अजिंक्यतारा किल्ला

अजिंक्यतारा किल्ला

चला जाऊया गड-किल्ल्यांवर
    (अजिंक्यतारा किल्ला)

नानाभाऊ माळी

    इतिहास दगडांचा असतो!दगडी छातीचाही असतो!इतिहास भेकडांचा असतो,इतिहास माकडांचाही असतो!इतिहास मर्दाचां असतो,इतिहास कावेबाजांचा देखील असतो!राज्यासाठी,प्रजेसाठी, देशासाठी लढणाऱ्यां शूरवीरांचा देखील इतिहास असतो!शौर्यातून इतिहास जन्म घेत असतो!जिंकणारे अन पराजितांचा इतिहास असतो अशी ही ठिकाणं इतिहासातील पानांवर ठळक दिसत असतात, त्यांना किल्ला म्हणतो!गड म्हणतो!दुर्ग म्हणतो!भुईकोट किल्ला म्हणतो तर कधी गढी सुद्धा म्हणतो!

प्राचीन काळी महाराष्ट्रात इ स ११०० व्या शतकातं शिलहार राजा भोज यांनी अत्यंत उत्तम कलाकृतीचा नमुना असलेले गड-किल्ले बांधले होते!नंतर बहामानी, आदिलशाही, निजामशाही अन मोघलसारखे धूर्त, कावेबाज, आक्रमक जिंकत राहिले!भारतीय प्राचीन इतिहास पुसून नवा इतिहास घुसडतं गेले!भिन्न संस्कृतीनें मांडलेला हिंस्र डाव वेदनादायी, यातनामय होता!चेतना जाळणारा होता!क्रूरतेचा हिंस्र इतिहास नरकसमान होता!अचेतनेंतून चेतनेचा उगम होतं असतो!जन्म होत असतो!दबलेली चेतना पेटून उठत असतें!अस्तित्वाचां अंगार होत असतो!अंगार संपूर्ण क्रूरतेला जाळून टाकत असतो!अशा चेतनारुपी अंगाराचं नाव ‘छत्रपती शिवाजी राजे’ होतं!छत्रपती प्रजादक्ष राजा होते!

परकीय सत्तेने भारतावर आपलं बस्थान बसविले असतांना हिंदवी स्वराज्य रक्षक जन्म घेतला होता!कंसाचा संहार करण्या कृष्ण जन्म घेत असतो!तसा ‘शिवबा’ साडेतीनशे वर्षांनी अवतार घेतात!छत्रपतीराजे भारतीय संस्कृतीचे पालनहार होतात!हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होतात!….आम्हाला छत्रपती शिवाजी राजांनी वास्तव्य केलेल्या किल्ल्यावर जाण्याचं भाग्य लाभलं!छत्रपती राजाराम महाराजांचं व्यास्तव्य केलेलं ठिकाण पाहायला मिळालं!महाराणी ताराबाई यांचं संपूर्ण आयुष्य ज्या ठिकाणी गेलं त्या अजिंक्यतारा किल्ल्यावर जाण्याचं भाग्य आम्हाला मिळालं!छत्रपती शाहूमहाराजांनीं राज्य केलेला किल्ल्यावर जाण्याचं भाग्य आम्हाला मिळालं!आमच्या तुकडीचे सेनापती होते आदरणीय वसंतराव वेडू बागूल सर!

२८ मार्चला छत्रपती शिवाजी राजांची जयंती होती!आज दिनांक ३१मार्चला राजांच्या वास्तव्य असलेल्या पाऊलखुणाचं दर्शन घेण्याचं भाग्य लाभलं!छत्रपती शिवाजी राजे दोन महिने अजिंक्यतारा किल्ल्यावर वास्तव्यास होते!अशा या किल्ल्याचं नाव आहे सातारचा किल्ला!आजामतारा किल्ला!..महाराणी ताराबाई यांच्या युद्धकुशल पराक्रमामुळे मोघलांकडून हा किल्ला जिंकून घेतला होता म्हणून या किल्ल्याचं नाव “अजिंक्यतारा” किल्ला!

सातारा शहरात असलेला हा किल्ला ११७८ते ११९० साला दरम्यान राजा भोज यांनी बांधला असावा!पुढे अस्मानी-सुलतानी आक्रमकांनी किल्ला जिंकला होता!अनेक राजगाद्या आल्या गेल्या!१७ व्या शतकातं अस्मानी-सुलतानींला शह देणाऱ्या महान अवताराने जन्म घेतला होता!अफजल खान वधानंतर आदिलशाहीकडून शिवाजी महाराजांनीं १६७३मध्ये हा किल्ला जिंकून घेतला होता!एक एक किल्ला जिंकत अजिंक्यतारा किल्ला देखील हिंदवी स्वराज्याचा महत्वपूर्ण भाग बनवला होता!

अजिंक्यतारा किल्ला स्वराज्याची चौथी राजधानी म्हणून ओळखली जाते!जय पराजयाच्या,राज्य विस्तारवाद,वर्चस्ववादाच्या लढाईत हा किल्ला शिलहार राजा भोज दुसरा यांच्याकडून बहामानी राज्याकडे आला होता!नंतर आदिलशाहीकडे गेला होता!विजापूरची राणी चांदबीबी १५८०मध्ये येथेच नजरकैदेत होती!पुढे मराठ्यांनीं हा किल्ला जिंकून घेतला होता!मराठ्यांकडे किल्ला होता!तेव्हा छत्रपती शिवाजी राजे अजिंक्यतारा किल्ल्यावर वास्तव्यास होते!छत्रपती शिवाजी महाराज अन छत्रपती संभाजी महाराजांनंतर छत्रपती राजाराम या किल्ल्यावर होते!औरंगजेबाचें सैन्य हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी चार महिने लढले!मराठ्यांच्या चिवट सेनेने शत्रूशी मुकाबला करीत राहिले!सभोवती औरंगजेबचं सैन्य होत!खालून संपूर्ण जंगल तोडून लाकडांच्या चौकटीवरून तोफांचा मारा केला होता!तोफांच्या माऱ्यात तटबंदी अन बुरुज अचानक ढासळाला  त्यात किल्ल्यावरील काही सैन्य आणि किल्ल्याच्या पायथ्यावरील मोघलांचं हजारो सैन्य त्यात गाडले होते!१६८२ते १७०० पर्यंत हा मुघलांच्या ताब्यात होता!किल्ला ताब्यात आल्यावर औरंगजेबाने किल्ल्याचं त्याच्या मुलाच्या नावाने ‘आजमतास’असं ठेवलं होतं!पूढे छत्रपती राजारामराजे यांच्या मृत्यू नंतर महाराणी ताराबाईंनी हा किल्ला मुघलांकडून जिंकून घेतला होता!अन किल्ल्याचं नाव अजिंक्यतारा असं ठेवण्यात आलं होतं!संभाजी महाराजाने पुत्र शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या वादात छत्रपती शाहू महाराजांनी किल्ला ताब्यात घेतला होता!महाराणी ताराबाई यांना किल्ल्यावरचं नजर कैदेत ठेवलं होतं!त्यांनी शेवटचा श्वास किल्ल्यावरचं घेतला होता!



कालांतराने राजगादीवरून अनेक वाद निर्माण झाले होते!पुढे छत्रपतींचे  सरदार पेशव्यांकडे हा किल्ला राहिला!पेशव्यांच्या अंतर्गत दुहीचा फायदा घेत इंग्रजांनी घेतला दुसऱ्या शाहू महाराजांच्या हातून हा किल्ला जिंकून घेत तेथे युनियन जॅक फडकवला होता!भारत स्वातंत्र्य होईपर्यंत किल्ला त्यांच्याचं ताब्यात होता!

पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगरामध्ये उभा असलेला किल्ला सातारा शहराला लागूनच चार किलोमीटरवर लांब आहे!किल्ल्यावरून संपूर्ण सातारा शहर दिसतं!किल्ल्याचा इतिहास रक्ताळलेला असून कूट नीती अन डावपेचांनी परीपूर्ण आहे!किल्ल्याची उंची ३३००फूट असून तटबधींच्या भिंतीची जाडी चार मिटर असावी!तटबंधींना मोठमोठया खिडक्या आहेत!शत्रूवर गरम तेलाचा मारा करण्यासाठी अन तोफांचा मारा करण्यासाठी या खिडक्यांचा उपयोग होत असावा!

किल्ल्यावर चुण्याचा घाना दिसला!किल्ल्यावर हनुमान मंदिर, महादेव मंदिर, सप्तर्षी मंदिर,मंगळाई देवीचं मंदिर आहे!मंगळाई देवी गडाची देवता आहे!तेथेच देवळी दिसतात!धान्य ठेवण्याचं कोठार,अंबरखाना, ताराराणी महाल,बाले किल्ल्याचीं सदर अन अवशेष पाहायला मिळतात!राज सदर असून शेजारीचं नाणे टांकसाळ असावी!किल्ल्यावर एकूण सात तळे दिसतात!पाण्याची समस्या गडावर नसावी!किल्ल्यावर कैद्याना ठेवण्यासाठी खोल असा तुरुंग असावा!गडावर जाण्यासाठी चार दरवाजे आहेत!महाद्वारच्यां आत अजून एक दरवाजा आहे!महा दरवाजा उभा कातळ फोडून बनविलेला दिसतो!दरवाजा अतिभव्य असून साधारण संपूर्ण किल्ल्याचं बांधकाम अतिशय सुरेख कलाकृतीचा नमुना दिसतो!महा द्वारातं जातांना आखीव रेखीव दगडी पायऱ्या आहेत!

दक्षिण दरवाज्याकडून देखील तेथे वरती पोहचता येत!उभट कडा पार करून दक्षिण दरवाज्यातून प्रवेश करता येतो!पुढे अतिशय सुरेख आखीव, रेखीव अन घडीव दगडी पायऱ्या आहेत!महाद्वार पहातांना किल्ल्याचा इतिहास डोळ्यसमोर येऊ लागतो!

आम्ही सेनापती श्री बागूल सरांच्या तुकडीचे मावळे होतो!उभट कडा पार करीत!वृक्ष संपदा पाहात दक्षिण दरवाज्याने प्रवेश केला होता!संपूर्ण किल्ला पाहात उत्तरेच्या महाद्वारातून बाहेर पडलो होतो!महाद्वाराच्या प्रवेश द्वारा पर्यंत लहान चारचाकी,तीन चाकी अन दुचाकी वाहनं पोहचता!प्राचीन शिल्पकलेंचा उत्तम नमुना असलेल्या किल्ल्यावर आता पोलीस स्टेशन, दूरदर्शन टॉवर, खूप मोठा लोखंडी अक्षरात ‘अजिंक्यतारा’ किल्ला बनविलेला दिसला!उत्तरेच्या महाद्वार ते किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत सिमेंटचा रस्ता बनविलेला दिसतो!किल्ल्यावर वन्य प्राण्यांचा, बिबट्यांचा वावर असण्याची शक्यता आहे!

असा पराक्रमाची साक्ष देणारा अजिंक्य तारा किल्ला आज दिनांक ३१मार्च रोजी पाहिला!मनाची तृप्ती झाली होती!ओढ आनंदात न्हात होती!अवघ्या तीन तासात किल्ला पाहून परतीच्या प्रवासाला लागलो होतो!जीवनात यावे अन असे शूर मर्दानी किल्ले पाहून आपण इतिहास जाणतं राहावा!
… नानाभाऊ माळी
हडपसर, पूणे
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-३१ मार्च २०२४

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *