Vat Savitri Purnima

Vat Savitri Purnima
Vat Savitri Purnima

Vat Savitri Purnima

वटसावित्री

तू कर वडाची पूजा
आज वटसावित्री पौर्णिमा व्रत आहे म्हणून
सभ्यता संस्कृतीला जखडून ठेवलंय तुला
जन्मोजन्मी हाच नवरा पाहिजे
म्हणून
तू सांकडें घाल सुती धाग्याने लपेटून
त्या वट वृक्षाला….

आणि
आज तो
तोच तुझा पती नवरा धनी
निर्धास्त झाला आहे
दारूच्या अड्ड्यावर जायला
दारूच्या बाटल्या रिचवून
गावभर भटकायला
नशेतच दंगामस्ती शिव्या द्यायला
आणि
घरी येऊन
तुलाच
लाथाबुक्क्यांनी तुडवायला…

तू कर वडाची पूजा
तुझ्या सारख्या अनेक सतीसावित्रींना
सोबत घेऊन
त्याही अशाच आहेत
ज्यांचे नवरोबाही
असेच आहेत
कुणी आडदांड
तर कुणी नराधम
स्त्री जातीची अब्रू लुटण्यात
तिच्या अब्रूची लक्तरे तोडण्यात
फुशारकी गाजविणारे
तरीही त्यांच्या बायकांना बसू दे
वड पुजायला…

अजून एक तो
बसलाय निकम्मा
बायको पोरांच्या जिवावर
आयतं खातोय
घरातच बसून
त्याच्या ही बायकोला
बसव तुझ्या सारखं वड पुजायला….

संस्कार संस्कृती सभ्यता
सगळं तुला लाऊन दिलंय

तो मात्र आज
निर्धास्त झाला आहे
कारण तू आज यमाच्या
तावडीतून त्याची सुटका करणार आहेस
वडाची पूजा करून…..

कवी:-
चंद्रशेखर प्रभाकर कासार
चांदवडकर, धुळे.
7588318543.

वट सावित्री पौर्णिमा

वट सावित्री पौर्णिमा
वट सावित्री पौर्णिमा

वट सावित्री पोर्णिमा

  काव्यप्रकार… अष्टाक्षरी

सया निघाल्या नटून
      पूजा वडाची करण्या
        व्रत वैकल्याचा वसा
          परंपरा जोपासण्या  

     नानारंगी भरजरी
        शालू नेसल्या सुंदरा
        नाकी नथीचा तो झोक
         शोभे कुंतली गजरा   

धागा वडाला गुंडाळी
     फेरे मारून ते सात
      सया सौभाग्यकांक्षिणी
        गाणी सावित्रीची गात  

कुंकू हळदीचं वाण
    देती घेती आनंदानं
      ओटी भरता लाजती
        उखाण्याच्या आग्रहानं

सात जन्म सोबतीची
    आस वडाला सांगते
      औक्ष मिळू दे धन्याला
        दान  एवढे मागते       

वट सावित्री पौर्णिमा
    सया निर्जली करीती
      धूप दीप नैवेद्याने
        मनोभावे त्या पुजिती

प्राणवायू देती वृक्ष
   संजीवनी जगण्यास
     छत्रछाया आपणास
      नका जाऊ तोडण्यास..
       
          रचयिती
    सौ पुष्पा सदाकाळ भोसरी पुणे

वट सावित्री पूर्णिमा
वट सावित्री पूर्णिमा



वटपौर्णिमा विशेष



ज्येष्ठी पौर्णिमा ही वटसावित्री पौर्णिमा होय !

ज्येष्ठ पौर्णिमेला महासती स्त्रीने त्रिरात्र उपोषण करून; यथाविध वटमूली पूजा करावी.

या वटसावित्री व्रताचे ठिकाणी त्रयोदशी पासून तीन दिवस उपोषण करावे.

उपोषणाविषयी अशक्त असेल तर; त्रयोदशीस नक्त, चतुर्दशीस अयाचित आणि पौर्णिमेस उपोषण या प्रमाणे करावे.

ज्येष्ठ चतुर्दशीला ज्या स्त्रिया उपवास करून; वटमूलीं सावित्रीचे पूजन करितात; त्यांस वैधव्य प्राप्त  होत नाही.

येथे स्त्रियांच्या या व्रता विषयी विशेष निर्णय म्हणजे; स्त्रीला “रजस्वला” इ.मासिकधर्म प्राप्त होईल तर; पूजादी ब्राह्मणां कडून करून घ्यावी.
उपोषण इ.स्वतः करावे.
असे स्त्री व्रताचे विशेष निर्णय-व्रतपरिभाषेत (प्रथमपरिच्छेदात) सांगितले आहे.  

अधिकारी 

नारी वा विधवा वापि पुत्री-पुत्र विवर्जिता ।
सभर्तृका सपुत्रा वा कुर्यात् व्रतमिदं शुभम् ॥

या स्कंदपुराणातील वचनानुसार; वटसावित्री व्रताचा अधिकार सौभाग्यवती , विधवा , मूलबाळ असलेल्या किंवा नसलेल्या सर्व स्त्रियांना आहे.

आपल्याकडे फक्त सुवासिनी स्त्रियांनीच; “वटसावित्रीची” पूजा करणेंची (चुकीची आणि अज्ञानाची ) पद्धती आहे.
विधवा माऊली देखील ही पूजा करूं शकतात.
जेणेंकरून अन्य कोणत्याही जन्मात त्यांना वैधव्य येणार नाही.

या व्रताचे ठायी विशेष विधी

एक शेर प्रमाण वाळू पात्रात घेऊन नंतर दोन वस्त्रांनी वेष्टित अशा वेळूच्या परडीत  सुवर्णाची किंवा मृत्तिकेची सावित्रीची प्रतिमा तयार करून; सत्यवानासह वर्तमान सावित्रीची फल,नैवेद्य, दीप, हळद, कंठसूत्र, कुंकुम, केशर, इत्यादी साहित्य घेऊन ; पूजा करावी.
नंतर सावित्रीव्रतकथा ब्राह्मणांकडून वाचवावी, रात्रीस जागरण करुन प्रातःकाळी ती प्रतिमा ब्राह्मणांस खालील मंत्राने दान देऊन ;नमस्कार करावा. क्षमा मागावी.

दान मंत्र  :-
सावित्रीयं मया दत्ता सहिरण्या महासती  ।
ब्रह्मणः प्रीणनार्थाय ब्राह्मण प्रतिगृह्यतां ॥

हे व्रत केले असतां कधीही  वैधव्य प्राप्त होणार नाही.

ज्येष्ठ पौर्णिमेला “तिलदान” केल्यास; “अश्वमेध” यज्ञाचे फळ प्राप्त होते.

या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर; छत्री,जोडा सत्पात्री ब्राह्मणांस दान केल्यास “राज्यप्राप्त” होते.

उदकुंभ, उदक, ताडाचा पंखा, चंदन ही त्रिविक्रम प्रीत्यर्थ द्यावी.

आर्द्रायाः प्रथमेपादे क्षीरमश्नाति यो नरः। अपिरोषयुतस्तस्य तक्षकः किं करिष्यति ॥

अद्यदिनमारभ्य चतुर्दिन पर्यंतं पायसं भक्षणीयम् ।

या वचनानुसार; या दिवशी पासून; चारदिवस रोज गायीच्या दुधापासून निर्मित “पायस” भक्षण करावा.

(दि.२१|०६) या दिवशी  सूर्याचा “आर्द्रा नक्षत्र” प्रवेश होत आहे.

आर्द्रा नक्षत्राच्या प्रथम चरणात सूर्य असताना पृथ्वी “रजस्वला” होते म्हणून; या दिवसापासून पुढील तीन दिवस पर्यंत; नांगरणी, बी पेरणी इ. कामे करूं नयेत.


श्रीगुरुदेव दत्त..!!!!

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *