जागतिक अहिराणी दिन

जागतिक अहिराणी दिन
जागतिक अहिराणी दिन

जागतिक अहिराणी दिन

जागतिक अहिराणी दिनानिमित्त…

Oh my god – वं माय वं.
Brilliant – दीड शाना
Be quick – उकाव् मार चपाटा..
Best – भारी शे..
Don’t challenge – मना वाटाले जावानं न्हाई..
Go to sleep – आडा पड तथा..
Have you gone mad – येड़ा बिडा व्हयना का रे..?
Are you ok? – खोपड़ी ठिकाणवर शे ना?
Come here – आथा शिलग..
You are too fast – इतली घाई कसाले तठे काई जेवाले वाडी ठयलशे का..?
I will kill you – मारीच टाकसु..


Simple – वायबार..
Come on…you can do it – जमाड़ी लेशी भो तू..
Fooled someone – येडा मा काढी टाकाभो त्याले…
You’re in trouble – वाट लाग्नी आते तुनी..
Go to hell – शीलग तथा..🔥
Shame on you – लाज शे का तुले..?
Get lost – काडी लागुदे तुले तथा…
Don’t worry – जाय मर तथा..
Oh….shit – हत त्यानी मायले..
Damm you – तुले मरी माय खायजो..
naughty- आगाऊ कथाना
You Rowdy- ओ बाट्टोळ
Shut up- बोंबलू नको
Nonsense- येडी खोबडीना
😆😆😆

Enjoy अहिराणी…
आमना गाव – आमना देश…!
खानदेश
जय अहिराणी              
😄🙏🏻😄🙏🏻😄

अहिराणी भाषेचा इतिहास
अहिराणी भाषेचा इतिहास

अहिराणी संस्कृती

मराठीच्या बोलीभाषांपैकी प्रमुख एक असलेली बोलीभाषा म्हणजे अहिराणी. मात्र, या अहिराणी भाषेला देखील एक मोठी प्राचीन परंपरा आणि इतिहास आहे. म्हणूनच अहिराणी हीदेखील एक स्वतंत्र भाषा म्हणून ओळखली जाते. आपल्याकडे दर बारा कोसांवर भाषा बदलते असं म्हणतात. म्हणजेच तिथल्या संस्कृतीचा प्रभाव त्या त्या बोलीभाषेवर पडतो आणि बोलीभाषा बदलत जाते. याच बोलीभाषांतील एक म्हणजे अहिराणी. अहिराणी ही फक्त बोलीभाषा नसून ती एक संस्कृती आहे. एका विस्तीर्ण अशा प्रदेशाची ओळख आहे. इतकंच नव्हे तर एक स्वतंत्र लोकसाहित्य अहिराणी भाषेत तयार झालं आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या तालुक्यात अहिराणी भाषा ही प्रामुख्याने बोलली जाते.

नाशिक जिल्ह्यातील हे चार तालुके सोडले तर जळगाव, धुळे, नंदुरबार या तीन जिल्ह्यांचा भूभाग हा खांदेश म्हणून ओळखला जातो. म्हणून अहिराणी भाषेला खांदेशी भाषा असेदेखील म्हटले जाते.

खांदेश या भूभागाचा प्रवास अतिशय प्राचीन काळापासून सुरू आला आहे. ऋषीकदेश, कंददेश, खांडदेश, खांडवदेश, खांदेश, कन्नदेश, अभिरदेश, अशा वेगवेगळ्या नावानं या प्रदेशाचा प्रवास चालू झाला. कोणी याला कान्हाचा देश म्हणून कान्हदेशाचा अपभ्रंश खांदेश म्हणतात. तर कोणी खानाच्या राजवटीवरुन खांदेश म्हणतात की, काननदेवावरुन खांदेश याचा अजून ठोस पुरावा नाही. याच खांदेशासह नाशिक जिल्ह्याचा कळवण, सटाणा, देवळा, मालेगाव, नांदगाव, चांदवड, दिंडोरी, सुरगाणा आणि गुजरातमधील डांग जिल्ह्याचा काही भाग हा पूर्वी बागलाण प्रांत म्हणून ओळखला जायचा. या बागलाण प्रांतावर बागुल राजांचे राज्य होते.

बागुल राज्यांच्या आधी येथे अभिरांची राजवट होती. तो कालावधी साधारण इ. स. २०३ ते ४१६. हेच अभीर पुढे अहिर झाले. आणि याच अहिरांची भाषा म्हणून अहिराणी नावारुपास आली. खान्देशचा भूभाग म्हणजे पूर्वेला वाघूर नदी, पश्चिमेला चांदवडचे डोंगर, उत्तरेला सातपुडा पर्वत रांगा तर दक्षिणेला अजिंठ्याचे डोंगर.

सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे अहिराणी ही प्राचीन भाषा आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत कबीर यांच्या ग्रंथांमध्ये देखील अहिराणी बोलीभाषेचा उल्लेख आणि शब्द आढळतात. अहिर हे गोपाळ, गुराखी, गुरे राखणारे. अहिरांचा नंद, गोपाळ म्हणून रामायण महाभारतातदेखील उल्लेख आढळतो. त्याचसोबत अनेक शिलालेखातून अहिराणी भाषेचे पुरावे मिळतात. इतर बोलीभाषेप्रमाणेच अहिराणीदेखील आपलं स्वतंत्र अस्तित्व आणि ओळख जपून आहे. अहिराणी भाषेची गोडी ही खूप मधुर आहे. खान्देशातील प्रदेशानुसार या भाषेला बागलाणी, नंदुरबारी, खाल्यांगी, वर्ल्यांगी, तप्तांगी, डोंगरांगी, जामनेरी हे बोलीभाषांतील प्रादेशिक प्रभेदांत, तर जातिवाचक बोली ह्या सामाजिक प्रभेदांत मोडतात.

खान्देशातील सर्व जातींची बोली ही अहिराणीची छाप असणारी बोली आहे. या सामाजिक प्रभेदांत महाराऊ, भिलाऊ, लाड सिक्की, लेवापातीदार, गुजरी, इत्यादी सामाजिक प्रभेदाच्या बोली आहेत. जवळपास ९५%  खान्देशी लोक अहिराणी बोलतात. ती त्यांची बोलीभाषा आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद तथा नाशिक जिल्ह्याच्या काही भागात अहिराणी भाषा बोलतात. उत्तर महाराष्ट्राच्या अमळनेर, साक्री, पारोळा, दोंडाईचा, शिरपूर, तळोदा, शहादा, धडगाव, नवापूर, नंदुरबार, धुळे, जळगाव, अक्कलकुवा, सिंदखेडा, चोपडा, एरंडोल, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या तालुक्यातील बहुतेक सर्व जाती जमातीची ती मायबोली भाषा आहे. गुजरातच्या सुरत, सोनगढ, व्यारा, उच्छल, निझर व मध्य प्रदेशच्या खेतिया, पानसेमल, सेंधवा आणि काही तालुक्यातही अहिराणी भाषा बोलतात.

अहिराणी भाषेचा इतिहास
अहिराणी भाषेचा इतिहास

खान्देशला कृषी संस्कृती, वस्त्र संस्कृती, नृत्य-कला संस्कृती, तसेच खाद्य संस्कृती आहे. प्राचीन काळातील मातीच्या भांड्यात स्वयंपाक करणारी संस्कृती आजच्या आधुनिक काळातसुद्धा पहायला मिळते. मातीच्या खापरावरच्या पुरण पोळ्या यालाच काही भागात मांडे देखील म्हणतात. आजही खान्देशात या पुरणपोळ्या सण उत्सवाला तसेच पाहुणे आल्यावर आवडीने केल्या जातात. आंब्याच्या सीझनमध्ये तर पुरणपोळी-रस नित्याचाच असे. जळगावमधील भरताची वांगी ही खूप प्रसिद्ध आहेत. ही वांगी पोपटी पांढरट रंगाची असून इतर वांग्यापेक्षा आकाराने खूप मोठी असतात. तेल लावून ती चुलीत भाजली जातात.

हिरवी मिरची, शेंगदाणा आणि खोबरं कुटून त्यात भाजलेली वांगी टाकून भरीत तयार करतात. कळणाची भाकर किंवा बाजरीच्या भाकरी सोबत हे भरीत खाल्ले जाते. म्हणून म्हणतात की वांग्याचे भरीत खावे ते खान्देशातच. याचबरोबर दाळबट्टी, खिचडी, ठेचा, काळ्या मसाल्याचे मटण-भाकरी त्याचबरोबर उन्हाळ्यातील वाळवणाचे खास पदार्थ कुरडई, बिबळ्या, पापड, शेवया हे पदार्थ आजही खान्देशची पारंपरिक ओळख टिकवून आहेत.

खान्देशातील अहिराणी संस्कृतीमध्ये होणारे पारंपरिक सण-उत्सव, लग्न समारंभ, कानबाई उत्सव, आखाजी (अक्षय्य तृतीया) यातून आपल्याला अहिराणी संस्कृतीचं दर्शन घडत जातं. यादरम्यान म्हटली जाणारी गाणी, जात्यावरच्या ओव्या, म्हणी ही खर्‍या अर्थाने अहिराणीची ओळख आहे. अहिराणी लोक घरात मुख्यत्वेकरून अहिराणी आणि घराबाहेर मराठी भाषेचा वापर करतात. शहरात स्थायिक झालेले अहिराणी भाषिक लोक गावी आल्यावर अहिराणीच बोलतात. किंवा शहरात आपल्या गावाकडील व्यक्ती भेटल्यावर अहिराणीत संवाद साधतात. ग्रामीण भागात मात्र, घराबरोबरच बाहेर देखील अहिराणी भाषाच बोलली जाते. २००१ च्या जनगणनेनुसार अहिराणी भाषा बोलणार्‍या लोकांची संख्या साधारण १९ लाखांच्या घरात होती.

यावरुनच अहिराणी बोलणार्‍या लोकांची संख्या आजमितीस किती असेल याचा आपण अंदाज बांधू शकतो. तर मागेच झालेल्या साहित्य संमेलनात आयोजकांनी अहिराणी भाषा बोलणार्‍यांची संख्या ही आता १ कोटीच्या घरात असल्याचं सांगितलं. परदेशात गेलेले अहिराणी भाषिकदेखील अभिमानाने ही भाषा बोलतात.

marathikavita latest

मराठी भाषेप्रमाणेच अहिराणी भाषा साहित्य संमेलन देखील होतं. पहिलं अहिराणी साहित्य संमेलन मांडळ ता. अमळनेर येथे १९९८ ला पार पडलं होतं. त्यानंतर कासारे ता.साक्री, चाळीसगाव, नाशिक, धुळे त्याचबरोबर पुणे येथे देखील खान्देश मंडळातर्फे संमेलनं झाली आहेत. याचबरोबर चर्चासत्रे, मुलाखती, कवी संमेलन, नाटक, गाणे, सिनेमा आता अहिराणी भाषेची व्याप्ती वाढवत आहेत. यामुळे अहिराणी भाषा ही दिवसेंदिवस समृध्द होत आहे.

खान्देशची आणि अहिराणी बोलीभाषेची खरी ओळख ही बहिणाबाई चौधरी यांनी करुन दिली. अगदी साध्या आणि सोप्या ओव्यांच्या माध्यमातून जीवनाचे सार बहिणाबाईंनी सांगितले आहे.

अरे संसार संसार,
जसा तवा चुल्यावर,
आधी हाताले चटके,
तेव्हा मिळते भाकर.

संसाराची सरळ व्याख्या या ओव्यांमधून आपल्याला समजते.

याचबरोबर लग्न समारंभात म्हटली जाणारी गाणी ही अतिशय मधुर आणि गोड आहेत.

लाडकीवं लेक,
तुन्हा लाड आसा कसा!
गगनना चंद्र
तूले धरी देवू कसा?

म्हणजेच या लाडक्या मुलीला तिच्या हट्टापायी आकाशीचा चंद्र तरी कसा पकडून द्यावा?

सासू आत्याबाई
तुम्हना पदरले ओवा,
मी जास माहेराले,
मन्हा रामले जीव लावा.

सासू ही आत्याच असते. वडिलांची बहीणच असते. आत्याबाई मी काही दिवस माहेरी चालले, माझ्या रामाला माझ्या माघारी जीव लावा, नीट सांभाळा, प्रेम द्या.

सासू करी सासूरवास,
नंदा करती कुरापती,
चतुर भरतार,
ग्यानं सांगती राती.

सासू सासरवास करते, नणंद ही कुरबुर करते. यातून मनशांती लाभावी, एकटेपणाची भावना येऊ नये म्हणून चतुर भ्रतार रात्रीचे वेळी ग्यान सांगतो, ज्ञान देतो, समजूत काढतो.

देरान्या जेठन्या,
आपू एक र्‍हावू,
रांझनीनं पानी आपू
चार्‍हीझनी व्हाऊ.

सर्व भावांच्या बायका – एकमताने घरात वागू, कोणत्याही कामाचा भार हा एकीवर पडू न देता चारही मिळून वाटून घेऊ. – देरानी = लहान दिराची बायको, जेठानी = नवर्‍याहून मोठ्या भावाची बायको.

खान्देशात आढळणारी विवाह गीते ही खान्देशभर आढळतात. मात्र अशा प्रकारची विवाह गीते इतरत्र आढळत नाहीत. या विवाह गीतातून खान्देशांच्या इतिहासावर, संस्कृतीवर आणि अहिराणी बोलीवर यानिमित्ताने प्रकाश पडतो.

गंगा जमना दोन्ही खेते,
तठे काय देव पह्यंना रोपे,
तठे काय सीता माई काते,
तठे काय परभू उखले ताना,
(इस्नू किस्नू कांड्या भरे,
राई रुक्मीनी पोयते करे.)
तठलं पोयतं ले आनं,
ना बाप घाडे उना,
बाशिंग मोती झडे उना,.
मातीपये रतं उना,
(राजा गया रतं उना)

गंगा आणि जमुना या दोन नदींच्या काठावर देवपर्‍हाटीची रोपे, त्या रोपांचा कापूस काढून सीता सूत कातते आणि विष्णू व कृष्ण सुताच्या कांड्या भरतात. त्या सुताचे पोयते नवरदेवासाठी बनविले जाते.

याचबरोबर अनेक म्हणीदेखील अहिराणी बोलीभाषेत प्रचलित आहेत. दररोजच्या वागण्या बोलण्यात त्या प्रामुख्याने वापरल्या जातात.

घरना पोरं उघडा, नी याहीणले नेसाडा लुगडा.

घरातली पोर उघडी राहिली तरी चालतील पण व्याहिणीला साडी नेसवायची.

चार आनानी कोंबडी, नी बारा आनाना मसाला.

एखादी गोष्ट कमी किमतीची असते. मात्र, तिचा खर्च खूप जास्त होतो.

खिंसात नही आणा, नी माले बाजीराव म्हणा.

खिसा रिकामा असला तरी मला मोठं म्हणा.

येडी न मत, नी घुबड ना चाळा.

माले ना तुले, घाल कुत्राले.

तुला आणि मला करण्यात तिसर्‍याचाच लाभ होणे.

तोच गुल, नी तीच काडी.

या आणि अशा असंख्य म्हणी रोजच्या व्यवहारात वापरल्या जातात.

सर्वच बाबतीत समृद्ध अशा या अहिराणी बोलीभाषा आणि संस्कृतीचा एक भाग असल्याचा मनापासून अभिमान वाटतो. म्हणूनच म्हणावंस वाटतं की, मना गाव, मना देश, खान्देश.