येरे येरे पावसा
येरे येरे येरे पावसा!
येरे येरे येरे पावसा!
रुसलास तू कां असा?
नाही सरता सरे विपदा
पेरणी मी करू कितिदा?
पाव आता तरी राजसा
रुसलास तू कां असा?
उरी कर्जाचा डोंगर ऊभा
वर तू छळतो गरिबा उगा
जगण्याची नुरे लालसा
रुसलास तू कां असा?
ऋण घेऊनी आलो जगी
पाहिली ना सुखाची सुगी
हीणवितो मला आरसा
रुसलास तू कां असा?
लेक लग्नाची झाली तरी
फुटकी दमडी उरेना करी
तू ही झालास वैरी कसा?
रुसलास तू कां असा?
वाट पाहून ‘किरण’ भागला
थांग नाही तुझा लागला
कुठवरी चालवू वारसा?
रुसलास तू कां असा? रचनाकार-
आमच्या खान्देशातील चाळीसगावच्या पंचक्रोषित अजूनही हवा तसा पाऊस पडलेला नाही, त्यामुळे बळीराजा हवालदिल झालेला आहे. त्याच्या अंतर्मनातील व्यथा-वेदना येरे येरे येरे पावसा!
या कवितेतून व्यक्त करण्याचा प्रयत्न करीत आहे.
शिवाजी साळुंके,’किरण’
चाळीसगाव, जि. जळगाव.