देवाचीया भेटी
नारायण बेट दर्शन
देवाचीया भेटी (नारायण बेट)
(भाग-०१)
नानाभाऊ माळी
मन झाले उतावीळ
गावोगावी रें चाललो
देव शोधाया निघालो
कष्ट भक्तीतून गेलो!
श्वास माझा देव झाला
श्रद्धेतं चिंब मी न्हालो
भेट अंतरीची होई ना
देव गाभाऱ्यात गेलो!
देव दगडात बंद
देव दर्शनासी आलो
अश्रू वाहती रोज रोज
तुझा बंदिवान झालो!
भेट होई ना रें तुझी
आंसू घेऊनियां आलो
असा दगडाचा रें देव
आज भेटावया आलो!
देव भावाचा भुकेला असतो!भाव तेथे देव असतो!देवाला अंतःकरणात ठेवण्यासाठी एकचित्त व्हावं लागतं!एकचित भावावस्था देवाजवळ नेत असतें!देवाची ओळख करून देत असतें!व्याकुळता जन्मावी लागते!ओढ लागल्याशिवाय भक्तीअमृत मिळत नाही!









आम्ही आज दिनांक १ एप्रिल २०२४ रोजी सकाळी सहा वाजता शतायु जेष्ठ नागरिक संघ आयोजित देव अंतरी ठेवण्यास निघालो होतो!देवामृताचे थेंब प्राप्त करण्यास हडपसर,पुण्याहून निघालो होतो!देव दर्शनाला निघालो होतो!यात्रेला निघालो होतो!देवदर्शन खरचं कठीण असतं का हो? भाजल्या शिवाय भाकर नाही!कष्टा शिवाय देह नाही!भक्तीच्या ओढी शिवाय देव नाही!
देव शोधता शोधता माणसं ओळखीत स्वतःस जाणण्या यात्रेला निघालो होतो!देव चरणाशी माथा टेकन्या निघालो होतो!हडपसर पुण्याहून सोलापूर रस्त्यावर आमची बस पळत होती!सूर्यनारायण झोपेतून उठण्या आधी आम्ही अंतरिच्यां साध्याकडे निघाली होतो!पवित्र,सात्विक हित साधण्यासाठी निघालो होतो!चंदन सुगंधापाशी स्वतःस अर्पण करण्या निघालो होतो!
सकाळचें आठ वाजले होते!सोलापूर महामार्गावर यवत गेल्यावर एका मंगल कार्यालयाबाहेर सूर्यसाक्षीनें नाश्ता उरकला!पुढे चौफुला नंतर आमची बस चार-पाच किलोमीटरवर असलेल्या नारायण बेटाकडे वळली!
सर्व प्रथम तीनमुखी श्री दत्त मंदिरात जाऊन दर्शन घेतलं!गाभाऱ्यातील श्री गुरुदत्तानां हृदयी बसविले!मंदिराचं दगडी बांधकाम शिल्पकलेंचा उत्तम नमुना आहे!मनोभावे प्रदक्षिणा मारून पुढे नारायण महाराज समाधी मंदिराकडे गेलो!दौंड तालुक्यातील नारायण बेट भक्तीचं अढळ स्थान आहे!नारायण महाराजांच्या विशाल अन अलौकिक योगदान हृदयात खोलवर जाऊन बसले!
नारायण बेट येथे सद्गुरु नारायण संस्था ट्रस्ट आहे!येथे महाराजांची समाधी आहे!येथे तीनमुखी दत्तमंदिर आहे!नारायण महाराज कर्नाटकातून या स्थळी आले असावेत!महान कार्य म्हणजे दौंड तालुक्यातील केडगाव येथील ख्रिस्त मिशीनरी कडून होणाऱ्या धर्म प्रसारास अध्यात्मिक तत्वज्ञानातून भक्तीमार्ग दाखवत उत्तर दिले होते!आयुषभर अध्यात्माचां अर्थ सांगत सगुण भक्तीचा साधा सरळ मार्ग दाखविला होता!नारायण बेट येथील सेवाकार्य विशाल स्वरूपाचं असावं!
जवळपास दोन-एकशे ऐकर जमीन या देवस्थानच्या नावे आहे!नारायण बेटातील घरं दीडशे ते दोनशे वर्षांची असावीत!दगडी बिल्डिंग अन बांधकामाचा अतिशय सुंदर अन अप्रतिम नमुना पहायला मिळतो!सुंदर मंदिर आणि श्रद्धा दोन्ही एक होऊन कार्य करीत असाव्यात!साभोवतालचा सर्व परिसर शांत, प्रसन्न होता!सद्गुरू नारायण महाराजांचं आसन चाळीस किलोचे आहे असं म्हणतात!आम्ही समाधीचं दर्शन घेतलं!श्रद्धास्थानी एकरूप होता आलं!त्या परिसरातील जागेवर चौफेर कडू लिंबाची झाडं दिसतं होती!सावली सोबत शुद्ध प्राणवायू देखील देत होती!संत देवाचे लाडके असतात!आम्ही भक्त संतांचे लाडके होण्याचा कसोशीने प्रयत्न करण्याचा मानस केला अन पुढील देवदर्शनाला निघालो!
… नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-१ एप्रिल २०२४
(आज पंढरपूर मुक्कामी)
श्रीराम मंदिर-फलटण दर्शन
देवाचीया भेटी
(श्रीराम मंदिर-फलटण ) भाग-०२
नानाभाऊ माळी
मी प्रवासी भुवरील
ओझं घेऊनि चाललो
अवजड होण्याआधी
ऋण देऊनी चाललो..!
देह अवजड माझा
अवजडाशी भुललो
दाता दान देत गेला
तव त्याशी रें बोललो!
परमात्माऋण ऋणी
आत्मा घुसळीत चाललो
काढ लोणी रें माझी
तप्त अग्नीशी बोललो!
भार नकोसा रें झाला
परम्यात्म्याशी बोललो
गुढातं घे ना रें देवा
माग काढीत चाललो.!
प्रवास आयुष्याचा असतो!जगण्याचा असतो!प्रवास जेथे थांबला ते स्टेशन शेवटचं असतं!आपल्या हृदयाचें ठोके थांबले म्हणजे या देहाचा अंतिम प्रवासाचा निरोप असतो!आपला प्रवास सद्गुण संगे झाला तर
जीवनानंद अमृत तृप्ती देऊन जातो!संतांनी प्रवास सांगितला तो प्रवास ज्ञान यात्रेचां आहे!यात्रा हृदयी बसवण्या आम्ही काल दिनांक १ एप्रिल रोजी नारायणबेटहुन सातारा जिल्ह्यातील फलटण येथे गेलो होतो!फलटण मध्ये प्राचीन श्रीराम मंदिर आहे!










राम जीव जीवांच्या अंतरी वसलेला श्रद्धाफळ आहे!आपलं आयुष श्री रामाच्या नामानें परिपूर्ण भरलेलं असावं!आपल्या आयुष्यातून राम गेला तर काहीही शिल्लक राहात नाही!आम्ही श्री.रामाच्या दर्शनासाठी फलटण येथे गेलो!मूर्ती तिचं,पुरुषोत्तम अन त्यागाचां आदर्श आमच्या समोर ठेवलेली!फलटणचे राजे नाईक निंबाळकर यांच्या राजवाड्या शेजारी प्रभू श्रीरामाचं मंदिर कातळ पाषाणातंलं मन भावनं मंदिर आहे!राजे नाईक रामराजे निंबाळकरट्रस्टचं मंदिर असावे!राजवाडा देखील तत्कालीन शिल्पकलेचा उत्तम नमुना दिसत होता!
काळ्या कातळ पाषानातआखीव रेखीव अन उत्तम कलाकृती असलेलं मंदिर आहे! पायऱ्यांचीं रचना डोळ्यात उतरते, भरते!येथील खांब देखील अस्सल सागवानी लाकडाचे आहेत!बांधकामाची कारागिरी अंतःकरणी वसवीत श्रीराम हृदयात उतरत गेले!मन प्रसन्न होत गेलं!भक्तीत न्हावून निघतं होते!
देव मुर्तीस हस्तस्पर्श करण्याचा मोह होत राहिला!अंतरीचा राम जागवत राहिलो!श्वासात श्रीराम ये जा करीत राहिलो!श्रीराम जगण्यातून प्राण एकचित्त होत राहिले!मांडी घालून बसलो होतो!अंतकरणी शुद्ध,सत्वरूप न्याहाळत होतो!
श्रीराम मंदिरा सभोवती अन्य देव देवतांच्या मंदिरात माथा टेकत माझं नको ते दुर्गुण अर्पित करीत राहिलो!श्रीराम चेतनेचे प्रवाहक आहेत!त्यागाची विशाल मूर्ती आहेत!जगण्याचा उजेड आहेत!आम्ही श्रीरामांनी दाखवून दिलेल्या प्रकाश वाटेवर चालण्याचीं आज्ञा घेत पुढील दर्शन वाटेवर निघालो होतो!
… नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-०२ एप्रिल २०२४
(आंबाजोगाईकडे प्रवासात)
शिखर शिंगणापूर दर्शन
देवाचीया भेटी
(शिखर शिंगणापूर)
भाग-०३
नानाभाऊ माळी
सुष्क कातळ पाषाणी
देव डोंगरावरी आला
पर्वत नतमस्तक होई
महादेव भुवरी गेला..!
कैलासावर सत्ता त्याची
ठेऊनी येथवर आला
कातळ सुष्क पाषानी
भक्त आनंदीत झाला…!
शिव चरचरात आहेत!भारतात राज्या राज्यात शिव मंदिरं आहेत!शिव मंदिर पाहिलं की आत्मिक सुखाची अनुभूती होत असतें!शिवलिंग खोल खोल दगडी गाभाऱ्यात असतं!बाहेर श्री.गणेश भगवान महाद्वारावर द्वारपाल सारखे उभे तर नंदी महाद्वाराबाहेर एकनिष्ठ वाहक-सेवक म्हणून उभे दिसतात!प्राचीन
हेमाडपंथी शिव मंदिरं भारतीय श्रद्धेचां आत्मा आहेत!शिवलिंगाचं दर्शन घेतांना आपणास आत्मिक शांतीचीं अनुभूती होत असतें!






आम्ही फलटणचं श्रीराम मंदिर दर्शन घेऊन पुढे लहान मोठ्या घाट माथ्या वरील उंच डोंगरावर शिखर शिंगणापूरला गेलो होतो!सातारा जिल्ह्यातील फलटण अवर्षणग्रस्त, पर्जन्य छायेचा तालूका आहे!पावसाचं प्रमाण कमीचं असतं!वनसंपदा मोजकीचं दिसते!त्यात काही खुरटी जंगलं आहेत!निसर्गानें दुर्लक्ष केलेल्या खडकाळ कठीण पाषानी उंच डोंगरावर अखंड दगडात महादेवाचं मंदिर असणं म्हणजे मानवी बुद्धी पलीकडे वाटतं!चमत्कार आणि अलौकिक वाटतं!परवा ०१ एप्रिल होता!उन्हाळा आपला रंग दाखवतो आहे!या वर्षी तापमान दर वर्षाहून अधिक आहे!घाम अन चटका देणाऱ्या उन्हात शरीराचं तापमान वाढवतो आहे!आम्ही शिखर शिंगणापूरच्या महादेवाचं दर्शनासाठी गेलो होतो!
कैलासातं महादेव आणि पार्वती माता सारीपाटचां खेळ खेळत होते!त्या खेळात साक्षात शंभु महादेव पराभूत झाले होते!शंभू महादेव अतिशय निराश झाले होते!निराशेत ते ब्रह्मांडत गुप्त झाले होते!पार्वतीने ही बाब श्री विष्णू यांना सांगितले!श्री हरी विष्णूनी महादेवाचा शोध घेऊन माता पार्वती अन महादेवात समेट घडवून आणला होता!दोघांनाही कोथलगिरी पर्वतावर बोलाविले होते!तो दिवस होता शुद्ध अष्टमीचां!दोघांचं मनोमिलन होऊन विवाह संपन्न होतो!दर वर्षी शुद्ध आष्टमीला यात्रा संपन्न होते!गुढीपाडव्याच्या जवळपास ही यात्रा भरते!असा प्रसंग म्हणून शिखर शिंगणापूरचं महत्व अधोरेखित होतं¡
मंदिराची उंची १५० फुट असावी!वरती कळस पहातांना आपली मान पूर्णतः ९० अंशातं वाकवावी लागते!त्या काळी महादेव मंदिराचं बांधकाम कसं झालं असावं बरं?मोठमोठे काळेशार पाषाण योग्य त्या मापात घडवून, कोरून कदाचित शिसे ओतून,एकमेकांवर घडीव दगडं रचून शिखर शिंगणापूर महादेव मंदिर बांधलं असावं!कळसाखाली दगडातील घडीव कलाकृतीचां सुरेख संगम साधलेला दिसला!उत्तम शिल्पातील नजरेला देवापर्यंत पोहचवणारं!बारीक सारीक कोरीव कलाकृतीच हृदयी वसवणारे योग्य मापात कोरलेलं सुंदर नक्षीशिल्प देवत्वाची आठवण करून देणारं होतं!
उंच डोंगरावर जाऊन बसलेल्या महादेवाचं दर्शन घेतलं!सोमवार असल्यामुळे मंदिराबाहेर मोठी रांग होती!पायांना चटके बसत होते!दुपारची साधारण एक वाजेची वेळ असावी!रांगेत पुढे जाता जाता हर हर महादेव मुखातून बाहेर पडत होते!ओंकार स्वरूप श्वासातून ये जा करीत होते!महादेव रूप अंतरी वसत होते!
गर्भगृहात जातांना चित्त ओंकार स्वरूपाशी एकरूप होत होते!बाहेरील चटका गर्भगृहात जाऊन थांडावा प्रदान करीत होतं!मस्तीष्क अन
मनचक्षु पिंडीवर एकचित्त झाले होते!महादेव अंतरी घेत होतो!महादेवाच्या अनादी अनंत,विशाल रूपात,शिखर शिंगणापूरीतं विरघळले जात होतो!
तप्त उन्हातही शांत शीतल वाटतं होतं!
यात्रा म्हणजे अनंत माणसांची गर्दी असते!गर्दी भक्तीचं विशाल रूप असतं!महाभक्ती विशाल महादेवात एकरूप होत गेली!यात्रा श्रद्धा साध्याकडे कूच करीत होती!सफलतेकडे यात्रा होती!काळजी घेणारा भगवंत सोबतीला होता!
दर्शन घेऊन ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरणावर माथा टेकण्यास निघालो होतो!
… नानाभाऊ माळी
हडपसर, पूणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
गोंदवलेकर महाराज-गोंदवले
देवाचीया भेटी
(गोंदवलेकर महाराज-गोंदवले )
भाग-०४
… नानाभाऊ माळी
संत दुःख निवारक
संत सतकडू कारले
संत क्रोध संहारक
मनी सद्गुण पेरले!
संत सद्गुरू नाम
मुखे देती सतनाम
निघे मळकट घाम
संत हरी मुखे नाम!
संत होती दृष्टी दाता
संत हलवीती भाता
संत जणांचीं माता
हृदयी लावीती वातां!
संत साखर गाठी
संत जगद्गुरूकाठी
जन्म आमुच्यासाठी
भरती कोरी पाटी!
संत शिकवण जीवनाचां आधार असते!समाजाचा अखंड धागा असते!संत मानवतेचे पुजारी असतात!दुःख हरण करणारे निष्णात डॉक्टर असतात!मनातलं दुःख हलके करीत असतात!संत देव अन सामान्य
जनांचें दुवा असतात!संत गरीबाची घोंगडी होतात!संत मानव समाजाचे डोळे असतात!डोळ्यातून चांगलं ते ग्रहण करून!बुद्धीतून गाळून सर्वांग सुंदर जगाच्या कल्याणा आपलं आयुष्य खर्ची घालणारे संत ईश्वर आणि समाजाचे दुवा असतात!
महाराष्ट्र संतांची भूमी आहे!रामकृष्ण विठ्ठल नामाची भूमी आहे!सर्वचं संतांनी आनंदी,सुखाचा मार्ग दाखविला आहे!क्षणभर सुखासाठी आयुष्यभर दुःख वाहक माणसाला सुखाची उत्तम व्याख्या सांगणारे संत भक्तीमार्ग सांगून गेले आहेत!अशा अनेक थोर संतांपैकी एक चैतन्यमूर्ती ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज होऊन गेलेत!आम्ही शिखर शिंगणापूर दर्शन करून आल्यावर सातारा-पंढरपूर मार्गांवर असलेलं ‘गोंदवले’ या तीर्थस्थळी ०१ एप्रिल २०२४ रोजी दर्शनाला गेलो होतो!शिखर शिंगणापूरहुन दहिवडी मार्गे गोंदवलेला जाता येत!चैतन्यस्वामी गोंदवलेकर महाराजांनी मानव कल्याणा सहज सोपा मंत्र दिला होता”श्रीराम जय राम जय जय राम!”प्रपंच करून परमार्थ साध्याकडे घेऊन जाणाऱ्या महाराजांनी सात्विक परमार्थ मार्ग दाखविला होता!
गोंदवलेकर महाराजांना वयाच्या १२व्या वर्षांपासून अध्यात्माचीं ओढ लागली होती!संपूर्ण भारतभर हिंडून संतमहतांच्या पवित्र कार्यास वाहून घेतलं होत!देवाच्या भेटीचीं वेगळी कल्पना मांडली होती!
व्यसनमुक्ती, कौटुंबिक कलह आदी गोष्टींवर रामबाण उपाय चैतन्यमूर्ती महाराजांनी केली होती!या ठीकांनी आल्यावर मानसिक समाधान लागत
मिळतं!येथे ध्यान मंदिर, समाधी मंदिर राम मंदिरं आहेतं, गोशाळा आहेत!सेवा कार्यातून अध्यात्माची गोडी लावण्याचं महान कार्य केलं होत!गोंदवले शहरातील हा मठ A place of peace and prayer म्हणून ओळखला जातो!महाराजांचं गायींवर खूप प्रेम होत!गोंदवलेकर महाराजांनी अनेक चमत्कार दाखविले होते!त्यांच्या जीवन कार्याच्या अनेक गोष्टी आदर्श दर्शन आहेत!म्हणूनच





गोंदवलेकर महाराजांना हनुमानाचा अवतार मानतात!प्रत्येक गोष्टी त्यांनी विचारपूर्वक केल्या असाव्यात!येथे दिवाळी वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते!लांबवरून महाराजांचें शिष्य येत असतात या अलौकिक कार्यातून प्रभावित होऊन आपल्या गावी चैतन्य मूर्तीच्या कार्याचा प्रसार करीर आहेत!त्या परिसरातील आई मंदिर देखील बांधले आहे!
संत सत्संगतीचा मार्ग दाखवत असतात!ब्रम्ह चैतन्यमूर्ती गोंदवलेकर महाराजांच्या शांत शीतल भागात मन प्रसन्न होत राहातं!संपून परिसर
चेतनास्फूर्ती वाटतं!संताच्या सानिध्यात लोखंड देखील सोनं व्हायला लागतं!येथे आल्यावर अनामिक सुख अन शांतीचा अनुभव आला होता!ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पांदुकांवर डोकं ठेवलं अन पुढील प्रवासाला निघालो होतो!
… नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं -९९२३०७६५००
दिनांक-०४ एप्रिल २०२४
आकलाईमाता मंदिर ग्रामदैवत- अकलूज
देवाचीया भेटी
(आकलाईमाता मंदिर ग्रामदैवत- अकलूज)
भाग-०५
… नानाभाऊ माळी
प्रवासातील सुंदर घरं ही
आम्ही मंदिरं म्हणतो त्यांला
जिथे भक्तीने वाकते मान
समर्पित करीतो देह त्यांला!
यात्रा आम्हा कष्टाचा देव
शोधित फिरतो दारोदारी
देह अपुला झिजूनी जावा
आपुली पूर्ण व्हावी वारी!
प्रवास होतो दारोदारी
सुखशांती घेण्यासाठी
पर्यटन नव्हे यात्रा सारी
देव दरबारी जाण्यासाठी!
कधी कधी वाटत,आपण भरकटलेलो तर नाही? मनाला शांती नाही!उदविग्न मनस्थितीतं जगणं सुरूच असतं!भरकटलेपण असतं तरी कसं मग? जेव्हा आपण ताण तणावातून मानसिक आजारपण घेऊन हिंडत असतो!जगण्याला अर्थ राहात नाही!सर्व नकोसं वाटतं!रस निघून गेल्यासारखं वाटत!एकटेपणाचं भूत मनाचा कोंडमारा करीत असतं!सर्वचं मनाविरुद्ध घडत असतं!घर, दार, गल्ली, समाजात कुठे कुठे जावस वाटत नाही!मानसोपचार तज्ञ देखील हात टेकतात!अशा नकोशा अवस्थेत कोणीतरी फुंकर मारीत असतं!
भावनेचा कोंडमारा असह्य असतो!शरीरिक जखमेच्या वेदनेहून असह्य असतो!वेदनाशामक,वेदनानाशक औषधं भेटतात!त्याचं मार्केट वेगळं असतं!हे मार्केट भावनेला आवाहन करीत असतं!मानसिक विस्कटलेपणाचं अंशता निराकरण करीत असतं!विज्ञान थांबल्यावर सुज्ञानाचं दार उघडत असतं!सुज्ञानाचा ऊर्जास्रोत अध्यात्म असतं!
अध्यात्माच्या उपचाराने मानसिक दोलायमान अवस्था स्थिरतेकडे मार्गक्रमण करू लागते!आध्यत्मिक गोडी लावणारे तज्ञ संतमहात्मा असतात!भक्ती मार्गातून श्रद्धावस्थेकडे घेऊन जाणारे आध्यात्मिक महात्मे पूजनीय होतात!देवत्वाला पोहचलेले असतात!मन विकारावर मनन, चिंतन, उपासना, योगा, व्यायाम सारखे गुणकारी औषधी देऊन माणसांवर उपचार सुरु होतो!सदाचाराचां सात्विक नितीधर्म शिकविणारे गुरु सर्वसामान्य माणसासं देवाची ओळख करून देत असतात!
आम्ही दिनांक ०१ एप्रिल २०२४ रोजी श्री.ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या कृपाशीर्वादानंतर पुढील देवदर्शन मार्गांवर निघालो होतो!डोळे अन मन अस्थिरतेकडून स्थिरतेकडे प्रवास करीत होते!चंचलतेकडून
ज्ञानगर्भाकडे वाटचाल सुरु होती!देवदर्शनाची तृष्णा व्याकुळ करीत होती!बस पळत होती!जातांना आमच्या मार्गांवर एक अंत्यविधी दिसला होता!लोक समुदाय जमला होता!अंत्यविधीतील देह चंदनातं जळत होता!लाकडातून विस्तव, विस्तवातून राखेत जातांना दिसला होता!
भस्म होतांना दिसत होता!स्मशान भूमीत स्मशान शांतता होती!रक्ताचे,जवळचे अश्रू गाळीत होते!स्मशानातील दृश्य पाहून डोळ्यात न सांगताही पाणी आलं होतं!का कोण जाणे अर्थ समजत नव्हता!वेळ काळाप्रमाणे सर्वांना जायचंचं आहे!
आमची बस हळूहळू पुढे जात होती!स्मशानातील ते दृश्य डोळ्यासमोर येत होतं!मनात आलं…’आपण जीवंत आहोत तोवर चांगलं ते वाटत राहू!नंतर सरणावर जायचंच आहे!मी,माझा स्वार्थ गळून जाऊ देऊ!’ खरचं दुसऱ्यांसाठी जगता येतं,थोडं जगून पाहू!डोळे पुढील दृश्य टिपण्यात सरसावले होते!
अर्ध्या तासानंतर सोलापूर जिल्यातील अकलूज जवळ पोहचलो होतो!एका उंच टेकडावर बस थांबली!खूप मोठी फळबाग अन मसाले उपयुक्त झाडांची विशेष बाग होती!बागेत अतिशय सुरेख अन सुंदर बांधकाम असलेलं आनंदी गणेशाचे मंदिर होतं!मंदिराचे बांधकाम आधुनिक पद्धतीच होतं!श्री गणेशासमोर मनोभावे नतमस्तक होत आपोआप हात जोडले गेले होते!श्री गणेशाच्या सुंदर मूर्तिकडे पाहात राहावेसे वाटत होत!
विघ्नहर्त्याच्या पायांवर डोकं ठेवलं!तेथून जवळच असलेल्या महादेव मंदिरात गेलो!बाहेर उभे असलेले नंदी एकाग्रतेने महादेवाच्या पिंडीकडे पाहात असलेले दिसलें!आम्ही देखील शंभु महादेवाच्या पिंडीवर हस्तस्पर्श करीत माथा टेकवला होता!महादेव शिव हृदयात ठेवून बसवून अकलूज शहराकडे निघालो होतो!शहराच्या बाहेर सयाजीराव वॉटर पार्क आहे!भव्य-दिव्य आहे!आम्ही वेळे आम्ही वेळेअभावी तिकडे गेलो नव्हतो!
अकलूज आशिया खंडातील सर्वात प्रगत ग्रामपंचायतीचं शहर आहे!अनेक सुविधा उपलब्ध आहेत!येथील राजकीय महत्वाकांक्षा अन नेतृत्वास याचं श्रेय द्यावं लागेल!शहर देखील उत्तमरित्या वसंविले आहे!
येथील आकलाई माता देवी अकलूजचं ग्राम दैवत आहे!संध्याकाळी पश्चिमेस सूर्यनारायण आपला रथ क्षितिजापलीकडे घेऊन निघाला होता!थकलेला सूर्यदेव विश्रांतीसाठी पलीकडे निघाला होता!पश्चिमेसं तांबूस छटा पसरू लागली होती!मावळत्या समयी आम्ही अकलूजचीं आकलाई देवीचं दर्शन घेत होतो!
अतिशय भव्य दिव्य प्रवेशद्वारातून आत निघालो होतो!सभोंवतालचा सुंदर परिसर मन वेधून घेत होतं!आकलाई देवीच्या मंदिरातील शांत वातावरण हृदयाला भावलं होतं!
गर्भगृहातील देवीची मूर्ती आशीर्वाद देत होती!रांगेने देवीमूर्ती जवळ गेलो अन दोन्ही हात जोडले गेले होते!



देवीची मूर्ती डोळ्यातून हृदयात बसवत होतो!अकलूजच्या ग्रामदेवतेचं दर्शन घेत होतो!सूर्यनारायण कधीच पश्चिमेला क्षितिजापलीकडे निघून होता!अंधाराच्या गडद छायेत अनंत प्रकाशित पथदिवे उजेड देत होते!आकालाई माता मंदिर देखील प्रकाशात उजळून निघाले होते!मातेचा नमस्कार करून आशीर्वाद घेत बसमध्ये जाऊन बसलो!अंधारात दिव्यांच्या उजेडसाक्षीने बस पंढरपूरकडे निघाली होती!
नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-०६ एप्रिल २०२४
श्रीहरी विठ्ठलद्वारी-पंढरपूर
देवाचीया भेटी
(श्रीहरी विठ्ठलद्वारी-पंढरपूर)
भाग-०६
नानाभाऊ माळी
भक्ती रसात अखंड आकंड डुंबावं!भक्ती रसात न्हाऊन निघावं!चिंब चिंब हृदयी स्वतःस बघावं!जगणं सारं त्यांचंच व्हावं!सुखांदे आमुचं जीवन जावं!पंढरपूरी बसलेला विठू अवघ्यां भक्तजनांची माऊली आहे!कोणी त्याच्या खांद्यावरी बैसला!कोणी कटेवरी बैसला आहे!कोणी बोट धरून चालला आहे!भक्तवत्सल कनवाळू माऊलीच्या दर्शनाला महापूर लोटला आहे!भक्तांचा मेळा ताल मृदूंगाच्या अवीट गोड ध्वनीत दंग झालेला दिसतोयं!मनात,तनातं, विठ्ठल निवासाला दिसतोय!पांडुरंग भक्तीचां गोडवा चौफेर पसरला आहे!अपार महिमेत पाय आपोआप चंद्रभागे तिरी वळताहेत!विठ्ठलाच्या गोजिऱ्या रूपास भुलून भाववेडा भक्त भजनी दंग झाला आहे!🚩
पंढरपूरचां सावळा विठ्ठल अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत!भगव्या पताकांच्या दिंड्या गावागावाहून निघत असतात!भगवंत भक्तीत,विठ्ठल आराधनेत चित्त हरवून बसलेला भक्त हाती टाळ घेऊन भजनात तल्लीन झालेला दिसतो आहे!मृदूंगावर हातांची तालबद्ध थाप पडतं आहे!संतांच्या दिंड्या निघालेल्या आहेत! “ज्ञानोबा तुकारामाचा” गजर करीत पालख्या पंढरपूर दिशेने निघाल्या आहेत!संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी येथून तर जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी देहूगावातून निघाली आहे!अजूनही महाराष्ट्रातून अनेक संत महात्म्यांच्या पालख्या निघाल्या आहेत!अवघड वाट पार करीत!भजनात विठ्ठल रस ओतीत!कर्णमधुर भजनातून विठ्ठल आळवीत वारी निघाली आहे!एकचं ध्यान लागले आहे!आसं लागली आहे,’माझा विठ्ठल,माझा पांडुरंग, माझा सावळ्या हरी,माझा जगण्याचा श्वास मला भेटावा!’
एक एक दिंड्या दिंडीस भेटतात!पालख्या भेटतात!वारी विठ्ठलाद्वारी येऊन पोहचते!भोळ्या विठ्ठलाचां भोळा भवसागर,चंद्रभागेतीरी येऊन पोहचला आहे!भजनी दंग झालेला विशाल सागर वाळवंटी पोहचला आहे!विठ्ठल नामाचा गजर सुरु आहे!भाव भक्तीचा गजर सुरु आहे!भक्तीत चिंब भिजलेल्या अवीट गोड अभंगासंगे टाळ-मृदूंग कानास विठ्ठलापाशी नेत आहेत!डोळ्यासमोर एकच वाट दिसत आहे!ती वाट विठ्ठल मंदिराकडे जात आहे!नाचत,वाजत,गात एक एक पावलं विठ्ठल भेटीसं निघाला आहे!जीव व्याकुळ झालेला आहे!हृदयात वसलेला पांडुरंग कमरेवर हात ठेवून उभाचं आहे!व्याकुळ झालेला भोळा भवसागर नतमस्तक होऊन विठ्ठलास डोळ्यांनी प्रासुन असतात!
भगवंत भेटीच्या आशेने मन व्याकुळ झालेलं असतं!विठ्ठलाचीं आसं आणि ओढीने मन त्याच्या ठायी लागलेलं असतं!भक्तजणांचा महासागर चंद्रभागेतिरी विखूरलेला असतो!अंतकरणातं तळमळ असतें ती विठ्ठल दर्शनाची!तगमग असतें ती विठ्ठल भेटीची!विठ्ठलमय झालेला भोळा वारकरी देव दर्शनाच्या आशेने आलेला असतो!कोण बोलवत यांना?कोण सांगत यांना?येथे बोलवणारा कोणीही नाही!तरीही लाख-लाख पावलं आपल्या आराध्याच्या दर्शनासाठी पंढरपूरी येत असतात!
कोणी विठ्ठलाचां बोट धरून असतो!कोणी करकटेवर असतो तर कोणी निस्सीम भक्त विठ्ठलाच्या खांद्यावरी बसलेला असतो!कुटुंबवत्सल पांडुरंग आपल्या लेकरांना अंगाखाद्यावर घेऊन मिरवत असतो!आपल्या सावळ्या रूपाचं दर्शन देत असतो!अनंत अनंत युगांपासुन भक्त पुंडलिकाने दिलेल्या विटेवरी जगदंपालनहार उभा आहे!पायी वारी, दिंडी, पालखी, बस, मोटर अशा अनंत मार्गानी भक्तीच्या आशेने आलेला वारकरी आपल्या आराध्याच्या दर्शनाभिलाषेने येत असतो!
कानडा! विठ्ठल!पांडुरंग!भक्तीचा भुकेला हरी!लाखो लाखो भक्तांना आपल्या कवेत घेत असतो!मायेने आपल्या कुशीत घेत असतो!अशा भक्तवत्सल विठ्ठलाच्या चरणी लीन होण्यासाठी आम्ही दिनांक ०१ एप्रिल रोजी पंढरपूर गेलो होतो!आम्ही पंढरपूरातं पोहचलो तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते!
रात्री भावभक्तीने चंद्रभागेतीरी गेलो!वाळवंटीचं दर्शन घेतलं!विठ्ठलाच्यां संत नामदेव पायरीवर डोक ठेवलं!संत चोखोबांचें आशीर्वाद घेतले!पंढरपूरच्या हरीचं मुख दर्शन घेतलं!कित्येक दिवसांची मनोकामना पूर्ण झाली होती!माझी आस्था अन
श्रद्धेला साक्षात ह्याच हातांनी स्पर्श करीत होतो!साक्षात देवाला हृदयी बसवत होतो!आराध्यासं डोळेभरून पाहात होतो!देह हृदयासह अर्पित करीत होतो!


पांडुरंगाशिवाय जीवन अपूर्ण आहे!वारी एक ओळख आहे!पांडुरंगास भेटण्याची आतुरता, ओढ असतें!वारी स्वतःस जगण्याची मार्गदर्शिका आहे!
आशा,आसं,आराध्य एक झाले होते!मी स्वतःसं जगदपित्या चरणी अर्पित करीत होतो!माझ्या मनचक्षुनी देव दर्शन करीत होतो!मी मी राहिलो नव्हतो!जगदस्वामीतं विलीन होतं गेलो!रामकृष्ण हरी नामात दंग झालो होतो!माझ्या अस्तित्वाच्या अस्तित्वाच्या रेषा पुसट होत गेल्या होत्या!हरी नाम ठळक ऐकू जात होते!आम्ही श्री गजानन महाराजांच्या पंढरपूरातील मठात मुक्कामी होतो!रात्रभर ‘हरी’ हृदयास घट्ट पकडून ठेवले होते!बाळ आईच्या कुशीत बसतं तसं विठ्ठल कुशीत ढूस्या मारीत राहिलो होतो!पान्हा शोधित राहिलो होतो!विठ्ठल माऊलीला पान्हा फुटत होता!आम्ही विठ्ठलामृत पीत होतो!
… नानाभाऊ माळी
हडपसर,पूणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-०८ एप्रिल २०२४
देवाचिया भेटी
🌹🚩💐🚩🌹🚩
(भगवंत मंदिर-बार्शी,श्री योगेश्वरीमाता मंदिर-अंबाजोगाई)
(भाग-०७)
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
****************************
… नानाभाऊ माळी
दररोज सूर्य उगवतो आहे!दररोज सूर्य मावळतो आहे!वेळ काळाचं योग्य नियोजन करून पृथ्वी सूर्याभोंवती फिरते आहे!योगेयुगे
तहहयात फिरते आहे!नियमानुसार फिरते आहे!आपणही पृथ्वीचेच अंश आहोत!आईपोटी जन्म घेतला असतो!धरणी मातेच्या कुशीत, निसर्गाच्या कुशीत आपण वाढत असतो!बुद्धी अन वयाने वाढत मोठे होत असतो!सर्व कसं निसर्ग नियमाप्रमाणे घडत असतं!मोठ होता होता काळ वेळे प्रमाणे आपण वृद्ध होत जातो!पृथ्वीवरील जीव सृष्टी देखील वेळेनुसार,काळानुसार जन्म ते मृत्यू असा प्रवास करीत असतें!सर्व कसं अनादी अनंत काळापासून घडत आलं आहे!🚩
मनुष्य प्राणी इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे!आपल्याला बुद्धी नावाचं विशेष ज्ञानिंद्रीय दिल्याने भाव भावनांचा खेळ सतत आपल्या डोक्यात सुरु असतो!आपण जन्मल्या पासून पोटासाठी स्वार्थ,परोपकार,देणे, घेणे, कमविणे या चक्रव्यूवात फसतं जातो!नैतिक,अनैतिक सर्वचं पचवतं मनुष्य जन्माचा प्रवास सुरूच राहतो!मन नावाचं अजून एक चंचल घोडं मानवी देहात उधळत असतं!उधळतांना मर्यादांची सीमा रेषा ओलांडू नये म्हणून सामाजिक बंधन घालून जगणं सुरु असतं!लगाम लावून उधळणारं घोडं नियंत्रित करता येतं असतं!आंस -आसं हव्यासातं लिप्त मनरुपी घोड्याला पाण्याजवळ नेलं जातं असतं!आस्थेजवळ नेलं जातं असतं!आस्था आस्तिक होतें!चौखूर उधळणं कमी होत जातं!मन हव्यासापासून अलिप्त व्हायला लागतं!दूर जायला लागतं!पृथक व्हायला लागतं!व्याकुळतेची ओढ लागायला लागते!मन संतुष्टीकडे ओढ लागते!तृप्तीकडे वाटचाल सुरु होते!आस्था श्रद्धा होऊ पाहते!🚩
आम्ही अशाचं श्रद्धेच्या पायरीवर डोकं ठेवायला गेलो होतो!आस्थेचीं आस्थेवाईकपणे ओळख करून घ्यायला गेलो होतो!हृदयातून ओळख करून घ्यायला गेलो होतो!मन शांतीसाठी गेलो होतो!श्रद्धातत्व समजून घ्यायला गेलो होतो!दिनांक ०१ एप्रिल २०२४ ते ०४ एप्रिल २०२४ दरम्यान देव यात्रेसाठी गेलो!🚩
०२ एप्रिल रोजी महाराष्ट्राचं श्रद्धादैवत,आराध्य दैवताचं दर्शन घेऊन पंढरपूरहुन निघालो होतो!पुढील प्रवासाला निघालो होतो!कडक उन्हाळ्यातील उगवत्या सूर्यनारायणाचा प्रसन्न मुखडा मनमोहक दिसत होता!आमची बस पळत होती!सोलापूर जिल्ह्यातील बार्शीकडे पळत होती!रस्त्यावर थांबून सकाळचा नाश्ता उरकला!सकाळचें नऊ वाजले होते!एप्रिल महिन्याचं बार्शीतील उन जाणवायला लागलं होतं!
भगवंत मंदिर अर्थात विष्णू मंदिर!अतिशय प्राचीन मंदिर आहे!बार्शी शहर ऐतिहासिक शहर आहे!शहरातील हे भगवंत मंदिर दगडी शिल्पातील कलाकृतीचा उत्तम नमुना आहे!मंदिराच्या कळसाकडे नजर टाकल्यावर छोट्या मोठ्या अतिशय सुंदर अशा कोरीव मुर्त्या मन मोहून घेत होत्या!बाहेर लाकडी सभामंडपावर अतिशय सुंदर कारगिरी केलेली दिसत होती!सुताराचं कसब त्यातून दिसत होतं!गाभाऱ्यातील भगवंत मूर्ती सर्वांग सुंदर दिसत होती!गाभाऱ्याभोवती दगडातील कोरीव नक्षीकाम पाहून घडवणाऱ्या शिल्पकारास नतमस्तक व्हावसं वाटत होतं!बार्शी शहरातील भगवंत मंदिरातं जाऊन मूर्तीवर माथा टेकवला!भगवंतास हृदयी घेत श्रद्धामृत हृदयी घेत राहिलो!श्रद्धा फळाला येत होती! भगवंतास अर्पण करून आम्ही बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईकडे प्रयाण केले होतं!🚩
अंबाजोगाई येथील योगेश्वरी माता देवी पार्वती मातेचं साक्षात दिव्य रूप आहे!अंबाजोगाई शहर पौराणिक आणि ऐतिहासिक शहर आहे!जयंती नदीच्या काठावर असल्याने प्राचीन काळी जयवंती नगर म्हणूनही ओळखले जातं होतं!जोगाईची अंबाबाई जागृत देवस्थान आहे असे समजले जाते!हे देवस्थान शक्ती पिठांपैकी अर्ध शक्तीपीठ म्हणून ओळखलं जातं!विद्येचे माहेरघर असलेलं अंबाजोगाई म्हणजे आस्था आणि श्रद्धेचां परिपाठ आहे!🚩
योगेश्वरी मातेचं दर्शन थेट गाभाऱ्यात जाऊन घेता येतं!पूर्णतः घडीव दगडात असलेलं यादव कालीन मंदिर भक्तांच्या श्रद्धेचं ठिकाण आहे!योगेश्वरी देवी मुळात कोकणातील लोकांची कुलस्वामिनी आहे!श्री योगेश्वरी मातेचा विवाह परळीतील श्री वैजनाथ यांच्याशी होणार होता!पहाट झाली!कोंबड आरवलं!विवाह मुहूर्त टळला होता!विवाह न होता देवी कुमारीकाचं राहिली!कोकणातील देवी कोकणात न जाता येथेच राहिली!अशी आख्यायिका आहे की दंतासूर नावाचा असुराचा वध जोगेश्वरी मातेने केला आहे!मंदिरात देवीची मूर्ती असून पाच मजली कळस आहे!उत्तम कलाकृतीचां संगम आहे!श्री योगिश्वरी माता योगसाधनेची देवता मानली जाते!नागांच्या राजाची राजकन्या म्हणूनही योगेश्वरी मातेच महत्व आहे!
मंदिरातं दोन दीपमाळा असून उत्तर प्रवेश द्वारातून आत जाता येतं!येथे शतचंडी होम केला जातो!अभिषेक केला जातो!देवीमाता उत्तराभिमुख आहे!श्रद्धामाता श्री योगेशरी देवीचं दर्शन घेऊन बाहेर पडलो!हृदयी आनंद सागर काठोकाठ भरला होता!दर्शन अभिलाषेनें आलो होतो!हृदयी तृप्तीचा आनंद घेऊन निघालो होतो!पुढील देवदर्शन परळी वैजनाथसाठी निघालो होतो!
.नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-१३ एप्रिल २०२४
देवाचिया भेटी
(श्री.परळीवैजनाथ ज्योतिर्लिंग)
भाग-०८
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
**************************
…नानाभाऊ माळी
कोण मी कुणासंगे
पुढे चाललो आहे
शोधित स्वतःलाही
कधी ना कळलो आहे!🚩
खेळ हा भ्रमाचा
युगानयुगे सुरूचं आहे
कळले ना कुणासही
हा कठीण बुरुज आहे!🚩
‘अंतर’ या शब्दातून अनेक गोष्टींचा अर्थबोध होत असतो!इंग्रजीमध्ये आपण space म्हणतो!कधी distance म्हणतो!जेथे भावनेचा उमाळा जन्म घेतो तेथे space चां निश्चितचं काहीतरी संबंध असावा! space शब्दातून ‘अंतराळ डोळ्यासमोर येतं असतं!अंतराळ अतिविशाल आहे!कल्पना करवत नाही इतकं विशाल आहे!पण कल्पनेत जाऊन येऊ शकतो!खरचं अंतरळाचीं पोकळी अगम्य आहे का?अनाकलनीय आहे?किलोमीटर मध्ये मोजता येतं नाही इतकं अनाकलनीय आहे!त्याची निर्मिती कल्पनेच्या बाहेर असावी!अंतराळ पोकळी अर्थात space मानवी मनाच्यां पलीकडे असावं!निर्मितीचा ऐतिहासिक सिद्धांत सांगितला जातो!इतिहास तंतोतंत जुळत नसतोच!सगळं काही चमत्कारिक,अनामिक, आगम्य अनाकलनीय असतं!याला ब्रह्मांड म्हणतं असतो का?🚩
ब्रह्मांड नजरेत भरल्यावर देवत्व ओढीचा सिद्धांत हृदयाला ओढायला लागतो!सत्यत्वाकडे घेऊन जाणारं space गृहीतक हृदयाला पोहचत असतं!धार्मिक आस्थेकडे नेत असतं!का कोण जाणे आपण श्रद्धाळू होऊ लागतो!श्रद्धा अंतरात्माचा खोल बोल असतो!शतकानू शतके मागे गेलें असतील,दृश्यरूपात श्रद्धेच्यां खाणाखुणा बोलावित असतात! भावनेच्या तराजूत आपण श्रद्धेचं सकारात्मक मोजमाप करू लागतो!सश्रद्ध होऊन नतमस्तक होऊ लागतो!विज्ञातील गृहीतकं भावनेच्या तराजूत मोजू लागतो!भावना जडल्यावर बुद्धी हृदयात जाऊ पहाते!हृदय बुद्धीच्या पदरी सुसंस्कारीत जगण्याचं मापट टाकते!…..बघा ना!!धार्मिक सश्रद्ध भावनेतून पाहिलं तर दिसतंय…ज्याचां प्रारंभ माहीत नाही,शेवटही माहीत नाही!असाही अनादी अनंत,या space पोकळीचा अनाकलनीय, गूढ स्वामी जटाधारी भगवान शंकर असावा!हिचं सश्रद्ध भावना हृदयात उतरते आहे असं समजू या!महादेव अनादी अनंत आहे!त्याच्या अस्तित्वाच्यां अनंत अख्यायिका सांगितल्या जातात! पिढ्यानं पिढ्या आपण ऐकतो आहोत!भारतात अनंत प्राचीन मंदिरं शिवास्तित्वाची ग्वाही देतअनंत काळा पासून उभी आहेत!….आम्ही यात्रेकरू दिनांक ०२ एप्रिल २०२४ रोजी अंबाजोगाई योगेश्वरी मातेच दर्शन घेऊन श्री.परळीवैजनाथ महादेवाकडे निघालो होतो!🚩
मी माझा असूनही
माझाचं होत नसतो
अहो आहे भ्रम सारा
भास मृगजळ आहे!🚩
सूर्य साक्षी असतो
सत्ता हाती घेऊन
रात्र निघून जाते हो
प्रकाश ठसे मागे ठेवून!🚩
महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई पासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर परळीवैजनाथ आहे!रस्ता घाट माथ्याचा असला तरी उत्तम आहे!श्री.परळीवैजनाथ १२ ज्योतिर्लिंगां पैकी एक असून ०९ वे जोतिर्लिंग आहे!बघा ना,अंबाजोगाई पासून फक्त २५ किलोमीटर अंतर आहे!योगेश्वरी माता अर्ध शक्तीपीठ आहे तर परळीवैजनाथ ज्योतिर्लिंग आहे!अशी प्राचीन अख्यायिका आहे की……. लंकाधिपती रावण महाशिवभक्त होता!कैलासातं महादेवास प्रसन्न करून रावण शिवलिंग घेऊन लंकेकडे निघाला होता!जाता जाता एका ठिकांनी त्याला लघुशंका आली होती!त्यानें गुऱ्हाकी असलेल्या देवाच्या हाती दिली होती!वजन खूप असल्यामुळे भार पेलवनं शक्य नव्हतं!वजन सहन न झाल्याने ते शिवलिंग श्री गणेशानी तेंथेचं जमिनीवर ठेवले!शिवलिंग तेथेचं स्थापित झाले!त्या ठिकाणाचं नाव श्री.परळीवैजनाथ ज्योतिर्लिंग तीर्थस्थळं म्हणून प्रसिद्ध पावले होते! येथील मंदिरं अतिशय टणक काळ्या पाषाणातील आहे!कालांतराने मंदिराचा जीर्णोद्धार महाराणी अहिल्यादेवी होळकर यांनी केला होता!
मराठवाड्यात असलेली श्रद्धा तीर्थक्षेत्रे अन मंदिरं म्हणजे दगडातील अप्रतिम कलाशिल्प आहेतं!प्राचीन भारतीय संस्कृतीचे प्रवाही द्योत्तकं आहेत!तेथे जाऊन नतमस्तक व्हावं!जीवनाभूतीचा अध्यात्मिक अन आत्मिक सुख शोधावं!आनंद घेत जगावं!नवी दृष्टी घेत जगावं!मन अन अंतरात्म्याचीं कल्पनातीत नाळ जोडून जगावं!भगवंतास हृदयी घ्यावं क्षणभंगूर जगण्यातून सश्रद्ध भक्कम मार्ग बनवून घ्यावा!देवाचं अगम्य, अनाकलनीय रुपाला नतमस्तक व्हावं!देवदर्शन घेत अनादी अनंतांचां सोईस्कर रस्ता बनवून घ्यावा!ज्याची सुरुवात अन शेवटीही कळतं नाही,ज्ञात नाही अशा महादेव स्वरूप परळी वैजनाथांच्यां दर्शनाला गेलो होतो!
माणसं एकमेकांना space देत जगत असतात!space ऐवजी स्पर्शातून जगणं आंतरिक सुख देत असतं!महादेवाच्या पिंडीवर हात ठेवून पाहावा!भावविभोर होत सुखाणंद होतो!होणारा हा आनंद अनंत काळ टिकत असतो!साक्षात ज्योतिर्लिंग महादेवास शरण गेलो होतो!श्री. परळीवैजनाथ महादेव भक्त वत्सल आहे!भोळा आहे!सेवेस प्रसन्न होतो!माणसांना मोकळीक हवी असतें!
देवास सवड असतें!महादेवाचं space अतिविशाल आहे!आम्हा सर्वांना सामावून घेण्याइतपत मोठं आहे!इथं अंतर(distance )पुसलं जातं असतं!येथे अंतरात्म्याच्या आवाजातून पुकारा होत असतो!हर हर महादेवाचा जय जयकार होत असतो!अशा भावभोळ्या श्री.परळी वैजनाथांकडे भावफुलं वाहायला गेलो होतो!स्वतःसं अर्पण करण्यासाठी गेलो होतो!🚩
कडक उन्हाळा होता!चटका बसत होता!मंदिरात शीतलता होती!महादेवाच्या विशाल शांत स्वरूपाचं दर्शन होतं!अखंड पाषाणातील अतिशय सुरेख गर्भगृहात मन प्रसन्न झाले होते!अशी अख्यायिका सांगितली जाते की श्री.परळी वैजनाथ महादेवाचा विवाह श्री.योगेश्वरी मातेशी होणारं होता!पण पहाट झाली!अंबाजोगाईतील विवाह मंडप दगडात रूपांतर झालं होतं!विवाह होऊ शकला नव्हता!श्री परळी वैजनाथ महादेव येथेच राहीलें!….असं म्हणतात की देवदर्शनानें पाप मुक्त होतं असतो!वाईट कर्मास मन धजावतं नसतं!अशा भोळ्या भाबळ्या महादेवाच्या चरणी स्वतःस अर्पण करण्या गेलो होतो!श्री.परळी वैजनाथ येथे गेलो होतो!अंतःकरण समाधानाने न्हावून निघालं होतं!या जन्माचं सार्थक झालं होतं!🚩
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*************************
… नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-१७ एप्रिल २०२४








Pingback: kanifnath mandir trek कानिफनाथ ट्रेक कष्टाचा देव - मराठी 1
Pingback: satyashodhak movie सत्यशोधक चित्रपट - मराठी
Pingback: sri rama navami 2024 श्रीराम नवमीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा - मराठी 1
Pingback: पांडुरंगा - मराठी 1
Pingback: शब्दात जीव ओतणारें कलाकार - मराठी