मातृपितृ देवाय नम

मातृपितृ देवाय नम
मातृपितृ देवाय नम

मातृपितृ देवाय नम

बाबा,
भिंतीला धरून (भिंतीला हात लावून) चालत राहायचे. ते जसजसे भिंतीला हात लावायचे त्या त्या ठिकाणाचा रंग पुसट होत राही व मळकट व्हायचा.
ते पाहून माझ्या बायकोच्या  चेहऱ्यावरचे भाव बदलत असतांना मी बघत होतो.
एके दिवशी बाबांचं डोकं दुखत होतं, त्यांनी डोक्याला तेल जास्त लावले होते आणि त्याच हाताने भिंतीला धरून चालत राहिल्याने  हाताचे ठसे भिंतीवर उमटले होते. ते पाहून माझी बायको माझ्यावर जाम भडकली.

मला पण काय झालं होतं, कुणास ठाऊक मी पण तडक बाबांच्या रूममध्ये जाऊन म्हणालो, “बाबा तुम्ही भिंतीला हात न लावता चालण्याचा प्रयत्नच करणार नाहीत का..?”
माझा आवाज जरा उंचच झाल्यासारखे मला वाटलं. ८०वर्षांच्या माझ्या बाबांनी माझ्याकडे बघितले. एखादा लहान मुलगा आपली चूक झाली असावी तेव्हा जसा चेहरा करतो तसा बाबांचा चेहरा झाला होता. ते मान खाली घालून गप्प बसले.

छे..!!!  हे मी काय केलं.! मी असं म्हणायला नको होतं
असं मलाच वाटायला लागलं.
माझे स्वाभिमानी बाबांनी तेव्हापासून मौन धरले, आणि भिंतीला हात लावून चालणे सोडून दिले.
पुढे दोन चार दिवसांनी ते असेच चालत असताना तोल जाऊन पडले, आणि अंथरुनच धरले. पुढे दोन दिवसांनी त्यांनी आपली इहलोक यात्रा संपवली.

भिंतीवरच्या त्या हाताचे ठसे पाहून मला माझ्या छातीत काहीतरी अडकल्यासारखं वाटत राहिलं.

दिवस पुढे उलटत राहिले. माझ्या बायकोला भिंती रंगवून घ्याव्यात असे वाटू लागले.
रंगविणारे पेंटर आले सुद्धा..!
आमच्या जितूला आपले आजोबा म्हणजे प्राणप्रिय होते. भिंती रंगविताना आजोबांच्या हाताच्या ठश्यांना सोडून रंगविण्याचा हट्टच त्याने धरला होता.

शेवटी ते रंगकाम करणारे म्हणाले, “सर तुम्ही काही काळजी करू नका  त्या ठश्यांच्या सभोवती गोल करून छान पैकी डिजाईन करून देतो, ती तुम्हालाही आवडेल.” शेवटी मुलाच्या हट्टापुढे काही चालले नाही.
पेंटरने व्यवस्थित ठसे तसेच ठेवून त्याभोवती सुंदर डिजाईन करून दिल्या.
पेंटरची आयडिया सर्वांनाच आवडली. घरी येणारे पाहुणे , मित्र-मंडळींना पण आवडली, ह्या कल्पनेची खूप स्तुती करून ते जाऊ लागलेत. पुढे जेव्हा जेव्हा भिंती रंगवण्याचे काम होत गेले, तेव्हा तेव्हा त्या हाताच्या ठश्यांभोवती डिजाईन बनवली जाऊ लागली.
सुरु सुरुला मुलाच्या हट्टापायी हे जरी करत राहिलो, तरी आमचाही मोह वाढत राहिला.

मातृपितृ देवाय नम
मातृपितृ देवाय नम

दिवस, महिने, वर्ष पुढे सरकत राहिले. जितू (मुलगा )मोठा झाला त्याचं झालं. तेव्हा मी माझ्या बाबांच्या स्थानावर येऊन पोहचलो. बाबांच्या एवढा नसलो तरी सत्तरीला पोचलो होतो.
मलाही तेव्हा भिंतीला धरून चालावं असं होऊ लागलं, पण मला तेव्हा आठवलं किती चिडून बोललो होतो मी माझ्या बाबांना..!!!
म्हणून चालतांना भिंतीपासून थोडं अंतर ठेवूनच चालत राहिलो.
एके दिवशी रूममधून बाहेर पडत असतांना माझा थोडासा तोल गेल्यासारखं झाल्याने आधार घेण्यासाठी भिंतीकडे हात पसरणार, तोच मी माझ्या मुलाच्या बाहू मध्ये असल्याचे जाणवलं.

“अहो बाबा बाहेर
येतांना भिंतीला धरून यायचं ना ? आता तुम्ही पडता पडता थोडक्यात वाचले.” मुलाचे वाक्य कानावर पडले.
मी जितूच्या मुखाकडे पाहत राहिलो. त्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती, पण द्वेष नव्हता.
तिथेच जवळच्या भिंतीवर बाबांचे हात मला दिसले.
माझ्या डोळ्यासमोर बाबांचं चित्र उभं राहिलं.

त्या दिवशी मी  ओरडून बोललो  नसतो, तर बाबा अजून जगले असते असे वाटू लागले.
आपोआप डोळ्यात पाणी साचू लागले. तेवढ्यात तिथेच जवळ थांबलेली माझी 8 वर्षाची नात  धावत आली,
“आजोबा -आजोबा  तुम्ही माझ्या खांद्यावर हात ठेवून चला.” असे म्हणत हसत हसत माझे हात आपल्या खांद्यावर घेऊन निघाली.
हॉलमधील सोफ्यावर बसलो. लगेच नातीने आपलं ड्रॉईंग बुक दाखवत, “आजोबा आज माझ्या क्लासमध्ये ड्रॉईंग परीक्षा झाली. मला फर्स्ट प्राईझ मिळाले” असे म्हणत ड्रॉईंग बुक दाखवू लागली.

“हो का ? अरे व्वा..!!! दाखव बघू कोणता ड्रॉईंग आहे तो ?” म्हटल्यावर तिने ड्रॉइंगच पेज उघडून दाखवलं.
आमच्या भिंतीवर बाबांच्या हातांची चित्र आहेत तशीच काढून त्याभोवती सुंदर नक्षी काढली होती.
टीचरांनी विचारले,” हे काय आहे” ? मी सांगितले, “हे माझ्या पणजोबांच्या हाताची चित्रे आहेत. आमच्या घरच्या भिंतीवर हे चित्रे कायमची कोरून ठेवली आहेत.

टीचर म्हणाल्या, मुले लहान असतांना असे भिंतीवर चित्र काढत असतात, भिंतीवर रेघोट्या, हातापायांची चित्रे काढत राहतात. मुलांच्या आईवडिलांना त्यांचं कौतुक वाटतं. त्यामुळे मुलांवरचं त्यांचं प्रेमही वाढत राहतं. टीचर आणखी म्हणाल्या, आपण पण आपल्या वयस्क आई वडिलांवर, आजी आजोबावर असेच प्रेम करत राहायला पाहिजे. त्या मला व्हेरी गुड श्रिया असे म्हणून कौतुक केले.
असं श्रिया (आमची नात )गोड गोड बोलत राहिली. तेव्हा  मला माझ्या नातीपुढे मी किती लहान आहे, असं वाटू लागलं.
मी माझ्या रुममध्ये आलो, दरवाजा बंद करून बाबांच्या फोटोपुढे येऊन… “*मला क्षमा करा बाबा… मला क्षमा करा.*”असे म्हणत मन हलकं होईपर्यंत रडून  घेतलं. आणि पुढील आयुष्यातही नेहमीच वरचेवर असेच रडून बाबांची क्षमा मागत राहिलो…..

मातृपितृ देवाय नमः

मातृपितृ देवाय नम
मातृपितृ देवाय नम