नवे येणार भेटाया
जुने सरणार आहे अन् नवे येणार भेटाया
तुला जे जे हवे उत्तम स्वये येणार भेटाया
नवे येते कशासाठी जरासा शोध घे याचा
नवा उत्साह जरतारी त्वरे येणार भेटाया
जिवाची जो करी माती उपाशी तो सदा राहे
खरे सुख त्या बळीला मग कसे येणार भेटाया
तुला ठावे मला ठावे तुझे माझे जुने नाते
नवे दृढ व्हावया नाते सखे येणार भेटाया
मनी बघ साचली मरगळ किती करतोस तू त्रागा
बुरे सरता दिवस अंती भले येणार भेटाया
छळो छळले विधात्याने कशाला कोसतो त्याला
सुखे सगळी समाधाना सवे येणार भेटाया
अखंडीतच फिरत राहे जगाची जगरहाटी ही
मधुर गीतात दडलेली स्वरे येणार भेटाया
नवा इतिहास दुनियेचा लिहाया सज्ज हो आता
हवे त्या लाख विषयांचे थवे येणार भेटाया
‘किरण’ टळणार का असते मरणघटका कुणालाही
तुझ्या चित्तास हर्षाया हसे येणार भेटाया
शिवाजी साळुंके,’किरण’
चाळीसगाव, जि. जळगाव.