मराठी कविता संग्रह प्रेम नाही उमगले
प्रेम नाही उमगले
पुरे झाल्या हाका तुझ्या,
तुझे इशारेही पुरे….
प्रेम नाही उमगले,
प्रिये तुला खरेखुरे…
समजली का प्रेमास,
नेत्रपल्लवीची धिटाई…
प्रेम नाही प्रिये स्वस्त,
बाजारातली मिठाई…
नको थांबू रस्त्यावर, घेउनियां हारतुरे.. 1..
प्रेमातुर कलिके गं,
प्रेम असते गं काय…
आचेवर तापलेल्या,
गोड गोरसाची साय….
प्रेम म्हणजे दुःखाच्या,
हाती हात घालणं…
प्रेम म्हणजे अद्वैताच्या,
वाटेवरती चालणं…
एकास रुते काटा,
दुजा अडखळे पाय..2..
प्रेम म्हणजे काय तर,
प्रेमनिष्ठ हवा त्याग….
आप.. पर त्यजुनिया,
कवटाळी उरी आग…. निज पाऊली जाऊन,
चितेवर गं निजनं….
तया ठावे प्रेमवर्षा,
चिंब सचैल भिजणं…
दिव्य ज्यास नाही ठाव,
शोधू नये त्याचा माग.. 3..
प्रेम म्हणजे आगीच्या,
ज्वाले संगती नाचणं…
प्रेम म्हणजे कबीराचे,
ढाई अक्षर वाचणं…
विरहाच्या आकाशात,
फडफडे त्याचा अर्थ…
गवसला नाही तर,
पंख झडतात व्यर्थ….
मग ह्रदयाच्या गर्तेत,
ढीग सयेचा साचणं.. 4..
दऱ्याखोऱ्या लाथाडोनी,
नदी सागरा भेटते…..
प्रीत पूस त्या दिव्याला,
तुझी वात का पेटते….
आकाशाचं धरेवर,
पर्जन्यमिसें पडणं….
वर्षा म्हणजे धरेसाठी,
आकाशाचं रडणं…..
मातलेले वादळही,
अंगी येऊन खेटते.. 5..
सर्व काही कळूनही,
करशील का हिम्मत…
माजलेला समाजही,
काय मागेल किंमत….
मनु निर्देशित राणी,
उभ्या जागोजागी खस्ता…
कामी बोळवणी आला,
प्रिये, कित्येकांचा बस्ता….
बळ असे आहे काय,
तर मी नक्की सम्मत.. 6..
प्रकाश पाटील, पिंगळवाडे.
