वट सावित्री पूर्णिमा आत्मवृत्त वटवृक्षाचे

वट सावित्री पूर्णिमा
वट सावित्री पूर्णिमा

वट सावित्री पूर्णिमा आत्मवृत्त वटवृक्षाचे

Vat Savitri Purnima

         आत्मवृत्त वटवृक्षाचे
वटवृक्ष नांव माझे
जेष्ठ पोर्णिमेला गाजे
एका दिवसा साठीच
            आम्ही वटवृक्ष राजे॥
वस्त्र मिळते आम्हास
तेही कपास वृक्षाचे
वटवट भोवताली
         मंत्रोच्चार नाव त्याचे॥
साज शृंगार लेवून
थवे येती ललनांचे
पिंगा घालती भोवती
           रक्षण्यास पतिराजे॥
आम्हा ठायी संचार हे
प्राणवायूचे नित्याचे
पतिप्रती मागती ह्या
             वरदान हे व्रताचे॥
लाभे प्राणवायू त्यास
सहवासी जे आमुचे
कसे रक्षणार प्राण
          दूर यांचे पतिराजे॥
काय करावे कळेना
यांच्या अशा अज्ञानाचे
यांच्यावरी लादलेल्या
        अंधश्रध्द विचारांचे॥
आम्ही ऐकतो उगीच
मंत्रोच्चार हे भटांचे
व्यर्थ घालवून वेळ
सारे भटांच्या कटाचे॥
          निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं.७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुलीरोड, एरंडोल जि.जळगांव.
दूरध्वनी क्रमांक :- ९३७१९०२३०३

वट सावित्री पूर्णिमा
वट सावित्री पूर्णिमा
Vat Savitri Purnima
Vat Savitri Purnima

वटपोर्णिमा धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व

दिनांक – २१/६/२०२४
विषय -वटपोर्णिमा.. धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व


सुवासिनी तयार झाल्या
वडाची पूजा करण्यास
सांगूया वटपौर्णिमा चे महत्व
वैज्ञानिक दृष्टीकोन समाजास

जेष्ठ महिन्यातमधे वटपौर्णिमा हा सण येतो.. मराठी महिन्यातील हा सण..महिलांचा सर्वात आवडता सण..
या दिवशी महिला..घरी गोड धोड पदार्थ करतात.. आणि नटून सजून वडाची पूजा करण्यास जातात…

यामागे पुराणातील जरी आख्यायिका असली,तरी या मागचा वैज्ञानिक दृष्टीकोन ही समाजास कळायला हवा आहे….

जेष्ठ महिना नावाप्रमाणेच जेष्ठ
वैशिष्ट्ये धारण करणारा हा महिना. ऋतूचक्रातील सर्वांत मोठा दिवस याच महिन्यात असतो. हा महिना तसा गंभीर, शांत आणि संथही. ग्रीष्माची चाहूल लागलेली, आभाळ भरून आलेले, त्यामुळे वातावरणात उष्मा वाढलेला, मध्येच पावसाची हलकी सर येणार्‍या पावसाळ्याची आठवण करून देते. उन आणि पावसाळ्याचं ‘फ्यूजन’ म्हणजे हा महिना. निरोप घेणारा उन्हाळा नि सुरू होणारा पावसाळा यांची गळाभेट या महिन्यात पाहता येते. अशा या स्वप्नील वातावरणाला धार्मिक अधिष्ठानही लाभले आहे.

स़ंपत येताच उन्हाळा
चाहूल लागते वर्षाची
चातक पक्षी वाट पाहे
त्या कोसळणाऱ्या जलधाराची

ज्येष्ठात येणारी पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा. या पौर्णिमेला धार्मिक महत्त्व तर आहेच, पण त्यामागचे वैज्ञानिक महत्त्वही समजून घेणे अगत्याचे आहे. वास्तविक शास्रकारांनी अनेक सण, उत्सवांची रचना त्यातील वैज्ञानिक संदर्भ लक्षात घेऊन केली असावी, असे वाटण्याइतपत या सणांमागे विज्ञान आहे…. दुर्देवाने ते जाणून न घेता, केवळ परंपरा म्हणून ते करण्याचा अट्टाहास धरला ,तर मग शास्रार्थ जाऊन त्याला कर्मकांडाचे स्वरूप येते …वटपौर्णिमेचेही तसेच आहे. सत्यवानाला यमदेवाकडून परत मिळविण्यासाठी सावित्रीने याच दिवशी वडाची पूजा केली.. व आपले सौभाग्य राखले… अशी आख्यायिका सांगितली जाते… त्यामुळे या महिन्यात सर्व सवाष्णी सौभाग्यरक्षणासाठी वडाची मनोभावे पूजा करतात…. सातही जन्मी हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करतात. (मग तो कितीही दुर्गुणी का असेना.)

घालते वडाला फेरी
मागते वाण तुजला
जन्मोजन्मी हाच पती
मिळू दे रे मजला

या व्रतामागचा शास्त्रार्थ लक्षात घेणे गरजेचे आहे. वड ही उपयुक्त वनस्पती आहे. डेरेदार अशा या वटवृक्षाच्या आजूबाजूला एक दुनिया वावरत असते… वडामुळे उन, पावसापासून आपले संरक्षण होते… तापल्या उन्हातून जाणारा पांथस्थ वडाखाली थांबतो तेव्हा त्याचा सारा शीण नाहीसा होतो. वडाच्या ढोल्यांमधून कावळे, घार, गिधाड (पर्यावरणाची स्वच्छता करणारे पक्षी) यांच्यासह चिमण्या, पारवे, पोपट आदी पक्षीही राहतात….

सावली देतो वृक्ष
म्हणनी येतात पक्षी
घरटे बांधून रहातात
वृक्षच त्यांना रक्षी

वडाची बारीक बारीक फळे हे त्या पक्ष्यांचे अन्न आहे. त्यामुळे त्यांचे अस्तित्व या झाडावरच अवलंबून आहे. …त्यांच्या विष्ठेतून बाहेर पडणार्‍या बियांमुळे परागीभवनाचे ‘ज्येष्ठ’ काम होते. झाडांच्या बिया अन्य ठिकाणी रूजून पर्यावरण संवर्धनास पक्ष्यांची मदत होते. परिसरात वडाच्या झाडाचे अस्तित्व असणे हे ,त्या परिसराचा पर्यावरण समतोल असल्याचे द्योतक आहे….

वडाच्या पारंब्या जमिनीत रूजून नवीन झाड तयार होते… त्यामुळे दाट झाडी तयार होऊन त्याखाली लहान वनस्पती वाढू शकतात. ..कमी उन मिळणार्‍या भागात या प्रकारच्या वनस्पती वाढतात… वेलींना आधार मिळतो. ..खाली पडलेल्या, कुजलेल्या पालापाचोळ्यापासून नैसर्गिक, जैविक खत मिळते. वडाची मुळे खूप खोलवर पसरलेली असतात. ..त्यांची माती धरून ठेवण्याची क्षमताही चांगली असते. त्यामुळे जमिनीची धूप होण्याचे प्रमाण कमी होते….

मुळे वृक्षांची
पाणी धरुन ठेवतात
म्हणून तर झाडे
जोमाने वाढतात

वडाचे झाड जंगलात असणे हे त्या जंगलाच्या संपन्नतेचे लक्षण आहे…. त्यामुळेच आपल्याकडच्या कितीतरी देवरायांमध्ये वडाच्या झाडाचे प्रमाण लक्षणीय आहे…. वडाचे बरेच औषधी उपयोगही आहेत. वडाच्या मुळांपासून (पारंब्यांपासून) निघणारे तेल केशवर्धक तर आहेच पण वीर्यवर्धक म्हणूनही त्याचा उपयोग होतो. पुरूषांच्या पुष्कळशा व्याधींवर आयुर्वेदात या मुळ्यांचा उपयोग केलेला आढळतो. ह्रदयरोगावर वडाच्या मुळांचा खूप उपयोग होतो. त्यामुळे या वृक्षाला मोठे महत्त्व आहे. त्यामुळेच आपल्या पूर्वजांनी त्याला पूजेचा मान देऊन त्याचा गौरव केला आहे….

वड आहे उपयोगी
नका तोडू कधी
संवर्धन करूया
झाडे लावू आधी



म्हणूनच की काय ‘मला मुलं व्हावीत असा आशीर्वाद देतोस,आणि माझ्या नवर्‍याला घेऊन* *जातोस’ असे प्रत्यक्ष यमदेवाला म्हणणार्‍या सावित्रीने नवर्‍याच्या आयुष्यवर्धनासाठी वडाचीच निवड केली असावी. आधुनिक सावित्रींनीही हा शास्त्रार्थ
लक्षात घ्यावा

झाडे लावू झाडे जगवू
पर्यावरणाचे रक्षण करु
जंगलतोड थांबवून
पर्यावरणाचा समतोल धरु

लेखिका कवयित्री -सौ सीमा मंगरूळे तवटे

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *