ग्रेगरिअन नवीन वर्ष
नववर्षाचे आगमन
[नचिकेत कोळपकर ९९२११४०७२९ ]
नुकतेच ग्रेगरिअन नवीन वर्ष सुरू झाले.सरत्या वर्षातील बऱ्या वाईट गोष्टींना विसरून नवीन संकल्प नवीन वर्षात केले गेले .ग्रेगरिअन दिनदर्शिका नुसार 31 डिसेंबर रोजी वर्ष संपून नवीन वर्षं सुरू झाले. नवीन वर्षाचे आनंदाने स्वागत ही झाले. ग्रेगरिअन वर्ष हे सौर कालगणनेवर आधारित आहे.भारतातही सौर कालगणनेनुसार कालमापन पद्धती वापरली जाते.पण भारतीय दिनदर्शिकेचा पहिला महिना चैत्र हा ग्रेगरिअन दिनदर्शिकेतील तिसऱ्या किंवा चौथ्या महिन्यात येतो.
भारत हा विविध संस्कृतींनी नटलेलेला देश आहे.विविध भाषा, वेशभूषा असलेला हा देश विविधतेतही एकता जपून आहे.किंबहुना हेच भारताचे वैशिष्ट्य आहे.भारताच्या वेगवेगळ्या भागात नवीन वर्ष वेगवेगळ्या तारखांना साजरे केले जाते. सहसा ही तारीख मार्च आणि एप्रिल महिन्यात येते. काही भागात चैत्राच्या पहिल्या दिवशी तर काही भागात वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी नवं वर्ष साजरे केले जाते.
भारतीय उपखंडात काही भागात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पहिल्या दिवशी नववर्ष साजरे केले जाते. आंध्र प्रदेशात चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी उगादी म्हणजे युगाचा आदी म्हणजेच सुरवात या अर्थाने सण साजरा केला जातो. काश्मिरी दिनदर्शिकेमध्ये नवरेह म्हणजे नववर्ष चैत्र शुक्लच्या पहिल्या दिवशी साजरे केले जाते.महाराष्ट्रात मार्च-एप्रिल महिन्यात चैत्र शुक्ल१ या दिवशी गुढी पाडवा म्हणून नववर्ष साजरे केले जाते. सातवाहन राजाने नहपान क्षत्रपावर या दिवशी विजय मिळविला आणि नवीन शक सुरू केला. या दिवसा पासून नवं वर्ष सुरू केले गेले. कन्नड नववर्ष उगादी हे कर्नाटकातील लोक चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरे करतात, सिंधी परंपरे नुसार चेटी चंद, उगादी आणि गुढी पाडवा एकाच दिवशी साजरा करतात. मदुराईमध्ये चैत्र महिन्यात चित्रय तिरुविजा हे नवीन वर्ष म्हणून साजरे केले जाते.
तसेच भारतीय उपखंडात काही भागात वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी, बैसाखी, शीतल, पोहेला बोसाख, बोहाग बिहू, विशू, पुथंडू यासारखे अनेक विविध नावाने नवीन वर्ष साजरे केले जातात. पंजाबमध्ये वैशाख च्या पहिल्या दिवशी 13 एप्रिलला नवीन वर्ष बैसाखी म्हणून साजरे केले जाते. शीख नानकशाही दिनदर्शिके नुसार, 14 मार्च हा होला मोहल्ला नवीन वर्ष आहे.
बंगाली आणि तमिळ नववर्ष देखील याच तारखेच्या आसपास येते. तेलुगु नववर्ष मार्च-एप्रिल दरम्यान येते. बंगाली नववर्ष पोहेला बैसाखी वैशाख महिन्यातील पहिल्या दिवशी म्हणजे 14 किंवा 15 एप्रिल रोजी येते. पश्चिम बंगाल आणि बांगलादेशात या दिवशी नवीन वर्ष साजरे केले जाते.तमिळ नववर्ष विशू हे तामिळनाडू आणि केरळमध्ये वैशाखाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १३ ते १५एप्रिल दरम्यान साजरे केले जाते. तामिळनाडूमध्ये काही ठिकाणी, पोंगल देखील अधिकृतपणे संक्रांतीच्या दिवशी म्हणजे 15 जानेवारी रोजी नवीन वर्ष म्हणून साजरा केले जाते.मारवाडी नववर्ष दीपावलीच्या दिवशी येते. गुजराती नववर्ष दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पाडव्याच्या दिवशी येते. हा दिवस जैन धर्माचे नवीन वर्ष देखील चिन्हांकित करतो.
मुस्लिम धर्मा नुसार मोहरमच्या दिवशी नववर्ष सुरू होते.अशा प्रकारे विविध भागात विविध नववर्ष साजरे केले जातात.या नवं वर्षाशी निगडित अनेकविध अख्यायिका आहेत.पण महत्वाचा भाग हा की नवं वर्ष हे पहिल्या पिकाशी निगडित असलेला सण आहे. शेतीच्या कामाच्या वेळापत्रकातील पहिला दिवस असे म्हटले तरी चालेल. भारतीय सण उत्सव हे शेतीच्या वेळा पत्रकाशी निगडित असेच सण आहेत हेच खरे.
ग्रेगरिअन नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
