
जे पाहता अनुभवता आलं त्याचा आनंद अंतर्मनात साठऊन व जे नाही बघता आलं त्याची खंत बाळगून सन्मित्रांच्या भेटी गाठी घेऊन सातपूर परिसरतील चि. गणेशच्या घराची वाट धरताना यावेळी का कुणास ठाऊक, पण माझं मन गहिवरुन आलं!
साहित्यक्षेत्रातील अनेक सभा समारंभांना  समारंभाच्या आधीच किंवा समारंभाच्या वेळी रितसर आवश्यक ते शुल्क भरून कविता किंवा गाझल सदर करणारा शिवाजीआप्पा साळुंके मात्र  या ‘गिरणा गौरव शेकोटी व लोककला साहित्य संमेलनाचा निःशुल्क आनंद घेतांना पुरता खजिल आणि लज्जीतही झाला! कुठेच व कुणीही कशाचेच शुल्क कां आकारले नाही हे रहस्य सोबत घेऊन साईनाथ रहाटकर या माझ्या नातवाची गळाभेट घेताना त्याच्या हातात पाचशे रुपयांची एक नोट मी जोरी जाबरदस्तीने कोंबली, कारण पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण असूनही बेकारिची सल मनात ठेऊन मोलमजूरी करुन जगत असताना हा साईनाथ न चुकता ईतक्या लांबवर केवळ साहित्याभिरुचिपोटी पदरमोड करुन आम्हाला भेटायला येत असतो, याउलट अनेक साहित्यिक अनाठायी व न पटणारे तसेच न परवडणारे मानधन घेत असतात, इतकेच काय जर एखाद्या पुस्तकाची साधी प्रस्तावना जर मागितली तर हे बहाद्दर हाजोरोंचं मानधन त्या कवी किंवा लेखकाच्या मानगुटावर विनाकारण बसवतात.  हे व असेच काहीबाही वेडसर विचार करीत करीत ओलावलेल्या डोळ्यांनी व जड अंतःकरणाने साईनाथचा निरोप घेऊन गिरणा गौरव प्रतिष्ठानचा परिसर ओलेत्या डोळ्याआड केला. मित्रहो! सदरील लेखात अनेकांची नावे घेता आली नाहीत, पण थोडक्यत सांगतो की बरेच लेखक व कवी यांची परिस्थिती जेमतेम व अत्यंत हलाखीची असूनही ते अशा संमेलनात किंवा सभासमारंभात येऊन हजेरी लावतात व आपले दुःख विसरून ईतरांना प्रबोधन करण्यात धन्यता मानतात अशा माझ्या सर्व सारस्वतांना मानाचा मुजरा करतो व थांबतो!

‘शिवाजी साळुंके, ‘किरण’
हल्ली मुक्काम- नाशिक