गीत जिजाऊंचे गाऊ
गीत जिजाऊंचे गाऊ
राजा शिवबांची आऊ
माय जिजाऊ जिजाऊ
कन्या आम्हीही आऊंच्या
माय आमुची जिजाऊ ॥धृ॥
नव्या युगाच्या आम्हीही
होऊ आजच्या जिजाऊ
शक्ति रुप माऊलीच्या
अभिवंदनाला गाऊ॥१॥
थोरा मोठ्यांची थोरवी
शिवबांना सांगे आऊ
जिजाईने शिवबांचे
केले बळकट बाहू ॥२॥
मुला बाळात आदर्श
आम्ही तसाच जागवू
शक्ति रुप जिजाऊ चे
धडे आम्हीही गिरऊ॥३॥
राजा शिवाजी सारखे
आम्ही सुपुत्र घडवू
नव्या भारताचे स्वप्न
अन् तयात जडवू॥४॥
निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३

धडे आदर्शाचे घेऊ
जय बोलू शिवबाजी
जय माऊली जिजाऊ
चला करु जयकार
कार्य तयांचे आठवू॥धृ॥
माय शिवबाची आऊ
माता जिजाऊ जिजाऊ
हिने केले बळकट
बाल शिवबाचे बाहू॥१॥
सुभेदाराच्या स्नुषेला
म्हणे जशी माझी आऊ
पुत्र असा घडवू या
होऊ प्रत्येक जिजाऊ॥२॥
हिच काळाची गरज
हाती काळासही घेऊ
सांगू नव्या दुनियेला
आम्ही आजच्या जिजाऊ॥३॥
धडे आदर्शाचे असे
चला सारेच गिरऊ
नवा इतिहास चला
सारे मिळून घडवू॥४॥
निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं.७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुलीरोड, एरंडोल जि.जळगांव.
दूरध्वनी क्र. :- ९३७१९०२३०३.




