कांदा
किंग मेकर कांदा
ओळखले का साहेबा ?
मला म्हणतात कांदा
तुम्ही छळले म्हणून
केला तुमचा मी वांदा..!
आले किती गेले किती
येऊ द्या कशीही लाट
नाद केला ज्यांनी माझा
त्यांची लावतो मी वाट..!
पोशिंद्यांचा आधार मी
प्राण माझा बळीराजा
कमी लेखले ना मला
भोगा मग आता सजा..!
सोपे नाही जाळे माझे
त्यात आहे अर्थनिती
भल्या भल्या नेत्यांची मी
फेल केली कुटनिती..!
भाव माझा पाडल्याने
काल चाळीत सडलो
बघा तुम्हाला आज मी
कसा अचूक नडलो..!
मोल मला असूनही
बंद पाडली निर्यात ?
पाच वर्ष पुन्हा आता
बसा रडत घरात..!
याद राखा नेत्यांनो मी
राजासुद्धा घडवितो
किंग मेकर कांदा हा
भलेभले लोळवितो..!
शेतकरी तारेल जो
त्याने घ्यावी माझी साथ
हाल केले त्याचे तर
कंबरेत खावी लाथ..!
कवी-देवदत्त बोरसे
नामपूर ता.बागलाण जि.नाशिक.
मो.नं ९४२१५०१६९५.