मतदार बंधू भगिनींनो

मतदार बंधू भगिनींनो
मतदार बंधू भगिनींनो

मतदार बंधू भगिनींनो

मतदार बंधू भगिनींनो!
या शब्दांमधे पहिल्यासारखी किमया आता राहिलेली नाही हे नमूद करतांना अत्यंत खेद होतो. पूर्वीदेखील मतदान होत असताना व मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरही गैरप्रकार होत होते व आजही ही प्रक्रिया वादाच्या भोव-यात अडकलेली आहे.बॕलेट पेपर किंवा ईव्हीएम द्वारा झालेले मतदान आपल्या बाजूने कसे वळवता येईल यासाठी मुख्यत्वे सत्ताधारी व सत्तापिपासू कुठल्याना कुठल्या गैरप्रकारांचा अवलंब करतातच हे सूर्य प्रकाशाइतके उघड आहे.

मात्र यात मतदार बंधू भगिनींचीच गळचेपी होत असते हा आजवरचा इतिहास आहे.लोकशाही परंपरेला न शोभणारे हे दुष्कृत्य थांबेल याची सुतराम शक्यता वाटत नाही. विविध आमिषांची खिरापत वाटून मतदारांची दिशाभूल करून त्यांची मते आपल्याकडे कशी वळवावीत एवढाच काय तो उद्देश डोळ्यासमोर ठेऊन विविध पक्षातील नेते हा खेळ दर पाच वर्षांनी खेळत असतात.

याबाबतीत फार पूर्वीपासून कवी, लेखक, विचारवंत, राजकीय पुढाऱ्यांनी व सारस्वतांनी आपली मते सार्वजनिकपणे व्यक्त केलेलीच आहेत.निवडून येण्यासाठी वाट्टेल ते करण्याची ज्यांची पूर्णतः तयारी आहे केवळ तेच निवडून येतात आणि निवडणूक संपल्यावर बहुमतासाठी काय काय करतील याचा तर आता काही नेमच राहिलेला नाही. याच भावनेने मागील तीन दिवस या रचनेने हैराण करुन सोडले. आज तिला आपणास समर्पित करीत असताना मनात दाटून आलेले मळभ काढून फेकण्याचा हा अल्पसा प्रयास करतोय!

पेच

पडलाय पेच भारी, मतदार बांधवांना
नेता गुणी दिसेना, मतदार बांधवांना

करतोय लोकसेवा, निस्वार्थ भावनेने
द्या दाखवून नेता, मतदार बांधवांना

काकास त्यागताना, पुतण्यास खेद नाही
गणतीच ना कुणीही, मतदार बांधवांना

उठसूठ रोज नेते, मुक्ताफळे उधळती
अगदी खुळे समजती, मतदार बांधवांना

पैसा नि आमिषांची, वाटूनिया खिरापत
देतात भूल तगडी, मतदार बांधवांना

मतदान संपल्यावर, जनतेस मोल नाही
पुजतात नामधारी, मतदार बांधवांना

ठासून लोक नेते, वदतात नित्य खोटे
फासत गुलाल बसती, मतदार बांधवांना

देवासमान त्यांचा, होतो उदो उदो पण
करती हलाल अंती, मतदार बांधवांना

कळलेच ना कुणाला, षडयंत्र ‘किरण’ फसवे
हैराण नित्य करती, मतदार बांधवांना

शिवाजी साळुंके, ‘किरण’
चाळीसगाव, जि. जळगाव.

मतदार बंधू भगिनींनो
मतदार बंधू भगिनींनो