खरा बोध
जवळजवळ पाच सहाशे वर्षांपूर्वी ज्या संतमहंतांनी, विचारवंतांनी, मानसशास्त्रज्ञांनी, मानवतावादी राजे महाराजांनी आणि समाजसेवकांनी केलेल्या समाजप्रबोधनाची आजच्या या यांत्रिक युगातही अत्यंत आवश्यकता आहे, परंतु आजचा हा माणूस मात्र भरकटलेला अवस्थेत दिसतोय!
जात-पात, धर्म-पंथ अशा नानाप्रकाराच्या भेदभावांनी समाजमन पोखरुन टाकलेल्या अवस्थेत तो दिशाभूल होऊन काटेरी मार्गावर चालत असलेला पाहून पुन्हा मला संत ज्ञानेश्वर माऊली, रामदास स्वामी, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत जनाबाई, संत सावता माळी, संत गोरा कुंभार, संत नरहरी सोनार, संत कबीर व अलिकडच्या काळातील संत गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराजांची प्रकर्षाने आठवण होत आहे.
म्हणूनच सादर करतोय!
खरा बोध
विकारी नसे अन् सरळ जो मनाचा
सदा शोध घ्यावा अशा साधकाचा
दुजाभाव ज्याच्या मनाला शिवेना
न हेवा न दावा जराही कुणाचा
मुखी सत्य वाचा तनू पथ्य जाणी
चुकुनही चुकेना सरळ मार्ग त्याचा
सदा ध्यास हृदयी असे चांगल्याचा
नसे गर्व-ताठा मुळी वैभवाचा
कुणाला न दावी व्यथा अंतरीच्या
सहिष्णू बहू स्वच्छ अंतर्मनाचा
दिसे दुःख तेथे त्वरा धाव घेई
सखा रंजल्यांचा पिता गांजल्यांचा
चरण धर ‘किरण’ तू अशा साधकाचे
खरा बोध होइल तुला जीवनाचा
शिवाजी साळुंके, ‘किरण’
हल्ली मुक्काम- नाशिक.